Next
‘जीवनदायिनी’च्या जीवितासाठी झटणारी संस्था
BOI
Friday, January 19, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

जीवित नदी संस्थेचे सदस्य

पुण्यातील ‘जीवित नदी’ ही संस्था शहरातील नद्यांच्या संरक्षणासाठी काम करते. ही संस्था म्हणजे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याकरिता वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांमधून एकत्र आलेल्या व्यक्तींचा समूह आहे. जीवनदायिनी असलेल्या नद्या जीवित राहण्यासाठी झटणाऱ्या या संस्थेबद्दल पाहू या ... ‘लेणे समाजाचे’ या सदरात...
.......
‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा दीड वर्षाचा पर्यावरणविषयक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काही जणांनी नदी पुनरुज्जीवनाचे काम करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ‘जीवित नदी’ हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला काही जणांपुरती मर्यादित असलेली ही चळवळ आता चांगलीच रुजली आहे. जीवित नदी ही केवळ एक संस्था नसून, नदीचे अस्तित्व टिकवण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी असलेला एक मंच किंवा सल्लागार मंडळ आहे. 

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, नदी पुनरुज्जीवनाच्या कामात लोकांना सहभागी करून घेणे व रासायनिक पदार्थविरहित जीवनशैली स्वीकारून नदीचे प्रदूषण कमी करण्यास लोकांना प्रवृत्त करणे, तसेच नदीच्या पुनरुज्जीवनासाठी शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित व पर्यावरणपूरक व्यवस्थापन आराखडा तयार करणे, अशा विविध स्तरांवर संस्था काम करते.

ही लोकसहभागातून वाढत गेलेली एक चळवळ आहे. ही चळवळ एका शहरापुरती, एका नदीपुरती मर्यादित नाही. नदी सुधारणेचे हे प्रयत्न कुठल्याही शहरात केले जाऊ शकतात. त्यासाठी संस्थेचे सदस्य नेहमीच तत्पर असतात. लोकसहभाग वाढावा आणि लोकांचे नदीशी असलेले नाते पुन्हा जोडले जावे, या दृष्टिकोनातून संस्थेच्या बहुतेकशा कामांची आखणी केली जाते. 

मुठा नदी ही पुणे शहराची जीवनदायिनी आहे. या नदीमुळेच पुणे शहर अस्तित्वात आले. परंतु भारतातील इतर शहरांप्रमाणेच पुणेही आपल्या जीवनदायिनीबरोबरचे नाते हरवून बसले आहे. शहरातील सांडपाणी व कचरा वाहून नेणारा नाला एवढेच अस्तित्व उरले आहे. तिच्या पुनरुज्जीवनासाठी संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. 

मुठाई नदी महोत्सव :
लोकांची नदीविषयीची आत्मीयता वाढावी या उद्देशाने संस्था दर वर्षी ‘मुठाई नदी महोत्सव’ आयोजित करते. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच महोत्सव आहे. विविध क्षेत्रांतील आणि विविध वयोगटांतील लोकांना सहभाग घेता येईल, अशा प्रकारे या महोत्सवाची रचना केली जाते.
मुठा नदीचा पुरातन काळापासून आजपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवणारे प्रदर्शन या महोत्सवात आयोजित केले जाते. सर्वप्रथम २०१५मध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यानंतर हे प्रदर्शन अनेक ठिकाणी भरविण्यात आले.

मुठाई रिव्हर वॉक :
‘हेरिटेज वॉक’च्या धर्तीवर आयोजित केलेला मुठा नदीविषयी माहिती देणारा हा उपक्रम दर रविवारी घेण्यात येतो. विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, पत्रकार, महानगरपालिकेतील अधिकारी, परदेशी नागरिकही या ‘वॉक’मध्ये सहभागी होतात. जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 

विषद्रव्यमुक्त जीवनशैली
मुठा नदीचे ७० टक्के प्रदूषण घरगुती सांडपाण्यामुळे होते. आपण घरात वापरलेले पाणी नदीमध्ये जाताना ‘सांडपाणी’ म्हणून जाते. आपल्या दररोजच्या वापरातील टूथपेस्ट, शाम्पू, डिटर्जंट यांच्यातील अनेक घातक रसायने या सांडपाण्यात असतात. पाण्याचे शुद्धीकरण केले, तरी ही रसायने नष्ट होत नाहीत. ही रसायने मानवी जीवनासाठी अत्यंत घातक आहेत. त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे ही रसायने नदीच्या पाण्यात मिसळण्यापासून थांबवणे. यासाठी विषद्रव्यमुक्त जीवनशैली अंगीकारणे आवश्यक असून, या शैलीचा प्रसार करण्याचे काम संस्था करते.  

ही जीवनशैली अंगीकारणे म्हणजे जैवविघटनशील, विषद्रव्य-विरहित असलेली, पूर्वापार चालत आलेली घरगुती उत्पादने वापरणे. ही उत्पादने वापरून आपली प्रकृती तर चांगली राहतेच. शिवाय नद्यांचे, पर्यावरणाचेही आपोआप संरक्षण होते. आपल्या पूर्वजांनी नेमका हाच दृष्टिकोन ठेवून, रीतसर संशोधन करून, पर्यावरणाशी सुसंगत, नैसर्गिक, स्थानिक आणि सहज उपलब्ध असलेलीच उत्पादने वापरात आणली होती. ‘घातक रसायन-विरहित जीवनशैली’ अंगीकारणे सोपे जाण्यासाठी, जीवित नदी समूहाने घरगुती वापरासाठी घातक रसायन-विरहित नैसर्गिक उत्पादनांचा एक संच बनविला आहे. या संचाविषयीची सविस्तर माहिती संस्थेच्या वेबसाइटवर ‘विषद्रव्य-विरहित जीवनशैली’ या विभागात उपलब्ध आहे. 

संस्थेचे अन्य उपक्रम :
जीवित नदी समूहातील सदस्य शाळेतील मुलांसाठी पंचमहाभूतांविषयी माहिती देणारे उपक्रम आयोजित करतात. याद्वारे मुलांना नावीन्यपूर्ण रीतीने निसर्गाशी जोडण्यात मदत होते.

नदी ही परिसंस्था अनेक परिसंस्थांशी जोडलेली असल्याने ‘नदीचा अभ्यास’ हे अनेक विषयांशी ओळख करून देणारे क्षेत्र आहे. यावरच आधारित एका शालेय अभ्यासक्रमाची रचना ‘जीवित नदी’च्या सदस्यांनी केली आहे. 

अनेक शाळा, महाविद्यालये, कंपन्या आणि सामाजिक संस्था ‘जीवित नदी’ या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. विविध उपक्रमांद्वारे लोकांची नदीविषयीची आत्मीयता वाढवण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. ‘लोकांच्या सहभागाशिवाय कोणताही नदी-संवर्धन प्रकल्प यशस्वी व शाश्वत होऊ शकत नाही,’ असा संस्थेच्या सदस्यांचा ठाम विश्वास आहे. 

संपर्क : शैलजा देशपांडे, जीवित नदी
मोबाइल : ९८२२३ ९१९४१
ई-मेल : shailajadesh@gmail.com
वेबसाइट : http://www.jeevitnadi.org

(‘जीवित नदी’च्या शैलजा देशपांडे यांच्याबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link