Next
ना मूँह छुपा के जियो...
BOI
Sunday, May 12, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

२५ मे हा अभिनेते सुनील दत्त यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘ना मूँह छुपा के जियो’ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या गीताचा...
.........
आमच्या बालपणात, शालेय जीवनात आम्ही राजेंद्रकुमारचे दिवाने होतो. का कोणास ठाऊक, पण तो आम्हाला आवडायचा. तसाच शम्मीचा धसमुसळा नायकही वेड लावायचा! १९६० ते १९७०चे ते दशक! त्या काळात सिनेमा बघण्यास सहजपणे परवानगी मिळायची नाही; पण कौटुंबिक कथानकांचे, अंत:करण गलबलून सोडणारे चित्रपट बघण्यासाठी घरातून तसा विरोध होत नसे. त्यामुळेच राजेंद्रकुमार, शम्मी कपूरपेक्षा सुनील दत्त आम्हाला परिचित होत गेला. 

कधी तो ‘चाँद जाने कहाँ खो गया’ असा प्रश्न मीनाकुमारीला विचारायचा, तर कधी ‘राधिके तूने बन्सरी चुरायी’ असे त्याच्यावर चित्रित झालेले गीत आम्ही आवडीने बघायचो. ‘मेहेरबान’ चित्रपट अशोककुमारसाठी वडिलांनी मला दाखवला; पण त्यातील सुनील दत्त मला भावला. मैं चूप रहूँगी, बेटी-बेटे, मेहेरबान या चित्रपटांतला सुनील दत्त आणखी कित्येक चित्रपटात आहे, हे त्या शालेय वयात कळले नव्हते. 

...पण कॉलेजचे दिवस सुरू झाले, तेव्हा भर दुपारच्या उन्हात ‘मॅटिनीचे चांदणे’ पडलेले असायचे आणि आम्ही बेभान होऊन चित्रपटगृहांकडे धावत सुटायचो. तेथे मात्र हा आरस्पानी सौंदर्याच्या मधुबालाला प्रश्न विचारत असायचा ‘चाँद सा मुखडा क्यूँ शरमाया?’ तर कधी ‘तुम बिन सजन बरसे नयन’ या नायिकेच्या व्यथेला ‘मजबूर हम मजबूर तुम...’ अशी साद द्यायचा व आम्हाला थिएटरच्या काळोखात बसवून ठेवायला मजबूर करायचा. 

‘खानदान’मध्ये तर तो अधू नायक होता; पण तरीही त्याच्यावर प्रेम करणारी नूतन आणि दोघांनी गायलेले ‘नील गगनपर उडते बादल...’ आम्हाला नादावून जायचे आणि त्याने गायलेल्या ‘बडी देर भई नंदलाला...’ने आजही कृष्णजन्माचा उत्सव साजरा होत असतो. ‘जलते है जिस के लिए’ तलतसाठी ऐकले व सुनील दत्तसाठी बघितले. श्रावणसरींची झड त्याच्या ‘शोर नही सोर’च्या प्रेमळ वादाने सुखद बनायची. 

असा सुनील दत्त त्याच्या ऐन तारुण्यात ‘बेस्ट’मधील नोकरी, रेडिओवरील निवेदकाची भूमिका सोडून रमेश सहगलच्या ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’वर आला आणि मग चित्रपटसृष्टीतच स्थिरावला. कारण बहुसंख्य नटांजवळ नसलेली एक गोष्ट उपजतच त्याच्याजवळ होती, ती म्हणजे चेहऱ्यावरचे सुसंस्कृतपणाचे, सज्जनपणाचे व चांगुलपणाचे भाव! माणसाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उतरतात. सुनील दत्त तसा अभिनय करत नव्हता. त्याचे हे सन्मार्गी उमदे व्यक्तिमत्त्व त्याला ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ चित्रपटाचा नायक बनवून गेले; पण तो चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर त्याला एक ही रास्ता, किस्मत का खेल, राजधानी, पायल असे चित्रपट मिळाले आणि त्यानंतर त्याचा चित्रपट आला ‘मदर इंडिया’! मेहबूब खानचा हा चित्रपट सुनील दत्त यांना जीवनाचा साथीदार मिळवून देणारा ठरला. 

‘मदर इंडिया’च्या चित्रीकरणावेळी नायिका नर्गिस सेटवर लागलेल्या आगीमध्ये सापडली. सुनील दत्त त्या आगीत घुसला आणि त्याने नर्गिसला वाचवले. त्या प्रसंगाने ते दोघे एकमेकांजवळ आले. आकर्षण, प्रेम, विवाह हे टप्पे पार पडले. 

