Next
देशातील एक आदर्श साहित्य-संस्कृती केंद्र
BOI
Sunday, September 30, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या प्रेरणेतून दोन ऑक्टोबर १९११ रोजी पुणे मराठी ग्रंथालयाची स्थापना झाली. हे ग्रंथालय केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील अग्रगण्य ग्रंथालय आहे. प्रामाणिक, निष्ठावान आणि सेवाव्रती कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमांमुळे संस्थेची अखंड प्रगतीच होत आली आहे. या ग्रंथालयाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात... 
........
पुण्यातील नारायण पेठेत, पत्र्या मारुतीजवळ ‘पुणे मराठी ग्रंथालय’ या संस्थेची चार मजली भव्य वास्तू उभी आहे. मानवी सभ्यतेला आवश्यक अशा साहित्य, शिक्षण, संस्कृती आणि समाज आदी क्षेत्रांचे ते आश्रयस्थान आहे. शासनमान्य ‘अ’ वर्ग जिल्हा वाचनालय हा दर्जा असलेले, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील ते अग्रगण्य ग्रंथालय आहे. प्रामाणिक, निष्ठावान आणि सेवाव्रती कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमांमुळे संस्थेची अखंड प्रगतीच होत आली आहे.साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या प्रेरणेतून, दोन ऑक्टोबर १९११ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर ग्रंथालयाची स्थापना झाली. आज या ग्रंथालयाची सुमारे २५ हजार चौरस फूट चटई क्षेत्र असलेली स्वत:च्या मालकीची वास्तू शहराच्या मध्य वस्तीत उभी आहे. मुख्य ठिकाणाशिवाय पुण्यात आठ ठिकाणी ग्रंथ देवघेव केंद्रे आहेत. मराठी भाषेतील ४६ विविध विषयांची दीड लाखांहून अधिक ग्रंथसंपदा तिथे आहे. शिवाय गेल्या १०० वर्षांमधील नियतकालिकांचा अमूल्य संग्रह अभ्यासकांना उपलब्ध आहे. ग्रंथ आणि नियतकालिके देवघेव, मुक्तद्वार वाचनालय, पु. ल. देशपांडे मुक्तांगण बालवाचनालय, अभ्यासिका आणि संदर्भसेवा असे विविध विभाग सदैव कार्यरत आहेत. सन १९६२पासून ग्रंथालयात अभ्यासिका विभाग सुरू झाला. सध्या सुमारे दोन हजार विद्यार्थी सभासद, विशेषत: स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा लाभ घेत आहेत. वातानुकूलित खोल्याही उपलब्ध आहेत. गेल्या ५५ वर्षांत ६० हजार विद्यार्थ्यांनी तिथे अभ्यास केला आणि आज ते विविध क्षेत्रांमध्ये चमकत आहेत.

पुरस्कार स्वीकारताना..

आजीव, सन्माननीय, हितचिंतक, सर्वसाधारण अशी एकूण सभासदसंख्या साडेसहा हजार आहे. वाचनसंस्कृतीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होत असताना हे दिलासादायक आहे. दैनंदिन कामकाज संगणकाद्वारे चालते. सर्व पुस्तकांचे संगणकीकरण झाल्यामुळे, हवे ते पुस्तक तात्काळ मिळू शकते. केंद्र सरकारच्या ‘राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान, कोलकाता’ या उपक्रमाद्वारे पुणे मराठी ग्रंथालयाला जानेवारी २००५मध्ये देशातील ‘सर्वोत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय’ हा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय महाराष्ट्र शासन आणि पुणे महापालिकेसह अनेक संस्थांचे सन्माननीय पुरस्कार वेळोवेळी मिळत आले आहेत. शताब्दी महोत्सवाचा (दसरा २०१०) शुभारंभ डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाला आणि सांगता (दसरा २०११) माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या दिमाखाने साजरी झाली.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत शताब्दी महोत्सवाची सांगता.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत शताब्दी महोत्सवाची सांगता.

