Next
मेरा छोटासा देखो ये संसार है...
BOI
Sunday, January 06, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

नामवंत अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्मदिन चार जानेवारीला होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आपण आस्वाद घेणार आहोत त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘मेरा छोटासा देखो ये संसार है...’ या गीताचा....
...........
काल अस्ताला गेलेला सूर्य आज पुन्हा एकदा उगवला! त्याचा हा दिनक्रम हजारो वर्षे चालू आहे. आपण मानवांनी त्याची दिवस, आठवडे, महिने, वर्षे यांमध्ये विभागणी करून ‘कालगणना’ सुरू केली आहे. आणि त्यातीलच आणखी एक वर्ष मागे पडून २०१९ हे वर्ष सुरू झाले आणि त्यामधील पाच दिवस संपलेही!

नव्या वर्षाकरिता सर्वांना शुभेच्छा देऊन एक सुंदर, सुखद आणि सोज्ज्वळ व सुंदर नायिकेवर चित्रित झालेले गीत घेऊन रसिक हो पुन्हा तुमच्यापुढे आलो आहे. जानेवारी महिना सुरू झाला आहे आणि ४ जानेवारी हा तिचा जन्मदिवस. चार जानेवारी १९३१ रोजी तिचा जन्म झाला होता आणि ११ ऑक्टोबर २००४ रोजी ‘ती’ हे जग सोडून गेली. परंतु जेव्हा जेव्हा प्रेमळ आई अगर प्रेमळ भावजय (मोठ्या भावाची पत्नी) यांचा विचार चित्रपटप्रेमींच्या मनात येईल, तेव्हा पटकन ओठावर नाव येईल, ‘म्हणजे निरुपा रॉय सारखी ना!’

रसिकहो, प्रेयसी व प्रियकर या नात्याने हिंदी चित्रपटसृष्टीत खूप नायक-नायिकांच्या जोड्या सांगता येतील! परंतु आमच्या पिढीने (म्हणजे १९५५ ते १९६५ या दशकात) मोठा भाऊ आणि मोठी वाहिनी (भावजय) म्हणून अशोककुमार आणि निरुपा रॉय हीच जोडी डोक्यात फिट्ट बसवली होती आणि आजही हीच जोडी त्या स्थानी कायम आहे. 

पती-पत्नी या नात्याने ते पडद्यावर दिसायचे! या वेळी कुटुंबप्रमुख, तसेच कर्तव्यतत्पर, सोशिक, प्रेमळ, मायाळू या सर्व गुणांचे एकत्रीकरण असणारी निरुपा रॉय ही आपल्याच घरातील वाटायची! तशी ती कधी बलराज सहानी यांच्याबरोबरही दिसायची, पण प्रतिमा तीच! आता तो कौटुंबिक चित्रपटांचा काळही ‘भूतकाळ’ बनला आहे; पण आजही निरुपा रॉयचे ‘ते’ रूप पहायला आवडते.

नव्या पिढीला ‘ती’ अमिताभची आई म्हणून परिचित झाली. आम्हाला ती ‘वहिनी’ म्हणून परिचित झाली होती; पण त्याही आधीच्या काळात ‘ती’ पडद्यावर नायिका होती आणि ‘देवी’पण होती. कधी सीतेच्या रूपात, तर कधी पार्वतीच्या रूपात, तर कधी द्रौपदी, दमयंतीसुद्धा!

दाहोद या गावातून आलेली कोकिला भगवानदास चौहान या नावाच्या साध्यासुध्या मुलीला सिनेमा मुळी ठाऊकच नव्हता. तिचे वडील रेल्वेत कामाला होते. वडील काळे-सावळे; पण आई रूपसुंदर होती. कोकिलाला एक बहीण होती. धनगौरी नाव तिचे! ती वडिलांचे रूप घेऊन आली होती आणि कोकिला आईचे. कोकिला चार इयत्ता शिकली आणि १४-१५व्या वर्षी तिचे लग्नही झाले.

किशोरचंद्र बलसारा हे तिचे पती तिला मुंबईला घेऊन आले. त्यांना चित्रपटात काम करण्याची खूप हौस होती. त्याकरिता ते एकदा गेले असताना कोकिलाही बरोबर होती. तिला पाहून तिच्याबद्दलच विचारणा झाली व स्क्रीन टेस्टही झाली. त्यास किशोरचंद्रांनी मोठ्या मनाने संमती दिली.