त्यानंतरही त्यांचे चित्रपट येत राहिले. सुनील दत्त यांच्या चित्रपटांचा विचार केला, तर एक गोष्ट ठळकपणे जाणवते, की त्यांच्या चित्रपटांपैकी खूपसे चित्रपट त्यांच्या एकट्याच्या नावावर चालले नाहीत. बघा ना. मदर इंडिया - मेहबूब खान, नौशाद, नर्गिस यांच्या जास्त प्रभावाचा होता. मैं चूप रहूँगी, गझल, एकही रास्ता, सुजाता, मिलन हे सारे चित्रपट नायिकेने बाजी मारून नेणारे ठरले. कधी मीनाकुमारी, तर कधी नूतन! वक्त, हमराज, गुमराह, पडोसन हे चित्रपट राजकुमार, अशोककुमार, मेहमूद, किशोरकुमार यांच्याच प्रभावाखाली होते. इतकेच काय, साधना, नंदा, आशा पारेख यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले गबन, मेरा साया, उसने कहा था, आज और कल, चिराग यांमध्ये नायक होते सुनील दत्त! 

ज्या भूमिका मिळतील, जशा भूमिका मिळतील, त्या त्यांनी स्वीकारल्या! अभिनेते सुनील दत्त पुढे निर्माते बनले आणि त्यामध्ये मात्र त्यांनी आपला एक वेगळा प्रभाव दाखवला. ‘अजंठा आर्टस्’ या स्वत:च्या चित्रसंस्थेमधून त्यांनी ‘मुझे जीने दो’सारखा डाकूंच्या जीवनावरील चित्रपट निर्माण करून डाकूंच्या मुलांचे भवितव्य, शिक्षण या समस्यांची मांडणी करून ‘अब कोई गुलशन न उजडे...’ असा आशावाद जोपासला. 

एकपात्री चित्रपट हा वेगळा प्रयोग त्यांनी केला. ‘यादें’ हे त्या चित्रपटाचे नाव! असा जगातील हा बहुधा पहिला व एकमेव चित्रपट असावा. प्रेक्षकांनी अर्थातच त्या चित्रपटाकडे पाठ फिरवली. कारण त्यात अन्य कलावंत नव्हते, छान छान गाणी नव्हती. 

‘दर्द का रिश्ता’सारख्या चित्रपटातून त्यांनी मुंबई येथील गणेश विसर्जन मिरवणूक दाखवली. ये रास्ते है प्यार के, मन का गीत, नहले पे दहला, रेश्मा और शेरा असे सात चित्रपट त्यांनी निर्माण केले. 

‘ब्लॅक अँड व्हाइट’ चित्रपटांच्या जमान्यातील हा कौटुंबिक कथानकात रंगणारा नायक बदलत्या काळाबरोबर रंगीत चित्रपटात बदललेल्या कथानकांच्या चित्रपटांतही रमलेला दिसतो. भरदार शरीरयष्टी आणि भरपूर उंचीमुळे त्यांनी साकार केलेला हिरो १९७०नंतरच्या हाणामारी, सूड, बदला अशा प्रकारच्या कथानकातही शोभून दिसला होता. गीता मेरा नाम, नागीन, उमर कैद, प्राण जाए पर वचन न जाए, जख्मी अशा चित्रपटांमधील सुनील दत्त व आम्रपाली, मेरा साया, खानदान अशा चित्रपटांतील सुनील दत्त वेगळा होता. 

पुढे तो समाजसेवेकडे वळला. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बनला. तीन-तीन वेळा लोकसभेच्या निवडणुकीतून निवडून येण्याचा विक्रम त्याच्या सुसंस्कृत खानदानी चेहऱ्याने व वर्तनाने केला. त्या आधी तो मुंबईचा शेरीफही झाला होता. 

स्वतःच्या मृत्यूपूर्वी त्याने लिहून ठेवले होते, की ‘माझे पुतळे उभारू नका, माझे नाव कोणत्याही रस्त्याला देऊ नका. माझी जयंती, पुण्यतिथी साजरी करू नका.’ मानवी जीवनाची क्षणभंगुरता, त्याचे अल्प काळाचे अस्तित्व व जगरहाटी यांचा त्याने केवढा विचार केला होता, हेच यावरून दिसून येते. 

सुनील दत्त यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा जन्मदिन, स्मृतिदिन साजरा करायचा नाही, हे जरी असले तरी असा चित्रपट निर्माता व अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत होऊन गेला, याची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आदर्श व्यक्ती सिनेमाच्या क्षेत्रातही होत्या हे ज्ञात होण्यासाठी हे सारे नमूद केले.

