Next
वैभवशाली साताऱ्याची सफर - भाग तीन
BOI
Saturday, April 13, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अजिंक्यतारा

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण साताऱ्याच्या पश्चिम बाजूची पर्यटनस्थळे पाहिली. या भागात सातारा शहराच्या आग्नेयेकडील पर्यटनस्थळे पाहू या. 
........
अजिंक्यतारा : ही मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजधानी राजगड, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. या किल्ल्याचे बांधकाम शिलाहार राजा भोज दुसरा याच्या कारकिर्दीत इ. स. ११९०मध्ये झाले. त्यानंतर बहामनी सुलतान, त्यानंतर विजापूरचा आदिलशहा यांच्याकडे हा किल्ला होता. सन १५८०मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबीबी हिला येथे कैदेत ठेवण्यात आले होते. २७ जुलै १६७३मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. शिवाजी महाराज काही दिवस तब्येत बरी नसल्याने दोन महिने येथे राहिले होते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मुघलांची दृष्टी या किल्ल्याकडे जरा उशिराच गेली. औरंगजेबाने सन १६९९मध्ये किल्ल्याला वेढा घातला. चार महिने किल्ला किल्लेदार प्रयागजी प्रभू यांनी लढविला. औरंगजेबाने फंदफितुरी करून अखेर १३ एप्रिल १७०० रोजी किल्ला घेतला. 

अजिंक्यतारा किल्ल्याचे विहंगम दृश्य

किल्ल्याला आझमतारा असे नाव देण्यात आले. महाराणी ताराबाईसाहेब यांनी किल्ला परत जिंकला व अजिंक्यतारा हे नाव दिले; पण परत किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला; मात्र सन १७०८मध्ये छत्रपती संभाजीपुत्र शाहूमहाराज यांनी हा किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार करण्यासाठी छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना केली. सन १७२१मध्ये राजधानी सातारा गावात अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी नेली. महाराणी ताराबाई कोल्हापूर येथून गृहकलहामुळे सातारा येथे आल्या. त्यांची व्यवस्था शाहूमहाराजांनी अजिंक्यताऱ्यावर केली. त्यांचे निधन येथेच झाले. दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ रोजी इग्रजांकडे गेला. 

यवतेश्वर डोंगरावरून दिसणारा अजिंक्यतारा

साताऱ्यातून कोल्हापूर रस्त्यावरील गोडोलीतील साईबाबा मंदिरापासून पश्चिमेला गेलेला रस्ता थेट अजिंक्यतारा किल्ल्यावर जातो. तसेच नगरपालिका कार्यालयाजवळील चौकातून चारभिंतीकडे गेलेला रस्ता याच रस्त्याला येऊन मिळतो. शंकराचार्य मठाजवळून मारुती मंदिराकडे गेलेली पायरीवाट याच रस्त्याला जाऊन मिळते. किल्ला सर्व बाजूंनी जंगलाने वेढलेला आहे. बऱ्याचदा यावर बिबटे, मोर यांचे दर्शन होते. हा किल्ला टेबललँड प्रकारातील त्रिकोणी आकारात आहे. किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी आहे. बांधीव तटाचे काम फारच थोड्या उंचीचे आहे. सर्व बाजूंनी साधारण ४० ते ५० फूट उंचीचा उभा कातळ आहे. रॅपलिंग केल्याशिवाय चढणे अशक्य. त्यावर साधारण पाच ते सात फूट उंचीची तटबंदी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडून बुरुजासहित दरवाजा आहे. दरवाज्यावर काही शिल्पे आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस उजवीकडे मारुती मंदिर आहे. सातारा शहरातील अनेक लोक व्यायामासाठी या मंदिरापर्यंत रोज चालत येतात. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. 

