Next
११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस
सूर्यनमस्कारांच्या प्रसारासाठी वाहून घेतलेले रत्नागिरीचे विश्वनाथ बापट
अनिकेत कोनकर
Tuesday, February 12, 2019 | 04:02 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरीतील मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक दाखविताना विश्वनाथ बापट

रत्नागिरी :
वय वाढत जाते, तसा बँकबॅलन्स वाढत जावा, अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते. रत्नागिरीतील विश्वनाथ वासुदेव बापट यांची इच्छा मात्र थोडी वेगळी आहे... ती म्हणजे त्यांनी घातलेल्या सूर्यनमस्कारांची संख्या वाढण्याची आणि नियमितपणे सूर्यनमस्कार घालणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढण्याची... बापट यांनी आतापर्यंत घातलेल्या सूर्यनमस्कारांची संख्या १२ लाखांपर्यंत पोहोचली आहे... आणि वय सत्तरीच्या घरात असूनही या संख्येत दररोज भर पडतेच आहे. मुलांना सूर्यनमस्कार विनामूल्य शिकविण्याचे कामही ते गेली अनेक वर्षे करत आहेत. रथसप्तमी (१२ फेब्रुवारी २०१९) अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने या अवलियाशी संवाद साधल्यावर त्यांच्या या आगळ्यावेगळ्या व्रताची कहाणी जाणून घेता आली. 

साऱ्या विश्वाला तेज देणाऱ्या सूर्याची उपासना भारतीय संस्कृतीत सांगण्यात आली आहे. धार्मिकतेपेक्षाही त्याचे शारीरिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व फार मोठे आहे. संत रामदास स्वामी दररोज १२०० सूर्यनमस्कार घालायचे, ही गोष्ट सर्वांना माहिती आहेच. सूर्याच्या, शक्तीच्या त्या उपासनेमुळे प्राप्त झालेल्या बलदंड शरीराच्या जोरावर रामदास स्वामींनी देशभर प्रवास करून लोकांचे प्रबोधन केले आणि शरीरसाधनेचे महत्त्वही त्यांना प्रत्यक्ष आचरणातून पटवून दिले. या रामदास स्वामींचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विश्वनाथ बापट यांनी लहानपणापासूनच सूर्यनमस्कारांचे व्रत अंगी बाणवले आहे. विश्वनाथ यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही नित्यनेमाने सूर्यनमस्कार घालत असत. तोच वारसा विश्वनाथ यांनी आयुष्यभर जपला आहे.रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते हे विश्वनाथ यांचे गाव. लहान असताना त्यांनी रामदास स्वामींचे चित्र पाहून कुतुहलाने आजोबांकडे त्यांच्याविषयी चौकशी केली. त्या वेळी आजोबांनी त्यांना रामदास स्वामींबद्दल, तसेच त्यांच्या सूर्योपासनेबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. शिवाय, आजोबा आणि आपले वडील सूर्यनमस्कार घालत असल्याचे ते पाहत होतेच. त्यातूनच प्रेरणा घेऊन विश्वनाथ यांनी लहानपणापासूनच नित्यनेमाने सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. 

पाचवीपासून ते शिकण्यासाठी डोंबिवलीत गेले. सहावीत असताना सूर्यनमस्कारांच्या एका स्पर्धेत भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. नावनोंदणीची मुदत उलटून गेली होती; मात्र विश्वनाथ दररोज सूर्यनमस्कार घालत असल्याचे माहिती असल्याने त्यांचे नाव घेतले गेले. सूर्यनमस्कार उत्तम पद्धतीने घालत असल्यामुळे त्या स्पर्धेत त्यांचा पहिला क्रमांक आला. त्यामुळे त्यांच्या या चांगल्या सवयीला अधिक प्रोत्साहन मिळाले.त्या काळी ११वी एसएससी होती. ती उत्तीर्ण झाल्यानंतर १९६८ साली ते पुन्हा रत्नागिरीत परतले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये शिकत असताना हॉस्टेलवर राहतानाही त्यांनी सूर्यनमस्कारांची सवय मोडली नाही. डोंबिवलीतील दूषित पाण्यामुळे एकदा त्यांना कावीळ झाली होती तेव्हा आणि एकदा ४५ दिवस विचित्र तीव्र डोकेदुखीमुळे आजारी होते तेव्हा, अशा दोनच वेळा त्यांच्या सूर्यनमस्कारांच्या या व्रतात खंड पडला. एरव्ही हे व्रत अखंडपणे सुरू आहे. 

