Next
ध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर
मानसी मगरे
Tuesday, June 11, 2019 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

मंदार कमलापूरकर

चित्रपटात पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांप्रमाणेच पडद्यामागे झटणारे जे असंख्य हात असतात, त्यांपैकी अत्यंत महत्त्वाचे कलाकार म्हणजे ध्वनिसंयोजक (साउंड डिझायनर). पुण्यातील ध्वनिसंयोजक मंदार कमलापूरकर यांना अलीकडेच ‘पुष्पक विमान’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट ध्वनिसंयोजक म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्या निमित्ताने, ध्वनीची ही किमया नेमकी कशी साधली जाते, ध्वनिसंयोजन म्हणजे नेमके काय, ‘पुष्पक विमान’चा अनुभव कसा होता, अशा विविध मुद्द्यांवर मंदार कमलापूरकर यांच्याशी केलेली ही बातचीत....
............
५६व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘पुष्पक विमान’ चित्रपटासाठी तुम्हाला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट ध्वनिसंयोजक या पुरस्काराबद्दल अभिनंदन. या चित्रपटाच्या ध्वनिसंयोजनाचा अनुभव कसा होता?
 - ‘पुष्पक विमान’साठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट ध्वनिसंयोजक हा पुरस्कार मिळाला, याचा नक्कीच आनंद आहे. ‘झी स्टुडिओ’च्या या चित्रपटाची मूळ कथा सुबोध भावे यांची आहे. सिनेमाच्या नावातच विमान असल्याने अर्थात तिथपासूनच आवाजाची सुरुवात होती. विमानाचा आवाज अर्थातच स्टुडिओत रेकॉर्ड करण्यासारखा नव्हता. तो प्रत्यक्ष रेकॉर्ड करण्याचा भाग होता. त्यासाठी आम्ही मुंबई विमानतळावर काम केले. कितीदातरी विमानतळाला फेरी मारून सर्व बाजूंनी मिळणारे वेगवेगळे आवाज टिपले. आजूबाजूच्या परिसरातील अन्य आवाजही त्यात येणे अपेक्षित होते.

‘पुष्पक विमान’ चित्रपटापूर्वी मी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी डबिंग सुपरवायझर म्हणून काम केले होते. हे करत असताना त्या टीमशी चांगला बंध जुळला गेला आणि याच आमच्या टीमने पुढे काही तरी वेगळे करण्याच्या दृष्टीने विचार करून ‘पुष्पक विमान’ करण्याचे ठरवले. ‘कट्यार’साठी सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेले वैभव चिंचाळकर यांनी ‘पुष्पक विमान’चे दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाची पहिलीवहिली जबाबदारी सांभाळली. सुबोध भावे यांची कल्पना, त्यातून फुललेली कथा, त्याची झालेली पटकथा या सगळ्या प्रक्रियेचा मी साक्षीदार होतो. त्यामुळे एखाद्या ध्वनिसंयोजकाची जबाबदारी संहितालेखनापासून कशी असते, याचा खूप छान अनुभव घेता आला. कथेतील संवाद, गाणी आणि यांच्यामधल्या जागा अशा कोणकोणत्या ठिकाणी मला ध्वनीवर काम करायचे आहे, हे लक्षात घेता आले. 

