Next
मुंबईतील पर्यटन : हायकोर्ट परिसर
BOI
Saturday, September 07, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मुंबई उच्च न्यायालय

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण हुतात्मा चौकाच्या आसपासचा परिसर बघितला. आजच्या भागात पाहू या मुंबई उच्च न्यायालय परिसरातील ठिकाणे. 
.........
न्यायदेवतेचा पुतळामुंबई उच्च न्यायालय : २६ जून १८६२ रोजी राणी व्हिक्टोरियाच्या पत्राद्वारे भारतातील तीन शहरांमध्ये उच्च न्यायालये स्थापन करण्यात आली. त्यामध्ये मुंबई येथे एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. हे भारताच्या सर्वांत जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे. या इमारतीची कोनशिला एप्रिल १८७१मध्ये बसविण्यात आली व इमारतीचे बांधकाम १८७८मध्ये पूर्ण झाले. कोर्टाच्या इमारतीचे संकल्पचित्र लेफ्टनंट कर्नल जॉन ऑगस्टस (ब्रिटिश अभियंता) यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात पहिले सत्र जानेवारी १८७९मध्ये सुरू झाले. या न्यायालयाचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, दीव-दमण हे आहे. गॉथिक आर्किटेक्चरल शैलीनुसार बांधलेली ही इमारत ५६२ फूट लांब आणि १८९ फूट रुंद आहे. मध्यभागी एक उंच मनोरा आहे. पश्चिमेस दोन अष्टकोनी मनोरे आहेत. 

मुंबई हायकोर्टाच्या इमारतीच्या वरच्या बाजूस न्यायदेवतेचा पुतळा बसविला आहे. तळमजल्यासहित चारमजली इमारतीचे क्षेत्रफळ ८० हजार चौरस फूट आहे. संपूर्ण घडीव पाषाणामध्ये ही इमारत बांधलेली आहे. 

मुंबई विद्यापीठ ग्रंथालय

मुंबई विद्यापीठ :
इ. स. १८५७मध्ये मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना झाली. सर चार्ल्स वुडच्या इ. स. १८५४च्या शिक्षणविषयक परिपत्रकानुसर डॉ. जॉन विल्सन यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. सध्या मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या सांताक्रूझ विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवी, पदविकांचे आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. 

विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय असून, त्याला जवाहरलाल नेहरू ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात साडेआठ लाखांहून अधिक पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे. सन १९९६पर्यंत हे विद्यापीठ ‘युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे’ म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली बॉम्बे शहराचे नाव बदलून ‘मुंबई’ असे करण्यात आले. चार सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या राजपत्रानुसार बॉम्बे विद्यापीठाचे नामकरण ‘मुंबई विद्यापीठ’ असे करण्यात आले. विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. 

राजाबाई क्लॉक टॉवर

या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा राजाबाई टॉवर आहे. ब्रिटिश आर्किटेक्ट सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी या इमारतीचे संकल्पचित्र तयार केले होते. यासाठी १३व्या शतकातील फ्रेंच गॉथिक शैली वापरण्यात आली आहे. विशेष म्हणजे आर्किटेक्ट स्कॉट भारतात कधीच आलले नव्हते. आपल्या लंडनच्या कार्यालयात बसून त्यांनी तपशीलवार डिझाइन्स पाठवली होती. डिझाइन्स आल्यानंतर विद्यापीठासाठी एक भूखंड देण्यात आला. ही जागा किल्ल्याच्या भिंतीच्या बाहेर असल्यामुळे भरपूर मोकळी जागा उपलब्ध झाली. 

राजाबाई क्लॉक टॉवरचे काम सुरू असताना..

राजाबाई क्लॉक टॉवर :
मुंबई उच्च न्यायालयाच्या दक्षिण बाजूस लागून मुंबई विद्यापीठ परिसरातच हा उंच मनोरा आहे. याची उंची ८५ मीटर (२८० फूट) असून, याचे संकल्पचित्र सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी केले होते. लंडनमधील ‘बिग बेन’सारखी याची रचना आहे. याचा वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. एक मार्च १८६९ रोजी याचे बांधकाम सुरू झाले आणि १८७८मध्ये ते पूर्ण झाले. त्या काळी याला साडेपाच लाख रुपये खर्च आला होता. त्यासाठी मुंबई शेअर बाजाराची स्थापना करणारे प्रेमचंद रॉयचंद यांनी देणगी दिली होती. त्यांच्या आईचे नाव या टॉवरला देण्यात आले. प्रेमचंद रॉयचंद यांची आई अंध होती आणि जैन धर्माच्या प्रथेप्रमाणे रात्रीचे जेवण संध्याकाळच्या आधी घेतले पाहिजे असा त्यांचा दंडक होता. किती वाजले हे त्यांना टॉवरवर बसविलेल्या घड्याळाच्या ठोक्यांवरून काळत असे. आज यातील घड्याळ फक्त तासाला टोल देते; पण पूर्वी ‘बिग बेन’सारखेच सूर यातून येत असत. घड्याळाला तीन टन वजनाच्या १६ घंटा होत्या. या घंटा इंग्लंडमधून आयात केल्या गेल्या होत्या. सुरुवातीला अनेक प्रकारची सुरावट ऐकू येईल अशी रचना होती; मात्र आता ती व्यवस्था अस्तित्वात नाही. काही लोकांनी आत्महत्या करण्यासाठी या मनोऱ्याचा वापर केल्याने तो आता बंद करण्यात आला आहे. 

