Next
सूर्यनमस्कार : सर्वश्रेष्ठ व्यायामपद्धती
BOI
Wednesday, June 21 | 03:01 PM
15 2 0
Share this story


योग ही मूळची भारतीय संकल्पना. तिची उपयुक्तता पाहून हळूहळू तिचा प्रसार साऱ्या जगभर होत गेला. आंतरराष्ट्रीय योगदिन २१ जून रोजी साजरा केला जाऊ लागल्यापासून योगाचे महत्त्व अधिकच अधोरेखित केले जाऊ लागले. आजच्या योगदिनाच्या निमित्ताने, सूर्यनमस्कार या सर्वश्रेष्ठ व्यायामपद्धतीचा घेतलेला हा आढावा...
............
सूर्यनमस्कार ही एक जुनाट आणि कालबाह्य व्यायामपद्धती म्हणून हिणवणारा मोठा वर्ग जिमच्या आधुनिक व्यायामपद्धतीकडे वळला आहे. एकीकडे जुनाट पद्धत म्हणून हिणवणारा वर्ग सौर ऊर्जेच्या अनेक उपकरणांचा उपयोग करत आहे. परंतु हीच सौर ऊर्जा आपले जीवन सुखकर व सुकर करत आहे हे समजून घेतले तर सूर्यनमस्कार पद्धतीच सर्वश्रेष्ठ व्यायामपद्धती आहे, असे आपल्या लक्षात येईल. विशेष म्हणजे इंधनासाठी अन्य मार्गांनी पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे होणार नाही हेही लक्षात घेणे आवश्यनक आहे. 

सूर्योपासनेने माणसाच्या अनेक व्याधी दूर होतात. विशेषत: हृदयरोग, कावीळ, कुष्ठरोग इत्यादी. अशा या देवतेची उपासना मानव प्राचीन कालापासून करत आला आहे. आज २१ जून म्हणजेच जागतिक योग दिन आहे. योगाचे महत्त्व संपूर्ण जगात अंगीकारले गेले आहे. असे असताना या आपल्या देशाचा, आपल्या मातीचा वारसा सांगणाऱ्या योग या संकल्पनेचा आपणही अवलंब करणे श्रेयस्करच आहे.

सूर्यनमस्काराचे सर्वसाधारणपणे दोन भाग आपल्या लक्षात येतील. एक म्हणजे मंत्रोच्चार व दुसरे शारीरिक हालचाली व श्वसनाचे नियम. मंत्र हे आपल्या मनाची शुद्धी करतात. सोबतच आपल्या मनाची एकाग्रताही मंत्रांनी साधली जाऊ शकते. नमस्काराची प्रथम स्थिती या सर्व दृष्टीने फार महत्त्वाची आहे. संपूर्ण दिवसभरात घडणाऱ्या घटनांनी विचलित न होता आपल्या ध्येयाकडे चित्त ठेवण्याची सवय यामुळे लागते. आपले शरीर हे पंचतत्त्वांनी बनलेले आहे. ती तत्त्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश. यातील संतुलन बिघडणे अपरिहार्य आहे. ज्यांची ही तत्त्वे बिघडली असतील त्यांना सरळ उभे राहता येणार नाही. अभ्यासाने पंचतत्त्वांचे संतुलन राखले जाते. या पार्श्वभूमीवर बहुउपयोगी सूर्यनमस्काराच्या स्थिती आणि त्यांचे महत्त्व यांचा आपण अभ्यास करू.

सूर्य ही एक देवता आहे. पृथ्वीसाठी व जीवसृष्टीसाठी सूर्य हाच परमेश्व्र असल्याने त्याला नमन करणे महत्त्वाचे आहे. अथर्ववेदात सूर्याची बारा नावे आढळतात. ती त्याच्या सात किरणांचे प्रतिनिधित्व करतात, असे म्हणता येईल. महाभारतात दिवसपुत्र, बुद्धभानू, चासू अशी सूर्याची बारा नावे दिली आहेत. वनपर्वात सूर्याला देवदेवेश्वजर म्हणून त्याची १०८ नावे दिलेली आहेत. सूर्योपासनेने माणसाच्या अनेक व्याधी दूर होतात. अशा या देवतेची उपासना मानव प्राचीन कालापासून करत आला आहे. मानवजातीच्या उत्पत्तीबरोबरच सूर्योपासनेची सुरुवात झाली असावी. कारण माणसाला देवासमान प्रथम सूर्यच दिसला असणार. सूर्यनमस्कार हा सूर्योपासनेचा एक भाग आहे. जसे सूर्य-स्नान, अर्घ्य देणे इत्यादी. उपासना यातील उप म्हणजे जवळ, सान्निध्य व आसन म्हणजे स्थिरावणे. परंतु, सूर्यनमस्कार या उपासनेत केवळ नामस्मरण वा ध्यानधारणा नाही तर शरीराच्या विशिष्ट हालचाली आहेत.