यात कोणत्या गोष्टी अधिक आव्हानात्मक होत्या?
- यातील आव्हानात्मक गोष्टींपैकी महत्त्वाची म्हणजे सिनेमातली दोन प्रमुख पात्रे - तात्या हे खानदेशातील एका छोट्या गावी, रम्य, शांत वातावरणात राहणारे आणि दुसरे पात्र म्हणजे सुबोध भावेंनी साकारलेला विलास, जे मुंबईतील भांडुपसारख्या अगदीच शहरी, सतत गोंगाट असलेल्या भागात राहणारे होते. त्यामुळे खेडेगावातील वातावरणाचा आणि मुंबईतील गर्दीच्या वस्तीचा अशा दोन ठिकाणांचे आवाज तयार करणे, या परस्परभिन्न गोष्टी होत्या. चित्रीकरणाचा परिसर, खानदेशातील भाषा, तिचा लहेजा हे सगळ्यांकडून योग्य प्रकारे येणे अपेक्षित होते. त्यामुळे चित्रपटाचे डबिंग करायचे असे ठरले. स्टॉक किंवा रेडिमेड आवाजांवर विसंबून न राहता अधिकाधिक आवाज नव्याने रेकॉर्ड किंवा तयार करायचे ठरवले. अशीच अनेक आव्हाने होती. अनेक प्रकारचे ध्वनी माझ्या परीने मी जिवंत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचेच श्रेय म्हणून मला हा पुरस्कार मिळाला असावा, असे वाटते. 

ध्वनिसंयोजन अर्थात साउंड डिझायनिंग या क्षेत्राकडे वळण्यामागचा विचार काय होता? याच्या अभ्यासक्रमाविषयी थोडे सांगा.
- पुण्यात अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत असताना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या माध्यमातून ‘पुरुषोत्तम करंडक’, फिरोदिया यासारख्या नावाजलेल्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत होतो. सुरुवातीला अभिनय, लेखन, संगीताचे एखादे काम अशा सर्व पातळ्यांवर काम केले होते. ते करत असताना संगीत किंवा पार्श्वध्वनी या प्रकारात जास्त रस वाटू लागला. पुढे सत्यजित केळकर यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याकडे घरातच एक स्टुडिओवजा सेटअप करून तिथे संगीतावर काम सुरू असायचे. तिथेही मन रमू लागले. मग केळकरांसोबत सहायक म्हणून काम करू लागलो. माझी या क्षेत्रातील रुची आणि कल लक्षात घेऊन त्यांनी मला फिल्म इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रमाविषयी सांगितले आणि या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याबाबत सुचवले. शिवाय त्यांनी तेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटला शिकत असलेल्या अनमोल भावेशी माझी ओळख करून दिली. त्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरातून केवळ आठ जागा होत्या, त्यामुळे निवड होणे तसे कठीणच होते. परंतु आश्चर्यकारकपणे आणि सुदैवाने माझी त्यामध्ये निवड झाली आणि मग या प्रवासाला सुरुवात झाली. या सर्व काळात अनमोल भावेचे खूप मार्गदर्शन व मदत झाली, आजही होते. शिक्षण घेत असतानाच एकीकडे काही लघुपट, माहितीपट यांच्यासाठी काम करण्याचीही संधी मिळाली. त्यातून खूप शिकता आले. हा अभ्यासक्रम खूप छान प्रकारे विभागलेला आहे. ऑडिओग्राफी हा यातील मुख्य अभ्यासक्रम आहे. ध्वनिसंयोजन हा त्यातील एक भाग किंवा एक शाखा म्हणता येईल. या ऑडिओग्राफीत मैफलीचा आवाज (लाइव्ह कॉन्सर्ट), गाण्यांचे किंवा संगीताचे रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग (स्टुडिओतील), चित्रपटासाठी लागणारे डबिंग (स्टुडिओतील संवाद रेकॉर्डिंग) किंवा सिंक साउंड (प्रत्यक्ष चित्रिकरणाच्या ठिकाणचे रेकॉर्डिंग), त्यानंतर प्रत्यक्ष ध्वनिसंयोजन (साउंड डिझायनिंग) आणि मिक्सिंग, ज्यात हे सगळेच थोड्याफार प्रमाणात येतात, असे वेगवेगळे जवळपास आठ-नऊ विभाग आहेत. या सर्व विभागातील मूलभूत शिक्षण तल्याने त्याचे तंत्र-मंत्र आणि आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारचे काम करण्याची क्षमता प्राप्त झाली.

