Next
‘चित्रकलेत व्यंगचित्रकाराचा वैचारिक सहभाग’
विवेक सबनीस
Thursday, August 30 | 12:45 PM
15 0 0
Share this story

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय तथा शि. द. फडणीस यांनी २९ जुलै २०१८ रोजी ९४व्या वर्षात पदार्पण केले. या वयातही त्यांच्या हातातून उत्तम कलाविष्कार घडतो. ६७ वर्षांची त्यांची या क्षेत्रातील तपस्या व झोकून काम करण्याची क्षमता कोणत्याही कलासक्त तरुणाला प्रभावित करेल अशी आहे. सकारात्मक दृष्टिकोन असलेले सर्जनशील कलावंत अशी त्यांची ओळख आहे. ‘एकूण चित्रकलेत व्यंगचित्रकला उपयोजित प्रकारात मोडत असली, तरी व्यंगचित्रकाराचा त्यात महत्त्वाचा असा वैचारिक सहभाग असतो,’ असे त्यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. या ज्येष्ठ कलावंताची ती संपूर्ण मुलाखत ...
......
- फडणीस सर, एव्हाना तुम्ही स्वत: व्यंगचित्रकलेतील, चित्रकलेतील एक संस्था, तसेच दंतकथा बनला आहात! तुमच्या व्यंगचित्रांमधील पात्रे व त्यांचे पोशाख पाहता गेल्या सहा, सात दशकांमधील माणसे, तेव्हाच्या केशरचना, फॅशन्स, घरातील भांडी व त्यातील घंघाळे, फिरकीचा तांब्या अशा दुर्मीळ वस्तूंचे दर्शन घडते. आजच्या पिढीला या फारशा माहीत नसलेल्या गोष्टी पाहून नक्कीच मजा येत असणार. आजही तुम्ही हातात पेन्सिल व ब्रश धरता. एवढ्यात कोणते नवीन व्यंगचित्र काढलेत? 
- अजूनही मला खूप काही करावेसे वाटते. तशी ऊर्जाही माझ्यात आहे; पण असे असले तरीही मी पूर्वीसारखी व्यावसायिक सफाईची कामे करणे आता थांबवले आहे. सध्या हंस मासिकाच्या दिवाळी अंकासाठी मी चित्र काढत असून ते व्हिज्युअल स्टेजमध्ये आहे. डोक्यात काही नवीन कल्पना आल्या, की मी कागदावर स्केचिंग करून त्यांना मूर्त स्वरूप देतो. सुदैवाने माझा हात अजूनही चालतो. मी आजही रेखाटने काढतो व हाताने मजकूरही लिहितो. 

- तुम्ही रिअलिस्टिक चित्रेही काढली आहेत. यासह आतापर्यंत तुमच्या एकंदर चित्रांची संख्या किती झाली असावी? त्यांचे संकलन व दस्तावेजीकरण केले आहेत का? 
- मी त्यांची मोजणी केली नाही, तरी सुमारे दहा हजार पृष्ठे मावतील, इतक्या पानांवर मी स्केचबुकातून चित्रे काढली आहेत. त्यातल्या निवडक चित्रांचे स्कॅनिंगही केले आहे. पुस्तके व मासिकांमधील चित्रांची संख्या अशीच काही हजारांपर्यंत गेली आहे. मुखपृष्ठांवरील चित्रांची संख्या सुमारे ५००पर्यंत पोहोचली असून, त्यामध्ये ‘पुलं’चे अपूर्वाई ते व. पु. काळे, दिलीप प्रभावळकर, द. मा. मिरासदार, लक्ष्मणशास्त्री जोशी अशा सर्व लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. १९५१मध्ये हंस मासिकाच्या जून महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर माझे पहिले चित्र प्रसिद्ध झाले! या साऱ्यांचे डिजिटायझेशन मी केले आहे. 