‘संगमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणापासून आमचे कळंबस्ते हे गाव ११ किलोमीटर. आमच्या घरी दुकान होते. तसेच दुधाचा व्यवसायही सुरू केला होता. पावसाळ्यात वाटेतील पऱ्ह्यांना (पाण्याचे ओहोळ) भरपूर पाणी असल्याने सायकलने जाणे अवघड होई. त्या वेळी मी दिवसातून दोन वेळा संगमेश्वरला चालत जाऊन येई. शिवाय त्या वेळी मी दररोज १२० सूर्यनमस्कार घालत असे. काही तरी कामामुळे एके दिवशी सकाळी मी ३० सूर्यनमस्कार घालून बाहेर पडलो. दिवसभर कामामुळे सूर्यनमस्कार घालणे शक्य झाले नाही. तेव्हा मी राहिलेले ९० सूर्यनमस्कार घरी आल्यानंतर रात्री १२ वाजता घातले होते. सूर्यनमस्कारांची वेळ चुकल्याचा तेवढा एकच प्रसंग मला आठवतो आहे,’ अशी एक फार जुनी आठवण विश्वनाथ यांनी सांगितली. 

बीएस्सी झाल्यानंतर काही काळ त्यांनी बांधकाम व्यावसायिकांकडे नोकरी केली. नंतर काही काळाने ते रत्नागिरीतील ऑक्टेल कंपनीत रुजू झाले. त्या वेळी त्यांना शिफ्ट ड्युटी असे. त्यामुळे वेळापत्रक सतत बदलते राही. तरीही सूर्यनमस्कारांना त्यांनी फाटा दिला नाही. शाळेतील मुलांवर संस्कार
विश्वनाथ बापट लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचे. पुढे मोठे झाल्यावर ते नोकरी सांभाळून संघाचे कामही करू लागले. १९८६-८७च्या दरम्यान ते रत्नागिरी तालुक्याचे कार्यवाह झाले. त्यामुळे त्यांना तालुक्यातील गावे पादाक्रांत करावी लागायची. त्या कामासाठी जाता जाता त्यांनी गावागावांतील शाळांमध्ये जायला सुरुवात केली. त्यामागचा एकमेव उद्देश होता तो म्हणजे लहान मुलांना सूर्यनमस्कारांचे बाळकडू पाजण्याचा. स्वतः लहानपणापासून सूर्यनमस्कार घालत असल्याने त्यांचे महत्त्व पुढच्या पिढीला समजावणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्याशिवाय आणखी कोणाला कळणार?

या पद्धतीने रत्नागिरी तालुक्यातील बहुतेकशा शाळांमध्ये त्यांनी सूर्यनमस्कारांचे प्रशिक्षण दिले. त्याशिवाय काही कामासाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत जाणे झाले, तरी तेथील शाळा शोधून काढून, तेथील शिक्षकांशी बोलून तेथील मुलांना ते सूर्यनमस्कारांचे प्रशिक्षण देत. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने काही वेळा परराज्यांतही जाणे झाले, त्या वेळी त्यांनी तिथेही शाळांशी संपर्क साधण्याची संधी सोडली नाही. प्रवासातही सूर्यनमस्कारांत खंड नाही
सूर्य रोज उगवतो; मग सूर्यनमस्कारही रोजच घातले पाहिजेत, असे विश्वनाथ बापट यांचे म्हणणे असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रवासात असले, तर अगदी रेल्वेतही सूर्यनमस्कार घालतात. एकदा तर पत्नीच्या एका ऑपरेशनवेळी १३ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले असताना वॉर्डमध्ये सूर्यनमस्कार घालण्याएवढी जागा नसल्यामुळे बाथरूम स्वच्छ पुसून घेऊन तिथे सूर्यनमस्कार घातल्याची आठवणही बापट यांनी सांगितली. 

