Next
महर्षी अरविंद यांचे अजरामर महाकाव्य - सावित्री
BOI
Sunday, December 23, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:महर्षी अरविंद
(१५ ऑगस्ट १८७२ ते पाच डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. अनेक वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या महाकाव्याबद्दल...
............
महर्षी अरविंद (१५ ऑगस्ट १८७२ ते पाच डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. इंग्लंडमध्ये १४ वर्षे शिक्षणासाठी वास्तव्य केल्यानंतर ते भारतात परतले. देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी त्यांनी काही काळ क्रांतिकारक म्हणून लढा दिला. त्यासाठी नियतकालिक काढून जहाल असे लेखनही केले. परंतु त्यांच्याद्वारे महान आध्यात्मिक कार्य घडवायचे होते. त्यामुळे योगाभ्यासाकडे वळून ते महायोगी बनले. काही दिवस क्रांतिकार्याबद्दल कारावास भोगल्यानंतर ते फ्रेंच वसाहत असलेल्या पाँडिचेरी शहरात कायमच्या वास्तव्यासाठी गेले. त्यांनी भारतीय तत्वज्ञानावर विपुल लेखन केले. ‘इंटिग्रल योग’ (पूर्ण योग) हे त्यांच्या विशेष योगपद्धतीवरील विवेचन आहे. आधुनिक मानवाची महामानवाच्या दिशेने कशी वाटचाल होत आहे, हे श्री अरविंदांनी स्पष्ट केले आहे. त्यांची अन्य महत्त्वाची पुस्तके म्हणजे लाइफ डिव्हाइन, सिंथेसिस ऑफ योग, वेद-उपनिषदे आणि गीतेवरील महाकाव्ये आणि सर्वांत प्रसिद्ध म्हणजे ‘सावित्री’ हे अमर महाकाव्य. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. अनेक वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. 

‘सावित्री’ नुसते वाचणे हीच एक साधना आहे. द्रष्ट्या ऋषींच्या ऋचांप्रमाणे त्यातील प्रत्येक ओळीला मंत्रसामर्थ्य प्राप्त झालेले आहे. हजारो साधकांना आध्यात्मिक वाटचालीत हे महाकाव्य मार्गदर्शक ठरत आलेले आहे. त्यात काय नाही? गूढविद्या, अतिमानवी शक्ती, तत्त्वज्ञान, मानवाचा आणि उत्क्रांतीचा इतिहास, देवदेवता रहस्य, सृष्टीची उत्पत्ती, निसर्ग, जग का निर्माण झाले, त्याचे भवितव्य, मानवाचा भविष्यकाळ या सर्व विषयांचे अत्यंत सुबोध, सविस्तर ज्ञान ‘सावित्री’त मिळते. त्याचे पहिले हस्तलिखित १९१६च्या दरम्यान तयार झाले. म्हणजे आधी बरीच वर्षे त्याचे लेखन सुरू होते. ही एकूण प्रक्रिया अरविंदांच्या आयुष्यभर, सुमारे ५० वर्षे, चालली होती. काही काही भागांचे ५-१० वेळा, तर काहींचे २० वेळा पुनर्लेखन झाले. निर्दोष महाकाव्याची निर्मिती अशीच तर होत असणार! अरविंद आश्रमातर्फे सुरुवातीला त्याची प्रकरणे क्रमश: प्रसिद्ध करण्यात आली. (श्री अरविंद मंदिर वार्षिक - सन १९४६ व १९४७; ‘अॅडव्हेंट’ नावाचे त्रैमासिक आणि १९४७मध्ये ‘श्री अरविंद सर्कल वार्षिकाच) संपूर्ण काव्य १९५० आणि १९५१मध्ये दोन भागांत प्रसिद्ध झाले. आज जगभर ‘सावित्री’ या विषयावर अभ्यासवर्ग सुरू असतात. साधकांच्या मनात कोणत्याही विषयामधील एखादी शंका उद्भवली आणि त्याने ‘सावित्री’चे सहजगत्या कुठलेही पान उघडले, तर त्या शंकेचे उत्तर मिळते, असे अनुभव त्यांना आलेले आहेत. 