पुण्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद संस्थेला दोनदा मिळाले. प्रथम १९९० साली (६३वे) डॉ. यू. म. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि २००२मध्ये (७५ वे) राजेंद्र बनहट्टी अध्यक्ष असताना. शिस्तबद्ध आणि उत्तम नियोजनामुळे दोन्ही संमेलने चांगलीच यशस्वी झाली. तिसऱ्यांदा तो मान मिळावा म्हणून पुणे मराठी ग्रंथालय उत्सुक आहे. लेखक, प्रकाशक, कलाकार, ग्रंथालय कार्यकर्ता यांचा दर वर्षी त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल निरनिराळ्या व्यक्तींच्या व संस्थांच्या नावाने सत्कार केला जातो. संस्थेमध्ये ‘केशव’, ‘माधव’ ‘विनायकराव आपटे’, ‘डॉ. निंबकर’, ‘पु. ल. मुक्तांगण बालवाचनालय’ आदी सुसज्ज सभागृहे आहेत. व्याख्याने, परिसंवाद, वाचक सभा, मुलाखती, लेखकांशी संवाद असे उपक्रम तिथे नेहमी साजरे होतात. त्यातून संस्थेचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य ठळकपणे लक्षात येते. ग्रंथालय चळवळीचा आधारस्तंभ असलेल्या ग्रंथालय भारतीच्या पश्चि म महाराष्ट्र विभागाचे कार्य पुणे मराठी ग्रंथालयातून प्रभावीपणे चालते. ‘ग्रंथ भारती’ या त्रैमासिकाचे व दिवाळी अंकाचे प्रकाशन संस्था सांभाळते. 

साहित्य संमेलनाचे यजमानपद
साहित्य संमेलनाचे यजमानपद

गरजू ग्रंथालयांना पुस्तके देणगीरूपाने देणे, हा संस्थेचा आणखी एक उपक्रम. पुणे मराठी ग्रंथालयाकडे देणगी रूपाने हजारो पुस्तके जमा होत असतात. त्यातली बरीचशी आधीच ग्रंथालयात उपलब्ध असतात. वैयक्तिक आणि संस्था पातळीवर योग्य ठिकाणी ग्रंथसंग्रह सोपवण्याची लोकांची इच्छा असते. त्याचे नियोजन हे ग्रंथालय उत्तम रीतीने करते. शहर व जिल्हा पातळीवर अशा ग्रंथांचे वाटप केले जाते. स्वत:च्या ग्रंथखरेदीसाठी संस्थेने कायमस्वरूपी निधी उभा केलेला आहे. त्यातून दर वर्षी नव्या पुस्तकांची खरेदी केली जाते. व्यक्ती किंवा प्रसंगांच्या स्मरणार्थ देणग्या मिळत असतात. काही लेखक आपला संपूर्ण संग्रह भेट म्हणून देतात. त्यांची उत्तम व्यवस्था केली जाते.सन १९८०पासून दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत वासंतिक मोफत वाचनालये शहरात ३५-४० ठिकाणी चालवली जातात. ग्रामीण विभागातही २० ठिकाणी अशी सोय केलेली आहे. त्याशिवाय मुलांसाठी सुटीत अभ्यासवर्ग असतात. आकाशकंदील, मेणबत्ती, गणेशमूर्ती, राख्या इत्यादी तयार करण्याचे प्रशिक्षण त्यात दिले जाते. ग्रंथालयाची वर्गणी माफक असून, सकाळी ८.३० ते रात्री आठपर्यंत ते खुले असते. मुक्तदार वाचनालय सातही दिवस खुले असते. अभ्यासिका सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत उघडी असते.

पुस्तकांबरोबरच येथे मराठी व इंग्रजी नियतकालिकेसुद्धा उपलब्ध असतात. दिवाळी अंकांसाठी चार महिने स्वतंत्र योजना असते. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. विविध विषयांवरील १५० ते २०० अंक खरेदी केले जातात. सर्व क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्ती वाचनालयाला नेहमी भेट देतात.

