Next
बरसणार कवितेतला पाऊस...
BOI
Monday, June 19, 2017 | 06:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : मेघांची दाटी... हिरवाईचा स्पर्श... आसमंतात दरवळणारा मृद्गंध... आषाढाचा पहिला दिवस... पावसाची चाहूल आणि आबालवृद्धांना भुरळ घालणारा सदा सनातन आणि तरीही चिरतरुण पाऊस... त्याने महाकवी कालिदासापासून आजच्या कवींपर्यंत सर्वांना वेड लावले. आणि हा पाऊस गेल्या अनेक शतकांपासून कवितांमधूनही तितक्याच उत्कटपणे बरसतो आहे. लहानपणापासून शिकलेल्या, ऐकलेल्या, पाठ केलेल्या पावसाच्या कविता... महाकवी कालिदासापासून ते बालकवी, केशवसुत, बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर, ग्रेस, अनिल, निकुंब, कुसुमाग्रज, बहिणाबाई, इंदिरा संत, पद्मा, ना. धों. महानोर ते थेट अरुणा ढेरेंपर्यंत अनेक नामवंत कवींच्या पावसाविषयीच्या कविता समाविष्ट असलेल्या आणि मराठी काव्यसृष्टीतील पावसाच्या थेंबांचा पाठलाग करणाऱ्या ‘शब्दांचा पाऊस’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. 

महाकवी कालिदास दिनाच्या निमित्ताने होणारा हा विशेष कार्यक्रम २६ जून २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ. माधव मुतालिक यांचे असून, ते आणि डॉ. मैत्रेयी मुतालिक हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली असून, रसिक श्रोत्यांनी या कवितांमध्ये चिंब होण्यास जरूर यावे, असे आवाहनही केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search