सत्यवान-सावित्रीचे कथानक सर्वांना ठाऊक आहे. आपल्या नवऱ्याच्या आयुरारोग्यासाठी स्त्रिया वटपौर्णिमेला (ज्येष्ठ पौर्णिमा) वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. महाभारतामधील वनपर्वात पतिनिष्ठ सावित्रीची कथा आलेली आहे. मद्र देशाचा राजा अश्वपती आणि त्याची राणी मालवी यांना संतान नसल्यामुळे त्यांनी अनेक वर्षे यज्ञमाग आणि तपश्चर्या केली. गायत्री देवतेने प्रसन्न होऊन त्यांना प्रसादरूपाने कन्यारत्न दिले. तीच सावित्री. दैवी अवतार असल्याने ती रूपगुणसंपन्न होती. उपवर झाल्यानंतर तिला योग्य असा वर मिळेना. म्हणून आई-वडिलांनी तिलाच स्वतःसाठी मुलगा शोधण्याची अनुमती दिली. त्यासाठी सावित्री अनेक ठिकाणी गेली. एक वनात तिला एक तेजस्वी, मुखावर ज्ञानाचे तेज झळकणारा, सुंदर तरुण दिसला. दिसताक्षणीच तिने ‘हाच आपला सहचर’ असा निश्चय केला. तोही एका देशाचा राजकुमारच होता. त्याचे नाव सत्यवान. त्याच्या वडिलांना - राजा द्युमत्सेन याला - भाईबंदांनी पदच्युत केल्यानंतर ते सगळे त्या वनातील झोपडीत राहत होते. सत्यवान आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करत होता. सावित्री आणि सत्यवान विवाहबद्ध झाले. ती पतीसह वनातच राहू लागली. एकदा वडाच्या झाडाची लाकडे तोडत असताना सत्यवानाच्या मस्तकात तीव्र वेदना होऊन तो काही क्षणांतच मृत्युमुखी पडला. त्याचा जीवात्मा पवित्र असल्यामुळे खुद्द यमराज त्याला नेण्यासाठी आला. सावित्रीने त्याला पतीच्या प्राणदानाची कळवळीची विनंती केली; पण यम तयार होईना. त्याने तिला प्रेमाने, रागावून, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो आपल्या ‘लोका’कडे जायला निघाला. सावित्रीसुद्धा त्याच्या पाठोपाठ (सूक्ष्म देहाने) खडतर मार्गाची पर्वा न करता जाऊ लागली. दोघांच्यात तत्त्वज्ञानपर दीर्घ चर्चा झाली. तिची चिकाटी, निश्चय आणि मानवाच्या कल्याणासाठी तिने घेतलेला जन्म हे सगळे ध्यानात घेऊन यमराजाने सत्यवानाला आपल्या पाशातून मुक्त केले. आनंदी दाम्पत्य पृथ्वीवर परतले आणि त्यांनी दीर्घकाळ सुखी संसार केला. त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले. अशी ही थोडक्यात कथा आहे. महर्षी अरविंद यांना त्यात महाकाव्याचे बीज दिसले आणि अर्धशतकाच्या अखंड चिंतनातून एक अद्भुत साहित्यकृती निर्माण झाली. 

महर्षी अरविंदांना ‘सावित्री’साठी एक प्रदीर्घ प्रस्तावना लिहायची होती; पण ते घडले नाही. तथापि, त्यांनी लेखकाचे निवेदन म्हणून सुरुवातीला त्या दीर्घकाव्याचा सारांशच प्रस्तुत केला आहे. ते म्हणतात, ‘सत्यवान-सावित्री ही मृत्यूवर विजय मिळविल्याची कथा महाभारतात आहे. तथापि त्यात संकेत असा दिलेला आहे, की दैवी सत्य जाणणारा आत्मरूपी सत्यवान हा अज्ञान आणि मृत्यूच्या तडाख्यात सापडलेला आहे. सावित्री ही ज्ञानी सूर्यकन्या त्या दुष्टचक्रातून मानवाला मुक्त करण्यासाठी आली आहे. तिचा पिता अश्वपती हा आध्यात्मिक वाटचालीत उपयुक्त ठरणाऱ्या तपस्येचे प्रतीक आहे. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे अंध झालेले पवित्र मन आहे. अशा मानवी व्यक्तिरेखांद्वारे मर्त्य जीवनापासून दिव्य चैतन्यापर्यंत कसे जाऊन पोहोचायचे, याचे मार्गदर्शन आपल्याला मिळते. 