गडावर श्रमदानाने स्वच्छता करण्यात येते. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. तसेच सातारा शहरातील सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, वनविभाग, नगरपालिका यांचा यात सहभाग असतो. त्यामुळे आता हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. येथे दूरदर्शनचे दोन मनोरे आहेत. पुढे डावीकडे मंगळाई देवीच्या मंदिराकडे वाट गेली आहे. या वाटेवरच वाड्याचे भग्नावशेष व कोठार आहे. येथेच महाराणी ताराबाई यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. मंदिरापर्यंत जाईपर्यंत तीन तळी आहेत. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन टॉवर आहेत. पुढे गेल्यावर डावीकडे जाणारी एक वाट दिसते व ‘मंगळादेवी मंदिराकडे’ असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचे निवासस्थान असलेला, पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. येथे जमिनीमध्ये खोदण्यात आलेला एक खोल तुपाचा रांजण आहे. या रांजणातील तूप जखमी सैनिकांच्या जखमेवर लावले जात असे. या वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर दिसते. 

मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आहेत. गडाच्या दक्षिणेलाही नैर्ऋत्य कोपऱ्यात एक दरवाजा आहे. किल्ल्यावरून पश्चिमेला यवतेश्वराचे पठार, उत्तरेस मेरुलिंग, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, ईशान्येकडे जरंडेश्वर, पूर्वेस त्रिपुटी खिंड, औद्योगिक वसाहत व आकाश स्वच्छ असल्यास वर्धनगडही दिसतो. दक्षिणेस शिलोबाचा डोंगर, सज्जनगड व ठोसेघर बाजूला पवनचक्क्या दिसून येतात. 

शिलोबाचा डोंगर : साताऱ्याच्या बोगद्यातून डावीकडे वळले, की सोनगाववरून उजवीकडे डोंगराकडे रस्ता गेला आहे. समोरच शिवाजीनगर (मुद्गलभटाची वाडी) आसनगाव फाट्यावर उजवीकडे शिलोबाचा डोंगर आहे. या डोंगरावर शिलोबाचे छोटे देऊळ आहे. हा डोंगर ट्रेकर्ससाठी खूप छान आहे. वर रीज पॉइंट आहे. डोंगराच्या दोन्ही बाजूंना तीव्र उतार आहे. 

सज्जनगडाचे छत्रपती शिवाजी महाराज द्वार

सज्जनगड :
येथे समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराज काही काळ येथे राहिले होते. श्री श्रीधरस्वामी यांचेही या गडावर बरेच दिवस वास्तव्य होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची समर्थ रामदास स्वामींशी सन १६७३मध्ये भेट झाली होती. फार भेटी झाल्या नसल्या, तरी महाराज समर्थांचे आध्यात्मिक कार्य ओळखून होते. त्यामुळे सज्जनगडावर त्यांची त्यांनी व्यवस्था लावून दिली होती. संत तुकाराम महाराज, श्री रामदास स्वामी, सूफी संत याकूबबाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. या तिन्ही संतांबद्दल महाराजांना आपुलकी होती व त्यांचे क्षेमकुशल जाणून घेत असत. समर्थांच्या वास्तव्याने हे एक तीर्थक्षेत्र झाले आहे. ‘सज्जनगड’ असे नाव उच्चारले, तरी नजरेसमोर येते, ती तेजस्वी, बलदंड, फक्त लंगोटी लावलेली, डाव्या हातात कुबडी, उजव्या हातात जपमाळ, दाढी व जटाधारी, डाव्या खांद्यावर भिक्षेची झोळी अशी समर्थ रामदास स्वामींची मूर्ती. मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील जांब ही त्यांची जन्मभूमी. सज्जनगड ही त्यांची कर्मभूमी. त्यांचे गडावर वास्तव्य फार थोडे असायचे. 

ते सतत रामस्तुती व बळसंवर्धनाचा प्रचार करीत भ्रमण करीत असत. त्यांची समाधी येथे आहे. या गडास आश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची वस्ती असल्याने अस्वलगड, नवरसतारा, परळीचा किल्ला अशी आणखीही काही नावे इतर कालखंडांत लाभली आहेत. 