ध्वनिसंयोजक म्हणून व्यावसायिकरीत्या सुरुवात कशी झाली?
- सचिन कुंडलकर यांचा ‘गंध’ हा चित्रपट होता. त्यासाठी माझा मित्र अनमोल भावे याने ध्वनिसंयोजनाचे काम केले होते. या चित्रपटासाठी चित्रीकरणस्थळाच्या ध्वनीवर (लोकेशन साउंड) मी काम केले होते. या कामामुळे चित्रीकरण प्रक्रिया जवळून पाहता आली. दरम्यान ‘चितगाव’ नावाच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण दार्जिलिंगला होते. त्यासाठीही मी रसूल पुकुट्टी यांचा सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर प्रभात फिल्म्सचे अनिल दामले यांच्या एका जंगल सफारी प्रकल्पाच्या माहितीपटासाठी ध्वनिसंयोजक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काही मोठ्या हिंदी चित्रपटांच्या सेटवर कलाकार मंडळींच्या अगदी चार हात दूर राहून काम करावे लागते. मराठी चित्रपटांच्या सेटवर सर्व कलाकारही सर्वांशी मिळून मिसळून वागतात. तिसरा आणि यापेक्षा वेगळा एक प्रकार म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर केलेले चित्रपट, जिथे कोणीही लोकप्रिय चेहरे नसतात, चार जण मिळून आपल्या खिशातील पैसे घालून या सिनेमासाठी काम करत असतात. अशा वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्याचा अनुभव मला सुरुवातीच्याच काळात मिळाला. जेवढी जास्त बंधने, अडचणी असतात, तेवढा माणूस जास्त सर्जनशील बनत जातो, असे मला वाटते. यामुळे मग या तिसऱ्या प्रकारात प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त चांगले काम करण्याची कला शिकता आली. यासाठी मी खूप भाग्यवान आहे, असे म्हणेन. 

पहिली दाद कोणत्या कामाला मिळाली?
- ‘श्वास’ हा चित्रपट केलेले संदीप सावंत यांचा पुढे दीर्घ काळानंतर आलेला चित्रपट म्हणजे ‘नदी वाहते.’ त्यासाठी काम करण्याची संधी मला मिळाली. या सिनेमात नदीचे वेगवेगळे मूड्स, तिच्या भावना, सिनेमातील पात्रांचे नदीशी बोलणे अशा कैक निरनिराळ्या आणि नवीन संकल्पना होत्या. त्यामुळे यात ध्वनीवर काम करणे ही एक खूप मोठी संधी होती. या चित्रपटासाठी पहिली दाद मिळाली असे मी म्हणेन. समीक्षकांकडून आलेली परीक्षणे असतील किंवा सामान्य प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, या चित्रपटातील ध्वनिसंयोजनाचा आवर्जून उल्लेख केला गेला. ‘हा सिनेमा ऐकायला आम्हाला खूप मजा आली,’ असे वाक्य या चित्रपटाबद्दल एका समीक्षकाने लिहिले होते, ते लक्षात राहण्यासारखे आहे. याशिवाय अमित दत्ता दिग्दर्शित ‘द सेव्हन्थ वॉक’ या चित्रपटाचा मी उल्लेख करीन. हा ७० मिनिटांचा सिनेमा होता. हिमाचल प्रदेशातील एक चित्रकार ठिकठिकाणी फिरून वेगवेगळे प्रकार वापरून निसर्गाची चित्रे काढतो, एवढीच याची कथा आणि एकच पात्र. ७० मिनिटांच्या या सिनेमात एकही संवाद नव्हता. केवळ निसर्गाचे विविध आवाज, चित्र ज्या साधनांनी रेखाटले जात आहे त्याचे आवाज, कागदाचे आवाज होते आणि मोजके संगीत. त्यामुळे ध्वनिसंयोजनाला खूप वाव होता. त्यासाठी काम करणे हा वेगळा अनुभव होता. त्यामधील माझ्या कामाची तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.


