पुणे : वायअॅँडएम अंजूमन खैरूल इस्लामच्या पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अॅंड कॉमर्स यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. २० देशांतील ३०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
या परिषदेत २०० लेखकांनी लिहिलेल्या १४६ शोधपत्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही शोध पत्रे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या (युजीसी) यादीतील ५.५ सूचिबद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल ‘अंजांता’मध्ये प्रकाशित केली गेली आहेत. आठ खंडात प्रकाशित झालेल्या या जर्नलचे प्रकाशनदेखील या परिषदेत करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे क्वॉलिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅमच्या सहकार्याने कॉमर्स पोस्टग्रॅज्युएट अँड रिसर्च सेंटरद्वारे आयोजित ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद सेमिनार हॉलमध्ये झाली. ‘न्यू ट्रेंडस् इन कॉमर्स, इकॉनॉमिक्स, बँकींग, कोऑपरेशन, मॅनेजमेंट, कॉम्पुटर सायन्स, आयटी अॅंड एन्हार्यनमेंट’ हा परिषदेचा विषय होता.
कॉमर्स अॅंड रिसर्च सेंटर विभागप्रमुख डॉ. आब्बास लोखंडवाला, नसरीन परवेज खान आणि वाफीया वाहिद यांनी परिषदेचे संयोजन केले. आयेशा काडीवाल आणि फैजा शेख यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आफताब अन्वर शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि प्रतिनिधींचे स्वागत करतानाच परिषदेचे महत्त्व आणि स्वरूप स्पष्ट केले.
वाणिज्य, अर्थशास्त्र, बँकिंग, सहकार, व्यवस्थापन, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रांतील सर्वांत प्रभावी आणि प्रचलित ट्रेंडचा आढावा घेणे, सर्वोत्तम पद्धतींचा सखोल अभ्यास करणे, तसेच २० देशांतील तज्ञ आणि प्रतिनिधींना एकत्र आणणे या प्रमुख हेतूने ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेत सहभागी देशांमध्ये ऑस्ट्रिया, जर्मनी, युनायटेड किंग्डम, थायलँड, रिपब्लिक ऑफ चाड, कॅमरून, दक्षिण आफ्रिका, आयव्हरी कोस्ट, तुर्कमानिस्तान, नायजेरिया, झांबिया, मोझांबिक, येमेन, बहरीन, श्रीलंका, रवांडा, इराक, इराण, अफगाणिस्तान या देशांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बँकॉकच्या थाई-नीचि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे वनिडा वडीचारोइन म्हणाले, ‘ही परिषद विविध देशांना त्यांचे अनुभव आणि सवोत्तम पद्धती यांची देवाणघेवाण करण्यासाठी सक्षम ठरेल.’
या वेळी श्रीलंकेतील केलॅनिया विद्यापीठाचे मार्केटिंग मॅनेजमेंट विभाग डॉ. रवींद्र डिसानायके, रूवांडा रेनेसान्सचे अध्यक्ष क्लेरन्स फर्नांडीस, चित्राल बेनिल्डस फर्नांडो (श्रीलंका), केलॅनिया विद्यापीठाचे प्रा. मॅपा थिलकार्तने, देहरादूनच्या आयसीएफएआय बिझिनेस स्कूलचे डॉ. व्ही. एन. सक्सेना आदी मान्यवर उपस्थित होते.