शिलाहार राजा भोज याने या किल्ल्याची उभारणी ११व्या शतकात केली. शिवाजीराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून दोन एप्रिल १६७३ रोजी जिंकून घेतला. पूर्वी परळी गावातून सुमारे ७०० पायऱ्या चढून या किल्ल्यावर जावे लागत असे. आता सातारा ठोसेघर मार्गावर घाटाच्या मध्यावर उजवीकडे एक रस्ता निघतो तो थेट सज्जनगडावर जातो. हा किल्ला क्षेत्रफळाने छोटा आहे. किल्ल्यावर समर्थशिष्य कल्याणस्वामी मंदिर, पुढे गेल्यावर एका बाजूला मारुतीचे व दुसऱ्या बाजूला गौतमीचे मंदिर आहे. श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. 

गडावर जाताना पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे नाव आहे. दुसऱ्या दरवाजाला समर्थद्वार असे म्हणतात. येथून आत शिरताना समोरच एक शिलालेख आढळतो. गडावर प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. तेथे समर्थांची एकांतात बसण्याची जागा असून, ती रामघळ नावाने ओळखली जाते. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामादासांना अंगलाईची मूर्ती सापडली होती. अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले. 

समर्थांच्या समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. या मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिर परिसरात अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामध्ये पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. यामध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या अक्काबाई हिचे वृंदावन आहे. गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे. त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात. येथून कण्हेर धरणाचे विहंगम दृश्य दिसते. 

समर्थ रामदासस्वामी समाधी

सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच उरमोडी धरणाच्या खालच्या बाजूस केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथे खजुराहो शैलीतील कोरीव शिल्पे आहेत. धरणाच्या दक्षिण बाजूने पुढे गेल्यावर कुस गावापासून जवळच ‘मोरघळ’ नावाची गुहा आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात येथे दासनवमी उत्सव साजरा करतात. शके १६०३ माघ नवमी (सन १६८२) रोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थान यांच्या वतीने उत्सव साजरा केला जातो. या वेळी भाविकांची गर्दी होत असते. गडावर राहण्याची छान सोय आहे. सज्जनगडावर पूर्वी तलावातून पाणी काढण्यासाठी पवनचक्कीचा वापर व्हायचा ठोसेघर परिसरात विद्युतनिर्मितीसाठी पवनचक्क्या उभारण्याच्या अगोदर वायुऊर्जेचा वापर होत होता. आता उरमोडी नदीतून दोन-तीन ठिकाणी इंजिनद्वारे पाणी उचलून गडावर आणले जाते. 

ठोसेघर धबधबाठोसेघर धबधबा : हा धबधबा ३० वर्षांपूर्वी कोणास माहीत नव्हता. अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी यावर लेख लिहून तो लोकांसमोर आणला. ३० वर्षांपूर्वी गजवडीपासून चाळकेवाडीपर्यंत रस्त्याचे काम झाले आणि सातारकर दर सुट्टीला या बाजूला येऊ लागले. हळूहळू याची कीर्ती सर्वदूर झाली आणि हे एक पर्यटनस्थळ झाले. मुख्य धबधबा ४०० फूट उंचीवरून कोसळतो. खरे तर हा धबधबा चाळकेवाडीकडून चांगला दिसतो. पायऱ्यांवरून उतरत असताना समोर दोन-तीन धबधबे दिसतात. त्यातील एक साधारण ५० फूट, तर दुसरा ६० फूट उंचीचा आहे. पायऱ्या उतरून खाली आल्यावर एक प्लॅटर्म बांधण्यात आला आहे. त्याच्यावर उजवीकडे पाहिले असता मुख्य धबधबा दिसतो. खोल दरीत पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा गंभीर, पण लयबद्ध आवाज येत असतो. मोठ्या धबधब्याच्या वरच्या बाजूस आणखी एक छोटा धबधबा आहे. उन्हाळ्यात याच्याखाली आंघोळही करता येते. साधारण सप्टेंबरनंतर डिसेंबरपर्यंत छोट्या धबधब्यात स्नानाची मजा घेता येते. प्लॅटफार्मपासून छोट्या धबधब्यापर्यंत दाट झाडीतून पेव्हरचा फुटपाथ करण्यात आला आहे. वर बांधलेल्या धरणातून गळतीमुळे बारा महिने हा धबधबा पाहायला मिळतो; मात्र पावसाळ्यात याचे रौद्र रूप बघण्यासारखे असते. येथे चुकीला क्षमा नाही. येथे अनेक जण खाली पडले, ते कायमचे वर जाण्यासाठीच. तेव्हा येथे गेल्यावर जपून वागणेच इष्ट. सेल्फीचा मोह टाळावा. बऱ्याचदा पावसाची उघडझाप होत असताना दरीतून एकदम ढग उचलले जातात व खाली दरीचे सुंदर दृश्य दिसते, तर मध्येच ढग संपूर्ण दरी व्यापून टाकतात. ठोसेघरजवळील पवारवाडीकडून पिलाणी गावाकडे एक रस्ता गेला आहे. या गावात मंडपघळ नावाची गुंफा आहे. येथे जिवंत झरा आहे. तसेच पुढे गेल्यावर डोंगराच्या कडेला खडकावर महाबळेश्वरसारखे ‘निडल होल’ आहे. 

