Next
पिरंदवण्यातील गोकुळाष्टमी उत्सवाला १५८ वर्षांची परंपरा
गावाने जपलाय पारंपरिक खेळ, गाण्यांचा वारसा
अनिकेत कोनकर
Monday, September 03, 2018 | 10:10 PM
15 0 0
Share this story

गोफ

रत्नागिरी :
शहरात अलीकडे गोकुळाष्टमीच्या उत्सवात प्रखर लाइटच्या झगमगाटात डीजेच्या तालावर केले जाणारे चित्रविचित्र नृत्य आणि धांगडधिंगा असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. काही गावांमध्येही हे लोण हळूहळू पसरू लागले आहे; मात्र तरीही अनेक गावांत आजही उत्सवात परंपरागत सुरांचे आणि सात्त्विक उत्साहाचे लेणे अनुभवायला मिळते. रत्नागिरीतील सड्ये-पिरंदवणे-वाडा जून या गावांतला उत्सवही त्या सध्या दुर्मीळ झालेल्या उत्सवांपैकीच एक. ग्रामदैवत श्री सोमेश्वराच्या मंदिरात होणाऱ्या या गोकुळाष्टमी उत्सवाचे यंदा १५८वे वर्ष होते. तीन सप्टेंबर २०१८ रोजी यंदाच्या उत्सवाची सांगता झाली. गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपरिक खेळांसह जुन्या गाण्यांचा वारसा या गावाने जपून ठेवलाय. त्यामुळे हा उत्सव सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो.

टिपऱ्या

भेदाभेद विसरून एकत्र येण्याचा संदेश श्रीकृष्णाने आपल्या वागण्यातून, खेळांतून दिला. गोकुळाष्टमीचा उत्सव म्हणजे त्या संदेशाचे प्रतीक असतो. रत्नागिरी तालुक्यातील सड्ये-पिरंदवणे-वाडा जून या गावांतील गोकुळाष्टमी उत्सव आजही आपले ते वैशिष्ट्य टिकवून आहे. शारीरिक, मानसिक ऊर्जा, एकाग्रता, टीमवर्क, समन्वय या गुणांचा कस लागणारा गोफ विणण्याचा खेळ, टिपऱ्या, त्याला पारंपरिक गाण्यांची नि पेटी-तबल्याची जोड हे या गावांतील उत्सवाचे वैशिष्ट्य. १५८ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाच्या वैभवात वक्तशीरपणा नि नियोजन या गोष्टीही भर टाकतात. उत्सवाचे स्वतंत्र नोंदणीकृत मंडळ आहे. ठरावीक कालावधीने त्याचे अध्यक्ष निवडले जातात. पूर्वी  गावात मानकरी असायचे. आता काळानुसार त्यांच्या प्रतिनिधींना मंडळात स्थान दिले जाते. सर्व गावकरी एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. हा उत्सव सुरू कसा झाला, याची गोष्टही रंजक आहे. उत्सव मंडळाचे सध्याचे अध्यक्ष विजय बेहेरे यांनी त्याबद्दल माहिती दिली. ‘फार पूर्वी इथून जवळच्या कोतवडे गावामध्ये सहस्रबुद्धे नावाचे एक कुटुंब होते. त्यांच्या घरी पूर्वीपासून गोकुळाष्टमी उत्सव होत असे. परिसरातील आणि आमच्या गावातील ग्रामस्थही त्या उत्सवात सहभागी होण्यासाठी रात्री जात असत. तेव्हा दळणवळणाची साधने नसल्याने अर्थातच चालत जावे लागायचे. पिरंदवण्यातून कोतवड्यात जाताना वाटेत दोन नद्या लागतात. एकदा कोतवड्यातील नदीला पावसामुळे पूर आला होता. त्यामुळे पिरंदवण्यातील ग्रामस्थांना उत्सवासाठी सहस्रबुद्ध्यांच्या घरी जाणे शक्य झाले नाही. निराश मनःस्थितीत सगळे जण परत जायला निघाले. सड्ये, पिरंदवणे, वाडा जून यांपैकी कोतवड्यातून येताना पहिल्यांदा लागते वाडा जून. ग्रामस्थांनी परत येताना तेथील भावे कुटुंबाच्या घरातील श्रीफळ उचलून ते श्री देव सोमेश्वराच्या पुढ्यात ठेवून कृष्णरूप आहे असे समजून ‘गोपालकृष्ण महाराज की जय’ असा जयघोष केला. तिथेच या तीन वाड्यांतील उत्सवाचे बीज रोवले गेले. अशा प्रकारे सुरुवात झालीच आहे, तर आपल्या गावाचा उत्सव सुरू करावा, अशी कल्पना पुढे आली. त्यातूनच साधारण १८६०च्या सुमारास या गावाचा पहिला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला गेला,’ असे बेहेरे यांनी सांगितले. ‘१९६०मध्ये या उत्सवाचा शताब्दी महोत्सव नऊ दिवस साजरा करण्यात आला होता.१९८५मध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सव, तर २०१०मध्ये शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. २०२०मध्ये शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा होणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. या गावाची आणखी एक ओळख म्हणजे नटवर्य शंकर घाणेकर यांचे हे गाव.

श्री सोमेश्वर मंदिर

‘पारंपरिक खेळ, टिपऱ्या, टिपऱ्यांची पारंपरिक गाणी हे या उत्सवाचे वैशिष्ट्य. तीन वाड्यांतील ग्रामस्थ एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. आबालवृद्धांचा सहभाग त्यात असतो. १५० ते २०० जण काल्याचा महाप्रसाद घेतात. श्रावण कृष्ण षष्ठी ते अष्टमी या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवाची लळिताच्या कीर्तनानंतर सांगता होते. गावातून मुंबई-पुण्यात गेलेले, तसेच नोकरीत उच्च पदे मिळविलेले लोकही उत्सवासाठी आवर्जून येतात, ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट,’ असे बेहेरे सांगतात.

त्यामुळेच या उत्सवाची गोडी काही निराळीच आहे.

(या उत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण गोफ, तसेच टिपऱ्यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सुकास डोर्लेकर st वाहक गावडे आंबेरे About 166 Days ago
मस्त , तुम्ही ही जी पारंपारीका जपताय त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत ।। खरच तूमच्या ह्या कार्याला माझा मानाचा मुजरा ।।। 👍👍👍👍
0
0
Shilpa hadap About 166 Days ago
Wa!!! Lekh farach chan aahe. Eekadam vegali mahiti. Navinyapurna aani parampara kasha suru hotat hyache uttam udhaharan asalela lekh.
0
0
Nitin hadap About 166 Days ago
uttam lekha. Best Video
0
0
मकरंद पटवर्धन About 167 Days ago
गाेफ विणायचा हा खेळ पाहायला खूपच छान वाटला. उत्सवाची परंपरा एवढे वर्षे जपली अाहे, याबद्दल मंडळाचे अभिनंदन. गाेपालकृष्ण महाराज की जय
0
1
Tejal Chaphekar About 167 Days ago
मी आले होते ऊत्सवाला त्याची आठवण झाली. खुप छान असते सगळे
0
0

Select Language
Share Link