Next
भारूड : नृत्यनाट्याद्वारे सोप्या शब्दांत अध्यात्माची शिकवण देणारा काव्यप्रकार
BOI
Sunday, August 25, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

महाराष्ट्रात सुमारे ८०० वर्षे भारूड हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. कीर्तन करताना ओवी, अभंग, नामगजराबरोबरच भारूड सादर करून लोकांची करमणूक केली जात असे. या भारुडांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
.........
वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता म्हणजे ज्ञानाचे महासागर. सामान्य जनांना त्यांचे आकलन होणे महाकठीण! त्यामुळे कोमलहृदयी संतांनी आपल्या चित्शक्तीच्या द्वारे त्या सागरांतल्या पाण्याची वाफ करून, जलवर्षेद्वारे खाली आणली. तीच वेदोनिषदांचे सार असलेली भारुडे. त्यांचे मूळ महाभारत काळापर्यंत मागे जाते. महाराष्ट्रात सुमारे ८०० वर्षे भारूड हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरलेला आहे. कीर्तन करताना ओवी, अभंग, नामगजराबरोबरच भारूड सादर करून लोकांची करमणूक केली जात असे. अर्थात, संत नामदेवांपासून मराठी भारुडे लिहिण्याची परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वोर, संत तुकाराम, संत रामदास यांनी ती पुढे चालवली. तथापि, भारूड म्हटले की संत एकनाथच समोर येतात. जनमानसात त्यांची भारुडे रूढ झालेली आहेत. वरकरणी ती समजायला अवघड वाटली, तरी थोडा विचार केल्यानंतर किंवा जाणकारांनी समजावून सांगितल्यावर त्यांचा अध्यात्मपर अर्थ कळून येतो. 

सोंगी भारूड

‘बहुरूढ’ या मूळ शब्दावरून पुढे ‘भारूड’ हा शब्द बनला. ‘धनगर’ असाही त्याचा अर्थ आहे. इतरही काही व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. रूपकात्मक गोष्टींच्या आधारे ज्ञानप्रसार हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘भजनी भारूड’, ‘सोंगी भारूड’, आणि ‘कूट भारूड’ असे भारुडांचे तीन प्रकार आहेत. त्यांचे अर्थ स्पष्ट आहेत. आज भारूड सादर करणाऱ्या कलाकारांची संख्या कमी असली, तरी काही जण हजारोंच्या संख्येने कार्यक्रम करताना दिसतात. वर्तमान सामाजिक प्रश्नांबाबतची लोकजागृती त्यातून साधते. त्या कलाकाराला गायनाबरोबरच अभिनयाची जाणही असावी लागते. पुरुषांप्रमाणे हल्ली स्त्रियादेखील भारुडे सादर करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांना अलीकडे उपस्थिती कमी असते. तथापि भारूड ऐकायला लोक तुफान गर्दी करतात. ठिकठिकाणी भारूड महोत्सव साजरे होतात. 

‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे। दोन ओसाड एक वसेचिना॥’ हे ज्ञानदेवांचे प्रसिद्ध भारूड आहे. मोक्षमार्गाचे सुलभ विवेचन त्यात आहे. ‘विंचू चावला’ आणि ‘भवानीआई रोडगा वाहीन तुला’ ही नाथांची दोन भारुडे तर लोकांना पाठ झालेली आहेत. एकनाथांनी सुमारे १५० विषयांवर ३५० भारुडे लिहिली. ‘सर्व देवनमस्कार: केशवं प्रतिगच्छति’प्रमाणे विषय काहीही असला, तरी त्याचे लक्ष्य श्रेयस्कर अशी जीवनमरणाच्या फेऱ्यांमधून मुक्ती हेच आहे. 

नाथांचे विषय बघा -
प्रबोधनपर, जाती-व्यवसाय वैशिष्ट्ये, व्यंगदर्शक, नाती-गोती, जागल्या-चोपदार, दैवी, भूत-पिशाच्च, पशुपक्षीविषयक, नवल, कोडी, सण-समारंभ, उत्सव, खेळ, जोहार, अभय, जाब, संसारविषयक इत्यादी 

काम, क्रोध, तमोगुण, आदींनी माणसाची विंचू चावल्यासारखी अवस्था होते आणि त्या वेदनांमुळे तो ‘थयथया’ नाचतो; सत्त्वगुणाच्या आश्रयाने त्यावर उतारा मिळतो, असे वर्णन ‘विंचू चावला’ भारुडात केलेले आहे. इतके होऊनही अहंकाराची किंचित ‘फुणफुण’ उरतेच. ती गुरुकृपेमुळे शांत होते. शाहीर साबळे यांनी गायलेले हे भारूड प्रसिद्धच आहे. 

संत ज्ञानेश्वरांच्या एका भारुडाचा अर्थ सविस्तर बघू.

काट्याच्या अणीवर बसली तीन गावं। दोन ओसाड एक वसेचिना॥१॥

काट्याच्या अणीवर म्हणजे टोकावर. दुर्योधन पांडवांना ‘सुईच्या अग्रावर बसेल एवढी जमीनसुद्धा देणार नाही,’ असे दर्पोक्तीने सांगतो. आता अग्र (टोक) म्हणजे केवळ एक बिंदू - तीच अणी! त्या ‘प्रचंड’ भूमीवर तीन गावे बसली. त्यातली दोन ओसाड तर एक वसेचिना! तीन गावे म्हणजे आपले स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. पहिले दोन नाश पावतात आणि तिसरा दिसत नाही म्हणून कळण्यापलीकडचा. एकूण काय तर ओसाडच!

