Next
सफर म्हैसूरची – भाग तीन
BOI
Wednesday, October 10, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


वालुकाशिल्प संग्रहालय

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण कर्नाटकमधील म्हैसूर शहरातील राजवैभव व तसेच वृंदावन उद्यानाची माहिती घेतली. या भागात पाहू या पुरातन, ऐतिहासिक संदर्भ असलेली मंदिरे आणि त्यातील शिल्पे.
............
नंजनगुड

अनेकदा प्रसिद्ध स्थळे बघताना काही चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. तसेच एक ठिकाण म्हणजे चामुंडा हिल रस्त्यावरील वालुकाशिल्प संग्रहालय. १३ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रावरील हे संग्रहालय एम. एन. गौरी या अभियंता महिलेने उभारले आहे. अशा प्रकारचे शिल्प संग्रहालय उभारणाऱ्या पहिला महिला शिल्पकार आहेत. ११५ ट्रक वाळूचा वापर करून त्यांनी १५० शिल्पे तयार केली आहेत. त्यातून पर्यावरणाचा संदेशही देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १५ फूट उंचीची गणेशमूर्ती हे येथील एक प्रमुख आकर्षण. देवी चामुंडेश्वरी, म्हैसूरची दसरा मिरवणूक, प्राचीन संस्कृती, वन्यजीवन, गीतोपदेश अशा १६ प्रकारच्या ‘थीम’ येथे हाताळलेल्या आहेत.

कोडीभैरव मंदिरकोडीभैरव मंदिर :
हे मंदिर वडियार राजवटीच्या स्थापनेच्या वेळचे ऐतिहासिक मंदिर आहे. राजा यदुराय आणि कृष्णराय हे दोघे भाऊ मेलकोटे येथील देवदर्शन करून दोड्डकेरे तलावाजवळील या मंदिरात आले. येथेच चामराजा यांची राजकन्या चिक्कादेवरसी व तिच्या आईशी त्यांची भेट झाली. राजा चामराज यांचे नुकतेच निधन झाले होते. करुगहल्लीच्या नायकाच्या त्रासाला कंटाळून त्या तिथे आल्या होत्या. त्या दोघींनी त्यांच्यावर आलेल्या संकटाची त्यांना कल्पना दिली. यदुराय आणि त्याच्या भावाने आक्रमकांना ठार मारले. त्यानंतर यदुराय याने राजकुमारी चिक्कादेवरसी हिच्याशी विवाह केला. तेव्हापासून वाडियार (मालक किंवा देव) ही पदवी धारण केली. या गोष्टीचा साक्षीदार असलेले हे मंदिर आहे. मंदिरामध्ये एक मीटर उंच असलेली भैरवाची एक मूर्ती आहे. त्याच्या चार हातांमध्ये श्री शिवाचा त्रिशूळ, डमरू आणि तलवार आहे. शेजारी डाव्या बाजूला भद्रकालीची मूर्ती उभी आहे.

लक्ष्मीरामण्णा स्वामी मंदिर
लक्ष्मीरामण्णा स्वामी मंदिर : हे म्हैसूर शहरातील सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. १४९९मध्ये विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांचे वडील राजा नरसा नायक यांनी भगवान लक्ष्मीनारायण मंदिराला देणगी दिली होती, असा उल्लेख म्हैसूर येथील बन्नी मंडपा येथे सापडलेल्या शिलालेखात आहे. कृष्णराज वाडियार तिसरे यांनी मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुराचा जीर्णोद्धार केला. येथे राजे वाडियार यांचा दोन फुटी पुतळाही आहे. मंदिरातील मुख्य देवता नंबिनारायण असून, हा विष्णूचा एक अवतार आहे. शेजारी श्री लक्ष्मी, तसेच श्री वेणुगोपालाची चार फूट उंचीची मूर्ती आहे. कांतिरावा नारसराज वाडियार (१६३८-१६५९) यांनी मागील भागात सुंदर मंडप बांधला. ३० जून १७९९ रोजी ब्रिटिशांनी या मंदिरात पाच वर्षांचे कृष्णराज वाडियार तिसरे यांना म्हैसूरच्या सिंहासनावर बसविले (राज्याभिषेक केला.)