बी. एम. व्यास यांनी तिला चित्रपटाची नायिका करून ‘मंगलफेरा’ हा चित्रपट तयार केला. तो खूप गाजला. त्यानंतर गाडानु बेल, गुणसुंदरी असे चित्रपट आले. नंतर चंदूलाल शहा यांनी तिला रणजित स्टुडीओत बोलवून घेतले. उर्दू भाषा शिकवली! चित्रपटसृष्टीतील ही वाटचाल सुरू असताना तिच्या जातीच्या लोकांनी ‘सिनेमात जाणे म्हणजे जातीचा कलंक’ असे विचार ऐकवून तिला सिनेमापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिच्या समाजातील काही माणसांनी तर मुंबईत येऊन धमकावले. परंतु आपल्या पतीच्या पाठिंब्यामुळे ती सिनेसृष्टीची पुढील वाटचाल चालू ठेवू शकली. 

जयंत देसाईंनी तिला गुजराती चित्रपटांतून हिंदीत आणले व ‘हर हर महादेव’ बनवला! त्यामध्ये त्रिलोक कपूर शंकर आणि ही पार्वती! मग पौरोणिक चित्रपटांची रांगच लागली. निरुपा रॉय निरुपा रॉय राहिलीच नाही. ती तीन वेळा सीता, तीन वेळा पार्वती, द्रौपदी, दमयंती बनली. मुकुट घालून डोक्याला घट्टे पडले. नागचंपा, नागलोक, नागमणी, नागपंचमी असेही चित्रपट आले. त्यामध्ये ती नागदेवता झाली. कधी पाताळात, तर कधी इंद्रलोकात, शिवलोकात संचार करू लागली. समाजात गेली की तिला सीता, पार्वती समजून भोळ्या बायका पाया पडू लागल्या! 

... पण नंतर बिमल रॉय यांच्या ‘दो बीघा जमीन’ने निरुपा रॉयचे वेगळे रूप चित्रपटप्रेमींपुढे आले. ‘एव्हीएम’च्या ‘भाई भाई’मधून अशोककुमार-निरुपा रॉय ही जोडी पुढे आली. १९५६ साल होते ते! त्यानंतर १३ चित्रपटांतून ही जोडी प्रेक्षकांनी पाहिली आणि पसंतही केली! मधूनच ‘राणी रूपमती’सारखे ऐतिहासिक चित्रपट मिळाले. ‘रझिया सुलतान’ हा त्याच पठडीतला! त्यामध्ये जयराज तिचा नायक होता. त्या दोघांच्या मनीचे भाव असलेले ‘ढलती जाये रात...’ हे लच्छीराम यांनी संगीत दिलेले, मोहम्मद रफी व आशा भोसलेंनी गायलेले सुखद प्रेमगीत श्रवणीय आहे. 

...आणि बदलत्या काळाबरोबर वृद्ध आईच्या रूपात निरुपमाजी ‘दीवार’ चित्रपटातून अमिताभच्या आईच्या रूपाने पुढे आल्या! ‘दीवार’मधील अमिताभ व शशी कपूर यांच्या संवादांइतकेच प्रभावी संवाद त्यांच्याही वाट्याला आले होते व त्यांनी त्यांचे सोने केले. ‘अमर अकबर अँथनी’मध्ये तर त्यांना तीन नायकांची आई बनवले गेले. १९७०नंतरच्या सूडपटात अमिताभशिवाय त्या कधी जितेंद्रच्या आई बनल्या, तर कधी शशी कपूरच्या!

राजस सौंदर्य, अभिनयाची जाण आणि सर्व ज्येष्ठ अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव गाठीशी असतानाही दुय्यम दर्जाच्या अभिनेत्रींमध्ये त्या राहिल्या. कारण आपली कारकीर्द घडवण्याची चतुराई त्यांच्याजवळ नव्हती. पुढे होऊन चार लोकांच्या ओळखी करून घ्याव्यात, आपले नाव पुढे करावे हे त्यांना सुचले नसावे, अशी कबुली त्यांनी एका मुलाखतीत दिली होती. आणि ‘शारदा’मधील मीनाकुमारीची भूमिका करायला आवडली असती, ही मनातील गोष्ट बोलूनही दाखवली होती.