प्रणामासन :

सूर्यकिरण अंगावर पडतील अशा स्वच्छ जागी पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे. समोर एका तांब्याच्या पात्रात पाणी ठेवावे. शुद्ध व प्रसन्न मनाने ताठ उभे राहावे. पायाचे अंगठे व टाचा जोडलेल्या ठेवाव्यात. दोन्ही तळहात जोडलेले, छातीच्या बरगड्या जेथे संपतात व जोडलेल्या असतात तेथे अंगठे ठेवावेत. अंगठे अंगाला चिकटून व बोटे दूर ठेवावीत. तीन वेळा दीर्घ श्वरसन करून यासाठीचा विशेष मंत्र म्हणावा. ब्रह्मांडाची निर्मिती ध्वनीमधून झाली व तो म्हणजे ॐ. हा अ, उ आणि म यांनी बनलेला आहे. म्हणजेच सृष्टीच्या निर्मितीबरोबरच संगीताचीही निर्मिती झाली. ‘अ’ व ‘उ’ यांचा उच्चार करत असताना नाभिकमलापासून मुखापर्यंत ध्वनिलहरी पोहोचतात व ‘म’चा उच्चार करत असताना त्या मस्तकापर्यंत पोहोचतात, म्हणजेच पूर्णत्वास जातात.

सूर्यनमस्कारामुळे या गोष्टी होतात...

मंत्रोच्चार व धारणा, मनाची एकाग्रता, प्राणायाम, वाचाशुद्धी, प्रणवाराधना, शारीरिक हालचाली व श्वसन, पूरक, रेचक, अंतरकुंभक व बाह्यकुंभकाचा प्राथमिक सराव, दीर्घ श्वसन, पंचमहाभूतांचे संतुलन, सांध्यांची हालचाल, तोल सावरून हालचाली व संयम, चेतनेचे जागरण, सामर्थ्य वृद्धी, विनम्रता, हृदय, आतडी व अन्य अवयवांची लयबद्धता.

सूर्यनमस्काराच्या दहा स्थिती

स्थिती एक : सर्व योगप्रकारांचे संतुलन
पहिली स्थिती प्रणामासन. ज्या पंचमहाभूतांनी आपले शरीर तयार झाले आहे, त्यांना पूर्णपणे संतुलित करण्याचे काम या प्रथम स्थितीत साधले जाते ते सरळ उभे राहण्याने. नंतरच्या आठही स्थितींमध्ये याची हालचाल होऊन ते प्रेरित करण्यात येते व पुन्हा दहाव्या स्थितीत त्याचे संतुलन साधण्यात येते व एक आवर्तन पूर्ण होते. याचा अर्थ असा, की शरीराचा तोल सांभाळताना मनाला एकाग्र करावेच लागते आणि म्हणूनच सूर्यनमस्काराची पहिली स्थिती सर्वार्थाने योग्य व कोणत्याही व्यायाम प्रकारापेक्षा श्रेष्ठ व मंत्रोच्चाराने सिद्ध अशी आहे. केवळ महिलांचे गर्भारपणाचे महिने सोडल्यास कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांनी याचा जरूर उपयोग करावा.

स्थिती दोन : सहस्रार
दुसऱ्या स्थितीत जाताना तोल सांभाळावाच लागतो. अर्थातच यामध्ये मेंदूला योग्य व्यायाम होऊन चित्त एकाग्र करणे सोपे जाते. या सवयीमुळे साधकाला संतुलित विचार करणे, कार्य करणे व निर्णय घेणे सुलभ होते. पायांची क्षमता वाढविण्यास मदत होते. फुफ्फुसांची क्षमता वाढते. अनेक खेळांमध्ये या स्थितीच्या सवयीचा फायदा होतो.