भुवनेश्वरी मंदिरभुवनेश्वरी मंदिर :
हे मंदिर मुख्य पॅलेसच्या उत्तरेस आहे. महाराज जयचामराज वाडियार यांनी १९५१मध्ये भुवनेश्वरी मंदिर बांधले. मंदिर वास्तुकला द्राविडी शैलीत आहे. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार सिद्धलिंगस्वामी यांनी भुवनेश्वरीची मुख्य मूर्ती साकारली आहे. मंदिरामध्ये सूर्य, महाविष्णू, महेश्वर, राजराजेश्वरी, गणपती व चामुंडेश्वरी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात मोठे सूर्यमंडळ आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रथसप्तमीच्या शुभ दिवशी सूर्यमंडळाला विशेष प्रार्थना केली जाते.

सोमेश्वर मंदिर म्हैसूर पॅलेसच्या ईशान्य कोपऱ्यात असून, श्री कांतिरावा नारसराज वाडियार यांनी बांधलेले आहे. येथील शिल्पकला बघण्यासारखी आहे. मंदिराच्या समोर शमीचे एक सुंदर झाड आहे. देवी सोमासुंदरी, नारायण, नवग्रह यांसारख्या देव-देवता येथे स्थापित केल्या आहेत.

प्रसन्न कृष्णस्वामी मंदिर : हे मंदिर कृष्णराज वाडियार तृतीय यांनी बांधले. हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे. १८२५पासून मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले आणि १८९२ साली ते पूर्ण झाले. येथे त्यांनी देवता, देवी आणि संत यांच्या सुमारे ४० कांस्यमूर्ती स्थापित केल्या आहेत. मूर्तीच्या पुढे नावे दिली आहेत. कृष्णराज वाडियार तिसरे यांचा पत्नीसह पुतळा तेथे आहे. वाडियार हे श्रीकृष्णाच्या यादव कुळातील असून, त्यांचे गोत्र अत्री असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये अत्री ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली आहे. मंदिरात रामानुजाचार्य, परवासादेव, अनाथसायण आणि राजमन्नर (भगवान कृष्णाचे एक रूप) यांच्या प्रतिमा आहेत. मधल्या सभागृहात भिंतीवर अनेक सुंदर शिल्पे आहेत. जन्माष्टमीच्या वेळी येथे आठ दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

श्वेत वरहास्वामी मंदिर

श्वेत वराहस्वामी मंदिर : हे वराहस्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. ते पॅलेसच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळ आहे. हे मंदिर वास्तुशास्त्रीय होयसळ शैलीत बांधले आहे. ते १२/१३व्या शतकातील असावे. देवीच्या देवळाला सुरेख कोरीव दरवाजे आणि कलाकुसरीचे खांब आणि शिखरे आहेत. भिंतीवर रामायण-महाभारतातील चित्रे काढलेली आहेत. देवीच्या देवळाच्या दक्षिणेकडील बाह्य भिंतीवर १२व्या किंवा १३व्या शतकातील वर्णांमध्ये माया भद्र शिलालेख आहे. एका शिलालेखानुसार, राणी चिक्कदेवराजा वाडियार यांनी श्वेतवराहस्वामी प्रतिमा तमिळनाडूतील श्रीमसुन्नम येथून आणली आहे.