मुंबई शहर व नागरी सत्र न्यायालय

मुंबई शहर व नागरी सत्र न्यायालय :
मुंबई विद्यापपीठाच्या दक्षिण बाजूला मुंबई नगर दिवाणी कोर्ट आहे. ही इमारतही जुन्या गॉथिक शैलीनुसार बांधलेली आहे. तसेच याला लागूनच जुने सचिवालयही आहे. या इमारतीमध्ये ग्राहक न्यायालय, कोकण आयुक्त, सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण (एमआरटी), होमगार्ड यांसह महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. 

ओव्हल मैदान : अगदी नावाप्रमाणेच लंबगोलाकृती असलेले हे मैदान आहे. पूर्वी असलेल्या किल्ल्याची तटबंदी पडल्यावर तटबंदीच्या जागेत भराव टाकण्यात आला आणि त्यानंतर उरलेल्या मोकळ्या भागात आजचे ‘ओव्हल मैदान’ अस्तित्वात आले. ब्रिटिश काळापासून आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी येथे आपली उत्तम खेळी केलेली आहे. या मैदानाला जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मैदानाचे क्षेत्र २२ एकर एवढे मोठे आहे. मैदानामुळे आसपासच्या भागाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मुंबई हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर, इरॉस चित्रपटगृह अशा सुंदर इमारतींची पार्श्वभूमी या मैदानाला आहे. हे बहुउद्देशीय मैदान आहे. मैदान मुख्यतः फुटबॉल, क्रिकेट आणि इतर खेळांचे सामने आयोजित करण्यासाठी वापरले जात होते. हे मुंबईतील सर्वांत जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. ते प्रामुख्याने मुंबईच्या प्रतिष्ठित डॉ. एचडी कंगा मेमोरियल क्रिकेट लीगसाठी वापरले जाते. 

ब्रेबॉर्न स्टेडियम

ब्रेबॉर्न स्टेडिअम :
‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’च्या मालकीचे हे मैदान १९३७मध्ये बांधण्यात आले. १९४८ ते १९७२ या दरम्यान येथे क्रिकेटचे क्सोटी सामने खेळविले गेले होते. तत्कालीन बॉम्बे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्यामुळे १८ एकर जमीन मैदानासाठी फक्त १३ रुपये चौरस यार्ड या दराने उपलब्ध झाली. त्यामुळे या मैदानाचे नावही ब्रेबॉर्न स्टेडिअम असे ठेवण्यात आले. सुरुवातीला मैदानाचा उद्देश ३५ हजार प्रेक्षकक्षमता व टेनिस कोर्ट आणि एक जलतरण तलाव बांधण्याचा होता. मेसर्स ग्रेगसन, बॅटले आणि किंग यांची याचे आर्किटेक्ट म्हणून नेमणूक केली गेली आणि शापूरजी पाल्लनजी अँड कंपनी यांना बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी २२ मे १९३६ रोजी पायाभरणी केली. पहिला सामना ऑक्टोबर १९३७मध्ये सीसीआय आणि स्पेन्सर कप इलेव्हन यांच्यात अपूर्ण असलेल्या मैदानावर खेळला गेला होता. मैदान पूर्ण झाल्यावर बॉम्बे पेंटॅंगुलर स्पर्धा बॉम्बे जिमखान्यातून ब्रेबॉर्न येथे हलविण्यात आली. जागतिक वारसास्थळामध्ये याचा समावेश झाला आहे. येथे पहिली कसोटी भारत वि. वेस्ट इंडीज – नऊ ते १३ डिसेंबर १९४८ या कालावधीत व शेवटची कसोटी भारत वि. इंग्लंड – सहा ते ११ फेब्रुवारी १९७३ या कालावधीत खेळविली गेली. त्यानंतर सामने वानखेडे स्टेडिअमवर खेळविले जाऊ लागले. हे स्टेडिअम चर्चगेटपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. 

मंत्रालय

मंत्रालय :
मादाम काम रोडवर उत्तर बाजूला मंत्रालयाची सात मजली भव्य वास्तू उभी आहे. या भारदस्त इमारतीचे बांधकाम १९५५मध्ये पूर्ण झाले. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांचे कामकाज चालते. खातेनिहाय सर्व मंत्र्यांची कार्यालये येथे आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार येथूनच चालतो. पूर्वी या इमारतीला सचिवालय म्हणत असत. १९७२नंतर या इमारतीस मंत्रालय असे नाव देण्यात आले. इमारत कमी पडू लागल्यावर काही विभाग समोरील प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्यात आले. मंत्रालयात प्रवेश करणे म्हणजे चक्रव्यूहात प्रवेश केल्यासारखे वाटते. तथापि येथे दिशादर्शक व विभागावर सूची असल्याने फारसा त्रास होत नाही. प्रवेशपत्रिका असल्याशिवाय आत सहजासहजी प्रवेश मिळत नाही. 

पंडित नेहरूंचा मंत्रालयाजवळील पुतळामंत्रालयाच्या पश्चिमेला अर्धवर्तुळात पंडित नेहरू व जमशेटजी टाटा यांचे पुतळे आहेत. उत्तर पश्चिम कोपऱ्यात एलआयसी मुख्यालयाची इमारत आहे. 

कसे जाल मुंबई हायकोर्ट परिसरात?
या परिसरात चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून जाता येते. मुंबईतील कोणत्याही भागातून येथे बेस्टच्या बसेस उपलब्ध आहेत. तसेच टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search