Next
पालघर तालुक्याची सफर
BOI
Wednesday, August 21, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

शीतलादेवी मंदिर - रामकुंड (केळवे)‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण वसई व विरार परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या वैतरणा नदीच्या उत्तरेस असलेल्या पालघर तालुक्यातील पर्यटनस्थळांची....
.........
पालघरचा प्रदेश साधारण सन १५३४ ते १७३७ या कालावधीमध्ये पोर्तुगीजांच्या अमलाखाली होता. चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमेनंतर हा भाग मराठ्यांच्या अंमलाखाली आला. त्यानंतर १८१८मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. वैतरणा नदी आणि अरबी समुद्र यांमुळे हा भाग निसर्गरम्य आहे. ऐतिहासिक ठिकाणे, गड, किल्ले, सागरकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. वारली चित्रकला व तारपा नृत्य ही पालघरच्या समाजजीवनाची ओळख आहे. 

पालघर : हे पालघर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा एक ऑगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात आला. पालघर शहर रेल्वे, रस्ते आणि समुद्रमार्गाने मुंबई आणि गुजरात राज्याशी जोडलेले असल्याने या गावाचा विकास झपाट्याने झाला. स्वातंत्र्यलढ्यात हे गाव अग्रेसर होते. १९१८ साली लोकमान्य टिळकांची पालघर येथे सभा झाली होती. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ‘चले जाव’ आंदोलनात काढलेल्या मोर्चावर पालघरमध्ये गोळीबार होऊन पाच तरुण मृत्यू पावले. सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे हे पाच जण स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देताना शहीद झाले. या शहीदांची स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी पालघरला आहे. पालघर हे बहुभाषक ठिकाण आहे. 

दापोली : हे पालघर जिल्ह्यातील दापोली आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील नव्हे. या गावाची सरकारदप्तरी नोंद ‘दापिवली’ अशी होती. येथेही शासनाचा कृषी प्रकल्प आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील पहिले नारळ बीजोत्पादन केंद्र मौजे-दापोली (ता. जि. पालघर) येथे सुरू केले असून या केंद्रासाठी दापोली गावातील १०० एकर शासकीय जमीन ३० वर्षांच्या करारावर देण्यात आली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामास सुरुवात करण्यात आली आहे. शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. गावात साईबाबा मंदिर व गावदेवी मंदिर अशी दोन देवळे आहेत. 

वांदरी धरण

शिरगावचा किल्ला व बीच :
पालघरच्या दक्षिणेला हा किल्ला आहे. हा किल्ला आजही मजबूत आणि सुस्थितीत आहे. हा किल्ला आतून, तसेच बाहेरून स्वच्छ ठेवण्यात आला आहे. किल्ल्याच्या आतील बाजूला फक्त एकच रावणमाडाचे झाड असून, त्याला फुटलेल्या अनेक फांद्या हे या किल्ल्याचे आकर्षण आहे. शिरगावचा किल्ला अत्यंत सुंदर अशा ठिकाणी उभारण्यात आला आहे. हा किल्ला २०० फूट लांब व १५० फूट रुंद आहे. किल्ल्याची तटबंदी तीस ते बत्तीस फूट इतकी उंच, तर रुंदी आठ ते दहा फूट एवढी आहे. तटावर जाण्यासाठी जिने आहेत. या किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. किल्ल्याला एकामागोमाग एक असे दोन भक्कम दरवाजे असून, ते अतिशय सुंदर व सुबक आहेत. या दोन प्रवेशद्वारांच्या मध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. या ठिकाणी वासे अडकविण्यासाठी केलेल्या खाचा व भिंतीतील नक्षीदार कोनाडे दिसतात. दोन्ही दरवाज्यांवरील दुसऱ्या मजल्यांवर भव्य खिडक्या असलेली सुंदर दालने आहेत. 

दरवाज्याच्या उजव्या बाजूला शिल्प कोरलेले दिसते. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडील भिंतीच्या तळाच्या दगडावर पुसट झालेल्या आकृत्या कोरलेल्या दिसतात. तसेच एका दगडावर १७१४ हे साल कोरलेले दिसते. आतील बाजूस चोरदरवाजा, घोड्यांच्या पागा, धान्य साठवण्याची दालने, बंदीखाना आहे. तिथला समुद्र आणि किल्ल्यालगताचा परिसर प्रेक्षणीय आहे. पालघर तालुक्यातला सर्वांत सुंदर किल्ला म्हणजे शिरगावचाच. गावकऱ्यांनी हा किल्ला स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे. येथील समुद्रकिनाराही स्वच्छ आणि सुंदर आहे. 