ध्वनिसंयोजक (साउंड डिझायनर) म्हणजे पार्श्वसंगीत (बॅकग्राउंड म्युझिक) करणारा, असा एक गैरसमज सर्वत्र असतो. यामध्ये नेमका काय फरक आहे, हे समजावून सांगाल?
- हा खूप मोठा गैरसमज आहे आणि त्याचा अनुभव मीदेखील घेतला आहे. ‘‘पुष्पक विमान’चे बॅकग्राउंड म्युझिक तुम्ही केले आहे का,’ हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो. ध्वनिसंयोजन आणि पार्श्वसंगीत हे दोन खूप वेगळे आणि स्वतंत्र घटक आहेत. ‘साउंडमध्ये करण्यासारखे काय असते, जे पडद्यावर दिसते, त्याचा आवाज आपोआप ऐकू येतो’ हादेखील एक मोठा गैरसमज आहे. प्रत्येक छोटामोठा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आणि चित्रपटात सहज, नैसर्गिक वाटणारे आवाज तसे वाटण्यासाठी स्वतंत्र मेहनत घ्यावी लागते. 

संवाद रेकॉर्ड करण्यात डबिंग आणि सिंक साऊंड हे दोन महत्त्वाचे प्रकार असतात. डबिंग या प्रकारात संवादाचे रेकॉर्डिंग स्टुडिओत केले जाते. सिंक साऊंडमध्ये प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी ते सुरू असताना रेकॉर्डिंग केले जाते. या दोन्हीही प्रकारांत संवाद, आवाजातील चढ-उतार, मधल्या जागांचे आवाज, संवाद नसतील तेव्हाचे आवाज, गाण्याच्या आधी किंवा नंतरच्या आवाजांचे टोन्स या आणि यांसारख्या कितीतरी गोष्टींचा समावेश असतो. संवादांव्यतिरिक्त फॉली, साऊंड इफेक्ट्स, वातावरणाचे आवाज (अँबियन्स) असे घटक असतात. हे सगळे ठरवण्याचे काम ध्वनिसंयोजक करतो. म्हणजेच चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा जसा दिग्दर्शक असतो, छायाचित्रण करणारा जसा छायाचित्र दिग्दर्शक (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) असतो, तसेच ध्वनीचे नियोजन आणि संयोजन करणारा ध्वनिसंयोजक (ऑडिओग्राफर) हा ध्वनीसाठीचा दिग्दर्शकच असतो. तेव्हा संगीत दिग्दर्शन आणि ध्वनिसंयोजन करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कामाचे स्वरूप पूर्णतः भिन्न असते.

तुमच्या कामाची पद्धत कशी आहे?
- ध्वनिसंयोजक म्हणून एखादे काम करताना, तिथे कोणतेच संगीत नाही असे समजूनच मी कामाला सुरुवात करतो. संगीतातून जो परिणाम साधता येईल, ते काम ध्वनीच्या माध्यमातून करता येईल का, असा प्रयत्न असतो. ध्वनी आणि संगीत यांच्या एकत्रित वापराने काम केले जाते. याशिवाय एखाद्या सिनेमासाठी आवश्यक असणारे ध्वनी हे शक्य तितके नव्याने रेकॉर्ड करण्यावर माझा भर असतो. स्टॉकमधील आवाज हे ऐकून जुने झालेले असतात, शिवाय ते नेमके आपल्या चित्रपटाच्या गरजेप्रमाणे असतीलच असे नाही. स्वतः नव्याने सर्व आवाज रेकॉर्ड करून आपल्याला हवा तसा साउंडट्रॅक तयार करणे हे आव्हानात्मक असले तरी समाधान देणारे असते. 

