Next
ऐ मेरी जोहरजबीं...
BOI
Sunday, May 05, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

मुख्य भूमिकेत नसल्या, तरी अनेक चित्रपटांमध्ये लक्षात राहण्यासारख्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अचला सचदेव. त्यांची जन्मशताब्दी तीन मे २०१९पासून सुरू झाली आहे. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘ऐ मेरी जोहरजबीं’ या गीताचा...
......
चित्रपटामध्ये फक्त नायक-नायिकाच महत्त्वाच्या असतात असे नाही, तर चित्रपट प्रभावी बनतो तेव्हा त्यामध्ये अनेकांचा सहभाग असतो. प्रमुख नायक-नायिका यांच्याखेरीज असलेले सहकलाकार, म्हणजेच आई, वडील, भाऊ, बहीण, काका, शिक्षक इत्यादींची भूमिका करणारे कलावंतही महत्त्वाचेच असतात. या दुय्यम भूमिका करणाऱ्या कलावंतांना दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण अशा एका अभिनेत्रीची माहिती घेणार आहोत, की जी तरुण असतानाही कधी प्रमुख नायिकेच्या रूपात दिसली नाही आणि वय वाढल्यावर तर नेहमीच चरित्र नायिकेच्या भूमिकेत दिसली. 

अचला सचदेव! अनेक नायक-नायिकांची पडद्यावरची सुंदर आई! तीन मे १९२० ही अचलाजींची जन्मतारीख! म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष कालच्या तीन मेपासून सुरू झाले; पण २९ एप्रिल २०१२ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतरही त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही, तेव्हा आता जन्मशताब्दी वर्षाची तरी कोण दखल घेणार? 

मुकेशजी गातात तसे ‘जमाने का दस्तूर है ये..’ हेच खरे! या चित्रपट कलावंतांना प्रसिद्धी, लोकप्रियता व पैसा मिळतो; पण त्याचबरोबर एक शापही अनेकांना मिळतो. लोकप्रियेच्या शिखरावर अगर चर्चेत असताना आलेला मृत्यू हा ‘ब्रेकिंग न्यूज’ बनते; पण फिल्मी वलयापासून दूर गेलेले असाल तर ‘हं! होती एक नटी/नट’ एवढेच कानावर येते. असो!
अभिनेत्री अमिताच्या बाबतीत लिहिताना मी नशिबाच्या एक-दोन टक्क्यांची गोष्ट केली होती. सुंदर अमिता त्या मानाने अनेक चित्रपटांत मुख्य नायिका तरी बनली होती; पण अचला सचदेव यांच्या बाबतीत मात्र याही पेक्षा वेगळी परिस्थिती होती. लोभस व्यक्तिमत्त्व असूनही, तारुण्यात असतानासुद्धा प्रमुख नायिकेच्या पदापासून त्या दूरच राहिल्या!

१९५१चा ‘काश्मीर’ हा त्यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट! पण त्यामध्ये त्यांनी आईची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तीन कलाकारांच्या आईचे काम त्यांना करावे लागले होते. अल नासीर, कमल कपूर आणि अरुण हे ते तीन नायक होते. युद्धामध्ये विमान कोसळून एक सैनिक ठार होतो. त्याच्या मृत्यूचे वृत्त येते तेव्हा त्याची आई पूजेचे ताट घेऊन येत असते. हे वृत्त ऐकताच ती जिन्यावरून खाली कोसळते, असे ते दृश्य होते. भारत-पाक फाळणीच्या वेळी विदारक प्रसंग पाहिलेल्या अचलाजींनी या प्रसंगात त्या अनुभवाच्या आधारे चित्रपटातील तो पहिला शॉट ओके केला. डोळ्यांतील अश्रू दाखवण्याकरिता त्यांना ग्लिसरीनची गरजच लागली नाही. तो शॉट बघून तेथे असलेल्या उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले; पण....?