असावा किल्ला

असावा किल्ला :
उंच असलेला आणि संपूर्ण जंगलाने वेढलेला हा किल्ला म्हणजे पालघरच्या दुर्गमालिकेतील जणू शिरोमणीच भासतो. ११व्या शतकाच्या उत्तरार्धात बिंब राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला असावा. डहाणूपर्यंत वर्चस्व राहण्यासाठी याची निर्मिती झाली असावी. हा किल्ला २०० वर्षे पोर्तुगीज राजवटीत होता. संभाजी महाराजांच्या काळात १६८३मध्ये हा किल्ला मराठ्यांनी घेतला; पण त्याचा ताबा परत पोर्तुगीजांनी लगेच मिळवला; मात्र चिमाजीअप्पांच्या मोहिमेत वसईपासून उत्तरेची पोर्तुगीज राजवट नामशेष झाली व ब्रिटिश राजवट येईपर्यंत किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. १८१८मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे कॅप्टन डिकिन्सनने याचा ताबा घेतला. या किल्ल्याचा असावा या नावाने, तसेच विसावागड असाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो. या किल्ल्याच्या संवर्धनाचा प्रयत्न ‘बा रायगड परिवारा’मार्फत कारण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची साफसफाई, तसेच माहिती या परिवारामार्फत देण्यात येते. या किल्ल्यावर फारशा वस्तू शिल्लक नाहीत; पण जागोजाग पाण्याच्या टाक्या, गुंफा आहेत. रक्त टाकीची साफसफाई करताना ब्रिटिशकालीन तोफ सापडली आहे. किल्ला जंगलाने वेढलेला असल्याने ट्रेकिंग करताना वेगळाच आनंद मिळतो. 

केळवे पाणकोट

केळवे पाणकोट/समुद्रकिनारा :
हा किल्ला नसून, एक छोटासा जहाजाच्या आकाराचा पाणकोट आहे. प्रवेशद्वाराची बाजू डेकसारखी दुमजली आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढला जातो. एका मोठ्या खडकाचा वापर करून हा किल्ला बांधण्यात आला आहे. पोर्तुगीज राजवटीत बांधलेल्या किल्ल्यांपैकीच हा एक आहे. किनाऱ्यावर वर्चस्व असावे या हेतूने अशा किल्ल्यांची निर्मिती पोर्तुगीजांनी केली होती. शितलादेवी मंदिरावरून पुढे गेल्यावर केळवे कस्टम कार्यालयाकडून कोळीवाड्यास जाणाऱ्या वाटेवरूनच या किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्याची तटबंदी अद्यापही शाबूत आहे; मात्र किल्ल्यातील बांधकामे भग्नावस्थेत आहेत. समुद्राच्या लाटांच्या सततच्या माऱ्याने किल्ल्याच्या भिंतीची झीज झाली आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून १० फूट उंचीवर आहे. किल्ल्याचे दार कल्पकतेने बांधले असून, दरवाज्यामागील अडसर लावण्यासाठी दगडात खाच केलेली आहे. किल्ल्याचा येथील भाग दुमजली बांधलेला आहे. दोन्ही मजल्यावर जागोजागी बंदुकीच्या मारगिरीसाठी जंग्या व तोफांसाठी झरोके ठेवलेले दिसून येतात. पोर्तुगीज-मराठे युद्धाच्या वेळी चिमाजीअप्पांनी पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते. चिमाजीअप्पांनी वसई किल्ल्याची घेराबंदी करण्यासाठी आसपासच्या भागावर नियंत्रण मिळविले. हा किल्ला १० जानेवारी १७३९ रोजी ताब्यात घेतला, तर वसईचा किल्ला २२ मार्च १७३९ रोजी ताब्यात आला. 

चिमाजीअप्पांनी त्या वेळी फार विचारपूर्वक मोहीम आखली होती. भिवंडी ते वज्रेश्वरी व तेथून पश्चिमेस पालघरच्या बाजूने वसईच्या किल्ल्यावर उत्तरेकडून, तर दक्षिणेकडून भाईंदर बाजूने किल्ल्याची नाकाबंदी करून मग निकराचा हल्ला चढविला. त्याअगोदर पोर्तुगीजांची ही छोटी बलस्थाने निकामी करून टाकली. 

भवानगड : चिमाजीअप्पांनी वसई मोहिमेच्या वेळी या किल्ल्याची निर्मिती केली. किल्ल्यावर फारसे अवशेष शिल्लक नाहीत. ऐन पावसात दोन हजार मजुरांनी हा किल्ला बांधला. किल्ला बांधायची निकड लक्षत घेऊन घडीव दगड न वापरता मोठे दगड रचून हा किल्ला बांधण्यात आला आहे. गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जिर्णोद्धारित मंदिर आहे. किल्ल्यावरून दांडा खाडीचे विहंगम दृश्य दिसते. 

