Next
पेट्रोलियम कंपन्यांतील गुंतवणूक लाभदायी
BOI
Sunday, August 26, 2018 | 03:45 PM
15 1 0
Share this article:


पेट्रोलचे जागतिक दर वाढत असल्याने सध्या पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे लाभदायी ठरेल. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
....
शुक्रवारी, २४ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अनुक्रमे ३८ हजार २५१ आणि ११ हजार ५५७ अंशांवर बंद झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे गेल्या आठवड्यात राष्ट्रीय दुखवटा होता. त्यामुळे आर्थिक घडामोडी वा धोरणे अपेक्षित नव्हती. शिवाय केरळमध्ये गेल्या शंभर वर्षांत झाली नसेल एवढी अतिवृष्टी झाल्याने मदतीचे सर्व हात तिकडे धावत आहेत. मध्य-पूर्वेत केरळमधून बरेच कामगार रोजगारासाठी जातात. म्हणून तिकडून ७०० कोटी रुपयांची मदत देऊ झाली होती; पण सरकारने ती विनम्रपणे नाकारली आहे. केंद्र सरकारने केरळला ५०० कोटी रुपयांची मदत केली आहे; पण लक्षावधी लोकांच्या पुनर्वसनासाठी कोटी लोकांचे हात लागायला हवेत. पर्जन्यवृष्टीचा लोकांना तडाखा बसू नये यासाठी श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता, तरी लक्षावधी गोपाळांच्या काठ्या पर्वताखाली आधाराला लागल्या होत्या. तसेच आताही झाले पाहिजे. भारतासारख्या मोठ्या देशात आज ना उद्या कुठलेतरी राज्य आपद्ग्रस्त होत असतेच.

या पर्जन्यवृष्टीचा फटका केरळमध्ये कार्यरत असलेल्या फेडरल बँक, जे. के. टायर्स, अपोलो टायर्स, मुथूट फायनान्स व तामिळनाडूतल्या रेप्को होम फायनान्स या कंपन्यांना बसणार आहे. त्यामुळे या कंपन्यांचे सप्टेंबर तिमाहीचे आकडे चांगले असणार नाहीत. इथून सध्या गुंतवणूक हलवावी.  रुपयाचा विनिमय दर अन्य चलनाच्या, विशेषतः डॉलरच्या संदर्भात घसरत आहे. रिझर्व्ह बँकेने पुरेसे डॉलर्स बाजारात टाकले नसल्याने सध्याचा विनिमयदर सत्तर रुपयांची सीमा ओलांडून जाईल. संगणन क्षेत्रातल्या निर्यात करणाऱ्या कंपन्यांना अशा घसरणीचा फायदा मिळेल; पण त्याच वेळी भारताला पेट्रोलच्या आयातीसाठी खूप विदेशी चलन मोजावे लागत असल्याने आपली व्यापारतुलेतील चालू खात्यातील तूट वाढत जाईल.

बहुतेक कंपन्यांचे जून २०१८ तिमाहीचे विक्री व नफ्याचे आकडे जाहीर झाले आहेत. पेट्रोलचे जागतिक दर वाढण्याचा फायदा ओएनजीसी व ऑइल इंडिया या कंपन्यांना होईल. त्यामुळे सध्या इथे गुंतवणूक केल्यास वर्षभरात तीस टक्के तरी फायदा मिळेल. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांमध्येही सध्या गुंतवणूक फलदायी होईल. भारत पेट्रोलियम कंपनीचा शेअर सध्या ३५७ रुपयांना मिळत आहे. ओएनजीसीचा शेअर १७५ रुपयांना उपलब्ध आहे.

ग्राफाइट इंडिया शेअर गेल्या शुक्रवारी ९६६ रुपयांपर्यंत खाली उतरला होता, तर ‘हेग’चा भाव ४०३२ रुपयांपर्यंत खाली आला होता. ग्राफाइट इंडिया शेअर ९२५ ते ९३५ रुपयांच्या पातळीत जरूर घ्यावा. हेग कंपनीचा शेअर ३८०० रुपयांच्या खाली खरेदी केल्यास चांगला नफा देऊन जाईल. सध्या महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीमध्येही गुंतवणूक फलदायी ठरेल; मात्र गुंतवणूकदारांनी मिळणाऱ्या माहितीचा स्वतः अभ्यास करून आपल्या जोखमीवर खरेदी व विक्रीचे व्यवहार करावेत. कारण नफा वा नुकसान त्यांनाच मिळणार असते. 

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search