Next
‘तो’ कृतार्थतेचा क्षण!
BOI
Monday, July 09, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story‘असा एक कार्यकर्त्यांचा संच, की जो आपल्या परिवारातला नाही; पण तो या कामामुळे आमच्या परिवारात आला. हा मोठा कृतार्थतेचा क्षण होता...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे... आरती आवटी यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा हा नववा भाग...
............
प्रश्न : तुम्हाला कृतकृत्य वाटणारा क्षण किंवा आठवण सांगाल का?

गिरीश प्रभुणे : एक जोडपं होतं. एक क्षण असा आला होता, की मुलगी वाया जाणार. तिला मी सांगितलं, ‘लग्न केलंस, तुझं वय नाही लग्नाचं; पण एक वर्षभर दोघं जणं वेगळे राहा, तर तुम्हाला मी मदत करेन.’ तसे ते राहिले. उत्तम स्थायिक झाले. दुसरी एक मुलगी आहे, की जिचा नवरा अत्यंत संशयी. दारू गाळण्याचा व्यवसाय. दोघंही सातवी-आठवीपर्यंत शिकलेले. दोघांनाही पाबळला आणलं. तिला म्हटलं तू शीक. नवऱ्याने दहा वेळा सोडलं तिला. ती सोडून आली. मी म्हटलं, अशी नको राहूस. तुला पाबळला पाठवतो. नाही म्हणाली, ‘नवऱ्याला बोलवा.’ पाबळला, डॉ. कलबागांकडे दोघांना खोली घेऊन दिली. वर्षभर त्यांची खोली होती. ते म्हणाले, ‘अहो हे किती भांडतात.’ पण ती शिकली. त्यानंतर यमगरवाडीत तिला तीन वर्षं ठेवलं शिक्षिका म्हणून. तिने अनेक मुलांना शिकवलं. पुण्यात पर्वतीजवळ पूना महिला मंडळात व्याख्यान करायचं होतं. मला बोलावलं होतं. मी म्हटलं, एक कार्यकर्ती देतो तुम्हाला. ती पहिल्यांदाच तिथे बोलण्यासाठी गेली. समाजवादी महिलांचं ते मंडळ होतं. उत्तम भाषण झालं तिचं. सर्व जणी रडत होत्या. तिला माहीत नव्हतं, आपण भाषण दिलं की पैसे मिळतात. तिला त्यांनी पाचशे रुपये मानधन दिलं. शिवाय काही जणींनी ५१, कुणी १०, कुणी १५ रुपये असे आणखी पैसे दिले. तिचा भाऊ जेलमध्ये. तिचा नवरा गवंडीकाम करायला लागलेला. त्यांची अनेकदा भांडणं होत. ती इथे आमच्याकडे सोडवली. माझ्या बायकोनंही सोडवली होती. तर, भाषण झाल्यावर ती आली, म्हणाली, ‘काका, हे पैसे’. म्हटलं, ‘तुला आत्ताशी तर नोकरी लागली आहे.’ पण तिनं ते पैसे मला दिले. आतापर्यंत आम्ही खूप प्रयत्न केले. मिळेल ते घेण्याची प्रवृत्ती असते; पण मिळालेलं दुसऱ्याला देणं शिकलेली ही पहिली मुलगी.

आता जो मिळालेला वेळ आहे, तो आपला नवरा, प्रपंच, मुलं-बाळं यांच्यात राहू-रमू.... नाही. तसं ती करत नाही. ती पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत इतका त्रास असला, तरी काम करत राहते. मुलांना शिकवते. एमए-बीएड, एमए-एमएड झालेल्या शिक्षिका आहेत आमच्याकडे. हिची स्पर्धा त्यांच्याशी आहे. स्पर्धा काय, की मलाही ते आलं पाहिजे. त्यांना येतंय, मग मीही करणार. भांडणं करून ती जबाबदाऱ्या घेते आणि पार पाडते. करून दाखवते. कार्यकर्ते नाही येत माझ्यामागे, म्हणून मी निराश झालो होतो आणि सोडून द्यायचं ठरवलं होतं. आता असं लक्षात आलं, की असं नाहीये. या कामातनं जो कार्यकर्ता तयार होतो, तो खरा कार्यकर्ता आहे. तो समाजाकरिता काम करायला लागला आहे, ती समाजाकरिता काम करायला लागली आहे. आणि उत्तम प्रकारे काम करत आहेत.