श्रीकांतेश्वर शंकराची भव्य मूर्ती
त्रिनेश्वरस्वामी मंदिर : पॅलेसच्या ईशान्य बाजूला हे मंदिर असून, ते द्राविडी शैलीमध्ये बांधलेले आहे. ते तीन डोळ्यांतील भगवान शिव यांना समर्पित असल्याने त्रिनेश्वरस्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते. साधारण १५व्या शतकातील किल्ल्याच्या ईशान्य कोपऱ्यात हे मंदिर आहे. कांतिरावा नारसराज वाडियार (१६३८-१६५९) आणि त्यांचे उत्तराधिकारी दोदा देवराजा वाडियार (१६५९-१६७२) यांच्या शासनकाळात यात सुधारणा झाल्या असाव्यात. मुख्य गोपुराच्या प्रवेशद्वारामध्ये गणपती व भैरवाच्या मूर्ती आहेत. पार्वती, चामुंडेश्वरी, सूर्यनारायण यांच्याही मूर्ती आहेत. शंकराचार्यांचा संगमरवरी पुतळा तेथे आहे. दक्षिणेकडील प्रवेशद्वारासमोर असलेल्या परिसरात कांतिरावा नारसराज वाडियार आणि दोदा देवराज वाडियार यांच्या प्रतिमा आहेत. शिवरात्री उत्सवात मंदिर मोठ्या प्रमाणावर भक्तांना आकर्षित करते. शिवरात्रीच्या रात्री पहाटे तीनपर्यंत खास प्रार्थना केली जाते.

म्हैसूर जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे :
अरबीथिटू अभयारण्य : १९८५मध्ये स्थापन केलेले अरबीथिटू वन्यजीव अभयारण्य १४ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. शेकरू, कोल्हे, रानडुकरे, हरणे, बिबटे येथे पाहायला मिळतात. निलगिरी आणि चंदनाची झाडे येथे मोठ्या प्रमाणात आहेत.

कावेरी वन्यजीव अभयारण्यकावेरी वन्यजीव अभयारण्य : १०२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले हे अभयारण्य मंड्या, म्हैसूर व बेंगळुरू जिल्ह्यात विभागले गेले आहे. वनसंपदा व वनचर यांनी समृद्ध असे हे अभयारण्य आहे. या अभयारण्यात हत्ती, गवे, वाघ, बिबटे, शेकरू, विविध प्रकारची हरणे, सरडे, तरस, कोल्हे, अजगर, भेकर, लांडगे, शेकरू, मुंगूस, विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि नानाविध पक्षी आढळून येतात.

सोमनाथपूर केशव मंदिरसोमनाथपूर केशव मंदिर : हे कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. सोमनाथ मंदिर इतिहासातील नरसिंह राजाच्या होयसळ घराण्याच्या सुवर्णयुगाकडे घेऊन जाते. हे म्हैसूरपासून ३८ किलोमीटर अंतरावर कावेरी नदीच्या काठी सोमनाथपूरमध्ये वसलेले आहे. हे होयसळ घराण्याचे शेवटचे प्रमुख मंदिर मानले जाते. हे मंदिर इ. स. १२६८मध्ये नरसिंह तृतीय राजाच्या काळात त्याचे सेनापती सोमनाथ यांनी बांधले होते. म्हणूनच मंदिराचे नाव त्याच्या नावावरून ठेवले गेले. हे मंदिर होयसळ स्थापत्यकलेचे सर्वांत उत्तम संरक्षित स्मारक आहे. सोमनाथपूर मंदिराच्या सर्व संबंधित गोष्टी प्रवेशद्वारावरील जुन्या कन्नड लिपीतील शिलालेखावर कोरल्या आहेत. मंदिरातील केशवाची मूर्ती गायब झाली आहे; मात्र जनार्दन व वेणुगोपाल यांच्या मूर्ती पाहता येतात. संपूर्ण देवळाच्या बाहेरील-आतील भिंती शिल्पांनी सजविलेल्या आहेत. सभागृहातील खांब, तसेच नृत्य करणारा गणेश, बासरी वाजविणारा कृष्ण, मोहिनी, सरस्वती, विष्णू, लक्ष्मीच्या सुबक मूर्तीही येथे आहेत. रामायण, महाभारत, भागवतातील प्रसंग येथे रेखाटले आहेत.