एक संपन्न आयुष्य जगलेली ही अभिनेत्री आपल्या तरुण वयातील, प्रौढावस्थेतील आणि वृद्धापकाळातील अनेक अविस्मरणीय भूमिका मागे ठेवून वयाच्या ७३व्या वर्षी महायात्रेला निघून गेली.

अशा या अभिनेत्रीच्या जन्मदिनानिमित तिच्यावर चित्रित झालेले एक सुंदर गीत! चित्रपट १९५६चा भाई भाई! संगीतकार मदनमोहन! गीतकार राजेंद्रकृष्ण! गायिका लता मंगेशकर! या गीताचे हर्ष गीत व शोक गीत असे दोन भाग या चित्रपटात आहेत. येथे आपण हर्ष गीत पहाणार आहोत. मद्रासचे सिनेमे त्या काळात छान कौटुंबिक स्वरूपाचे होते. अशाच पद्धतीच्या या चित्रपटातील एका प्रापंचिक स्त्रीच्या भावना राजेंद्रकृष्णांनी किती सार्थ शब्दांत काव्यामधून उतरवल्यात बघा! ‘ला लल्लला ला ला ऽऽऽ’ अशा आलापाने लतादीदी गीत सुरू करताना, उत्साहाने, प्रसन्न चेहऱ्याने, सुंदर दिसणाऱ्या निरुपमाजी पडद्यावर दिसतात व त्या सांगतात - 

मेरा जीवन है ये मेरा सिंगार है

(बघा) माझा हा छोटासा संसार (प्रपंच, विश्व, जग) आहे. माझ्या जीवनाचा श्रृंगार/शोभा सारे हेच आहे.
आपल्या पतीला ही पत्नी म्हणते – 

मेरी छोटीसी बगियाँ के ओ बागबाँ 
तेरे दमसे है सारी बहारे यहाँ 
सारे बागों से अच्छा ये गुलजार है

माझ्या या प्रपंचरूपी बगीच्याचा (हे प्रिया तू) माळी आहेस. (अर्थात मला फुलवणारा, माझी काळजी घेणारा असा तू आहेस.) (या बागेतील ही फुलांची) बहार, सौंदर्य (अर्थातच या प्रपंचातील सौख्य) हे सारे तुझ्यामुळेच आहे (आणि त्यामुळेच) सर्व बगीच्यांपेक्षा, उद्यानांपेक्षा (माझा हा संसाररूपी बगीचा) मला जास्त आवडतो, चांगला वाटतो.

आपल्या पतीचे महत्त्व विशद करताना ती पुढे त्याला म्हणते -

मेरा जीवन है एक मुस्कुराहाट तेरी 
मेरी दुनिया है कदमों की आहट तेरी 
तेरे कदमों मेंही मेरा घरबार है 

तुझे एक हास्य माझे जीवन आहे. (अर्थात तुझे सौख्य हेच माझे जीवन आहे.) तुझ्या पदरवांमध्ये माझे जग आहे (तुझे माझ्यासमवेत असणे हेच माझे विश्व आहे.) तुझ्या पावलांजवळच माझे घरबार (कुटुंब, प्रपंच) आहे.

पुढे ‘ती’ त्याला असेही सांगते, की -

छोड के मैं तुझे कोई जन्नत न लूँ 
तेरे बदले में दुनिया की दौलत न लूँ 
मेरी पूजा पिया तेरा दीदार है

तुला सोडून (अगर वगळून) मला कोणी स्वर्ग जरी दिला, तरी तो मला नको! तुझ्या बदल्यात मला जगातली कोणतीही व कितीही संपत्ती दिली, तरी मी ती घेणार नाही. तुझे दर्शन, तुला पाहणे हीच माझी पूजा आहे. 

सर्वस्व अर्पून केलेल्या उदात्त प्रेमाच्या या भावना संगीतबद्ध करताना मदनमोहन यांनी अत्यंत सुरेख संगीत दिले आहे. गीताच्या अखेरीस असलेले ‘हूँ हूँ ऽऽ हूँ’ असे आलापही गीताची मधुरता वाढवतात. शब्द, स्वर, संगीत व पडद्यावरील सोज्ज्वळ निरुपा रॉय... सर्व काही ‘सुनहरे!’

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search