या वर्षी आम्ही इंटरव्ह्यू घेतले दुसऱ्या शाळांसाठी. तिथे इंटरव्ह्यू घेत असताना लक्षात आलं, की आपण एक गुरुकुल सुरू केलंय आणि गुरुकुलासाठीही शिक्षिका घ्यायच्या आहेत. उत्तम असणाऱ्या चौघींना आम्ही बाजूला काढलं आणि बाकीच्यांना जायला सांगितलं. त्यांना सांगितलं, की आम्ही तुम्हाला निवडलेलं आहे; पण तुम्हाला पगार नाही मिळणार. अशी अशी शाळा आम्ही सुरू केली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. दोघी जणी म्हणाल्या, ‘असं-कसं? आम्ही एवढं शिकलोय, आम्हाला तिकडे पैसे भरायला लागले, एवढी फी भरायला लागली, लाख-लाख रुपये भरून आम्ही ‘बीएड’ला प्रवेश घेतला.’ आम्ही पुढे काही सांगायच्या आतच त्यांनी नकार दिला. दोघी जणी म्हणाल्या, ‘ठीक आहे. तुमची शाळा कसली आहे, ते आम्हाला जरा समजून घेऊ द्या. असं का करायचं? अशी कुठली शाळा आहे?’ मग त्यांना ही सगळी मुलं दाखवली. त्यांच्या समस्या आहेत, ते सांगितलं. पुस्तक वाचायला दिलं. दोघी जणी थांबल्या, सगळं वाचलं त्यांनी. आणि म्हणाल्या, आम्ही तयार आहोत. दोघींची लग्नं झालेली होती. दोघी जणी नवऱ्यांना घेऊन आल्या. नवरे म्हणाले, ‘असली कसली शाळा? एवढा खर्च केलेला आहे, इतकी फी भरली आहे. आणि नवा पैसा देणार नाही अशा ठिकाणी तुम्ही काम करणार? नाही चालणार.’ दोघी म्हणाल्या, ‘आमचे ते काका आहेत म्हणून करणार.’ एका इंटरव्ह्यूच्या परिचयातनं आम्हाला या दोन शिक्षिका मिळाल्या.

त्यापैकी एक भुई समाजातली, मासेमारी करणारी. अत्यंत गरीब. बाप दारू पिणारा, ही मावशीकडे राहिलेली, थोडंसं काय मिळेल ते गोळ्या-बिळ्या विकून, त्यातनं ‘एमए’पर्यंत गेलेली. तिच्या पुढे अशी समस्या आहे, की आपण आता नोकरी करावी, खूप पैसा मिळवावा, की हा मार्ग धरावा. आम्हाला माहीत नव्हतं, की तिचं जीवन कसं आहे. आम्ही सर्टिफिकेट पाहिलं, गुण पाहिले आणि तिला बोलावलं. नंतर कळलं, की तिचे दिवस कसे होते! ती पूर्ण वेळ आली. तिच्या नवऱ्याला नोकरी आहे, दहा एक हजार रुपये पगार आहे.

दुसरी एक मराठा समाजातली आहे. तिचे सासू-सासरे, आई-वडील सगळे आले. म्हणाले, ‘नाही, तू नोकरी केली पाहिजेस, पैसे मिळवले पाहिजेत.’ ती म्हणाली, ‘नाही, मला इथं काम करायचंय. किमान दोन-तीन वर्षं का होईना, मी इथं काम करेन आणि मग तुम्ही सांगाल तिथे.’