प्रसिद्धी, पैसा, मान, सन्मान सगळे सुनील दत्त यांना मिळाले. त्यांच्या जीवनात दुःख काहीच नव्हते असे नाही. मिळाले ते सारे गोड मानून जगत असतानाच पत्नीला कॅन्सर होतो. पाण्यासारखा पैसा ओतूनही ती वाचत नाही. त्यातून सावरण्यापूर्वीच मुलगा ड्रग्जच्या व्यसनाची शिकार होतो. काही काळाने मुलाला व्यसनमुक्त केले, तर तोपर्यंत मुलीचे सासरी पटेना. तिने नवऱ्याबरोबर वेगळे बिऱ्हाड करून प्रश्न सोडवला तर मुलगा खूप आजारी पडला. तो बरा होऊन परततो तोच सुनेला ब्रेन ट्यूमर झाला आणि वृद्धापकाळात मुलावर देशद्रोहाचे आरोप झाले.

‘गमों का दौर’ म्हणजे काय हे सुनील दत्त यांनी अनुभवले आणि साऱ्याला ते तोंड देत राहिले. ‘हमराज’मध्ये पडद्यावर गायलेले गाणे जगत राहिले. असे कोणते होते ते सुनहरे गीत? आऽऽ आऽऽ अशा महेंद्र कपूर यांच्या आलापाने गीत सुरू होते. पुढे शब्द येतात -

गमों का दौर भी आए, तो मुस्कुराके जियो

(लज्जेने/अपमानाने/दुःखाने) तोंड लपवून जगू नका. (दुःखातिरेकाने अगर खेदाने) मान खाली झुकवून जगू नका. (दुःख, संकटे, अडचणी येतच असतात, हे जाणून) दुःखाचा काळ (जीवनात) आला तरीही त्याला हसत हसत सामोरे जा! ओठांवर हास्य खेळवत जगा!

जीवनाचे हे तत्त्व पटवून देण्यासाठी साहिर लुधियानवी पुढे लिहितात -

घटा में छुप के सितारे फना नहीं होते 
अंधेरी रात के दिल में दिये जला के जियो

तारे/चांदण्या ढगांआड गेले/लपले म्हणजे काय त्यांचा विनाश होत नाही, ते संपून जात नाहीत. (सर्वत्र दुःखाचा काळोख दाटल्यामुळे) अंधारी रात्र जरी वाट्याला आली, तरी हृदयात (आशेचा, सकारात्मक विचारांचा) दिवा प्रज्ज्वलित करा (आणि पुढची वाटचाल करा.) 

कारण हे जीवन बेभरवशाचे आहे. न जाणो - 

न जाने कौन सा पल मौत की अमानत हो 
हर एक पल की खुशी को गले लगा के जियो

न जाणो, कोणता क्षण मृत्यूची ठेव असेल (कोणत्या क्षणी मृत्यू येणार हे आपल्याला माहीत नाही) (म्हणूनच) प्रत्येक क्षणाला मिळणारा आनंद, सौख्य उपभोगून घ्या, आपलेसे करा. (कारण ते पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही.)

जीवनाची ही पद्धत सांगून एक शाश्वत सत्य कवी शेवटच्या कडव्यात सांगतो. तो म्हणतो - 

ये जिंदगी किसी मंज़िल पे रुक नहीं सकती 
हर एक मकाम से आगे कदम बढा के जियो
 
आपण अमुक एका ठिकाणावर/ध्येयापाशी पोहोचलो, म्हणजे तेथेच आपले जीवन थांबणार आहे, संपणार आहे असे असू शकत नाही. जीवनाचे चक्र चालूच असते. म्हणूनच एक मुक्कामाचे ठिकाण, एक ध्येय गाठले, की पुढे पाऊल टाकत वाटचाल चालू ठेवायची असते.

साहिर लुधियानवी यांचे हे तत्त्वचिंतनाने भरलेले आशयपूर्ण काव्य संगीतकार रवी यांनी साजेशा संगीतात गुंफलेच आहे; पण ते महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेताना सुरुवातीचा आलाप आणि प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या ओळीतील पहिले तीन शब्द अशा उच्च स्वरांत गाऊन घेतले आहेत, की त्यामुळे हे गीत आणखीच प्रभावी बनले आहे. सारेच ‘सुनहरे’ बनून गेले आहे.

पडद्यावर हे गीत गाणारे व जीवन या गीताप्रमाणेच जगून एक आदर्श जीवन जगण्याचे उदाहरण बनलेले सुनील दत्त यांना विनम्र अभिवादन! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shobhana Tirthali About 55 Days ago
छोट्याशा लेखात सुनील दत्त यांचा जीवनपट आणि कारकीर्द सुंदर रीतीने उलगडली.
0
0
Rohoni About 65 Days ago
अप्रतिम गाणे आणि त्याचे विश्लेषण
0
0

Select Language
Share Link
 
Search