Next
सोने तारण पीक कर्ज
BOI
Saturday, October 13, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

बहुतांश शेतकरी आपल्याकडील जमेल तशी शिल्लक रक्कम सोन्यात गुंतवत असल्याचे दिसून येते. अशा गुंतवणुकीतून व्याज अथवा लाभांश स्वरूपात परतावा मिळत नसला, तरी आजही ग्रामीण भागात सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. काही अंशी ते खरेही आहे. असे थोडे थोडे करून जमविलेले सोने शेतकऱ्याला प्रसंगी कर्ज घेण्यासाठी उपयोगी पडू शकते. या सोने तारण पीक कर्जयोजनेबाबत अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
.......
विशेषत: शेतकऱ्यांना कृषी हंगामानुसार पिकांसाठी अल्प मुदतीचे कर्ज घेण्याची गरज पडते व असे कर्ज सहज व त्वरित मिळणे आवश्यक असते. शेतकऱ्याकडे काही प्रमाणात सोने असते, ही बाब विचारात घेऊन बँका आता शेतकऱ्यांना सोने तारणावर कर्ज सहजरीत्या व त्वरित देऊ लागल्या आहेत. कोणाही शेतकऱ्यास आता त्याच्याकडील असलेल्या तारणावर पीक कर्ज सहज व त्वरित मिळू शकते. 

त्यासाठीच्या प्रमुख अटी खालीलप्रमाणे असतात.
- स्वत:ची शेती असणे आवश्यक.(सात-बारा उतारा स्वत:च्या नावे असणे आवश्यक.)
- सोने बँकेच्या ताब्यात ठेवावे लागते. याला प्लेज असे म्हणतात.
- मिळणारे कर्ज चोख सोन्याच्या वजनावर अवलंबून असते व यासाठी बँकेच्या मान्यताप्राप्त सराफाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.

मिळणारे पीक कर्ज संबंधित पिकास एकरी किती कर्ज देणे आवश्यक आहे, लागवडीखालील एकूण क्षेत्र, शेतकरी तारण म्हणून देऊ करत असलेले सोने याचा एकत्रित विचार करून दिले जाते. तारण म्हणून देऊ केलेल्या सोन्याच्या बाजारभावानुसार होणाऱ्या किमतीच्या जास्तीत जास्त ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते; मात्र ही मर्यादा संबंधित बँकेच्या धोरणानुसार कमीही असू शकते. याला एलटीव्ही (लोन टू व्हॅल्यू) असे म्हणतात.

व्याज दर : तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सबव्हेंशन कालावधीसाठी प्रती वर्षी सात टक्के व्याजदर असतो. त्यानंतर तो ९.५ टक्के इतका असतो. तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जासाठी व्याजदर ९.५ टक्के इतका असतो.

इंटरेस्ट सबव्हेंशन : या सवलतीचा लाभ मिळण्यासाठी घेण्यात येणारे पीक कर्ज संबंधित पिकासाठी एकरी असलेल्या ‘स्केल ऑफ फायनान्स’नुसारच असावे लागते; तसेच ज्या पिकासाठी कर्ज घेतले आहे, त्याच पिकासाठी त्याचा विनियोग होणे आवश्यक असते. अन्य कारणासाठी कर्ज रकमेचा वापर केल्यास ही सुविधा मिळण्यास कर्जदार शेतकरी पात्र होत नाही. मिळणारे कर्ज डिमांड लोन किंवा कॅश क्रेडिट/ ओव्हरड्राफ्ट पद्धतीने घेता येते.

परतफेड : डिमांड लोन पद्धतीने कर्ज घेतल्यास, कर्ज रक्कम अदा झाल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत परतफेड करवी लागते. कॅश क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट पद्धतीने कर्ज घेतले असेल, तर कर्जाचे नूतनीकरण एका वर्षाने करावे लागते.

कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :
- संबंधित बँकेच्या सोने तारण कर्जासाठीचा विहित नमुन्यातील फॉर्म योग्य रीतीने भरून देणे आवश्यक असते.
- वरील फॉर्मसोबत कर्जदाराचा नुकताच काढलेला फोटो, पॅन कार्ड, आधारकार्ड जोडणे आवश्यक असते.
- अर्जदाराच्या नावावर असलेला ‘सात-बारा’चा उतारा (नुकताच काढलेला)
- ज्या पिकासाठी कर्ज घ्यावयाचे आहे, त्याचा तपशील व येणाऱ्या खर्चाचा उल्लेख (यात बी- बियाणे, खते व अन्य आनुषंगिक खर्चाचा तपशील असावा लागतो.
- विशेष म्हणजे इंटरेस्ट सबव्हेंशन योजनेमुळे कर्जदार हे कर्ज मुदतीच्या आता व्याजासहित चुकते करत असेल, तर त्याला व्याजात तीन टक्के सूट दिली जाते. परिणामत: केवळ चार टक्के इतक्या नाममात्र व्याजाने कर्ज मिळते. केंद्र सरकारतर्फे कर्ज देणाऱ्या बँकेससुद्धा दोन टक्के व्याजदरानुसार साह्य केले जाते.
सोनेतारण असल्याने बँकासुद्धा कर्ज देताना निश्चिंत असतात. 

अल्प व मध्यम भूधारकांना या योजनेमुळे अत्यंत अल्प व्याजाने सोने तारणावर सहज व त्वरित कर्ज मिळू शकत असल्याने लहान शेतकऱ्यांचा यातून नक्की फायदाच होणार आहे. गरज आहे ती शेतकऱ्यांपर्यंत ही योजना नेण्याची.


- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी  प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 171 Days ago
Hope , somebody finds a way . The sooner the better .o
1
0

Select Language
Share Link
 
Search