Next
मैं जब भी अकेली होती हूँ ...
BOI
Sunday, September 23, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चिरतरुण आवाजाच्या अष्टपैलू गायिका आशा भोसले यांनी आठ सप्टेंबर २०१८ रोजी ८५व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी गायलेल्या ‘मैं जब भी अकेली होती हूँ’ या गीताचा आस्वाद...
..........

सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सुधीर फडके यांनी एक आठवण सांगितली होती. ‘१९५७ -५८ सालाच्या आसपासची घटना. एक नवी गायिका मला भेटायला आली. तिच्याबरोबर तिचा पती होता व मुलेही होती. सुरुवातीला तिने म्हटलेले गाणे मला मनाजोगे वाटले नाही; पण तिने मला लगेचच सांगितले, ‘माझी कितीही मेहनत करायची तयारी आहे! तुम्ही तुम्हाला हवे तसेच गाणे गाऊन घ्या!’ त्या गायिकेचे हे शब्द ऐकल्यावर मला समजले, की या मेहनतीच्या गुणामुळेच ती मोठी गायिका होणार आहे. अखेर तीन दिवसांच्या मेहनतीनंतर मी त्या गायिकेचे पहिले गाणे रेकॉर्ड केले. आणि ते गाणे खूप गजलेही!’

सुधीर फडके यांनी सांगितलेल्या या हकीकतीमधील त्या वेळची ती नवीन गायिका म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेल्या चिरतरुण आवाजाच्या अष्टपैलू गायिका आशा भोसले होत! आठ सप्टेंबर २०१८ रोजी त्या ८५ वर्षांच्या झाल्या! त्यांच्या त्या वाढदिवसानिमित्त त्यांचे एक ‘सुनहरे’ गीत आपण बघणार आहोत. परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आशा भोसले यांची माहिती विशिष्ट पद्धतीने आपणापुढे न मांडता या अफाट कर्तृत्वाच्या गायिकेबद्दलची काही मते, त्यांचे स्वतःचे काही अनुभव व काही माहिती आपण बघणार आहोत. 

संगीत क्षेत्रातील आपल्या पदार्पणाच्या काळातील आठवणी सांगताना आशाताईंनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘त्या काळी संगीत क्षेत्रात जागा मिळणे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य कोटीतले होते. कारण त्या वेळी दीदी (लता मंगेशकर), शमशाद बेगम आणि गीता दत्त यांसारख्या चांगल्या गायिकांचा जम बसला होता. त्यांना सगळी गाणी मिळायची. त्या काळात चित्रपट आजच्यासारखे भारंभार बनत नव्हते. जे बनायचे त्यात अर्धी गाणी नायकाच्या वाट्याला, तर अर्धी नायिकेच्या वाट्याला! ही सगळी गाणी जर दीदी, शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहाँ यांच्यासारख्या प्रस्थापित गायिकांना मिळणार असतील, तर माझ्या वाट्याला काय उरणार? माझ्या वाट्याला मग त्यांनी नाकारलेली गाणी येत असत. मग मी जी मिळतील ती गाणी गात गेले, तेव्हा मी क्वालिटी, क्वांटिटी यांचा विचार करत नव्हते.’  आशाताईंच्या या मुलाखतीवरून, त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण करणे किती अवघड होते हे दिसून येते. 

१९५२ मध्ये आलेला ‘संगदिल’ हा दिलीपकुमार अभिनित चित्रपट त्यांच्यासाठी पहिला मोठ्या बॅनरचा चित्रपट ठरला. त्यांचा विचार निर्माते व संगीतकार करू लागले. नंतर १९५४चा ‘बूट पॉलिश’ आणि बिमल रॉय यांच्या ‘परिणिता’ यांमधून त्या रसिकांच्या व चित्रपटसृष्टीच्या नजरेत भरल्या! १९५६चा ‘सीआयडी,’ १९५७चा ‘नया दौर’ या चित्रपटांनी, त्यातील त्यांच्या गाण्यांनी त्यांच्या कारकिर्दीला मोठा ब्रेक दिला. 

त्यानंतर आशा भोसले यांची कारकीर्द बहरू लागली. कारण त्यांच्या आवाजात स्वरवैविध्य आणि स्वरवैचित्र्य पेलण्याची ताकद आहे. एकाच वेळी सोज्वळपणा आणि मादकता यांचा आविष्कार त्या सारख्याच तोलामोलाने करू शकतात. त्यांच्या आवाजातील या वेगळेपणाचा उपयोग पहिल्यांदा जाणतेपणी करून घेतला तो एस. डी. बर्मन यांनी ‘टॅक्सी ड्रायव्हर’ चित्रपटातील कॅब्रे गीतात! 