एखादी गोष्ट ही जशी असायला हवी तशीच दिसत असेल, ऐकू येत असेल, तर ती वेगळी वाटत नाही, तिच्याकडे लक्ष जात नाही. जेव्हा काही वेगळे त्यात दिसते किंवा ऐकू येते, तेव्हा त्याकडे लक्ष वेधले जाते. ध्वनिसंयोजनात बऱ्याचदा अशीच कलाकारी असते. कथानकाला परिणामकारक बनवण्यासाठी एखाद्या गोष्टीच्या आवाजात बदल करून दाखवताना त्यातील मूक भावना ध्वनीतून व्यक्त केल्या जातात. हे प्रेक्षकांच्या लक्षात येतेही आणि लक्षातही राहते. ध्वनिसंयोजन ही गोष्ट जेवणातील मीठासारखी आहे, असे मी म्हणेन. ते योग्य असेल, तर त्याकडे लक्ष जात नाही. परंतु कमी किंवा जास्त असेल, तर जाणवते. असेच ध्वनिसंयोजनाचे आहे. ही कला आहे. विशिष्ट हेतूने याचा वापर करताना दोन शक्यता असू शकतात. एक तर लोकांना वाटू शकते, की हे चुकले आहे. नाही तर हा एखादा विचार मांडण्याचा प्रयत्न आहे. यात जेव्हा दुसरी शक्यता लोकांना समजते, की हा एक विचार दाखवण्याचा प्रयत्न आहे, तिथे ध्वनिसंयोजनाचे यश आहे असे समजले जाईल. केवळ पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींचे आवाज ऐकू येणे इतपत दुय्यम भूमिका ध्वनीची नाही, ध्वनीला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याचा सौंदर्यपूर्ण वापर करून चित्रपटाचा अनुभव अधिक सखोल करता येतो, करायला हवा.

चित्रपटाच्या दृष्टीने ध्वनी (साउंड) आणि नाद (म्युझिक) या दोन गोष्टींमधील वेगळेपण कसे सांगता येऊ शकेल? त्यात फरक काय?
- कानाला ऐकू येते ती प्रत्येक गोष्ट म्हणजे ध्वनी (साउंड). तांत्रिक भाषेत सांगायचे झाले तर २० हर्टझ् ते २० हजार हर्टझ् या फ्रिक्वेन्सी रेंजमधील कोणताही आवाज माणसाला ऐकू येतो. हा प्रत्येक आवाज म्हणजे ध्वनी असे म्हटले, तरी तो प्रत्येक आवाज कानाला सुखावणारा असेलच असे नाही. कानाला सुखावणारा असाच आवाज म्हणजे नाद आणि अशा अनेक नादांचे मिळून बनते ते संगीत (म्युझिक). संगीताची एक प्राथमिक गरज असते, ती म्हणजे ते कानाला चांगले वाटले पाहिजे. आपल्या आयुष्यात आणि चित्रपटातही ध्वनी आणि संगीत या दोन्हींचे स्वतंत्र स्थान आणि महत्त्व आहे. तसेच ध्वनिसंयोजकाला संगीताचे शास्त्रीय ज्ञान असले-नसले (असल्यास फारच उत्तम!) तरी त्याचा कान तयार असणे हे फार आवश्यक असते.

