Next
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन
९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये सुरू
BOI
Friday, January 11, 2019 | 03:25 PM
15 0 0
Share this article:

वैशाली येडेयवतमाळ : आजपासून (११ जानेवारी २०१९) यवतमाळमध्ये सुरू होत असलेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली येडे या शेतकरी महिलेच्या हस्ते होणार आहे. शेतकरी असलेले त्यांचे पती सुधाकर येडे यांनी २०११मध्ये आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्यांचा ज्वलंत प्रश्न असलेल्या विदर्भात होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेच्या हस्ते व्हावे, हे खचितच औचित्यपूर्ण आहे. 

शेतीतील समस्यांना कंटाळून पतीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीपुढे अनेक अडचणी उभ्या असतात. तरीही अशा महिला पदर खोचून उभ्या राहतात आणि निर्धाराने पुढे वाटचाल करतात, कुटुंब चालवतात. अशा महिलांच्या लढ्याची कहाणी ‘तेरवं’ या नाटकात मांडण्यात आली असून, त्यात वैशाली येडे याही भूमिका करतात. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील राजूर हे वैशाली यांचे गाव. तेथे त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. २००९मध्ये त्यांचा विवाह झाला आणि २०११मध्ये पतीने आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना बराच संघर्ष करावा लागला. आज नऊ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी यांना घेऊन, परिस्थितीशी दोन हात करत, वैशाली सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगत आहेत.

‘तेरवं’ हे नाटक श्याम पेठकर यांनी लिहिले असून, हरीश इथापे यांनी दिग्दर्शित केले आहे. आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांच्या पत्नी आणि दोन शेतकऱ्यांच्या मुली यात काम करतात. त्यात वैशाली येडे यांचाही समावेश आहे. 

विविधांगी साहित्यासह स्त्री जाणिवांबद्दलचे संवेदनशील लेखन करणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे यांच्यासारख्या अभ्यासू साहित्यिका संमेलनाध्यक्षा असताना वैशाली येडे यांच्यासारख्या शेतकरी महिलेच्या हस्ते उद्घाटन होणे, हा वेगळा योगच म्हणावा लागेल.

इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित करून नंतर ते आमंत्रण ऐन वेळी रद्द केल्यामुळे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आयोजकांवर टीका होत होती; मात्र आयोजकांनी माफी मागितली. तसेच त्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयाचे स्वागत होत आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या वादामुळे राजीनामा दिला. त्यामुळे उपाध्यक्षा विद्या देवधर यांच्याकडे कार्यभार आला आहे. 

ग्रंथदिंडीने सुरुवात
आज, (११ जानेवारी २०१९) रोजी सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी या वेळी उपस्थित होते. आज सायंकाळी चार वाजता यवतमाळमधील पोस्टल ग्राउंड, समता मैदान येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरी असे नाव संमेलनस्थळाला देण्यात आले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसून, १२ जानेवारीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार हे मान्यवर या वेळी उपस्थित असतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search