Next
धास्ती अंतर्ज्ञानासंबंधीची...
BOI
Thursday, April 05, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

ज्येष्ठ कलावंत दत्तात्रय आपटे

‘बाजूला नांगरट होऊन पावसाची वाट पाहणारी जमीन वाटावी असा काहीसा आभास होणारी कलाकृती या प्रदर्शनात होती. एखाद्या किल्ल्याचे आकाशातून दिसणारे मनोहारी दृश्य होते. बुरुज, तटबंदी, तळी, वस्ती, वाटा, पायवाटा, प्रवेशद्वारे आपण पाहू शकू ते सगळे काही या प्रिंट्समध्ये दिसत होते. तीन-तीन फुटांपर्यंत आकारमानातील असे मोठे प्रायोगिक प्रिंट करायला एका प्रकारचे साहसच लागते, माध्यमावर प्रभुत्वच लागते, हे सगळे आपटे सरांचे प्रदर्शन पाहताना मनात रेंगाळत होते.’... ‘स्मरणचित्रे’ सदरात आजचा लेख दत्ता आपटे या ज्येष्ठ कलावंताच्या कलाकृतींबद्दलचा...
............
दत्ता आपटे हे दिल्लीस्थित कलावंत. पुण्यात व मुंबईत २००५ साली झालेल्या त्यांच्या प्रदर्शनाच्या कॅटलॉगच्या शीर्षकाचे मराठीमध्ये भाषांतर करायचे झाल्यास ते ‘धास्ती अंतर्ज्ञानासंबंधीची’ असे करता येईल. हे शीर्षक जरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राच्या सरहद्दीवरील वाटले, तरी त्यांची त्या प्रदर्शनातील बहुतेक चित्रे एखाद्या गरुडाच्या दृष्टिकोनातून जग पाहावे, तशी होती. एकदा आपण त्यांची दृष्टी घेतली, की चित्रे सहज सोपी वाटतात आणि आपणही एखाद्या पक्ष्याप्रमाणे त्यांचे हे कलात्मक जग आनंदाने अवकाशात भराऱ्या मारत अनुभवू शकतो.

आपल्या आजूबाजूची गावे, शहर, एखादा परिचित-अपरिचित किल्ला असे काय-काय आपण आकाशातून संचारताना पाहात आहोत, असा दृश्यानुभव त्या प्रदर्शनातील कलाकृती देत होत्या. मुंबईतील ताओ आर्ट गॅलरी आणि पुण्यातील सुदर्शन आर्ट गॅलरी अशा दोन ठिकाणी आपटेंचे हे प्रदर्शन पाहता आले.

दत्ता आपटे हे समकालीन कलाजगताला प्रिंटमेकर म्हणून परिचित आहेत. जसा चित्रकार, शिल्पकार किंवा कुंभारकाम करणारा कलावंत असतो, तसा प्रिंटमेकर म्हणजे कलाकृतीच्या प्रतींच्या रूपात  तांत्रिक गोष्टी सांभाळून कलाकृती निर्मिणारा चित्रकार. लाकूड, धातूची प्लेट वगैरेंवर कोरून मग त्याचा छाप कागदावर घेणे अशा बऱ्याच गोष्टी प्रिंट मेकिंग मध्ये येतात. रसायनांचा योग्य वापरही या तंत्रात येतो. ...तर या प्रिंटमेकिंग क्षेत्रात दत्ता आपटे हे नाव भारतातील पहिल्या दहा प्रिंटमेकर्समध्ये अग्रगण्य आहे.