स्थिती तीन : मूलाधार स्वाधिष्ठान चक्र
तिसरी स्थिती पूर्णपणे जमली, तर नमस्काराच्या यापुढील स्थिती सहज साधता येतात. श्वास बाहेर काढून हनुवटी आत, बरगड्यांच्या वरच्या भागात खोचल्यामुळे आपोआप जालंधर व उडियान बंधाचा फायदा मिळू शकतो. जठरावर दाब पडून पचन सुधारण्यास मदत होते व हृदयाला चालना मिळते. परंतु त्यावर खाली वाकल्याने ताण येत नाही. खांद्याचे सांधे ताण न देता मोकळे होतात. तळहात पूर्णपणे जमिनीस टेकवल्याने मनगटाचा सांधा मजबूत होतो. कंबर हलकी होते. भावनात्मक विचार केल्यास अहंकार दूर होण्यास मदत होते व माणसात विनम्रता येते.

स्थिती चार : विशुद्धी
ही स्थिती अश्वसंचालनासन. याला घोड्याच्या चालीवरून हे नाव पडले असावे. ही स्थिती मोठी गमतीशीर आहे. ही स्थिती घेताना श्वास पूर्णपणे भरावयाचा असल्याने, कमरेवरच्या सर्व भागाला ताण बसल्याने पूरक उत्तम होते. परिणामी एक प्रकारचे चैतन्य प्राप्त होते. क्रमांक चार व नऊच्या स्थिती सर्व शरीराला व्यायाम होऊन पूर्ण चैतन्य प्राप्त करून देणाऱ्या आहेत. खेळांचा विचार केल्यास क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन या खेळांमध्ये या स्थितीचा चांगला फायदा होतो. नृत्यात तर अनेक स्थितींमध्ये याचा समावेश आहे. स्ट्रेचिंग करण्यासाठी याचा अभ्यास करण्याची मूलभूत गरज आहे.

स्थिती पाच : सर्व योगचक्रांवर संयम
या स्थितीमुळे मेरुदंडाच्या सर्व मणक्यांरवर दाब पडून एक प्रकारचे ट्रॅक्शान होते. पायांच्या अंगठ्यांवर दाब पडल्याने मेंदूकडे रक्तसप्रवाह वाढतो. कुंभकामुळे आत घेतलेला प्राणवायू सर्व शरीरभर पसरून रुधिराभिसरण चांगले होते. ही स्थिती माणसाची सहनशीलता वाढवणारी आहे. तसेच खांदे, मनगट व कंबर मजबूत होते.

स्थिती सहा : अष्टांगासन
अष्टांग टेकून नमस्कार या शब्दाचा अर्थ सांगणारी स्थिती. आंतरकुंभकाचा भाव हा प्रतिकारशक्तीरची वृद्धी म्हणजेच ऊर्जेची वृद्धी करणारा आहे. श्वास सोडताना निश्चिंतता येत जाते. मनामध्ये विकल्प ठेवून शरण अथवा समर्पण होऊ शकत नाही. आपली पंचकर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये समर्पण करणे याला सर्वार्थाने नमस्कार करणे असे संबोधणे योग्य होऊ शकेल. पंचकर्मेंद्रियाचा म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय व मस्तक यांचा नमस्कार, तर गुडघे टेकणे म्हणजे शरण जाणे व श्वास सोडणे म्हणजे अहंकार सोडणे असा भावार्थ या स्थितीतून येतो. पाच व सहा क्रमांकाच्या स्थिती सर्व इंद्रियांवर नियंत्रण व नंतर समर्पण दाखवतात. अर्थात सर्व शरीर जमिनीलगत, विशेष करून हृदय व मस्तक टेकल्याने गुरुत्वाकर्षणाचा ताण कमी होऊन शरीर स्वस्थ व निश्चिंत राहते. अधिकाधिक आवर्तने केल्यास ती मानसिकता प्राप्त होण्यास मदत होते. यामुळे माणसाच्या स्वभावात फरक पडू लागतो व सबंध जीवनाचा अर्थच बदलून टाकणाऱ्या या स्थिती एकमेकांविरुद्ध, पण पूरक अशा आहेत. अष्टांगे टेकण्याची स्थिती ही सूर्यनमस्काराची परमोच्च स्थिती आहे. मनुष्याला या स्थितीशिवाय पर्यायच नाही. समर्पण करण्यासाठी मिळवावे लागते व मिळविल्यावर समर्पण करावे लागते तरच शांती मिळू शकते. मैदानी व बैठे अशा कोणत्याही खेळात या स्थितीचा फायदा होऊ शकतो.