'शब्दो' चित्रपटातील एक दृश्यध्वनिसंयोजनात फॉली हा एक महत्त्वाचा प्रकार असतो. तो नेमका काय आहे?
- पडद्यावर घडत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचे, विशेषतः पात्रांच्या हालचाली आणि क्रियांचे आवाज स्टुडिओमध्ये तयार करणे म्हणजे फॉली. उदाहरणार्थ चालणे, खाणे, भाजी चिरणे इ. इ. हे करण्यासाठी विशेष फॉली आर्टिस्ट असतात. चित्रपटात पडद्यावर दिसणाऱ्या अशा असंख्य गोष्टी असतात, की ज्यांचे मूळ आवाज वेगळ्याच दोन गोष्टी वापरून तयार केलेले असतात. कोणत्या गोष्टी वापरून कोणता आवाज तयार करता येऊ शकतो, हे समजण्याची कला म्हणजे फॉली. मग पावलांचा आवाज, पानांच्या सळसळीचा आवाज, पावसाचा आवाज हे कृत्रिमरीत्या तयार करता येतात, फॉलीचा मुद्दा सांगताना मी आवर्जून एका बंगाली चित्रपटाचा उल्लेख करीन. ‘शब्दो’ नावाचा एक बंगाली चित्रपट आहे. बंगालीत शब्दो म्हणजे ध्वनी. एका फॉली कलाकाराची ही कथा आहे. एक फॉली कलाकार, ज्याचे लक्ष केवळ हालचाली आणि इतर आवाजांकडे असते. संवादांशी त्याचे घेणे-देणे नसते. त्या कलाकाराला पुढे एक आजार होतो, ज्यात त्याला केवळ हालचालींमधून येणारे आवाज ऐकू येतात, संवाद त्याला ऐकू येत नाहीत. इतका तो आपल्या कामाशी एकरूप झालेला असतो. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.
फॉली हा आमच्या कामातील अतिशय मनोरंजक आणि तितकाच आव्हानात्मक भाग आहे. त्याला ‘जादूचे प्रयोग’ म्हणता येईल इतका तो भन्नाट प्रकार असतो. हल्ली यूट्यूबवर त्याचेही काही छान व्हिडीओज उपलब्ध आहेत.

चित्रपटांव्यतिरिक्त ध्वनिनाट्याचेही ध्वनिसंयोजन तुम्ही केले आहे. ‘अनादि मी.. अनंत मी..’ या सावरकरांवरील नव्या ध्वनिनाट्याचेही ध्वनिसंयोजन तुम्ही केले आहे. तो अनुभव कसा होता?
- ते ध्वनिनाट्य अर्थात ऑडिओ ड्रामा आहे. आजकाल लोकांना गाण्यांप्रमाणेच ऑडिओ बुक्स ऐकण्याची नवीन साधनं उपलब्ध आहेत. त्यातच हे नाट्य मोडते. यातही केवळ संगीत न वापरता वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी वापरून काम केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित ध्वनिनाट्यात त्यांच्या जीवनातील कैक प्रसंग, त्यात समुद्राचे आवाज, अंदमानच्या तुरुंगात असताना बेड्यांच्या आवाजातून त्यांनी साधलेला संवाद अशा अनेक कल्पना सुचत गेल्या. ते करतानाही एक वेगळा अनुभव आला. चित्रपटाप्रमाणे इथे समोर दृश्य नसल्याने केवळ ध्वनीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणे हे निश्चितच जास्त आव्हानात्मक आहे. (‘अनादि मी.. अनंत मी..’हे ध्वनिनाट्य ऐकण्यासाठी आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. )

याशिवाय ‘आईशप्पथ’, ‘कलंदर’, ‘पँप्लेट’ अशा काही लघुपटांच्या माध्यमातूनही मला खूप छान काम करायला मिळालं. हे लघुपट अनेक महोत्सवांमधून लोकांपर्यंत पोचले, त्यांना ध्वनिसह अनेक पुरस्कार मिळाले आणि प्रेक्षक-समीक्षक सर्वांची दादही मिळाली.