वर उल्लेख केलेल्या प्रदर्शनात त्यांनी प्रिंटची तंत्रे वापरून काही वेगळे प्रयोग केलेले होते. बहुतेक कलाकृतींचे माध्यम म्हणजे कागदाचा लगदा. लगद्याची कलाकृती इतक्या दर्जापर्यंत नेता येते हेच नव्याने पुढे येत होते. अनेक शक्यतांचे पदर आपटे सरांनी अत्यंत कौशल्याने उलगडून दाखवले होते. लहान-लहान ठिपके, समांतर रेषा, कमी उठावात घेतलेले चढउतार, मर्यादित रंगाचा संयमीत वापर हे सगळ पाहिलं की त्यांची संयमी वृत्ती दृष्टिपथात येते. सर्वसाधारण कागदाचा लगदा करणे, अपेक्षित आकाराच्या संयोजनावर त्याचा साचा असावा तसा हा लगदा त्यावर लावणे, मग उसाच्या गुऱ्हाळात असतो तशा या प्रेसमध्ये असलेल्या चरख्यात साचा व लगद्यावर योग्य दाब दिल्यावर त्यावर साच्याची प्रतिमा उमटते. आपटेंची कलाकृती तयार करण्यामागची प्रक्रिया सर्वसाधारणपणे अशी होती. हे जरी असले, तरी साचा हा कलाकृतीच्या बरोबर उलटा (निगेटिव्ह) स्वरूपाचा करावयाचा असतो, म्हणजे अपेक्षित सुलटी (पॉझfटिव्ह) प्रतिमा त्यामधून मिळते. त्यातील तांत्रिकता फार क्लिष्ट आहे आणि आपटेंसारखा कलावंत या गोष्टी सरावाने लीलया हाताळतो. आपण या कलाकृती पाहताना गुंगत जातो आणि अचंबित होतो.एखाद्या पुरातत्त्वज्ञाने उत्खनन केलेले स्थळ विमानातून पाहावे, असा आभास देणारी कलाकृती या प्रदर्शनात होती. बाजूला नांगरट होऊन पावसाची वाट पाहणारी जमीन वाटावी असा काहीसा आभास होणारी कलाकृती या प्रदर्शनात होती. एखाद्या किल्ल्याचे आकाशातून दिसणारे मनोहारी दृश्य होते. बुरुज, तटबंदी, तळी, वस्ती, वाटा, पायवाटा, प्रवेशद्वारे आपण पाहू शकू ते सगळे काही या प्रिंट्समध्ये दिसत होते. तीन-तीन फुटांपर्यंत आकारमानातील असे मोठे प्रायोगिक प्रिंट करायला एका प्रकारचे साहसच लागते, माध्यमावर प्रभुत्वच लागते, हे सगळे आपटे सरांचे प्रदर्शन पाहताना मनात रेंगाळत होते. ‘दी मशीन’ नावाच्या कलाकृतीत अणुऊर्जा प्रकल्पासारखा एखादा अपरिचित भूभाग पाहावा, असा अनुभव येत होता किंवा खाणीच्या प्रदेशातून विहार करीत आहोत का, असाही प्रश्न मनात येत होता. ही कलाकृती लहानच होती. दीडेक फुटाची असेल; परंतु इतक्या लहान आकारात काही एकर भूभागावर संचार करण्याचा अनुभव देणारी होती.दुसऱ्या एका कलाकृतीचे नाव होते ‘प्लीज लिसन.’ त्यामध्ये नाक-ओठ दाखवले होते. वाळूच्या शिल्पाचे समुद्र किंवा नदीच्या किनाऱ्यावर एखाद्या भूभागाचे रूप वाटावे अशा स्वरूपाचे... जणू जमीनच काही सांगू इच्छितेय...‘माझे ऐक’... म्हणून. उन्हाळ्याच्या दिवसांत रस्त्याने जाताना वाळक्या शेंगा झाडावरून पडतात, तसा काहीसा दृश्यानुभाव देणारी एक कलाकृती या प्रदर्शनात होती. कलात्मक दृष्टीने पाहिले, तर ‘पोत’ या कलाघटकाचे असंख्य प्रकार त्या प्रदर्शनात होते. रेघांचे, कापडाचे, रेतीचे, बांधकामाचे, कागदांचे, असे स्पर्शाने अनुभवता येणारे नानाविध पोत होतेच होते. परंतु वर्णनातीत आणि डोळ्यांना भावणारे आकर्षक पोतही होते. या कालावधीत सुदर्शन कलादालनाने त्यांच्याशी संभाषणाची संधी दिली होती. त्या सादरीकरणात आपटेंनी ‘कागदाचा लगदा ही दृश्यभाषा मी स्वीकारली आहे,’ असा उल्लेख केला होता. कागदाच्या लागद्याला वाळायला वेळ लागतो. हा सावकाशपणा त्यांना सुलभ वाटतो. कारण कलाकृती परिपक्व करायला तितका अधिक अवधी मिळतो. कलावंत व कलाकृतीचा संवाद होत जातो. नाते दृढ होत जाते. त्याला हा अवधी मिळतो. बदलांना संधी मिळते. लगद्याचा माल साच्यात ओतणे, त्यातून तो वाळणे आणि पुन्हा त्यावर सफाई देणे ही प्रक्रिया आपटेंसारखे कलावंत जाणीवपूर्वक निवडतात.दत्ता आपटे हे मूळचे सांगलीचे. १९७४ साली महाराष्ट्र शासनाचा चित्रकला विषयातील डिप्लोमा त्यांनी पुण्यात पूर्ण केला. काही काळ ते पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात कलाअध्यापन करीत. नंतर १९८०च्या सुमारास बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात त्यांनी प्रिंटमेकिंग विषयात दोन वर्षांचा पोस्ट डिप्लोमा पूर्ण केला. या सुमारासच रिनी धुमाळ या सुप्रसिद्ध प्रिंटमेकर, चित्रकर्तीशी त्यांचा संपर्क आला व त्यांच्या स्टुडिओत काम करण्याची संधी आपटे यांना मिळाली. पुढे ते दिल्ली येथे स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी प्रिंटमेकर्ससाठी अनेक दृष्टिकोनांतून काम केले. प्रिंटमेकर्सचा गट स्थापन केला, स्वतंत्र प्रदर्शने केली, प्रदर्शने आयोजित केली व इतरही उपक्रम राबवले. काही शैक्षणिक संस्थांना प्रिंटमेकिंग स्टुडिओ उभारण्यास मदत केली. मार्गदर्शन केले. १९७९पासून दत्तात्रय दिनकर आपटे या कलावंताने प्रिंट, वूडकट, वूड एनग्रेन्टिंग, मेसोटिंट आणि पेपर पल्प अशा नानाविध माध्यमांत अनेक एकल प्रदर्शने केलेली आहेत.

पुण्यात पाहिलेल्या त्यांच्या या प्रदर्शनाने कलाकृतींकडे पाहण्याचा एका अर्थाने ‘बर्ड आय व्ह्यू’ दिला आणि प्रिंटमेकिंगची व्याप्ती कलाकृतींद्वारे नव्याने पुढे आली.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(दत्ता आपटे यांच्या प्रिंटमेकिंगच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ सोबत देत आहोत. http://dattatrayaapte.com/ या वेबसाइटवर त्यांच्याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध आहे.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer Bhagwat About 291 Days ago
Very nice article...
1
0

Select Language
Share Link