Next
‘मनःसृष्टी’तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन
BOI
Thursday, July 11, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘मन:सृष्टी - सेंटर फॉर सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड स्टडिज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्षमा’ हा यंदाच्या निबंध स्पर्धेचा विषय असून या विषयावरील निबंध ३१ जुलैपर्यंत मनःसृष्टीच्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष निखिल वाळकीकर यांनी केले आहे.  

शब्दमर्यादा, वय, भाषा असे कोणतेही बंधन नसलेल्या या निबंध स्पर्धेत मानसिक आरोग्याशी निगडीत असलेल्या ‘क्षमा’ या महत्त्वाच्या घटकावर आधारित लिखाण अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. निबंध पूर्णपणे स्वतःच्या अनुभवांवर आधारित असावा अशी अट संस्थेच्या वतीने घालण्यात आली आहे. 

या स्पर्धेबाबत संस्थेच्या सचिव वैशाली व्यास यांनी अधिक माहिती दिली आहे. तुमच्या आयुष्यातील व्यक्ती आणि संबंधित प्रसंग, त्या व्यक्तीमुळे झालेले शारीरिक, मानसिक, सामाजिक अथवा आर्थिक नुकसान, तिला तुम्ही माफ करू शकला आहात, की नाही, नसल्यास काय भावना आहेत, केले असल्यास आता तुमच्या आयुष्यात काय फरक पडला आहे, तुम्ही कोणाची क्षमा मागितली आहे का, कोणी तुम्हाला माफ केले आहे का अथवा अजून केलेले नाही, तुम्ही स्वतःला कधी माफ करू शकलात का, कोणत्या प्रसंगात करू शकला नाहीत, क्षमा करणे अथवा मागणे तुम्हाला महत्त्वाचे वाटते का आणि का वाटते? क्षमा करणे म्हणजे नेमके काय, असे तुम्हाला वाटते? अशा अनेक मुद्द्यांवर, स्वतःच्या अनुभवावर आधारित सदर निबंध असावा. थोडक्यात, तुमच्या मनाच्या खोल कप्प्यात असलेल्या काही गोष्टी या निबंधात व्यक्त केलेल्या असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

‘या वर्षी निबंध स्पर्धा होणार, की नाही याबद्दल अनेकांनी विचारणा केली, त्यामुळे खूप छान वाटले. हा उपक्रम लोकांना आवडतो आहे, हे लक्षात आले आणि समाधानही वाटले. निबंधातील मजकूर आणि इतर गोष्टींबाबत नेहमीप्रमाणे ‘मनःसृष्टी’कडून संपूर्ण गोपनीयता राखली जाईलच. भावना आणि विचारांना व्यक्त करणे, ही भावनिक नियमनाची पहिली पायरी आहे आणि याच हेतूने आम्ही ही निबंध स्पर्धा आयोजित करत आलो आहोत. जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या भावना मांडाव्यात असे आवाहन मी संस्थेच्या वतीने करत आहे’, असे वैशाली व्यास यांनी म्हटले आहे.

निबंध पाठवण्यासाठी पत्ता आणि संपर्क :
वैशाली व्यास, (सचिव, मनःसृष्टी) (माइंड मिरॅकल्स : रिफ्रेमिंग द माइंड)
१०२, पायल सोसायटी, गल्ली क्र. १४, प्रभात रस्ता, एरंडवणा, पुणे – ४
मोबाईल : ९८८१२ ०४२६७, ९०२८० ९५०३२

(सूचना : निबंध प्रत्यक्ष आणून देणार असल्यास, कृपया आधी फोन करावा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search