ध्वनी संयोजन या पडद्यामागील कलेचे महत्त्व प्रेक्षकांना लक्षात आणून देण्यासाठी आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष असे काय सांगाल?
- मी आधी म्हटल्याप्रमाणे, चित्रपटात ऐकू येणारा कुठलाही आवाज हा ‘आपोआप’ ऐकू येत नसून तो प्रत्येक आवाज स्वतंत्रपणे वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड करावा लागतो. तो चित्रपटात सहज, नैसर्गिक वाटावा यासाठी त्यावर काही संस्कार करावे लागतात. यासाठी ध्वनीचे शास्त्र आणि कला यांचा योग्य समतोल साधणे महत्त्वाचे असते. तसेच प्रेक्षकांनीही केवळ ‘ऐकू आलं म्हणजे झालं’ यापलीकडे जाऊन ध्वनीच्या तपशीलांकडे लक्ष दिले तर दर्जेदार ध्वनी म्हणजे काय, हे लक्षात येऊन त्यांचाही आनंद नक्कीच वाढेल. संवाद आणि संगीत यांशिवाय असंख्य आवाजांच्या करामती त्यांना अनुभवता येतील. आजच्या सतत बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि विस्तारत चाललेल्या मनोरंजनाच्या जगात ध्वनीच्या क्षेत्रात करिअरसाठीही मोठी संधी आहे. चित्रपटच नव्हे, तर लघुपट, माहितीपट आणि आता वेबच्या माध्यमातून प्रचंड काम सुरू असून त्यात ध्वनिसंबंधी कामाला खूप वाव आहे. ज्यांना यात रस असेल त्यांनी प्रत्यक्ष हे काम कसे चालते, हे जवळून पाहिल्यास त्यांना अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात. हल्ली यात शिक्षण घेण्यासाठी अनेक संस्था आणि असंख्य छोटे-मोठे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तेव्हा तरुणांनी, विशेषतः मराठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही. अर्थात, ग्लॅमर किंवा इतर आकर्षणातून हे क्षेत्र निवडण्यापेक्षा आपल्याला आपले काम मनापासून आवडत असेल तरच तुम्ही टिकू शकता, पुढे जाऊ शकता. इथेही मेहनतीला पर्याय नाहीच.

(मंदार कमलापूरकर यांचे मनोगत, ध्वनिसंयोजन या विषयाबद्दल त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यांचे अनुभव पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Brahmadatta Pandey, Warora About 43 Days ago
Congratulations. You are fortunate not only in having a legacy of rhyme and rhythm but also in having creative zeal to enrich the legacy through metre and melody. We, the ones who have a sense of belonging to the legacy you own feel proud. May you rise to command the skies of sound and its resonance with the human sensibilities. Congratulations again. Brahmadutt Pandey
0
0
Harshad Sahasrabudhe About 60 Days ago
सुंदर आर्टिकल. रायटप आणि व्हिडियो दोन्हीही छान
0
0
Daksha Venkatesh Patil About 60 Days ago
Abhinandan. Nice Information.
0
0
Jayashri About 63 Days ago
माहितीपूर्ण मुलाखत.होतकरू ,सृजनशील तरुणांसाठी कलाक्षेत्रातिल नव्या दालनाची उपयुक्त माहिती. ध्वनिच्या किमयागाराचे अभिनंदन!मानसी यांनी केलेले उत्तम शब्दांकन!
0
0
Kunal Hitty About 66 Days ago
Indeed a very thorough explanation about the importance and nitigrities in making any video stand out bcoz of fantastic sound designing aspect. Very glad to work with you Mandar. Keep up the good work and experiments that you do in each project.
2
0
Rohan Agashe About 66 Days ago
Congratulations Mandar !!! Chaan paddhatine explain kela ahes Sound Designer nakki kay karto aani overall film sound sathi kona konacha contribution asta. This awareness is very much needed.
2
0
Mrs. Radha Ganu About 66 Days ago
So nice information about sound . Now I want to see that movie with keeping this out look about the sound .Now sky is the limit for your sweet sound
2
0
Seema Waghmode About 66 Days ago
Collegemadhe astana tu he sagl karaychas te aatta kaltay... Kup khup Abhinandan Mitra.. Feeling proud.. Keep it up :)
2
0
Pournima Kamalapurkar About 67 Days ago
Proud of brother...keep it up
2
0
Ashok Mujumdar About 67 Days ago
What 's great performance.. New field. No family background in this field. It is like GARUD ZEP... ALL THE BEST FOR FUTURE... from Ashok Mujumdar Sangli Bank Solapur....
2
0
Aarati Musrif. About 67 Days ago
Khup khup Abhinandan Mandar.Tuzi pragati ani yash pahun khup anand zala.Aata sadhya tumhi kothe aahat?Aai baba kase aahet?
2
0

Select Language
Share Link
 
Search