चाळकेवाडी : ठोसेघरपासून पुढे तीन-चार किलोमीटर अंतरावर चाळकेवाडी येथील पवनऊर्जा प्रकल्प बघण्यासारखा आहे. चाळकेवाडीपासून पाटणपर्यंत पवनचक्क्यांचे जंगल आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. साधारण १९९७च्या सुमारास येथे मनोरे उभारण्यात आले. त्यांची उंची साधारण १०० फुटांच्या आसपास आहे, तर पाती ४५ फूट लांबीची आहेत. साधारण ७०० किलो वजनाची तीन पाती असतात. अर्थात हा प्राथमिक अवस्थेतील प्रकल्प आहे. आता याहून मोठे मनोरे व पंखे असतात. रस्त्यापासून ५०० मीटर अंतरावर पश्चिमेला शिवसागर जलाशय दिसतो. या बाजूला गवे, बिबटे, अस्वले, कोल्हे यांचा वावर आहे. 

वीर मारुती, दास मारुती, चाफळचाफळ : श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे सातारा जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे ठिकाण. चाफळ हे सुप्रसिद्ध कवी यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ ‘कवी यशवंत’ यांचे गाव. समर्थांनी चाफळचे राममंदिर शके १५६९मध्ये (सन १६४८) आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधले. साताऱ्याजवळील अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात समर्थांना श्रीरामाची मूर्ती सापडली. तिची स्थापना चाफळमधील या देवळात करण्यात आली. समर्थ रामदासांनी मारुतीची अनेक मंदिरे उभी केली. त्यातील ११ मारुतींपैकी दोन मारुती मंदिरे येथे आहेत. दास मारुती व प्रताप मारुती ही दोन मारुती मंदिरे श्रीराम मंदिर परिसरातच आहेत. जवळ असलेल्या डेरवण येथे छत्रपती शिवाजीमहाराज व रामदास स्वामींची भेट झाली. याच परिसरात पश्चिमेला तोंडोशी येथील घळीमध्ये (गुंफा) सन १६४४च्या सुमारास समर्थ काही काळ राहिले होते. तसेच जवळ असलेल्या चरेगावजवळील चंद्रगिरी गुहेतही ते ध्यानधारणा करीत असत. अलीकडे मफतलाल या उद्योगपतींनी देवळाचा जीर्णोद्धार करून संपूर्ण संगमरवराचे मंदिर बांधले आहे. चाफळ उंब्रजपासून १० किलोमीटर अंतरावर पाटण रस्त्यावर चरेगावच्या उत्तरेस मांड नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. 