दुय्यम गाण्यांच्या दुष्टचक्रात त्या अडकल्या असताना त्यातून त्यांना बाहेर काढण्याचे श्रेय संगीतकार खय्याम यांच्याकडे जाते! ‘फुटपाथ’ या चित्रपटातील नायिकेच्या तोंडची सर्व गाणी खय्याम यांनी आशा भोसले यांना दिली होती. त्यानंतर ओ. पी. नय्यर यांनी त्यांच्या संगीत कारकिर्दीत खऱ्या अर्थाने ‘नया दौर’ सुरू केला. पुढे काही काळाने ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ करीत आर. डी. बर्मन त्यांच्या जीवनात आले व एक संगीत मेजवानी रसिकांना मिळाली. 

तेव्हापासून काल-परवापर्यंत असंख्य प्रयोग करत, बदलत्या काळाची व बदलत्या संगीताची आव्हाने झेलत आशाताईंनी आपल्या वयालही चकवा देत आवाजात जो ताजेपणा कायम ठेवला आहे, त्याला तोड नाही. त्यांनी विविध भाषांमध्ये ३५० संगीतकारांकडे गायलेल्या गीतांची संख्या एवढी प्रचंड आहे, की ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने त्यांना सर्वोच्च बहुमानाचा ‘मोस्ट स्टुडिओ रेकॉर्डिंग्ज इन दी वर्ल्ड’  हा किताब देऊन गौरवले आहे. त्यांच्या गायकीची एकेका गीतातील वैशिष्ट्ये सांगण्याकरिता एक स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल! 

अशा या महान गायिकेला परमेश्वर दीर्घ आयुष्य आरोग्यासह देवो, अशा शुभेच्छा देऊन त्यांच्या एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे आपण वळू या! त्यांची कैक ‘सुनहरी’ गीते असताना त्यातील एकच गीत कसे निवडायचे, हा एक गहन प्रश्न आहे. तो सोडवताना मला ‘धर्मपुत्र’ चित्रपटातील गीत आठवते. मला आवडणारे हे एक अप्रतिम गीत आहे. 

काय आहे त्या गीतात? ते गीत एका प्रेयसीचे आहे, जी प्रियकरापासून दूर आहे. त्याच्याच विचारात ती मग्न आहे आणि त्याच्या आठवणीतून बाहेर येत असताना ती त्याला ‘ये! एकदातरी माझ्याकडे ये’ असे सांगते. बघा, या सगळ्या भावना गीतकार साहिर १९६२च्या धर्मपुत्र चित्रपटातून आपल्यापुढे ठेवतो. संगीत एन. दत्ता यांचे! आशाताई गातात – 

और झाँक के मेरी आँखो में, बीते दिन याद दिलाते हो 

(हे प्रिया) जेव्हा मी एकटी असते, तेव्हा तू (माझ्या मनात) हळूच (चोरून) येतोस आणि माझ्या नजरेत नजर मिसळून (आपल्या दोघांच्या प्रेमाच्या) गत दिवसांच्या आठवणी जाग्या करतोस. 

तुला आठवतात का रे ते दिवस? तेव्हा -

मस्ताना हवा के झोकों से हर बार वो पर्दे का हिलना 
पर्दे को पकडने की धुन में दो अजनबी हाथों का मिलना
आँखों मे धुआँ सा छा जाना साँसों मे सितारे खिलना
बीते दिन याद दिलात हो....

मस्तपणे वारा वाहत होता. त्यामुळे ‘तो’ पडदा हलत होता. आणि तो जास्त हलू नये, वाऱ्याबरोबर उडू नये म्हणून तो पकडण्यासाठी तूही हात पुढे केलास. त्या पडद्याच्या निमित्ताने आपण दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले. त्या क्षणी डोळ्यांवर प्रेमाची धुंदी पसरून राहिली. श्वासाश्वासातून चांदणे फुलून राहिले. केवढे सुंदर दिवस होते नाही का ते? त्या दिवसांच्या आठवणी तू जागवतोस.

प्रेमातील गत दिवसांच्या आठवणी सांगताना ती पुढे म्हणते - 

मुड मुडकर तुम्हारा रस्ते में तकना वो मुझे जाते जाते 
और मेरा ठिठककर रुक जाना चिलमन के करीब आते आते 
नजरों को तरस कर रह जाना एक और झलक पाते पाते 
बीते दिन याद दिलाते हो....