केळवे समुद्रकिनारा : केळवे (केळवा) सागरकिनारा पर्यटकांचा आवडता आहे. केळव समुद्रकिनारी सुरूच्या झाडांची मोठी बाग आहे. येथे फूड फेस्टिव्हल साजरा केला जातो. येथील किनारा बऱ्यापैकी सखल आहे. तसेच शांतही आहे. सुरूची बने, नारळी, पोफळी, चिकू, आंबा, फणस, केळीच्या बागा, पानवेलींचे मळे यांमुळे हा परिसर आकर्षक झाला आहे. केळवे समुद्रकिनाऱ्यावर अनेक चित्रपट व मालिका यांचे चित्रीकरण चालू असते. 

तारापूरचा किल्ला

तारापूरचा किल्ला :
माहीमचा राजा भीम यांनी नाईकांकडून हा किल्ला सन १२८०मध्ये जिंकल्याचा उल्लेख आहे. १५३३मध्ये पोर्तुगीजांनी येथे जाळपोळ केली होती. १५५६मध्ये पोर्तुगीजांनी येथे भक्कम किल्ला बांधला. त्या काळी हे ठिकाण भरभराटीला आले होते. ते व्यापाराचे केंद्र झाले होते. मुघलांनी या ठिकाणी अयशस्वी हल्ला केला होता. किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे. येथे पोर्तुगीजांचा एक शिलालेखही दिसून येतो. वसईच्या मोहिमेवेळी चिमाजीअप्पांनी हा किल्ला जिंकून घेतला. बाजीराव, रामचंद्र हरी, यशवंत पवार आणि तुकाजी पवार, राणोजी भोसले यांनी या वेळी पराक्रम केला होता. कॅप्टन डिकिन्सन यांनी १८१८मध्ये उत्तर कोकणातील सर्वांत मोठे, उत्तम हवेशीर आणि समुद्रकिनारा असलेल्या किल्ल्यांपैकी मध्यवर्ती ठिकाण म्हणून या ठिकाणाचे वर्णन केले आहे. 

तारापूर किल्ला - शिलालेख

तारापूर अणुऊर्जा केंद्र :
१६० मेगावॉट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. जवळच चिंचणीचा सागरकिनाराही आहे. 

तारापूर अणुऊर्जा केंद्र

केळव्याचे शीतलादेवी मंदिरकेळव्याचे शीतलादेवी मंदिर : काही ठिकाणे अशी असतात, की जेथे गेल्यावर मन शांत व प्रसन्न होते. स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यवस्थापन आणि रम्य परिसर यांमुळे सहलीसाठी जरूर यावे असे हे ठिकाण आहे. केळवा हा शब्द ‘कर्दलिवाह’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. स्थानिक कथेप्रमाणे, श्रीरामाने येथे भेट दिली होती. श्रीरामाने मारलेल्या बाणाच्या जागी पाणी आले व तेथे तलाव बांधण्यात आला, अशी लोकांची श्रद्धा आहे. येथे अहिल्याबाई होळकर यांनी येथे भेट दिली होती व मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर भाऊसाहेब वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९८ मध्ये जीर्णोद्धार झाला. अमेरिकास्थित श्रीमती मीरा राव यांनी त्या वेळी मोठी देणगी दिली. मंदिराचे आराखडे प्रभाकर सावे (आर्किटेक्ट) यांनी केले आहेत. रीतसर विश्वस्त मंडळाची नोंदणी करून स्थापना करण्यात आली आहे. मंदिर परिसरात श्री गोवला, श्री हनुमान, श्री मातापार्वती, श्री वालुकेश्वर, श्री सिद्धिविनायक यांची मंदिरे आहेत, तसेच एक सुंदर तलावही आहे. अखंड शिळेत सापडलेली ही पुरातन मूर्ती असून, तिचे रूप शांत आहे म्हणून शीतलादेवी असे म्हणतात. 

केळवे राम मंदिर

प्राचीन राम मंदिर :
हे मंदिर शीतलादेवी मंदिरापासून जवळच आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, येथे राम आणि लक्ष्मण यांना अहिरावण आणि महिरावणाने कैद करून ठेवले होते. हनुमंताने नंतर येऊन त्यांची सुटका केली. १९९४मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. रामनवमीचा मोठा उत्सव येथे साजरा केला जातो. 

