Next
‘संगणकाच्या मराठीकरणासाठी प्रयत्न’
BOI
Thursday, March 01 | 10:30 AM
15 1 0
Share this story


राज्य सरकारची राज्य मराठी विकास संस्था नावाप्रमाणेच मराठी भाषेच्या विकासासाठी काम करते. मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर, या संस्थेबद्दल आणि प्रस्तावित उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी, या संस्थेचे संचालक आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉ. आनंद काटीकर यांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या मानसी मगरे यांनी घेतलेली ही मुलाखत...
................
मराठी राजभाषा दिनाबद्दल काय सांगाल?
- २७ फेब्रुवारी ही कुसुमाग्रजांची जयंती. या दिवशी संपूर्ण भारतभर मराठी गौरव दिन साजरा केला जातो. ज्या मराठी कवीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, ज्याचे नाव आकाशातील एका ताऱ्याला देण्यात आले आहे, अशा कवीचा जन्मदिन हा मराठी भाषेचा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो, ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र शासनाची ‘राज्य मराठी विकास संस्था’ मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करते. मराठी राजभाषा दिन साजरा करत असताना या संस्थेचा संचालक म्हणून काही उपक्रम सर्वांसमोर यावेत असं वाटतं. 

राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने मराठीसाठी सध्या प्रत्यक्ष राबवले जाणारे उपक्रम कोणते?
- राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. आजचं युग हे संगणकाचं युग आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आज संगणकाचा वापर करतात. परंतु असं असलं तरी अजूनही संगणकाचं पूर्णतः मराठीकरण झालेलं नाही. विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात मराठीचा वापर अजूनही युनिकोडमध्ये होत नाही. म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने युनिकोड असोसिएशनचं सदस्यत्व घेतलं आहे. त्यासाठी १२ हजार डॉलर वार्षिक शुल्क भरलं जातं. या निमित्तानं संगणकावर आणि आपल्या फोनवरही मराठीचा वापर जास्तीत जास्त कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संदेश पाठवताना किंवा चॅटिंग करताना आजकाल चित्रसंदेशांचा (इमोजी) जास्तीत जास्त वापर केलेला दिसतो. प्रत्येक भावनेसाठी एक चित्र उपलब्ध आहे आणि ते वापरले जाते. या चित्रसंदेशांमध्ये मराठी चित्रं समाविष्ट करता येतील का, असाही विचार सुरू आहे. यामध्ये गुढी-पाडवा, होळी, पुरणपोळी, कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र, दूध, मंदिर अशा परंपरादर्शक चित्रांचा समावेश लवकरच या चित्रसंदेशांमध्ये करण्यात येणार आहे. सोबतच सध्या लिपीसंदर्भातल्या ज्या अडचणी आहेत, त्याही सोडवण्याचं काम सुरू आहे. 

दुसरा मुद्दा म्हणजे संगणकावर वापरली जाणारी साधनं खूप खर्चिक आहेत. यामुळे बऱ्याचदा मराठी टंक (फाँट) वापरले जात नाहीत. आज मराठी युनिकोडचे सुमारे ५० ते ६० टंक उपलब्ध आहेत, ज्यात किरकोळ बदल करून ते वापरले जाऊ शकतात. हे टंक पूर्णतः मोफत उपलब्ध आहेत. भाषेची गरज लक्षात घेता येत्या काही काळात ६० मराठी पूर्ण टंक उपलब्ध करून दिले जातील. ‘यशोमुद्रा’ नावाचा टंक याआधी तयार करण्यात आला आहे आणि त्याचा वापरही सुरू आहे. व्यावसायिक साधनांमध्ये कोरल ड्रॉ, फोटोशॉप अशा काही साधनांचा समावेश होतो. त्याला पर्यायी साधनं उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. विशेषतः व्यक्त आणि मुक्त साधनं (फ्री अँड ओपन सोर्सेस) उपलब्ध करून देण्यावरही संस्थेचा भर आहे. थोडक्यात, आगामी दोन वर्षांत संगणक संपूर्णपणे मराठी करता येईल, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. 

विकिपीडियावर मराठी लेखन वाढावं, यासाठी संस्थेतर्फे दर वर्षी २० ते २५ कार्यशाळा घेतल्या जातात. त्याला प्रतिसादही चांगला असतो. परिणामतः मागच्या वर्षभरात विकिपीडियावरील नोंदींमध्ये आठ ते दहा हजार पानांची वाढ झाली आहे. या धर्तीवर आणखी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे, तो म्हणजे ऑलिंपिक कोशाचा. पुढील ऑलिंपिक स्पर्धा टोकियोला होणार आहे. या ऑलिंपिकपूर्वी मराठीत ऑलिंपिकचा एक माहितीकोश तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीमध्ये एक संपादकीय मंडळ स्थापन करण्यात आलं असून, त्यांच्यामार्फत या उपक्रमाचं काम सुरू करण्यात आलं आहे. ऑलिंपिकची ही सगळी माहिती ई-बुक स्वरूपात असेल. जॉर्ज ग्रीअर्सनने स्वातंत्र्यापूर्वी एक भाषिक सर्वेक्षण केलं होतं. तसंच एक भाषिक सर्वेक्षण करण्याचं काम पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयाच्या सोबतीनं हाती घेण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचा भाषिक नकाशा तयार केला जाईल. या प्रकल्पाला आधुनिकतेची जोड देऊन हा उपक्रम साकारला जाणार आहे. दृक-श्राव्य तसेच ध्वनिमुद्रित स्वरूपात हा भाषिक नकाशा असणार आहे. महाराष्ट्रात मराठीची किती रूपं बोलली जातात हे या निमित्तानं समजू शकेल, ज्याचा भाषेच्या अभ्यासकांना खूप उपयोग होणार आहे. 