हंस मासिकाच्या मुखपृष्ठावरील शि. द. फडणीस यांचे पहिले चित्र

हंस १९५२ (सौजन्य : www.sdphadnis.com)- त्या पहिल्या मुखपृष्ठाबद्दल, त्याच्या अनुभवाबद्दल आणि तोपर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडे सांगा ना!
- मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये मी कमर्शियल आर्टिस्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर औद्योगिक व व्यावसायिक पातळीवर काही कामे केली. तेव्हा मी व्यंगचित्रकलेकडे केवळ एक छंद म्हणून पाहत असे; पण हंस मासिकाचे संपादक अनंत आंतरकर यांनी माझ्यातील व्यंगचित्रकार ओळखला असावा! त्यांनीच माझ्या मागे लागून व्यंगचित्रे काढायला लावली. तेव्हा मी ती आधी कृष्णधवल रंगात, नंतर दोन व तीन रंगांत काढून त्यांना दिली. अंतरकरही तेव्हा व्यवसायात वर येण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांनी १९५१मध्ये मी काढलेले व्यंगचित्र ‘हंस’च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी निवडले. आज त्या चित्राकडे पाहताना ते तेवढे परिपक्व वाटत नाही. समुद्राकाठी दोन मित्र गप्पा मारता मारता चणे खात आहेत. शेजारीच दोन मुलीही गप्पा मारताहेत. त्यातील एका मुलीच्या पंजाबी ड्रेसची ओढणी चणे खाणाऱ्या तरुणाच्या हातात येते व असे दिसते की तिच्या ओढणीतील चणे हे तरुण खात आहेत! वाचकांना हे चित्र खूप आवडले आणि माझी मुखपृष्ठाची कारकीर्द सुरू झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी ‘हंस’च्या दिवाळी अंकावरील माझ्या दुसऱ्या हास्यचित्रात बस स्टॉपवर उभ्या असणाऱ्या तरुण-तरुणीच्या अंगावरील उंदीर व मांजराचे डिझाइन पाहता मांजर उंदराचा पाठलाग करत आहे, असा आभास निर्माण होत होता. तेव्हा पुण्यातील एक आघाडीच्या दैनिकाने या मुखपृष्ठाची चाकोरीबाहेरचे चित्र, असे वर्णन करून विशेष दखल घेतली! 

कुटुंबीयांसह शि. द. फडणीस


- त्या काळात व्यंगचित्रांची व व्यंगचित्रकारांची स्थिती कशी होती? तुम्ही पदवी घेतल्यानंतरही थोडे उशिराच व्यंगचित्रकलेकडे वळलात का?
- १९४४च्या जून महिन्यात मी कमर्शियल आर्टिस्ट ही पदवी घेतली. या पदवीमुळे आपल्याला व्यावसायिक स्वरूपाची कामे मिळतील, असा मी विचार केला. त्यानुसार तेव्हा महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, लँड डेव्हलपमेंट बँक, काही सरकारी प्रकल्पांची कामे, वालचंदनगर इंडस्ट्रीज, तसेच काही औषध कंपन्या यांची जाहिरातींची, बुकलेटची कामे मी माझ्या चित्रकलेतून मांडली. कॉलेज शिक्षणात व्यंगचित्रकला शिकवली जात नाही; पण ‘जेजे’मध्ये येणाऱ्या पाश्चिमात्य नियतकालिकांपैकी सॅटर्डे पोस्ट, स्ट्रँड, तसेच शेवटी ‘मॅड’ यांसारख्या मासिकांमधून जगभरातील व्यंगचित्रे पाहता येत असत. नॉर्मन रॉकवेल हा तेव्हाचा व्यंगचित्रकार आजही आठवतो. आपल्या देशात तेव्हा दिल्लीतील शंकर हे कार्टूनिस्ट प्रसिद्ध होते. ‘हिंदुस्थान टाइम्स’मध्ये त्यांची व्यंगचित्रे येत असत. व्यंगचित्रकला हा आपल्याला पुरेसा पैसा देणारा उद्योग नाही, याची लख्ख जाणीव तेव्हा होती. म्हणूनच व्यावसायिक कामे मिळवण्याच्या मागे मी होतो. तसेच छपाईसाठी लागणारा ब्लॉक मेकिंगचा व्यवसाय करण्याची तयारीही मी केली होती. त्यासाठी लागणारे साहित्यही गोळा केले; पण माझ्यावर सुदैवाने तशी वेळ आली नाही! पुढे ‘हंस’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून मला माझा सूर गवसला. त्यानंतर इतर मासिकांच्या मुखपृष्ठांसाठी व्यंगचित्रे काढण्याची संधी मला मिळाली. त्यात मनोहर, किर्लोस्कर, मोहिनी, वसंत इत्यादींचा समावेश होता.  

- चित्रकलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपण चांगली चित्रे काढू शकतो, हे तुम्हाला कधी उमगले? 
- बालपणी मला कोल्हापुरातील बाबूराव पेंटर यांच्यापासून आबालाला रेहमान ते अभिनेते चंद्रकांत मांढरे यांची मोठी पेंटिंग्ज पाहून आपणही अशी चित्रे काढावी असे वाटत असे. त्यातून स्केचिंग किंवा रेखाचित्रे काढण्याचा छंद मला शालेय जीवनातच लागला. त्या वेळी चित्रकलेच्या एलिमेंटरी व नंतर इंटरमिजिएट यांपैकी दुसऱ्या परीक्षेत मला मानाचे तीन पुरस्कार मिळाले. त्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढीस लागला. कोल्हापुरातील शाहू दयानंद हायस्कूलमधील शिंदे मास्तरांचे प्रोत्साहनही याला कारणीभूत होते. तिथूनच पुढे मुंबईला ‘जेजे’मध्ये जाण्याचे मी ठरवून टाकले! पण तिथेही मोठी स्पर्धा असे. कारण शिकण्यासाठी भारतभरातून विद्यार्थी तिथे येत. अशा स्थितीत प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे कळल्यावर मात्र मोठा आनंद झाला! 

