Next
अन् त्याने सारं जिंकून घेतलं..
BOI
Saturday, February 10, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

पिस्सू टॉप

मी डोळे मिटून बसलो असताना तीन उत्तर भारतीय तेथे येऊन बसले. त्यांच्यापैकी एकजण इतर दोघांना या जागेला पिस्सू टॉप नाव का पडलं, त्याची धार्मिक कथा सांगत होता. डोळे मिटून जे कानी पडत होतं, ते मी ग्रहण करत होतो. इथे एके काळी राक्षस आणि देवांमध्ये युद्ध झालं होतं. देवांनी, इंद्राने येथे राक्षसांचा पाडाव केला, त्यांची हाडं इथे टाकली. त्या हाडांचे नंतर दगडात रूपांतर झाले... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा पंधरावा भाग..
...................................
हातातली एक लाठी तिथेच टाकून देणं खूप मोठी गोष्ट होती, पण सुरुवातीलाच मला खूप थकवा आला होता. लेदरचं जॅकेट सांभाळत दोन पाचफुटी काड्या सांभाळणं कठीण जात होतं. रोरावणाऱ्या नदीच्या काठी एका मोठ्या शिळेवर थोडा वेळ बसलो. बरीच तरुण मंडळी तिथे फोटो काढत होती. डीएसएलआर कॅमेरा ट्रायपॉडसोबत सर्व कीट त्यांच्याकडे उपलब्ध होती. त्यांना पाहून मी विचार करू लागलो; हे लोक इतकं वजनदार सामान वर कसं नेणार.. सुरुवातीचा हा उत्साह ओसरल्यावर त्यांना पश्चाताप होईल.
 
मी उठलो, शिळेवरंच काठी ठेऊन दिली आणि चालायला लागलो. तेवढयात समोर एक मध्यमवयीन बाई चालताना दिसली. तिच्या हातात काठी नव्हती. मी परत वेगाने मागे गेलो, शिळेवर माझी काठी तशीच उन्हात पहुडली होती. तिला घेऊन पुन्हा वेगात समोर गेलो. माझी काठी त्या बाईला दिली. तिने धन्यवाद म्हटलं. माझा पिस्सू टॉपकडे प्रवास सुरू झाला. तो आला, त्याने माझ्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो जिंकला.

ज्याची भीतीने वाट पाहणं सुरू होतं, ज्याचा दरारा कानोकानी ऐकला होता, चप्पे चप्पे पे उसके डर की कहानी सुनी हुई थी, उसके दर पे मैं आ पहुचा था! पिसू टॉपची लढाई.. चढाई सुरू झाली होती. उंच पर्वत समोर होता. त्याच्या अंगावर खांद्यावर नागमोडी वळणं घेत पायवाटेने चालत जायचं होतं. उंचावर दृष्टी टाकली की मुंग्या मुंगळ्यासारखे लोक उंच वळणावर सरकताना दिसत होते. चार किलोमीटरची ही सरळ एकशे ऐंशी अंशातली चढाईची लढाई अनेकांचा दम काढते हे ऐकलं होतं. पण तोवर मी इतकं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. शेवटी जोवर स्वतः अनुभव घेत नाही, तोवर लोक सुधारत नसतात. मी ही त्यातलाच एक होतो.

एक एक पाऊल टाकत पुढे चालू लागलो. घोडेवाले शेजारून जात होते. खूप मोठा पर्वत, मोठा आकार, क्षेत्रफळ असलेला तो हिमालयाचा एक डोंगर. त्याच्या अंगावरून नागमोडी कच्चा रस्ता तयार केला होता. त्यावरून डोंगर माथ्यावर जायचं होतं. माथ्यापलिकडचा रस्ता शेषनागकडे जात होता.., पण सुरुवातीला या अवाढव्य, अक्राळविक्राळ पिस्सू टॉपला सर करणं गरजेचं होतं. मला थोड्याच वेळात खूप दम लागला. मी नागमोडी रस्त्याने चालत होतो. त्यामुळे वेळ लागत होता. पण तेच योग्य होतं. कारण आमिष समोरच होतं. ते म्हणजे नागमोडी पूर्ण रस्त्यावरून वर वर जाण्यापेक्षा सरळ एकशे ऐंशी अंशाने दगडावरून ‘क्लाइम्ब’ करून वर जाणं. यामुळे लॉंग कट हा कट होऊन शॉर्टकट मिळत होता. पण यात धोका होता. दोन रस्त्यांना वरून जोडताना दगडं तारांच्या कुंपणाने बांधलं होतं. त्यावरून जाणं म्हणजे धोका; पण कितीही चालत गेलो तरीही रस्ता काही संपतच नव्हता! वर दृष्टी टाकली की नागमोडी रस्ता दिसायचाच. त्यावरून लोक चालताना, घोडे, खेचर चालताना दिसायचे. वर निळंशार आकाश, मध्येच एखादा पांढरा ढग ब्रिटनच्या राणीच्या मुकुटासारखा डोंगराच्या शिखरावर स्थिरायचा. मी पोळ्यातील बैलासारखा, शहरातील सांडासारखा जोरजोरात नाकाने दम टाकत चालत होतो. काठीवर पूर्ण ताण होता. पण काठी पक्की होती. खालील टोकदार भाग जमिनीत रुतायचा त्यामुळे बॅलन्स टिकवता यायचा. मी एका ठिकाणी दम घ्यायला बसलो. डोळे मिटून जोरजोरात धापा टाकत होतो. जवळील बाटलीतून तीन घोट पाणी प्यायलो. जास्त पाणी पिणे म्हणजे पोट दुखावून घेणे. आतड्यांना त्रास.

अभिजित पानसेमी डोळे मिटून बसलो असताना तीन उत्तर भारतीय तेथे येऊन बसले. त्यांच्यापैकी एकजण इतर दोघांना या जागेला पिस्सू टॉप नाव का पडलं, त्याची धार्मिक कथा सांगत होता. डोळे मिटून जे कानी पडत होतं, ते मी ग्रहण करत होतो. त्याने सांगितलं येथे एके काळी राक्षस आणि देवांमध्ये युद्ध झालं होतं. देवांनी, इंद्राने येथे राक्षसांचा पाडाव केला, त्यांची हाडं इथे टाकली. त्या हाडांचे नंतर दगडात रूपांतर झाले. त्यामुळे इथे खूप दगडं आहेत.
 
भारतात सगळीकडेच तीर्थक्षेत्र, पर्वत यांच्यामागे अशा धार्मिक कथा-दंतकथा जोडलेल्या असतातच. ‘सीतेची नहाणी’ तर संपूर्ण भारतात सापडतेच! पिस्सू टॉपला खूप दगडं आहेत. ते पक्के नाहीत. अस्थिर आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. सतत सावध असावं लागतं. मी डोळे मिटून वारा, हवा, सूर्यप्रकाश, लोकांचा आवाज, निसर्ग  ग्रहण करत होतो. पण पुढे जायचं होतं. इथे अडकून राहणं योग्य नव्हतं. मी उठलो पण त्या एका आमिषाला बळी पडलो आणि ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. त्या एका चुकेने मी मृत्युच्या जबड्यात सापडलो. मी जी चूक केली ती खरं तर कोणीही करू नये.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link