अमराठी वर्ग आणि अनुवाद या संदर्भात कोणते उपक्रम प्रस्तावित आहेत?
- शिक्षण, व्यवसाय, नोकरी या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात स्थलांतरं होत आहेत. यामुळे विविध भाषिक लोक महाराष्ट्रात येतात. या स्थलांतरित लोकांना मराठी बोलता यावं किंवा शिकता यावं यासाठी जर्मन, जापनीज या भाषांप्रमाणेच मराठीचा सहा पातळ्यांचा एक अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागानं यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातल्या दोन पातळ्यांची पुस्तकंही तयार झाली आहेत. लवकरच त्याचं संकेतस्थळही तयार करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे याची साधनं मुक्त आणि व्यक्त स्वरूपात उपलब्ध असतील. 

अनुवाद हाही भाषेच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे. व्यावसायिक स्तरावर भाषांतराचं काम करणाऱ्या काही कंपन्यांशी संपर्क साधला असता, सध्या भाषिक अनुवाद करणाऱ्या पिढीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर, पहिल्या टप्प्यात इंग्रजी ते मराठी भाषांतराचा तीन महिन्यांचा एक अभ्यासक्रम सुरू करण्याचं प्रयोजन संस्थेमार्फत करण्यात येत आहे. लवकरच हा भाषांतराचा अभ्यासक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहे. 

महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांचा कल आणि त्यांचा मराठी साहित्यातील सहभाग वाढवण्यासाठी काय उपक्रम राबवले जातात?
- ग्रहण, भाषण, वाचन आणि लेखन अशी चार प्रकारची भाषिक कौशल्यं मानली जातात. या चारही प्रकारांचा विकास करण्यासाठी विशेषतः महाविद्यालयीन पातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी भाषा शिकण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु तिथे त्यांना व्यावहारिकतेची जोड नाही. इतर राज्यांमध्ये मराठीसाठी होणाऱ्या कार्यासाठी मराठी आणि त्या ठिकाणची प्रादेशिक भाषा अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या लोकांची गरज निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य मराठी विकास संस्थेने पुढील वर्षीपासून ‘आंतरभारती शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्ती तीन वर्षांची असेल. यादरम्यान विद्यार्थ्याने कोणत्याही एका राज्यात जावं, एक वर्ष तिथली भाषा शिकावी, पुढील दोन वर्षांत त्या भाषेतून एमए करावं, असे अपेक्षित आहे. यादरम्यान त्याला भाषांतराची कामं दिली जातील आणि त्या दोन राज्यांमधील सेतू म्हणून हे विद्यार्थी काम करतील.  

पुस्तकांचे गाव, भिलार‘भिलार’ हे ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून घोषित केलं गेलं. त्याला असलेला प्रतिसाद, सद्यस्थिती आणि पुढील प्रयोजन याबाबत काय सांगाल?
- वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने मागील वर्षी राज्य शासनाच्या वतीने एक आगळावेगळा प्रयोग करण्यात आला. महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून विकसित केलं गेलं आहे. या ठिकाणी ३० घरं आहेत. या घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तकं उपलब्ध आहेत. कथा, कविता, कादंबरी, विज्ञान, पर्यावरण अशा अनेक विषयांवरील जवळपास १५ हजार पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. लोकांनी पर्यटक म्हणून इथं यावं, पुस्तकं हाताळावीत, दिवसभर ती वाचत तिथं बसावं असा उद्देश आहे. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी कसलंही शुल्क नाही. या घरांमध्ये बसण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. चहा, नाश्ता, जेवण हेदेखील त्या त्या घरांमध्ये किंवा बाहेर सशुल्क उपलब्ध आहे. विशेष म्हणजे महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांनी मधल्या दोन-तीन तासांच्या वेळात इथं यावं आणि या पुस्तकांच्या दुनियेचा भाग व्हावं, या उद्देशानेच या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. तिथे आता शाळा, महाविद्यालयांच्या सहली येत आहेत. यासाठी एक वेगळं शिस्तबद्ध नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, लोकांनी वाचावं, चिंतन, मनन करावं यासाठी हा खटाटोप आहे. नजीकच्या भविष्यकाळात हे पुस्तकांचं गाव आणखी विकसित करण्याचा मानस आहे. साधारण पुढच्या दोन-तीन वर्षांत हा प्रकल्प नवीन रूपात आणि आणखी समृद्धरीत्या लोकांसमोर येईल असे प्रयत्न सुरू आहेत.    

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.) 
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link