वसेचिना तिथे आले तीन कुंभार। दोन थोटे एका घडेचिना॥२॥

तीन कुंभार म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश (उत्पत्ती, स्थिती, लय यांचे कर्ते). विष्णू आणि शंकराला ‘उत्पत्तीचे ज्ञान नाही, म्हणून ते थोटे. ब्रह्मा हा आत्मतत्त्व वसवतो, म्हणजे सगळीकडे भरून ठेवतो - जे केवळ जाणून घ्यायचे आहे, अक्षर, अदृश्य, अद्वैत आहे. मग ‘घट’ कुठून निर्माण होणार!

घडेचिना त्याने घडली तीन मडकी। दोन कच्ची एक भाजेचिना॥३॥

त्रिदेहात्मक तीन मडकी. वर सांगितल्याप्रमाणे पहिली दोन नाशिवंत. तिसरा देह म्हणजे अविनाशी आत्मतत्त्व. (त्याला अग्नी जाळू-तापवू शकत नाही - गीता) म्हणून भाजणे शक्यच नाही. 

भाजेचिना त्यात रांधले तीन मूग। दोन हिरवे एक शिजेचिना॥४॥

रज आणि तम हे हिरवे म्हणजे कधीच शिजू न शकणारे (गणंग). सत्त्व शिजवण्याचा प्रश्नेच येत नाही. 

शिजेचिना तिथे आले तीन पाहुणे। दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥

तीन पाहुणे म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य हे तीन काळ. भूतकाळ होऊन गेला, म्हणजे रुसून बाजूला गेला. वर्तमानकाळ प्रत्येक क्षणाला मागे पडत आहे; म्हणजे भूतकाळात जमा होत आहे. भविष्य अजून उगवायचे आहे, तर ते कसे जेवणार!

जेवेचिना त्याला मारल्या दोन बुक्क्या। दोन हुकल्या एक लागेचिना॥६॥

प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण ही तीन प्रकारची शुभाशुभ कर्मे. माणसाला त्यांची चांगली-वाईट फळे भोगावीच लागतात. मागील सर्व जन्मांमध्ये घडलेली सर्व कर्मे म्हणजे संचित. या दोन्हींत आता नव्याने काही घडावयाचे नाही, म्हणजे ती हुकली. क्रियमाण म्हणजे भविष्यात घडणारी कर्मे - मग ती फळणार कशी? आज ती (बुक्की) लागण्याचा प्रश्नमच नाही. 

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव। सद्गुरुवाचोनी कळेचिना॥७॥

कुठल्याही विषयात, योग्य मार्गावर जाण्यासाठी गुरू लागतोच. आध्यात्मिक वाटचालीत तर सद्गुरूची नितांत आवश्यकता असते. गुरूची कृपा झाली, ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त झाली, की कुठल्याही कर्मफळांपासून भक्त अलिप्त राहतो. (कमळाच्या पानावरील पाण्यापासून ते अस्पर्श असते त्याप्रमाणे). 

आहे की नाही हे भारूड समजायला सोपे! 

मानवाच्या परम कल्याणासाठी दयाळू साधू-संतांनी प्रपंच आणि परमार्थाच्या सुलभ वाटचालीसाठी रूपककथांच्या आश्रयाने, विनोदांचा अवलंब करून भारुडे रचली. वासुदेवाची गाणी, लळित, गोंधळ, पोवाडा, कीर्तन या लोककलांप्रमाणे भारूड लोकजागृतीचे कार्य साधते. ते सादर करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. त्यांचा चरितार्थ लोकांच्या मदतीवर चालतो. 

संत एकनाथांचे एक भारूड पाहू या :

सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।
सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी त्याला - भवानी आई।
सासू माझी जाच करिते, लवकर नेई गं तिला - भवानी आई।
जाऊ माझी फडाफडा बोलते, बोडकी कर गं तिला - भवानी आई।
नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला - भवानी आई।
दादला मारून आहुती देईन, मोकळी कर गं मला - भवानी आई।
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला॥

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू, द्वेष, अविवेक आणि अहंकार (जो जाता जात नाही) हे सर्व दोष जावोत आणि जीवनात वैराग्य निर्माण होऊन शाश्वात आनंद मिळावा, यासाठी देवीची केलेली ही प्रार्थना आहे. जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमधून मुक्त होण्यासाठी एकट्यालाच वाटचाल करावी लागते. तिथे सगेसोयऱ्यांची साथ उपयोगाची नाही, हा या भारुडाचा मतितार्थ!

लोककला आणि लोकसंगीत शेकडो वर्षे चालत आलेले आहे आणि टिकून राहिले आहे. इथल्या मातीत त्या परंपरा भक्कम रुजलेल्या आहेत. आधुनिक काळात तुकडोजी महाराज, नवनाथ महाराज यांनी भारुडे लिहिली. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी आजवर भारुडाचे सुमारे २१०० प्रयोग केले आहेत. त्यांचे हे कार्य अभिनंदनीय आहे. 

एका जनार्दनी समरस व्हावे, ‘तो’ सत्वर पावेल तुला॥

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान हे डॉ. रामचंद्र देखणे यांनी लिहिलेले पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(भारूडांसंदर्भातील काही वृत्ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(सोलापूर जिल्ह्यातील रोपळे गावात झालेल्या भारूड जुगलबंदीची झलक दर्शविणारा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search