लग्नानंतर एका वर्षातच सत्यवानाचा मृत्यू होणार, हे भविष्य आधीच ठाऊक असूनही सावित्री आपला निर्णय बदलत नाही. ती प्रार्थना, उपवास आदी नित्यनेम चालू ठेवते. ठरलेल्या वेळी यम सत्यवानाचे प्राण हरण करतो आणि आपल्या ‘लोका’कडे जायला निघतो. सावित्रीही तिच्या तपाच्या बळावर त्याच्या मागोमाग जात राहते. यमाबरोबर तिचा अखंड संवाद होतो. तिचे ते ज्ञान, पातिव्रत्य, चातुर्य पाहून यमराज अखेर तिला वर प्रदान करून सत्यवानाला जिवंत करतो. तिच्या सासऱ्यांची गेलेली दृष्टी आणि राज्यही परत मिळते. पुत्रपौत्रांसह सगळे आनंदात जीवन घालवतात. या कथाबीजापासून अरविंदांनी तत्त्वज्ञान आणि दिव्य जीवनाचा विशाल वटवृक्ष उभारला. त्याच्यात उपजतच काव्यगुण भरलेले होते. बाराव्या वर्षापासून त्यांनी उत्तम कविता लिहायला सुरुवात केली होती. जगातील सर्व धर्म, तत्त्वज्ञानाने आणि योगसाधनेची मूलतत्त्वे त्यांनी ‘सावित्री’त विशद केली आहेत. पृथ्वी आणि मानवाचे भवितव्यही सांगितले आहे. देवता म्हणजे काय, कर्मसिद्धांत आणि मानवाला कसे निर्णयस्वातंत्र्य आहे, सप्तचक्रे आणि तंत्रविद्या काल्पनिक आहे काय, अशा शेकडो विषयांचा ऊहापोह ‘सावित्री’त झाला आहे. या महाकाव्याचे एकूण १२ भाग (प्रदीर्घ प्रकरणे) आहेत. १) प्रारंभ, २) प्रवाशाचे वृत्त, ३) दिव्य माता, ४) जन्म आणि जीवनाचा शोध, ५) प्रेम, ६) प्रारब्ध (कर्म), ७) योग, ८) मृत्यू, ९) सनातन (अखंड चालू असलेली) रात्र, १०) दोन संधिप्रकाश, ११) न संपणारा दिवस आणि १२) उपसंहार. 

यमराज आणि सावित्री यांच्यातील वादविवाद हा महाकाव्याचा गाभा आहे. इहवादी जीवन आणि अनेक पळवाटा असलेले ‘आदर्श’ तत्त्वज्ञान यांच्या मर्यादा तिथे लक्षात येतात. यम तिचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न करतो; पण ती दृढनिश्चयी आहे. पतीला जिवंत परत नेल्याशिवाय ती स्वस्थ होणारी नाही. यमाला आपले कर्तव्य पार पडणे भाग आहे आणि सावित्री म्हणते, की दिव्य प्रेम मृत्यूपेक्षाही श्रेष्ठ आहे. दोघांचेही म्हणणे सत्य आहे. परंतु तिचे सत्य वरचढ आहे. तिला आपले ध्येय - जीवनाचे उद्दिष्ट - गाठायचे आहे. मृत्यूवर विजय आणि पृथ्वीवर चिरशांती आणणे, हेच ते ध्येय! हे दैवी कार्य आहे. आणि त्यासाठीच तिचा जन्म आहे. वाद-प्रतिवाद होत राहतात. यम अनेक प्रकारचे युक्तिवाद करतो; पण ती अचल आहे. अखेर यमराजाला तिचे खरे स्वरूप कळून येते आणि सावित्रीला तिचा पती परत मिळतो. 

पृथ्वीवर स्वर्गाचे अर्थात ईश्वराचे राज्य स्थापित करणे, हेच अरविंदांचे ध्येय होते. ‘सावित्री’च्या माध्यमातून त्यांनी साऱ्या जगाला त्याचा मार्ग दर्शविला. या महाकाव्याचे लेखन उच्च श्रेणीच्या इंग्रजीत झालेले आहे. त्यामुळे ते सहजासहजी समजणे कठीण आहे. त्यासाठी ‘सावित्री’चे अनुवाद मदतीला आहेत. हा विषय ज्यांनी आत्मसात केलेला आहे, त्याचे मार्गदर्शनही मिळू शकते. मूळ महाकाव्य जरी वाचता आले नाही, जमले नाही, तरी इच्छा असल्यास, तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारी आणि भवसागर तरून नेणारी ‘नौका’ आपल्याला निश्चित उपलब्ध होईल.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search