Next
चोरडिया यांना ‘ईओ ग्लोबल सिटीझन पुरस्कार’
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 12:02 PM
15 0 0
Share this story

पुणे : आंत्रप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन अर्थात ‘ईओ’ या आंतरराष्ट्रीय उद्योजक संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्यखादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांचा ‘ईओ ग्लोबल सिटीझन पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. राज्यातील मनुष्यबळास कौशल्यवृद्धीची जोड देऊन त्यांना रोजगारक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या राज्य सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या ‘महाखादी’ या उपक्रमासाठी चोरडिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

चोरडिया यांच्या पुढाकाराने राबवल्या गेलेल्या राज्य सरकारच्या ‘महाखादी’ या उपक्रमाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आले आहे. हा सन्मान मिळालेले चोरडिया हे पहिलेच भारतीय असून, जगभरातून आलेल्या १२ नामांकनांमधून नऊ परीक्षकांच्या मंडळाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.  

गेल्या आठवड्यात टोरंटो (कॅनडा) येथे झालेल्या ‘ईओ’च्या ग्लोबल लीडरशीप परिषदेत ‘ईओ’च्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंबर्ली हिकॉक स्मिथ यांच्या हस्ते हा पुरस्कार चोरडिया यांना प्रदान करण्यात आला. ‘महाखादी’ हा राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, राज्य सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्याअंतर्गत तो राबविण्यात येत आहे.

ग्रामोद्योगांना जगाच्या नकाशावर आणणे, शासनाच्या विविध योजना व सामान्य नागरिक यांमध्ये समन्वय राखणे व त्याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात सुमारे ५० उत्पादकांना व ४०० कारागिरांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

‘महाखादी’अंतर्गत खादीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम केले जाते. यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालायाच्या आवारातील हातकागद संस्थेमध्ये विक्री केंद्र देखील सुरु करण्यात आले आहे. स्वतः एक उद्योजक असलेल्या चोरडिया यांनी मंडळाचे सभापती झाल्यावर ‘महाखादी’ उपक्रमाद्वारे सामान्य नागरिकांच्या रोजगार सक्षमीकरणासाठी राबवलेला हा यशस्वी प्रयत्न लक्षात घेत ‘ईओ’च्या वतीने चोरडिया यांचा ग्लोबल सिटीझन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

‘ईओ’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची उद्योजकांची संघटना असून, जगभरातील ५४ देशांत संस्थेचे १७३ अध्याय आहेत. याअंतर्गत सुमारे १२ हजारांहून अधिक उद्योजक जोडले गेले आहेत. युवा उद्योजकांनी १९८७ साली या संघटनेची स्थापना केली असून, उद्योजकांनी एकमेकांपासून काहीतरी शिकावे, आपले अनुभव शेअर करावेत व स्वत:चा विकास करावा या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली. उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना या व्यासपीठावर आपल्या उद्योग व त्या संबंधित गोष्टींविषयी मार्गदर्शन मिळावे हा या संघटनेचा हेतू आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link