नंजनगुड : हे शहर नंजनगुडेश्वराच्या मोठ्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. तसेच हकीम नंजुदा म्हणूनही ओळखले जाते. हे एक हजार वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. येथील श्रीकांतेश्वर शंकराची भव्य मूर्ती प्रसिद्ध आहे. असे मानले जाते, की गौतम ऋषी येथे काही काळ राहिले आणि त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. या पवित्र ठिकाणाला दक्षिण काशी किंवा दक्षिणेकडील वाराणसी म्हणूनही ओळखले जाते. इ. स. ९०० मध्ये गंग राजवटीत हे मंदिर बांधण्यात आले. या देवावर टिपू सुलतानाची श्रद्धा होती, असे म्हणतात. शिवलिंगाला टिपू सुलतानाने हिऱ्यांचा हारही अर्पण कला होता. कपिल आणि कौंडिण्य नदीचा संगम येथे झाला आहे. या ठिकाणाला परशुराम क्षेत्र असे म्हटले जाते. येथे परशुरामाने आपल्या आईचे डोके फोडण्याच्या पापापासून स्वत:ला शुद्ध केले असल्याचे सांगितले जाते. १७३५मध्ये बांधलेला २८३ वर्षांचा भारतातील सर्वांत जुना पूल येथे आहे. हे ठिकाण म्हैसूरपासून २३ किलोमीटरवर आहे.

२८३ वर्षांचा भारतातील सर्वांत जुना पूल
नुगू वन्यजीव अभयारण्य : हे म्हैसूर जिल्ह्यातील ३०.३२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. वनसंपदा व वनचर यांनी समृद्ध असे हे अभयारण्य आहे. येथे आवळा, चंदनाची झाडे आहेत. हत्ती, बिबटे व हरणेही दिसतात.

करापूर वनविहारकरापूर वनविहार :
कावेरी नदीच्या काठावर कर्नाटक टुरिझमद्वारे संचालित केले जाणारे हे पर्यटन केंद्र असून, येथे जंगल सफारी घडविली जाते. पर्यटकांसाठी तंबू, तसेच लॉजची व्यवस्था आहे. हे अत्यंत शांत ठिकाण असून, वनविहाराची अनोखी मजा घेता येते. वनभ्रमंतीमध्ये गवे, रानडुक्कर, हत्ती, बिबटे, हरणे आणि क्वचित प्रसंगी वाघही बघायला मिळतो. म्हैसूरच्या महाराजांचा जुना शिकारलॉज म्हैसूरपासून ४५ किलोमीटरवर आहे.

तालाकडतालाकड (किंवा तालुकुडू) : कावेरी नदीच्या काठावर असलेल्या वाळवंटात एक मंदिर समूह आहे. त्यामध्ये पाच शिवमंदिरांचा समावेश होतो. त्यामध्ये अर्केश्वर, वैद्यनाथेश्वर, पातालेश्वर, मरालेश्वर व कीर्तिनारायण अशी मंदिरे आहेत. येथे भव्य प्रवेशद्वारमंडप आहे. गंगा राजवटीत (इ. स. ३४५-९९९) हा मंदिरसमूह उभारला गेला असावा, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. तथापि, इतिहासकार आय. के. शर्मा यांच्या मतानुसार, राजा रचमाल्ला सत्यावाक्य चतुर्थ (इ. स. ९७५-९८६) याच्या काळात पातालेश्वर आणि मरालेश्वर ही दोन मंदिरे बांधण्यात आली असावीत. हे मंदिर कावेरीच्या पुरामुळे वाळूने भरले जात असे, तसेच त्याचे सतत नुकसान होत होते. त्याची बरेच वेळा अनेक राजवटींत दुरुस्ती झालेली दिसून येते. इतिहासकार अॅडम हार्डी यांच्या मते कीर्तिनारायण मंदिर होयसळ राजा विष्णुवर्धन यांनी तालाकडच्या लढाईत चोलांवर विजय मिळाल्याच्या प्रीत्यर्थ बांधले. हे म्हैसूरपासून ४८ किलोमीटरवर आहे.

म्हैसूरला कसे जायचे?

रेल्वे, विमान, तसेच हमरस्त्याच्या मार्गाने म्हैसूर सर्व भारताशी जोडलेले आहे. येथे राहण्यासाठी सर्व स्तरांतील हॉटेल्स आहेत. तसेच जेवणही चांगल्या प्रकारचे मिळते. म्हैसूरहून उटी, मडिकेरी, हळेबिडू, बेंगळुरू दर्शन अशी सहल करता येते.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 

तालाकड (किंवा तालुकुडू)

( म्हैसूरची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search