आता आमच्यापुढे समस्या आहे, की यांना काहीतरी दिलं पाहिजे. इतक्या शिकलेल्या आहेत. यांना किमान दोन-चार हजार रुपये तरी दिले पहिजेत. असा एक कार्यकर्त्यांचा संच, की जो आपल्या परिवारातला नाही; पण परिवारात आला. हा मोठा कृतार्थतेचा क्षण होता.

या सगळ्या शिक्षिका म्हणाल्या, आम्ही या वर्षी समितीच्या वर्गाला जाणार. प्रमिलाताई मेढे आल्या होत्या, तेव्हा त्यांच्याशी परिचय करून दिला. यांनी सांगितलं, ‘आम्हाला काही माहीत नव्हतं, समिती काय आहे. इथे आल्यानंतर आम्हाला समितीबद्दल कळलं. आणि जर समिती इतकं चांगलं काम करते, मग ती बाहेर कुठे का दिसत नाही. आता आम्हीच समितीचं काम करू.’ सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीला त्यांनी हे ऐकवलं. म्हणजे एवढी समज, एवढं धाडस आम्ही त्यांच्यात निर्माण करू शकलो. प्रमिलाताई म्हणाल्या, ‘तुम्ही करताय ना, खूप चांगलं आहे. तुम्हीच करायचंय हे काम. आपण कशासाठी काम सुरू केलं? या समाजातनं लोक उभे राहावेत आणि त्यांनी हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये राहून काम करावं, हा उद्देश आहे.’

त्यातल्या अनेक मुलींना आम्ही लिहितं केलेलं आहे. त्यांच्या आत्मकथा लिहायला लावलेल्या आहेत. एका मुलीच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. ती कैकाडी समाजातली आहे. नववीत शाळा सोडली. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये होती. आईनं दुसरं लग्न केलं. वडील केव्हा सोडून गेले, यांना माहीत नाही. घर लहान. एक मुस्लिम मुलगा भेटला. त्याच्याशी हिचे प्रेमसंबंध जुळले. तिला आम्ही इथे आणल्यानंतर तो इथे यायचा. कर्वेचं एवढं मोठ्ठं आवार आहे. त्यातनं पण तो चिठ्ठ्या द्यायचा कुठून तरी... त्यातनं तिनं शाळा सोडली. गेली परत. आईचं तिचं भांडणं झालं. त्यात आईच्या नवऱ्यानं म्हणजे सावत्र बापाने तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्नच केला. तिनं त्याला मारलं. आईने हिला पोलिस कस्टडीत टाकलं. दीड वर्षं तिचा काही पत्ता नव्हता. एकदा तिचा फोन आला. म्हटलं, ‘ताबडतोब ये. इथे बालवाडीचा कोर्स आम्ही सुरू केला आहे. निर्मलाताई पुरंदऱ्यांच्या वनस्थळीत.’ त्याच्यात तिला जायला लावलं. एक दिवस ती आली कविता घेऊन. ३०-४० कविता लिहिलेल्या आहेत. तिच्या रांगड्या भाषेत आहेत; पण अप्रतिम कविता आहेत. तिच्या मनातल्या भावना तिने मुक्त छंदातल्या कवितांतून व्यक्त केल्या आहेत. मग तिला मी ग्रेस यांच्या कविता वाचायला दिल्या, अजून काही कविता वाचायला दिल्या. कुणाला चित्रकलेचं अंग आहे. दुर्दैवानं मला या सगळ्या कला मोडक्या-तोडक्या येतात. त्यामुळे काहीही आलं तरी त्याच्याशी मी रिलेट करतो. ...तर अशी ती कविता करायला लागली. तिला तिचा एक मार्ग सापडला. निराश झाली होती. आत्महत्या करायला चालली होती. अशा आता इथं सात-आठ जणी आहेत, की ज्यांना जीवनाची वेगवेगळ्या प्रकारची दिशा मिळाली. अजून पूर्ण सापडली असं नाही; पण शिक्षण घेता घेता त्या एका वेगळ्या आनंदात आहेत. आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे दुसऱ्यापेक्षा. त्यामुळे जे पाहिजे वाटत होतं, ते यातनं तयार होतं आहे. भविष्य उत्तम आहे. अजून काय पाहिजे?

