Next
‘दुष्काळ व टंचाई स्थितीत संवेदनशीलतेने काम करा’
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरांचे आवाहन
प्रेस रिलीज
Monday, May 13, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दुष्काळ व टंचाईच्या स्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी संवेदनशीलतेने काम करा,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. 

पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, उपायुक्त पुनवर्सन दीपक नलावडे, उपायुक्त पुरवठा नीलिमा धायगुडे, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व संबंधित यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टंचाई निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने गतिमान करून त्यात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची खबरदारी घ्या. चारा छावण्याचे संचलन काटेकोरपणे करा. दुष्काळ व टंचाई स्थिती भागात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीअंतर्गत विविध यंत्रणांकडील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करा. ज्या ठिकाणी पाण्याचे टँकर भरले जात आहेत, त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा स्टॉक करून ओटी टेस्ट घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पाणी टंचाई निवारण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या आराखडा अंमलबजावणी व आराखड्याव्यतिरिक्त किती ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत याबाबतची माहिती त्यांनी या वेळी घेतली. आवश्यक तेथे तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देत डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘ज्या ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत त्या ठिकाणी जीपीएस कार्यप्रणालीचा काटेकोरपणे अवलंब व्हावा, टँकर भरून घेण्यासाठीचे स्त्रोत निश्चित करा, टँकरची देयके जीपीएसच्या लॉगबुक तपासूनच द्यावी, त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे तपासून घ्यावी, टँकरची क्षमता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी, टँकरला अजिबात गळती असू नये. ज्या ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरले जात आहे त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा स्टॉक असावा. ओटी टेस्ट करूनच पाणी टँकरमध्ये भरले जावे. ही टेस्ट निगेटीव्ह आल्यास अशा पाण्याचे टँकर वापरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.’

सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या शहरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा घेतला असता खानापूर वगळता अन्य ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर खानापूर शहरासाठी शहरालगतच्या विहिरी व कुपनलिका या अधिगृहित करून त्यातून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. सन २०१८-१९मधील वितरीत १५ कोटी ३८ लाखांच्या विनियोगाबाबत या बैठकीत आढावा घेऊन २०१७-१८मधील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे तात्काळ देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेऊन दुष्काळ व टंचाई परिस्थिती असणाऱ्या तालुक्यांमध्ये या योजनेंतर्गत यंत्रणांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत. रोजगार नाही म्हणून कोणीही कामापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे,’ असे त्यांनी सांगितले.

जिल्हास्तरावर चारा छावण्यांसाठी सात प्रस्ताव प्राप्त झाले असून, पाच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तीन चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. दोन चारा छावण्या लवकरच सुरू करण्यात येतील. आटपाडी तालुक्यातील चार व जत तालुक्यातील चार चारा छावण्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावर मागणी व आवश्यकता लक्षात घेऊन चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ते म्हणाले, ‘चारा छावण्यातील पशुधनासाठी १५ किलोऐवजी १८ किलो चारा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी. चारा छावणीतील सर्व पशुधनाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या ठिकाणी शेड, इलेक्ट्रिसिटी व अग्निशमन यंत्रणा असावी. चाऱ्याची तपासणी व्हावी. पशुपालक समितीची नियमित बैठक व्हावी, आजारी जनावरांची स्वतंत्र व्यवस्था ठेवली जावी. एकूणच चारा छावण्यांचे संचलन काटेकोर व्हावे.’  

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सर्व सूचनांचे जिल्हा प्रशासन तंतोतंत पालन करेल, अशी ग्वाही देऊन संवेदनशीलतेने व सदसदविवेक बुद्धीने सर्वसामान्य माणसासांठी काम करण्याचे आवाहन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search