पण त्यानंतर दु:खी स्त्री किंवा तत्सम आईच्याच भूमिका त्यांच्या वाट्याला येत राहिल्या. कोणाला नाही म्हणायचे नाही, आनंदी वृत्तीने मिळेल ते काम स्वीकारायचे या पद्धतीने त्यांचे वागणे होते. अर्थातच त्यामुळेच ‘रोने का सीन है तो अचलाजीको बुलाओ’ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यांना कामे मिळत गेली; पण साचेबंद भूमिकेबाहेर पडण्याची संधी मात्र मिळाली नाही. नायिकेचे व्यक्तिमत्त्व असूनही त्या चरित्र नायिकेच्याच भूमिकेत दिसून येत होत्या; पण त्या भूमिकेत त्या शोभून दिसत आणि त्यांचा चेहराही लक्षात राहत असे. 

दिल एक मंदिर, मेरा नाम जोकर, संगम, सपनों का सौदागर, आरजू, हकीकत, चांदनी, मेरा साया अशा अनेक चित्रपटांतून त्या आईच्या भूमिकेतून दिसून आल्या. ‘काश्मीर’ या पहिल्या चित्रपटापासून सोनाली बेंद्रेची भूमिका असलेल्या ‘दहक’ या चित्रपटापर्यंत सुमारे दोनशे चित्रपटांत अचलाजींनी भूमिका केल्या. त्याशिवाय दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्येही त्यांच्या भूमिका होत्या. काही पंजाबी, गुजराती, बंगाली चित्रपटांतूनही त्यांना संधी मिळाली होती. 

हिंदी चित्रपटांतील तीन पिढ्यांच्या नायिका अगर नायकाची आई म्हणून त्यांनी कामे केली. त्यापैकी पहिल्या पिढीत – राज कपूर, नर्गिस, नलिनी जयवंत, अशोककुमार इत्यादी कलावंत, तर दुसऱ्या पिढीत साधना, राजेंद्रकुमार, सुनील दत्त आणि तिसऱ्या पिढीत झीनत अमान, राजेश खन्ना इत्यादी कलावंत अशी ही तीन पिढ्यांची पडद्यावरील आई बहुतेक वेळा प्रेमळ व गरीब स्वभावाचीच दिसली; पण आई म्हणून त्यांचे काम पाहताना एका चित्रपटात मात्र त्यांचा राग येतो. मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या संसारात नको इतके नाक खुपसून मुलगी व जावई यांच्या संसाराचा विस्कोट करणारी ‘कोरा कागज़’ चित्रपटात त्यांनी साकारलेली आई चीड आणणारी होती. 

अचलाजी मूळच्या कराचीच्या! मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी काही काळ नभोवाणी केंद्रातील नाट्य विभागात काम केले. फाळणीनंतर काही काळ त्या श्रीनगर येथील आकाशवाणी केंद्रात नोकरीला होत्या. तेथे असतानाच योगायोगाने त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. 

अनेक चित्रपटांत आईची भूमिका केलेल्या या अभिनेत्रीने १९९५मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते, की ‘चित्रपटात दुःखी आईची भूमिका करणे हे अवघड काम असते. ममत्वाची भावना मनात निर्माण झाल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर तसे भाव येत नाहीत आणि अश्रूही येत नाहीत.’

प्रारंभी चित्रपटसृष्टीत ‘अचला’ म्हणून ओळखली जाणारी ही कलावंत आईच्या भूमिकेमुळे ‘अचलाजी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि अखेरच्या दिवसांत ‘माताजी’ म्हणूनच ओळखली जात होती. मुंबईच्या झगमगाटापासून दूर होऊन तिने शेवटचे दिवस पुण्यात काढले. अशा या अचलाजी!

सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य असते. चित्रपटसृष्टीत सौंदर्यवती नायिका बनतात हा इतिहास आहे. परंतु अचला सचदेव यांच्यासारख्या स्त्रिया सौंदर्य असूनही ‘नशीब’ नसल्यामुळे चरित्र नायिकाच बनून राहतात. दोनशे चित्रपटांच्या संपूर्ण कारकिर्दीत एका चित्रपटात तरी त्यांना उद्देशून गाणे होते हेच नशीब म्हणायचे!

होय. बी. आर. चोप्रांच्या ‘वक्त’ चित्रपटात बलराज सहानींच्या त्या नायिका होत्या आणि चित्रपटाच्या सुरुवातीला हा नायक या नायिकेसाठी गाणे म्हणतो. त्यामधील ‘तू अभी तक है हँसीं’ ही ओळ खरोखरच अचलजींकरिता सार्थ होती, समर्पक होती. 