प्रश्न : या सगळ्या कामात संघ पाठीशी असल्याचा फायदा-तोटा काय जाणवला?

गिरीश प्रभुणे : लहानपणापासून संघाशिवाय दुसरं काही मी पाहिलेलंच नाही. म्हणजे मी शिशू असल्यापासून मी शाखेत जातोय. नंतर प्रचारकही झालो. गुरुजींचा सहवास मिळाला. गुरुजींना जवळून पाहता आलं, त्यांच्याशी बोलता आलं. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात मी गुरुजींवर एक वेगळा लेख लिहिलाय. आमच्या घरात ब्राह्मण्यवाद कधीच नव्हता. मी संघात ज्या ज्या लोकांत वावरलो, हिंडलो, तिथे ब्राह्मण्यवाद जाणवलाच नाही कधी. मित्र वगैरे मला असेच सगळे मिळत गेले, ज्यांच्यामध्ये मी मिसळत गेलो, ते आमच्या घरी येत गेले. त्यामुळे जातीयवाद प्रत्यक्षात समाजात मोठं झाल्यानंतरच कळायला लागला, की हा जातीवाद होता; पण तो आपल्याकडे नाहीये. त्यामुळे संघाचं असणं हे एका अजाण वयापर्यंत मला आनंदाचं होतं. नंतर मी जस-जसा दलित पँथर याच्यात-त्याच्यात, समाजात हिंडायला लागलो, कॉलेजच्या निवडणुकांमधे भाग घ्यायला लागलो आणि मग मी ब्राह्मण आहे हे कळलं. मग संघर्ष करायला लागलो. एक दलित साहित्य संमेलन घेतलं होतं, १९८० साली आणि त्या वेळी समरसता मंचही स्थापन नव्हता झाला.

चाफेकर स्मारकाची पहिली शाळा मी भीमनगरमध्ये सुरू केली, प्रचारक म्हणून थांबल्यावर. दलित साहित्य संमेलन संपल्यावर गंगाधर पानतावणे यांना बोलावलं. ते इथल्या समरसता परिषदेला आले. त्यांना साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं. तेव्हापासून सगळी सामाजिक क्षेत्रातली प्रतिष्ठित मंडळी संघापासून दूर राहायला लागली; पण त्याच्याही पाच-दहा वर्षं आधी इथं गो. नी. दांडेकरांना उद्घाटक म्हणून बोलावलं होतं. ते आले होते. गंगाधर गाडगीळांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. महाराष्ट्रातलं पहिलं आणि शेवटचं संमेलन. शेवटचं का? तर अजून झालं नाही तसं, म्हणून, ज्याच्यात सदाशिव पेठी म्हणून गणले गेलेले, साडेतीन टक्क्यांचे म्हणून गणले गेलेले, असे सगळे प्रमुख साहित्यिक आले होते. दलित म्हणाल, तर दया पवार, बाबुराव वाळुंज, भालचंद्र मुणगेकर, तेही इथं आले होते. त्या वेळेस ते मुंबई विद्यापीठात होते. गंगाधर पानतावणे आले होते. त्या वेळी गुजरातचं आंदोलन चाललं होतं. आरक्षणाविरोधातलं ते देशभरातलं पहिलं आंदोलन, जे नंतर सगळीकडे पेटलं. त्या आंदोलनाला नगरपालिकेने मदत केली होती. निधी गोळा केला होता, धान्य गोळा केलं होतं. तीन दिवसांचं संमेलन होतं. पाच हजार लोकं आली होती. म्हणजे मला हे कळेनाच, की दलित एवढ्या मोठ्या संख्येने? बरं, आमच्याकडे मुबलक जेवण ठेवलं होतं. कॉर्पोरेशनवाले म्हणाले, की हे काय आहे? म्हटलं बाजारपेठेतल्या सगळ्यांनी मदत केलेली आहे. तरीसुद्धा एक ट्रकभर धान्य शिल्लक राहिलं. सगळे तीन दिवस जेवले. तरीही धान्य, पंचवीस हजारांचा निधी शिल्लक राहिला.

सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे! आमच्याकडे कधी निधी शिल्लक राहत नाही. कारण हातात जेवढे दिलेले असतात, तेवढे सगळे पैसे संपतात; पण आम्ही हिशेबाला पक्के. माझ्याकडे झोळीत सगळे पैसे. सगळं संमेलन झाल्यानंतर हिशेब काढला, पंचवीस हजार शिल्लक. एक ट्रकभर धान्यही शिल्लक. ‘प्रभुणे होते म्हणून हे शक्य झालं,’ असं नंतर सगळे म्हणाले. त्या संमेलनाला मी बाबासाहेब आंबेडकरांचा, गुरुजींचा आणि डॉक्टरांचा फोटोही लावला होता. शिवाजी महाराजांचाही लावला होता. फोटोंवरून काही वादही झाले. माझ्या ब्राह्मण असण्यावरून आणि मी संघाचा असल्यावरून मला खूप ऐकूनही घ्यावं लागलं. मला संताप आला. पानतावणे म्हणाले, ‘प्रभुणे, तुम्ही संघाचे आहात, शिवाय ब्राह्मण आहात; पण तुम्ही या चळवळीत आलेले आहात. हे सगळं तुम्हाला सहन करावं लागेल. तुम्ही नाही सहन केलं, तर हा सेतू बांधला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही हे सहन करा आणि उत्कृष्ट संमेलनाचा पाया घाला.’ मला आश्चर्य वाटलं. पुढे म्हणाले, ‘ही सगळी शाखेची पोरं, इथं ताटं वाढताहेत, उष्टी काढताहेत, जेवण तयार करताहेत. सगळी शिबिरातली कामं संघाची मंडळी करत आहेत. संघाच्या प्रयत्नांनी हे संमेलन पार पडलं आहे. तुम्ही हे फार चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही निराश होऊ नका. हे तसं बोलताहेत. कारण त्यांना तसे काही अनुभव आलेले आहेत. त्यामुळे हे काही काळ तुम्हाला सहन करावं लागेल.’

संघाचं असणं म्हणजे काय? संघाचं नसणं म्हणजे काय? समजा, मी संघाचा नसतो, तर हे काम करू शकलो असतो का? मला नाही वाटत. कारण रक्तात गुण मिसळले आहेत ते चळवळीचे. मला बालपणीच संघ मिळाला. संघात नसतो तर निराश होऊन कुठेतरी सगळं सोडून दिलं असतं. माझा स्वभाव अत्यंत संतापी आहे. मी कलेक्टर, मंत्री, मुख्यमंत्री, कोणीही काही असं उलट-सुलट सांगायला लागलं, तर मी नाही म्हणून उठतो. त्यामुळे सगळे म्हणतात ‘प्रभुणे आहे ना, करू द्या त्याला काम.’ मी संघात राहिलो. कारण संघाच्या सगळ्या स्वयंसेवकांनी मला सहन केलं. संघाचं हे वैशिष्ट्य आहे. तयार होईपर्यंत ती ठोकत राहतात. त्यामुळे मी संघाचा नसतो, तर कदाचित लेखकाचे गुण आहेत म्हणून लेखक झालो असतो आणि काहीतरी चांगल्या कथा-कादंबऱ्या लिहीत बसलो असतो.

(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg   या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मिलिंद दाते About 218 Days ago
या महान व्यक्तीचा सहवास रोज च मिळतो,.तसेच गुरुकुल मधील मुला मुलीं चा परिचय होतो.आणि काही शिकवण अनुभव तो आहे.तसेच गुरुकुल मधील वातावरण अनुभव घेण्या सारखे आहे.मी नाशिबवांन .
0
0

Select Language
Share Link