शिंगणवाडी येथील खडीचा मारुतीचाफळच्या आसपासचे समर्थस्थापित मारुती :
शिंगणवाडी येथील खडीचा मारुती चाफळपासून एक किलोमीटरवर आहे. शके १५७१मध्ये या मूर्तीची स्थापना झाली. माजगाव येथील मारुती चाफळपासून दीड मैलाच्या अंतरावर आहे. या मारुतीच्या स्थापनेविषयी दंतकथा सांगतात, की या गावाच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा दगड होता. या दगडाचीच लोक ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजा करीत असत. नंतर समर्थांच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली उंब्रज मठातील मारुतीची स्थापना १५७०मध्ये झाली. समर्थांनी मारुती मंदिर व त्या पाठोपाठ मठही स्थापना केला. हा मारुती समर्थांच्या अकरा मारुतीतील बालमारुती वाटतो. शहापूरमध्ये शके १५६६मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. कराड-मसूर रस्त्यावर सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर शहापूर फाटा असून, मुख्य रस्त्यापासून मारुतीचे मंदिर दोन फर्लांग आत आहे. येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली आहे. म्हणून त्याला चुन्याचा मारुती म्हटले जाते. मूर्तीची उंची सहा फूट आहे. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मसूर येथील महारुद्र मारुतीची स्थापना शके १५६६मध्ये करण्यात आली. समर्थस्थापित अकरा मारुतींपैकी सात मारुती उंब्रज परिसरातच आहेत. दोन मारुती सांगली व दोन मारुती कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. 

मसूरचा मारुती

सडा वाघापूर :
येथे उलटा धबधबा आहे. सातारा जिल्ह्यात पाटणजवळ सडा वाघापूर येथे ही निसर्गाची अजब किमया पाहायला मिळते. अत्यंत दाट धुके असलेल्या मोठ्या पावसात येथे जाऊ नये. साधारण जुलैनंतर सप्टेंबर अखेर जावे. असे अनेक धबधबे पश्चिम घाटात आहेत. (शिवथरजवळ भोर-महाड मार्गावरही असा धबधबा आहे.) आग्नेय दिशेस पडणाऱ्या या धबधब्याचे पाणी वाऱ्याच्या दाबाने परत वर फेकले जाते. अर्थात वारा जोरात असेल, तरच ही मजा अनुभवता येते. येथे पवनचक्क्या असून, विद्युतनिर्मितीही होते. यावरून वाऱ्याच्या वेगाची कल्पना येईल. धबधब्याजवळ जाऊ नये. वाऱ्याने तोल जाऊ शकतो. तेथे सेल्फीचा प्रयत्न टाळावा. शक्यतो सकाळी जावे आणि सायंकाळी पाच वाजण्याच्या आत तेथून परत फिरावे. साताऱ्याहून कोल्हापूरला जाताना नागठाण्याच्या पुढे काशीळ फाटा येतो. तेथून उजवीकडे खंडोबाचे पाल (किंवा पाली) आहे. येथे म्हाळसा व खंडोबाचा विवाह झाला. तेथून सडा वाघापूर येथे जाता येते. तसेच ठोसेघरहूनही तारळे येथे येऊन येथे जाता येते. उंब्रज-खंडोबाचे पाल-तारळे मार्गानेही जाता येते. येताना उशीर झाल्यास पाटणमार्गे यावे. येथे बिबट्याही दिसू शकतो. या ट्रिपबरोबर कोयना, ओझर्डे धबधबा, येराड धबधबा किंवा तारळेमार्गे परत आल्यास ठोसेघर येथेही जाता येते. 

सडा वाघापूरयेथील उलटा धबधबा

खंडोबाचे पाल :
येथील खंडोबा मंदिर ८०० ते ९०० वर्षे पुरातन आहे. मल्हार पुराणात खंडोबाची १२ ठिकाणे सांगितली जातात. त्यापैकी पाल किंवा पाली हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. महामार्गावरील काशीळ किंवा उंब्रज येथून येथे जाता येते. पौराणिक कथेतील समुद्रमंथनात उत्पन्न झालेल्या अमृताचे देव आणि दैत्यांना वाटप करण्याच्या कारणाने श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. त्या वेळी मोहिनीच्या रूपावर शंकर भाळले. त्या वेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले, की तू ज्या वेळी मार्तंडभैरवाचा अवतार धारण करशील, त्या वेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली. म्हणून तिचे नाव महालयाशक्ती असे ठेवण्यात आले. तीच म्हाळसा. तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येच्या रूपामध्ये प्रवेश केला. चिम्माशेठने तिचे पालनपोषण केले व तिचा विवाह वाण्याने मार्तंडभैरवाशी पौष शु. पौर्णिमा या दिवशी करून दिला. म्हाळसा व म्हाळसाकांत येथून गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्या वेळी पाली येथील खंडोबाला मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तिप्रीत्यर्थ येथे देव निर्माण झाला. म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले, अशी कथा सांगितली जाते. येथून पुढे १० किलोमीटर अंतरावर तारळी नदीवर धरण आहे. हा परिसरही निसर्गरम्य आहे. 