सन २०१७-१८मध्ये ग्रंथालयात (मोठ्यांसाठी) निरनिराळ्या प्रकारचे ३२ कार्यक्रम झाले. बालविभागासाठी तर ३३ कार्यक्रम झाले. विविध केंद्रांमध्येही नेहमी असे कार्यक्रम होतच असतात. त्यातून नवीन उपक्रमांसाठी कल्पना मिळतात.

साहित्य संमेलनाचे यजमानपद

शताब्दी महोत्सवानिमित्त (२०१०-११) एक स्मरणिका प्रकाशित झाली. त्यात ज्येष्ठ लेखक, संपादक, प्राध्यापकांचे ४३ लेख समाविष्ट होते. संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य आणि ग्रंथालय चळवळीचे प्रतिबिंब त्यात उमटलेले होते. संस्थेने १९८० साली ‘अबोली’ नावाचा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक प्रकाशित केला. सन १९९३पर्यंत हा विशेषांक निघत होता. त्यानंतर २००२मध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘अमृतसंचय’ या नावाने अंक प्रकाशित झाला.

राज्यात सुमारे १२ हजार शासनमान्य वाचनालये आहेत. त्यात शताब्दी पूर्ण केलेली ११० ग्रंथालये आहेत. पुस्तक प्रकाशन आणि वाचन संस्कृती सध्या धोकादायक वळणावर आहे. अशा वेळी पुणे मराठी ग्रंथालयाने पुढाकार घेऊन ग्रंथालय चळवळीचे नेतृत्व करावे. आपल्या परीने ही संस्था काम करतच आहे. अशा कार्यात अनेक व्यक्ती आणि संस्थांचा सक्रिय सहभाग नक्कीच राहील, याची खात्री आहे. तसेच, दर वर्षी संस्थेने एकतरी साहित्यिक विशेषांक काढावा. व्याख्यानांच्या निमित्ताने तिथे बाहेरगावचे अनेक मान्यवर येत असतात. त्यांच्या निवासासाठी किमान दोन खोल्या तरी संस्थेत असाव्यात. अन्यत्र बऱ्याच ठिकाणी तशी व्यवस्था आहे.

एक आदर्श ग्रंथालय म्हणून पुणे मराठी ग्रंथालयाचा लौकिक उत्तरोत्तर वाढत राहो, हीच सदिच्छा.

ग्रंथालयाचा पत्ता : ४३७/ब, नारायण पेठ, पुणे - ४११०३०
दूरध्वनी : (०२०) २४४५४५३०, २४०७६४००

संस्थेचे सध्याचे कार्यकारी मंडळ - अध्यक्ष : मुकुंद अनगळ, उपाध्यक्ष : डॉ. सुरेश पळसोदकर व दिलीप ठकार, कार्याध्यक्ष : धनंजय बर्वे, कार्यवाह : डॉ. अनुजा कुलकर्णी, कोषाध्यक्ष : प्रा. चारुदत्त निमकर, ग्रंथपाल : ललिता मोसकर आणि संजीवनी अत्रे  

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(पुणे मराठी ग्रंथालयासह पुण्यातील शासकीय ग्रंथालयाविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. राज्यातील विविध वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथालये आणि ग्रंथपालांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 105 Days ago
And to think that Piblic Library was established in Goa -- in 1832 ! Even before than those in Kolakatta and Mumbai ?
0
0
Geeta khaladkar About
अभिमान ग्रंथालयाचा....!!!!
0
0
Jyotsna pandharpure About
सुंदर अप्रतिम
1
0
संचिता ड़ेंगळे About
सर धन्यवाद . पुणे मराठी ग्रंथालय ची पूर्ण माहिती देणारा लेख
2
0

Select Language
Share Link
 
Search