मला भेटून परत जाताना वळून वळून माझ्याकडे बघून तुझे ते मला न्याहाळणे (मला अजूनही आठवते) (आणि त्याच वेळी) पडद्याच्या जवळ येता येता माझे अडखळणे (मला आठवते) तुझ्या प्रेमळ नजरेच्या एका कटाक्षासाठी मी उत्सुक असायचे; पण पुन्हा एकदा तू कधी पाहशील म्हणून मी काळजीत पडायचे. त्या दिवसाच्या आठवणी तू जागवतोस (तुझी आठवण जागवते) 

ती आणखीन एक आठवण जागवताना म्हणते – 

बालों के सुखाने के खातिर कोठे पे वो मेरा आ जाना 
और तुमको मुकाबिल पाते ही कुछ शरमाना कुछ बल्खाना 
हमसायों के डर से कतराना, घरवालों के डर से घबराना 
बीते दिन याद दिलाते हो.....

(माझ्या ओल्या) केसांना वाळवण्यासाठी माझे त्या मोठ्या खोलीत येणे आणि त्याच वेळी तुला समोर (मुकाबिल) पाहिल्यावर माझे लज्जित होणे व उत्तेजितही होणे, शेजाऱ्यांच्या (हमसाया) भीतीने (त्यांचा) डोळा चुकवून निघून जाणे, घरातल्यांना घाबरणे (काय अन काय, किती आठवते) त्या दिवसांच्या आठवणी तू जागवतोस. 

बरसात के भीगे मौसम में सर्दी की ठिठुरती रातों में 
पहरों वो यूँ ही बैठे रहना हाथों को पकडकर हाथों में 
और लंबी लंबी घडियों का कट जाना बातों बातों में 
बीते दिन याद दिलाते हो..... 

पावसाळ्याच्या ओल्या ऋतूमध्ये रात्री गारठ्याने काकडणे (आणि त्यामुळेच) हातात हात घेऊन तासन् तास बसून राहणे व त्याच वेळी गुजगोष्टी करता करता दीर्घकाळ निघून जात असे (त्याचे भानच राहत नसे) त्याही दिवसांच्या आठवणी तू जागवतोस!

त्या दोघांच्या प्रेमाच्या गत दिवसांच्या अशा अनेक आठवणी जागवल्यानंतर अखेरच्या कडव्यात ‘त्याच्या’ मिलनासाठी आतुर झालेली ‘ती’ आर्तपणे त्याला सांगते -

रो रो के तुम्हे खत लिखती हूँ और खुद पढकर रो लेती हूँ 
हालात के तपते तूफाँ में जजबात की कश्ती खेती हूँ
कैसे हो, कहाँ हो, कुछ तो कहो, मैं तुम को सदाएँ देती हूँ

(या विरह अवस्थेत तुझ्या आठवणींमुळे व्याकुळ झालेली मी) रुदन करत करतच तुला पत्र लिहिते, आणि नंतर ते स्वतःच वाचून अश्रू ढाळते. (सभोवतालच्या या विरहाच्या) तप्त वादळाच्या परिस्थितीत, माझ्या भावनांची नाव लोटून देते (अर्थातच हा विरहाग्नी मला भाजून काढत आहे.) त्यामुळेच तू कोठे आहेस? कसा आहेस, याबद्दल काही तरी सांग ना! काही तरी मला कळव ना? मी तुला हाका मारत आहे, बोलावत आहे (अरे माझ्या प्राणप्रिया मला भेटायला ये ना!)

प्रियकराच्या आठवणीत गायलेले हे तब्बल पाच कडव्यांचे साहिर यांचे काव्य! प्रथम दोघांचे प्रेमाचे सौख्याचे दिवस कसे होते ते सांगते व अखेरच्या कडव्यात त्या सुखद आठवणीने व्याकुळ झालेली ती त्याला बोलावते. हा काव्याचा भाव जाणून आशाताईंचा स्वर असा काही प्रभाव दाखवतो, की ते काव्य अक्षरशः काळजाचा ठाव घेते. एन. दत्तांचे संगीत, त्या गीताची चाल व पडद्यावरील त्याचे सादरीकरण, माल सिन्हाचा अभिनय... सारेच सुनहरे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
विदुला करंजेकर. About
मखमली आवाजाच्या सम्राज्ञी ,अष्टपैलू गायिका आशादिदि....... 👍👍👍👍🌹🌹
0
0

Select Language
Share Link
 
Search