Next
एक तरी ऋचा अंगीकारावी - अथर्वशीर्ष : एक स्व-संवाद
BOI
Wednesday, August 28, 2019 | 12:11 PM
15 0 0
Share this article:

व्यवस्थापन आणि नेतृत्व या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले धनंजय गोखले यांनी गणपती अथर्वशीर्षावर लिहिलेल्या ‘एक तरी ऋचा अंगीकारावी’ या पुस्तकाचे ई-बुक नुकतेच ‘बुकगंगा डॉट कॉम’वर प्रसिद्ध झाले आहे. अथर्वशीर्ष स्वतःची स्वतःलाच ओळख करून देतं, असा अनुभव गोखले यांना आला. त्यानुसार, गणपती अथर्वशीर्षामधील ऋचांचा रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल, हे गोखले यांनी या पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकाची ही तोंडओळख...
..........
‘एक तरी ऋचा अंगीकारावी’ हे धनंजय गोखले (डीजी) यांनी लिहिलेलं पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच प्रकरणाने माझी झोप उडवली. गेली अनेक वर्षं अथर्वशीर्ष म्हणतोय; पण हा असा विचार माझ्या मनामध्ये कधीच का येऊ नये ही चुटपुटसुद्धा मनाला लागली. धक्का बसणं आणि खडबडून जागं होणं हे मी अनुभवलं. ‘गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीसाठी नसून स्वतःसाठी आहे,’ असं ठामपणे सांगणारं आणि अत्यंत सोप्या पद्धतीने ते उलगडून दाखवणारं असं हे पुस्तक आहे. ‘डीजीं’चा व्यवस्थापन आणि नेतृत्व या विषयांमधील दांडगा अनुभव या पुस्तकामध्ये जाणवत असतानाच अत्यंत लाघवी आणि सोप्या पद्धतीने, एक मित्र म्हणून ते हे सगळं आपल्यासमोर मांडतात. 

अथर्वशीर्षावर लिहिलेल्या या पुस्तकामध्ये आकृत्या किंवा तक्ते असतील अशी शंकासुद्धा येत नाही; मात्र संवादशास्त्रावरची एक आकृती समोर येते आणि एक सुखद आश्चर्य वाटतं. अव वक्तारम्, अव श्रोतारम्, त्वम् चत्वारि वाक्पदानि या ऋचांबद्दल डीजी जे मांडतात ते समजावून घेत असताना अंगावर शहारा येतो. या तीन ऋचा जरी अंगात मुरवल्या, ‘डीजीं’चा शब्द ‘अंगीकारल्या,’ तरीसुद्धा स्वतःच स्वतःने आयुष्यामध्ये तयार करून ठेवलेले प्रश्न चुटकीसारखे सुटतील याची पक्की खात्री पटते; मात्र नुसतं पटून उपयोग नाही हे ‘शहाणपणाच्या सप्तपदी’मध्ये घोटवलं जातं. 

खरं आणि खोटं याची संकल्पनाच ‘ऋतम् वच्मि सत्यम् वच्मि’ हे प्रकरण वाचल्यानंतर बदलते. हाती घेतलेल्या कामाशी प्रामाणिक राहणं इतकी सोपी युक्ती बिरबल, द्रोणाचार्य, चोरांचं टोळकं या गोष्टींतून डीजी सांगतात. कमाल वाटते या सगळ्याची. पंचतत्त्वं इतक्या सोप्या पद्धतीनं सांगितलेली मी अजून कुठे वाचलेली नाहीत. या संपूर्ण पुस्तकाचा उद्देशच मुळी स्वतःची जडणघडण करण्यासाठी आहे. 

‘विवेके क्रिया आपुली पालटावी’ या समर्थवचनाप्रमाणे, क्रिया पालटवण्यासाठीचा नुसता विचारच नाही, तर साध्या सोप्या युक्त्या तितक्याच सोप्या भाषेत या पुस्तकात मांडल्या आहेत. विसावं प्रकरण तर मुकुटमणी आहे. ‘आयसिंग ऑन केक’ असं म्हणतात ना तसं. ‘मूलाधार स्थितोसि नित्यं’ असं प्रत्येक वेळी आपण अथर्वशीर्ष म्हणताना म्हणतो; पण स्वतःच्या मूलाधाराची, अस्तित्वाच्या आधाराची साधी दखलसुद्धा घेत नाही, हे जाणवलं. ‘मग, आता पुढे काय?’ असा प्रश्न मनात येतो न येतो तोच, पुस्तकामध्ये लगेच त्याचं साधं सोपं उत्तर सापडतं. 

एकविसावं प्रकरण तर धमाल आहे. नाटकाचा प्रयोग संपतो त्या वेळी कसे सगळे कलाकार एकत्र रंगमंचावर येतात. हे प्रकरण वाचताना तसं काहीसं वाटतं. आणि हे सगळे कलाकार  - ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, अग्नी हे मीच. माझीच एक नाटक कंपनी! शेवटी गुलजार यांची ‘बूढी अलमारी’ ढवळून टाकते. मोठा दिलासा हाच असतो, की नशिबाने हे जुनं कपाट आहे अजून, त्यातल्या माझ्याच हरवलेल्या गोष्टी शोधायच्या आहेत. हे न संपणारं पुस्तक आहे. कदाचित शेवटच्या दिवशीसुद्धा एखादं प्रकरण मी वाचून अंगीकारण्याचा प्रयत्न करत असेन. किंबहुना तसंच व्हावं ही गजाननाचरणी प्रार्थना. ‘डीजीं’ना मनापासून धन्यवाद! सर्वांनी हे ई-बुक अवश्य वाचावं. 

- आलाप कुलकर्णी
............
पुस्तक : एक तरी ऋचा अंगीकारावी - अथर्वशीर्ष : एक स्व-संवाद
लेखक : धनंजय गोखले
प्रकाशक : धनंजय गोखले
पृष्ठे : २००
ई-बुक मूल्य : ३०० रुपये

(‘एक तरी ऋचा अंगीकारावी’ हे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search