‘शिबिरासाठी वगैरे एकत्र बाहेर जाणे झाले, तर मी नेहमीच्या वेळेप्रमाणे लवकर उठून सूर्यनमस्कार घालत असे. सुरुवातीला माझी चेष्टा होत असे; पण मी हे कोणाला दाखविण्यासाठी करत नाही हे नंतर सर्वांच्या लक्षात आले. तेव्हापासून माझी चेष्टा होणे बंद झाले,’ असे बापट यांनी सांगितले. 

कंपनीच्या कामानिमित्ताने एकदा उत्तर प्रदेशातील देवबंद येथे गेलेले असताना त्यांना सूर्यनमस्कार घालत असल्याचे पाहून आधी तेथील सिक्युरिटी गार्ड आणि नंतर तेथील साहेबांनीही आपल्याला सूर्यनमस्कार शिकविण्याची विनंती केल्याचे आणि त्यांना ते शिकविल्याचे बापट यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांच्या कॅलेंडरवर दुधाच्या किंवा अन्य कसल्या कसल्या घरगुती नोंदी असतात. बापट यांच्या घरातील कॅलेंडरवर त्यांनी दररोज घातलेल्या सूर्यनमस्कारांच्या संख्येच्या नोंदी असतात. नंतर या नोंदी त्यांनी त्यासाठी तयार केलेल्या विशेष फुलस्केपवर केल्या जातात. एका फुलस्केपमध्ये चार वर्षांचे आकडे राहतात. ३१ डिसेंबर २०१८पर्यंत त्यांनी घातलेल्या सूर्यनमस्कारांची एकूण संख्या ११ लाख ८० हजार १८५ एवढी झाली होती. 

१० लाख सूर्यनमस्कारांचा संकल्प
एवढ्या नित्यनेमाने ते सूर्यनमस्कार घालत असल्याचे पाहून त्यांच्या एका स्नेह्याने त्यांना निवृत्तीपर्यंत १० लाख सूर्यनमस्कार पूर्ण करण्याची कल्पना सुचवली. त्यानुसार, ते १६ मे २०१० रोजी निवृत्त झाले, त्या दिवसापर्यंत त्यांनी १० लाख सूर्यनमस्कारांचा टप्पा ओलांडला होता. आता ते दररोज ७४ सूर्यनमस्कार घालतात. एखाद्या दिवशी घाई असेल, तर थोडी संख्या इकडे-तिकडे होऊ शकते; पण तसे होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. दररोज ते घरी ज्या ठिकाणी सूर्यनमस्कार घालतात, त्या ठिकाणी घर्षणाने लादीवर खुणा निर्माण झाल्या आहेत. बापट यांच्या नियमिततेची कल्पना येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे.

‘सूर्यनमस्कारासाठी अगदी थोडी जागा पुरते, त्यासाठी काहीही साहित्य लागत नाही किंवा कुणा सोबत्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे हा अगदी सहज करण्यासारखा व्यायामप्रकार आहे,’ असे ते म्हणतात.

विनामूल्य प्रशिक्षण
निवृत्त झाल्यानंतरही ते लायन्स क्लब, कोकण विकास प्रतिष्ठान यांसारख्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत होते/करतात. शाळा-कॉलेजांमध्ये सूर्यनमस्कार शिकविण्याचे त्यांचे व्रतही अजून चालूच आहे. शिवाय, शाळेमध्ये दर वर्षी नवीन मुले येत असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच शाळांमध्येही ते आवर्जून शिकवायला जातात. ‘आधी केले, मग सांगितले’ या तत्त्वानुसार, ते स्वतः नित्यनेमाने सूर्यनमस्कार घालत असल्यामुळे इतरांना सांगण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे.

मानधनाबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. ‘मी हे विनामूल्य शिकवतो. कारण ही आपली संस्कृती आहे. संस्कृतीचे संरक्षण करणे, संवर्धन करणे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हे आपले कर्तव्य आहे. ते मी पार पाडतो. एकदा एका शाळेत मी अनेकदा गेलो होतो, तेव्हा तेथील शिक्षकांनी अति आग्रह केल्यामुळे मी येण्या-जाण्याचा खर्च घेतला होता; पण मला सूर्यनमस्कार विकायचे नाहीत. मी क्लास वगैरे सुरू करून माझा शिष्यवर्ग तयार केलेला नाही; पण वेगवेगळ्या शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन शिकविण्याचा माझा उपक्रम सुरूच राहणार आहे. लोकांनी मला मानधन विचारलेच, तर मी सांगतो, की प्रत्येकाने नियमितपणे सूर्यनमस्कार घातले, तर मला मानधन मिळाल्यासारखेच आहे.’ 