एडवन कोट : काळाच्या ओघात नष्ट झालेला हा कोट स्थानिक लोकांनाही माहिती नसावा. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. दत्त राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे या ठिकाणाची माहिती होत आहे. कोटाच्या सर्व भिंतींवर झुडपे उगवली आहेत. कोटाच्या आवारातच एक विहीर आहे. एडवन कोट सभोवतालच्या परिसरात अर्धवट भिंती व चौथरे दिसून येतात. एडवनजवळील समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांच्या हेलकावणाऱ्या बोटींचे सुंदर दृश्य दिसते. समुद्रात घुसलेल्या भागात आशापुरी देवीचे मंदिर आहे. येथून समुद्राचे सुरेख दर्शन होते. 

आशापुरी देवीचे मंदिरमाहीम किल्ला, बीच : हा किल्ला म्हणजे पोर्तुगीजांनी बांधलेला एक टेहळणी बुरुज आहे. आतल्या बाजूला असणारा जिना (दुहेरी) इतर कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. किल्ल्याच्या तटबंदीवरून बाहेरचा सुंदर परिसर पाहता येतो. पालघरच्या किनाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी अनेक पाणकोट व बुरुजांची निर्मिती केली. त्यापैकी हा एक आहे. त्याची कोठेही नोंद नाही. याचे नाव सध्या गावाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या गावातच महिकावती देवीचे मंदिर असून, या देवीच्या नावावरूनच या गावाला माहीम हे नाव पडले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी इ. स १६८४मध्ये माहीम परिसरावर हल्ला चढविला होता. इ. स. १७३९च्या वसई मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. येथेही छोटा समुद्रकिनारा आहे. 

पालघर परिसरातील आणखी बीच : नांदगाव बीच, माहीम बीच, उसरानी बीच, श्रॉफवाडी बीच, नवापूर बीच. 

काळदुर्ग

काळदुर्ग :
पालघरच्या पूर्वेला असलेल्या डोंगरावर समुद्रसपाटीपासून १५५० फूट उंचीवर हा किल्ला आहे. हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडा असलेला गडमाथा होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे गडमाथ्याच्या खालचे पठार. या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते. वाघोबा, भिलोबा व मेघोबा देवांचे दर्शन व वाघोबा धबधब्याचा आनंदही येथे लुटता येतो. 

गरम पाण्याचे कुंड, सातिवली

सातिवली गरम पाण्याचे कुंड :
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या पूर्वेला असलेल्या डोंगरापलीकडे हे ठिकाण आहे. येथे गरम पाण्याची सहा कुंडे आहेत. वांदरी नदीच्या काठावर ही कुंडे आहेत. तसेच वांदरी नदीवर निसर्गरम्य परिसरात बांधलेले छोटे धरणही जवळच आहे. 

अशेरीगड (फोटो : विकिपीडिया - सी. सी. मराठे)

अशेरीगड :
पालघरच्या आसपास अनेक किल्ले आहेत; पण त्यातील हा १७०० फूट उंचीचा किल्ला त्यांच्यातील ‘दादा’ समजला जातो. हा किल्ला ट्रेकिंग करणाऱ्यांसाठीच आहे. अशेरीगडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरेही येथे आढळतात. सांडपाणी वाहून नेण्यासाठी या चरांची योजना असावी. गडावर मध्यम आकाराची व रुंद तोंडाची गुहा आहे. वारा आणि थंडीपासून संरक्षण मिळेल अशा पद्धतीने ही गुंफा खोदलेली आहे. त्यात झोपण्यासाठी दगडी चौथरेही दिसून येतात. या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या या झाडांच्या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते. येथील वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे कोहोजगडाचे दर्शन होते. शिलाहार राजवटीत बांधला गेलेला हा किल्ला इ. स. १२००मध्ये बांधला गेला. पुढे १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. इ. स. १५५६ साली पोर्तुगीजांनी अशेरीवर हल्ला करून तो बळकावला. पुढे संभाजीराजांनी इ. स. १६८३मध्ये अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला; पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. 

अशेरीगड (फोटो : विकिपीडिया - सी. सी. मराठे)

गुहेच्या वरच्या बाजूला असलेल्या बांधीव तळ्यामध्ये एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. पालघरहून कासा या शहराकडे जाणाऱ्या एसटी बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनाने निघून ‘मस्तान नाका’ या ठिकाणापासून सुमारे १०-११ किलोमीटरवर असणाऱ्या ‘खोडकोना’ गावाजवळ हा किल्ला आहे. 

अशेरीगडकसे जाल पालघर परिसरात?
पालघर हे पश्चिम रेल्वेवरील स्टेशन आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ठिकाण आहे. जवळचा विमानतळ मुंबई. राहण्यासाठी भरपूर हॉटेल्स व रिसॉर्टस् या भागात आहेत. हा प्रदेश अतिपावसाचे दिवस सोडून कधीही जाण्यासारखा आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mahendra Vaze About 31 Days ago
Great Information. Thanks for sharing.
0
0

Select Language
Share Link
 
Search