स्थिती सात : विशुद्धी
ज्याप्रमाणे चयापचय हा सृष्टीचा नियम आहे, त्यास अनुसरून या सूर्यनमस्काराची रचना करण्यात आली असावी. कारण अष्टांग समर्पणानंतर येणारी सातव्या क्रमांकाची स्थिती म्हणजे भुजंगासन. ही स्थिती म्हणजे ऊर्जाशक्तीेचे ग्रहण करून वृद्धी करणारी आहे. यात पायांच्या बोटांनी रेटा देऊन दोन्ही हात कोपरात सरळ करताना छाती हातांमधून पुढे काढत पूर्ण श्वाबस भरावा. पायाचा मांडीपर्यंतचा भाग जमिनीस टेकवण्याचा प्रयत्न करावा व नजर वर ठेवावी.

स्थिती आठ : योगचक्रांवर संयम
सातव्या स्थितीला जोडून पुढची आठव्या क्रमांकाची स्थिती घेतली जाते. या दोन्ही स्थितींमुळे खांद्याचे, दंडाचे स्नायू बळकट होतात. श्वास भरून आंतरकुंभक केल्याने सर्व शक्तीी म्हणजेच प्राणवायूचा संचार सर्व शरीरभर होतो. यानंतरच्या पुढील दोन्ही स्थितींत कुंभक असल्याने पूर्वीच्या कुंभकाच्या स्थितीपेक्षा दुप्पट कुंभक करावयाचे असल्याने प्राणायामाची पूर्ण पूर्वतयारी होते.

स्थिती नऊ : अश्वसंचालनासन
पुढे येणारी नवव्या क्रमांकाची स्थिती म्हणजे मागे नेलेला उजवा पाय पुढे आणून अश्वसंचालनाची स्थिती आणावी. ही स्थिती पूर्वीच्या क्रमांक चारच्या स्थितीच्या बरोबर विरुद्ध असून, ताण व स्वास्थ्य निर्माण करून संतुलन राखले जाते.

स्थिती १० : बाह्यकुंभक 
ही स्थिती तिसऱ्या क्रमांकाच्या स्थितीसारखी आहे. तथापि तीनच्या स्थितीत बाह्यकुंभक होते, तर या दहाव्या क्रमांकाच्या स्थितीत आंतरकुंभक होते व अकराव्या पूर्वस्थितीत येताना उच्छ्वास करून पुन्हा प्रणामासनाची स्थिती येते. म्हणजेच क्रमांक एकची स्थिती.

या सर्व स्थितींतून एक गोष्ट लक्षात येईल, की श्वसनाचा चयापचय व शारीरिक स्थिती उलटसुलट आल्याने पूर्ण शरीराचे संतुलन साधले जाते. म्हणजेच ऊर्जेचे संकलन व समर्पण ही दोन्ही उद्दिष्टे यामध्ये साधण्यात आली आहेत. समग्र जीवनाचे दर्शन या स्थितींतून प्रकट होते. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय जसे अनिवार्य आहेत, तसे सर्व घटनांमध्ये-व्यवहारांमध्ये आहे, असा एक संदेश या नमस्काराच्या माध्यमातून दिला जात असल्याचे दिसून येते. याची अनेक आवर्तने केली, तर यातून नक्कीमच एक तेजस्वी व्यक्तिामत्त्व निर्माण होऊ शकते. आपल्या भारतीय व्यायाम पद्धतीचे हेच वैशिष्ट्य आहे, की व्यायामात श्रद्धेसाठी काही आदर्श मानून व ते पुढे ठेवून व्यायाम करावयाचा असतो. त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वारस निर्माण होतो.

सूर्यनमस्काराचे महत्त्वाचे फायदे :
- कोणताही खर्च नाही.
- अत्यंत कमी जागा लागते.
- कोणत्याही यंत्रसामग्रीची गरज नाही.
- कोणत्याही वयाचे, लिंगाचे बंधन नाही.
- वजन वाढवणे वा कमी करणे दोन्ही साध्य होते.
- मार्गदर्शनाची गरज अल्प.
- खेळ, कला, नृत्य, कार्यालयीन काम, योगासने, ध्यानधारणा यांसाठी उपयुक्ते
- हे सूर्यनमस्कार रोगमुक्त, करणारे, संतोष व आनंद देणारे आहेत. आपण फक्त‍ उठून सुरुवात करण्याची आवश्य कता आहे. सूर्यनमस्कार ही पर्यावरण राखणारी उत्तम व्यायाम पद्धत आहे आणि नैसर्गिकही आहे.

– श्रीराम विष्णू साठे

(लेखक पुण्यातील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ आहेत)

 
15 2 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link