पण हे अशा रूपातील ‘मानधन’ फारसे मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सूर्यनमस्कार शिकविल्यापैकी फारच थोड्या जणांनी ती सवय कायम ठेवली आहे. शाळेतील मुलांवर हे संस्कार करण्यासाठी, त्यात सातत्य राहण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी जास्त पुढाकार घेण्याची गरज आहे, असे त्यांना वाटते.

सूर्यनमस्कार कोणी, किती आणि कधी घालावेत?
‘आपण सूर्याकडे ज्या वेळी पाहू शकतो, त्या वेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटी, प्रत्येकाने आपल्याला झेपतील तेवढे सूर्यनमस्कार दररोज घालावेत. आपल्याला घाम येईपर्यंत सूर्यनमस्कार घालावेत. सुरुवातीला १० सूर्यनमस्कारांनंतर घाम आला, तर काही दिवसांनी ती क्षमता वाढत जाऊन सूर्यनमस्कारांची संख्या वाढवता येते. काही दिवसांनी हे प्रमाण स्थिर होते. मुलींनी/स्त्रियांनीही सूर्यनमस्कार घालण्यास काहीही हरकत नाही. केवळ मासिक पाळीच्या दिवसांत शरीराला त्रास होत असल्याने तो कालावधी वगळता महिलांनीही सूर्यनमस्कार आवर्जून घालावेत,’ असे बापट सांगतात. 

सूर्यनमस्कारांमुळे होणारे फायदे
‘दीर्घायुष्य, कुशाग्र बुद्धिमत्ता, भरपूर ताकद, पराक्रमी-निर्भयी वृत्ती, सर्जनशीलता, चिकाटी, तेजस्विता या गोष्टी सूर्यनमस्कार नियमितपणे घातल्यामुळे प्राप्त होतात,’ असे बापट यांचे अनुभवाचे बोल आहेत. 

खरोखर साष्टांग दंडवत घालावे, असे हे व्यक्तिमत्त्व! शक्य असेल त्या सर्वांनी दररोज सूर्यनमस्कार घालणे आणि ती सवय मुलांना लावणे, असे व्रत अंगीकारल्यास विश्वनाथ बापट यांचे हे कार्य चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकेल. 

संपर्क : विश्वनाथ बापट - ९४०४३ २९३६३

(सूर्यनमस्कारांचे फायदे या विषयावरील विश्वनाथ बापट यांचे अनुभवाचे बोल सोबतच्या व्हिडिओत... रत्नागिरीतील कुवारबाव येथील मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुलांना बापट यांनी १२ फेब्रुवारीला रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. त्याचा व्हिडिओही सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्रीराम दिनकर जोशी About 215 Days ago
At any age you can perform, subject you have done hard work through out your life. To shape up your body one need to invest time in developing it. काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
1
0
Sau. Sneha Ninad joshi. About 216 Days ago
बाबा मला तुमचा खूप अभिमान वाटतो. फक्त एवढीच खंत वाटते कि तुमच्याएवढी चिकाटी माझ्यात नक्कीच नाहिये. पण माझ्यापरीने जे समाजाला देता येईल, जे करता येईल ते नक्कीच करेन.
2
0
DEELIP MADHAVRAO RAJESHIRKE About 216 Days ago
Great Person
1
0
डाॅ.विश्वास कानडे About 217 Days ago
नमस्कार,चिपळूण येथे8/10 वर्षापूवी आपली भेट झाली होती.मला आपले मार्गदर्शन लाभले.मी दररोज 40/50 सुर्यनमस्कार नियमीत घालतो.थंडीचे दिवसात 70/80 घालतो.
1
0
Shirish Belsare About 217 Days ago
Very good and informative. It is absolutely useful to all agegroups.
2
0

Select Language
Share Link
 
Search