खंडोबाचे पाल

किल्ले मोरगिरी :
पाटणपासून कोयनानगरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच डोंगररांगा, डाव्या बाजूला सतत दुथडी भरून वाहणारी कोयना नदी, असे सुंदर दृश्य दिसत असते. उजव्या बाजूला दातेगड, डाव्या बाजूला किल्ले मोरगिरी, त्याच्या पलीकडे गुणवंतगड असे किल्ले आहेत. ट्रेकर्ससाठी ही ठिकाणे चांगली आहेत. शासनाच्या सेवेत असताना माझी एकदा एका निवडणुकीत किल्ले मोरगिरी येथे मतदान केंद्राधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. या गडावर आता काहीही बघण्यासारखे शिल्लक नाही. यांचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. मोरगिरीवर एका गुहेमध्ये जखमातेचे स्थान आहे. येथे पाण्याचा जिवंत झरा आहे. 

दातेगड

दातेगड :
हा किल्ला पाटण गावाजवळ आहे; पण येथे जाण्यासाठी गाडीरस्ता नाही. चालतच जावे लागते. दातेगडास सुंदरगड असेही नाव होते. गडाला चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी आहे. पश्चिम तटावरील दरवाजा भूकंपात पडला, असे सांगतात. शेजारीच सहा फूट उंचीची गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे दिसतात. या मूर्तीशेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची मारुतीची मूर्तीही आहे. दातेगडाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केलेल्या आहेत. या किल्ल्यावर कातळ खोदून विहीर काढली आहे. या विहिरीचा आकार तलवारीसारखा आहे. 

गुणवंतगड

वाल्मिकी पठार :
हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. वाल्मिक ऋषींची तपोभूमी वांग नदीचे उगमस्थान असून, जवळच नाईकबाबा हे धार्मिक ठिकाण आहे. 

श्री येडोबा
मारुल : या भागातील पाच-सहा गावांसाठी कर्मवीर भावराव पाटील यांनी एका टेकडीवर १९४७मध्ये शाळा सुरू केली होती. या शाळेचे नाव (रयत शिक्षण संस्थेचे) ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी असे आहे. शाळा निसर्गाच्या वातावरणात आहे. शाळेच्या शेजारी विहिरीकेषण हा पाण्याचा मोठा प्रकल्प आहे. श्रीनिवास पाटील यांचे हे गाव आहे. 

केरा धबधबा : पाटण गावातच केर नदी कोयना नदीस मिळते. या नदीवर उत्तरेकडे निवकाने गावाच्या पुढे २०० फूट उंचीचा धबधबा आहे. हा फारसा परिचित नाही. बरेच चालावे लागते. 

येराड : श्री येडोबा देवामुळे तीर्थक्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. श्री जोतिबाप्रमाणेच श्री येडोबादेवाचे भक्तही संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. दर वर्षी यात्रेला अलोट गर्दी असते. हनुमान जयंती म्हणजे पौर्णिमेपासून यात्रा सुरू होते व पाच दिवस चालते. दोन दिवस मोठा बाजार भरतो. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या सासणकाठ्या पाहण्यासाठी भक्तांची गर्दी जमते आणि ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीत परिसर न्हाऊन जातो. 

येरफळे : याच रस्त्यावर या गावाजवळ एक बौद्धकालीन गुंफा आहे. येथे एक छोटे चैत्यगृह असून, स्तूपाचे अवशेषही आहेत. 

