Next
तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण परत केले; कचरावेचक महिलेचा सत्कार
प्रामाणिकपणाच्या कौतुकासाठी ‘के अँड क्यू’ परिवाराचा उपक्रम
अमोल आगवेकर
Friday, May 17, 2019 | 03:08 PM
15 0 0
Share this article:पुणे :
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तऱ्हेतऱ्हेच्या बातम्यांचा अक्षरशः प्रवाहच सुरू आहे. कचरावेचक महिलेला सापडलेला सोन्याचा दागिना तिने प्रामाणिकपणे परत करण्याच्या घटनेची बातमी या गदारोळात नक्कीच विरून जाऊ शकते; पण ‘के अँड क्यू’ या पुण्यातील व्यावसायिकांच्या परिवाराने मात्र या धामधुमीतही या बातमीकडे दुर्लक्ष न करता संबंधित प्रामाणिक व्यक्तीचा सत्कार करून तिला शाबासकी दिली. लांडी-लबाडी व चोऱ्यामाऱ्यांच्या बातम्या कानावर येण्याचे प्रमाण वाढत असताना प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे निदर्शक असलेली अशी बातमी सकारात्मकतेचे इंधन ठरते. 

पुण्यातील प्रभाग क्रमांक १५मध्ये स्वच्छतादूत म्हणून काम करणाऱ्या स्वाती गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कचरा वेचताना सोन्याचे एक गंठण सापडले. ते साधारण तीन तोळ्यांचे होते. त्याची बाजारातील किंमत सुमारे एक लाख रुपये होती. स्वाती यांनी तातडीने ते गंठण ज्यांचे होते, त्यांना परत केले. पुणे महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या ‘स्वच्छ’ या संस्थेसाठी स्वाती व त्यांचे पती औदुंबर गायकवाड हे कचरावेचक म्हणून काम करतात. स्वाती चौथी आणि औदुंबर दहावीपर्यंत शिकले आहेत.

त्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेऊन ‘के अँड क्यू’ या पुण्यातील व्यापाऱ्यांच्या परिवाराने स्वाती व त्यांचे पती औदुंबर यांचा एका छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. परिवाराच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात स्वाती यांना साडी, ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात आली. या वेळी ‘स्वच्छ’ संस्थेच्या शुचिष्मिता, प्रभाग क्रमांक १५मधील प्रमुख नमिता इंगळे व परिवाराचे अनेक सदस्य उपस्थित होते. स्वाती म्हणाल्या, ‘आम्ही रोज घरोघरी कचरा वेचायला जातो. त्यामुळे बहुतेक जण ओळखीचे आहेत. सगळे जण आम्हाला घरातल्यासारखीच वागणूक देतात. त्या दिवशी मी कचऱ्याच्या डब्यातील कचरा वेचताना मला सोन्याचे गंठण सापडले. मनात एवढाच विचार आला, की हे आपले नाही. ज्याचे आहे त्याला परत देऊ. त्या मॅडमना गंठण परत केले. त्याची माहिती नमिताताईंना दिली. नंतर याची बातमी टीव्हीवर दिसल्यावर माझ्या तीन मुलांना खूप आनंद झाला. ‘आमचे आईबाबा टीव्हीवर दिसतायत,’ असे त्यांनी अभिमानाने सगळ्यांना सांगितले. मलाही आनंद वाटला.’

औदुंबर म्हणाले, ‘अनेक वर्षे आम्ही काम करत आहोत. त्यात कधीही कुणाचे चार पैसे घेतले नाहीत. त्यामुळे सोन्याचे गंठण पाहूनही ते परत करण्याचाच विचार मनात आला. दुसऱ्याची वस्तू घेण्याचा मोह आम्हाला झाला नाही. ती वस्तू परत केल्यानंतर आता अनेकांकडून आमचे सत्कार होत आहेत. आमच्या मुलांनाही त्याचा अभिमान वाटत आहे, हेच आमच्यासाठी मोलाचे आहे. ‘के अँड क्यू’ परिवाराने केलेल्या सत्कारामुळे भविष्यात असेच काम करण्याचे बळ आम्हाला मिळाले आहे.’
परिवाराचे पंकज मानधने यांनी आपले विचार मांडले. 

‘के अँड क्यू परिवारात पुण्यातील अनेक व्यावसायिक आहेत. १७ मे हा आमच्या परिवाराचा वर्धापनदिन असतो. त्यानिमित्त आम्ही स्वाती व औदुंबर गायकवाड यांचा सत्कार केला. सकारात्मक गोष्टींचे कौतुक करणे सध्या अत्यंत गरजेचे आहे. त्यातून पुन्हा असे वागण्यासाठी त्या व्यक्तीला बळ मिळते आणि आपल्या सगळ्यांनाही तसे प्रामाणिकपणे वागण्याची प्रेरणा मिळते,’ असे सत्येंद्र राठी यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search