तेच आपले आजचे सुनहरे गीत! गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार रवी, गायक मन्ना डे, पडद्यावर बलराज सहानी! पण या सर्वांचे हे गीत अचलजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांची आठवण करून देणारे! बघा त्या गीतात त्या कशा सुंदर दिसतात आणि चारचौघांत आपला पती आपल्या सौंदर्याचे कौतुक करतो, म्हणून कशा छान लाजतात! अभिनेत्री अचला सचदेव यांचा तो अभिनय आहे हे वारंवार बजावावे लागते इतके ते लाजणे खरेखुरे वाटते. 

गाण्याचा ताल आपल्याला डोलायला लावतो. मन्ना डेंचा स्वर गाण्याच्या आधी अंऽ अंऽ असा आलाप घेतो! संगीतकार रवींची चाल ‘अभी तक जवाँ’च वाटते! आपल्या पत्नीचे कौतुक व रूपवर्णन करताना वयाने प्रौढ झालेला हा पती म्हणतो - 

तू अभी तक है हँसीं और मै जवाँ
तुझपे कुर्बान मेरी जान मेरी जान 

सुंदर (भालप्रदेश असलेल्या) सुंदरी (हे प्रिये) तुला हे माहीत नाही, की तू अजूनही सुंदर दिसतेस आणि मीपण तरुण आहे (म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते, की) हे माझ्या प्राणप्रिये मी तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकतो (एवढे मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो). 

बलराज सहानी व अचलाजी चित्रपटाच्या प्रारंभाला वृद्धत्वाकडे झुकलेले/प्रौढावस्थेत आहेत. त्यामुळे या ओळी त्यांच्या तोंडी साजेशा दिसतात. दोघेही अभिनयात निष्णात. त्यामुळे तारुण्याचा जोश (बलराजजींच्या बाबतीत) आणि प्रेमातील लज्जा (अचलाजींच्या बाबतीत) हे कलावंत आपल्या अभिनयातून हुबेहूब उभी करतात. 

पुढे बलराजजी गातात - 

ये शोखियाँ, यह बाँकपन, जो तुझ में है कहीं नहीं 
दिलों को जीतने का फन, जो तुझ में है कहीं नहीं 
मैं तेरी आँखो में पा गया, दो जहाँ

(हे प्रिये) ही तुझी चंचलता/अवखळपणा, हे तुझे सौंदर्य, हे जे तुझ्या ठायी एकवटले आहे ना, तसे ते अन्यत्र कुठेही मिळणार नाही. मनाला जिंकण्याची तुझी कलाही अन्यत्र कुणापाशी मिळणार नाही. (त्यामुळेच) या तुझ्या (सुंदर) नेत्रांत मला सारे विश्व मिळाल्याचे जाणवत आहे. 

तिचे वर्णन करताना ‘तो’ पुढे म्हणतो - 
दो मीठे बोल जानेमन, जो मुस्कुराके बोल दे 
तो धडकनों में आज भी शराबी रंग घोल दे 
ओ सनम, ओ सनम मैं तेरा आशिक जाविदाँ

हे प्राणप्रिये, सुंदर हास्य ओठी खेळवत दोन गोड शब्द तू माझ्याशी बोल (त्यामुळे या वयातही) तुझ्या बोलांमुळे माझ्या स्पंदनांना एक प्रकारे शराबी रंग येईल. माझ्या हृदयाची स्पंदने सौख्याने भारित होतील. हे प्रिये, मी तुझा शाश्वत (जाविदाँ) असा चाहता/आशिक आहे. 

बस! दोन कडव्यांमधील हे काव्य! या वयात आणखी वेगळे काय बोलणार, त्याचे भान ठेवून साहिरजी हे काव्य येथेच थांबवतात; पण संगीतकार रवी मात्र त्याला कव्वालीसदृश गीताचे स्वरूप देऊन आपल्याला एक छान ठेका धरायला लावतात व गीत मोठे बनवतात. पडद्यावरचे बलराज सहानी व अचलाजी खरोखरच सुंदर व साजेसे दिसतात व तसाच अभिनयही करतात. पन्नास वर्षे उलटून गेली, तरी अशी सुनहरी गीते ‘अभी तक है हँसीं’ म्हणायला भाग पाडतात. 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
S G Chandorkar About 138 Days ago
Very nice
0
0

Select Language
Share Link
 
Search