कोयना धरण

शिवसागर कोयनानगर

कोयनानगर :
येथे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे जलविद्युत केंद्र आहे. हे संपूर्ण काँक्रीटचे धरण आहे. हे धरण १०५ टीएमसी क्षमतेचे असून, त्याच्या जलाशयाचा विस्तार महाबळेश्वरजवळील तापोळ्याच्या मागे देवळीपर्यंत गेला आहे. पूर्वेकडे जाणारे पाणी नवजा येथून बोगद्यातून कोकणात अलोरे येथील विद्युतघरात नेले जाते व जनित्राद्वारे विद्युतनिर्मिती होते. चार टप्प्यांतील वीज उत्पादन क्षमता १९२० मेगावॉट आहे. धरणाची उंची ३३९ फूट असून, लांबी २६४८ फूट आहे. धरणाच्या भिंतीच्या पश्चिम बाजूवरील नेहरू उद्यानाततून गर्द झाडीने झाकलेल्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर शिवसागराचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. पाचगणीसारखे सुंदर वातावरण येथे असते. 

ओझर्डे धबधबा

ओझर्डे धबधबा :
कोयनानगरहून नवजाकडे जाताना हुंबरळी गावाजवळ ५०० फूट उंचीवरून पडणारा हा सुंदर धबधबा आहे. येथे पाचव्या टप्प्यातील विद्युतनिर्मितीचा प्रस्ताव आहे. कोकणात जाणारे पाणी परत उचलून घेऊन पुन्हा विद्युतनिर्मितीची योजना आहे. 

कोयना अभयारण्यातील शेकरूकोयना अभयारण्य : चांदोली व कोयना अभयारण्यांचा मिळून सह्याद्री व्याघ्रप्रकल्प साकारला आहे. हे अभयारण्य मानवमुक्त अभयारण्य आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या महाबळेश्वरपासून चांदोलीपर्यंत हे अभयारण्य वसले आहे. सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला उतार असलेल्या या अभयारण्यात कोठेही मानवी वस्ती नाही. कोयनानगरच्या पुढे असलेल्या अवसरी येथे वनविभागाचे विश्रामगृह आहे. येथून बोटीने अभयारण्य दाखविणाऱ्या गावकऱ्यांच्या संस्था आहेत. या जंगलात पट्टेरी वाघ, बिबटे. कोल्हे, शेकरू, गवे अशा अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यांची वस्ती आहे. 

भैरवगड : पाटणच्या पुढे चिपळूण रस्त्यावर हेळवाक येथून चालत जावे लागते. तिथून मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला गेल्यावर, डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून एक तास गेल्यावर रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली रामघळ लागते. (याच रामघळीत रामदास स्वामींना ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.) या रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडल्यास भैरवडावर पोहोचता येते. भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी हा एक. बाकीचे असे : भैरवगड (ठाणे जिल्हा), कणकवलीजवळचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा), कोथळ्याचा भैरवगड, नरडव्याचा भैरवगड. 

शिवसागर कोयनानगर

साताऱ्यातील गड चांदोली व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात आहे. येथून प्रचितगड, तसेच निसर्गरम्य पाथरपुंजही पाहता येते. चिपळूणपासून रत्नागिरी रस्त्याला २१ किलोमीटरवर असुर्डे फाटा लागतो. तिथून डावीकडे पाते (गोवळपाती) गावापर्यंत रस्ता जातो. पाते गावातून गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायऱ्यांनी जाता येते. तेथून खड्या चढणीच्या वाटेने दोन तासांत भैरवगडावरील मंदिरात पोहोचता येते. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास साडेतीन तास लागतात. या किल्ल्याचा कोणताही इतिहास उपलब्ध नाही. अनेक जातींची रानफुले येथे पाहण्यास मिळतात. पाटण-कोयना रस्त्यावर तामकणे येथेही बौद्ध लेणी आहेत.

जाण्याची, राहण्याची व्यवस्था : ठोसेघर, सज्जनगडला जाण्यासाठी सातारा येथून वाहनव्यवस्था होऊ शकते. सातारा येथे राहण्याची, भोजनाची उत्तम व्यवस्था आहेच. या ठिकाणी वर्षभर प्रवासी येत असतात. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जयश्री चारेकर About 97 Days ago
खुपच छान माहीती.सज्जनगड तर छान माहीती.
1
0

Select Language
Share Link
 
Search