- मासिके व पुस्तकांमध्ये इलस्ट्रेशन्स आणि मुखपृष्ठांच्या कामांच्या बाबतीत स्पर्धेला कितपत तोंड द्यावे लागले?
- खरे तर मला सुरुवातीपासून स्पर्धा कधी जाणवलीच नाही. मी मासिकांच्या संपादकांना किंवा पुस्तकांच्या प्रकाशकांना सांगायचो, की हे काम मलाच मिळायला हवे असे नाही, ते तुम्ही इतर कुणालाही दिले तरी चालेल. असे असले, तरीही माझ्या कामातील वेगळेपणामुळे असेल, माझ्याकडे अनेक कामे आपसूक येत राहिली. व्यंगचित्रांबरोबर मी काढलेली रिअलिस्टिक चित्रंही वापरली जात असत. तेव्हा पु. भा. भावे यांचे साहित्य, लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पुस्तकं, शिवाय गो. नी. दांडेकरांच्या लेखनातही माझी अनेक गंभीर वळणाची चित्रे आहेत.

- तुमची हास्यचित्रे भौमितिक शैलीतील आहेत. अशी शैली जगात अगदी मोजक्याच चित्रकारांनी वापरली आहे. तुम्हाला तुमच्या हास्यचित्रांबद्दल काय वाटते?
- हास्यकलेची वाट चित्रकलेतून जाते. त्यामुळे व्यंगचित्रकाराची वास्तव चित्रकला आधी चांगली असायला हवी. हास्यचित्र काढताना त्यामध्ये  किती डिस्टॉर्शन (मोडतोड) करावे, हा ज्याच्या त्याच्या विचारांचा व त्यानुसार घेतल्या गेलेल्या निर्णयाचा भाग असतो. त्यातला बेढबपणा वाढवायचा का कमी करायचा हा तो मुद्दा आहे. माझी काही चित्रं पेंटिंगच्या अंगानेही जाणारी आहेत. ‘उंटाच्या मानेवर झोपाळा बांधून त्यात बाळाला जोजवणारी आई’ या चित्राला कवितेची लय आहे. आता भौमितिक आकारांमधली किंवा क्युबिझममधली माझी चित्रं सांगायची तर फार नाहीत. माझ्या रेषा या त्या मानाने मुलायम असतात. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांना माझी चित्रे ही डेकोरेटिव्ह किंवा आलंकारिक शैलीतली वाटली होती. अर्थात, सगळीच चित्रे तशी नाहीत. काही ठिकाणी ती सिंप्लिफाइड किंवा सुबोध आहेत, तर काही ठिकाणी त्यात बारीकसारीक तपशीलही भरण्यात आलेला आहे. व्यंगचित्रकलेतील ही विविधता जपण्याची एक प्रयोगशाळाच मला अनंत अंतरकरांसारखे पूर्ण स्वातंत्र्य देणारे संपादक भेटल्याने शक्य झाली! इतकी विविधता असताना त्याखाली माझी सही नसली तरी ते चित्र तुमचेच आहे, असे सांगणारे रसिक प्रेक्षकही भेटले. मी ही शैली अर्थात माझी आयडेंटिटी किंवा ओळख म्हणून स्वीकारली नाही, तर ती आपोआप घडत गेली. जगभरातील अनेक चित्रकारांची चित्रे मला आवडूनही त्यांच्यासारखी चित्रे मला काढायची नाहीत, हे माझ्या मनाशी पक्के ठरवले होते.

- तुमची स्वत:ची चित्रे व एकंदर व्यंगचित्रे यासंबंधी तुम्ही बराच विचार केला आहे. त्यावर काही स्वतंत्र लेखन करावेसे वाटते का? 
- हो. मी काही वर्षांपूर्वी ‘रेषाटन’ हे आत्मवृत्त लिहिले आहे. त्यामध्ये चित्रकला आणि व्यंगचित्रकला यासंबंधी विस्ताराने लिहिले आहे. ते पुस्तक म्हणजे मी आजवर दिलेल्या मुलाखती व केलेले लेखन यांचे सार आहे. अजूनही मी यावर विचार करतो, तेव्हा लेख, भाषणे किंवा मुलाखतींमधून सुचलेले नवे मुद्दे यावर लिहावेसे वाटते. ‘रेषाटन’ या आत्मवृत्ताची दखल महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली आणि त्याबद्दल मला लक्ष्मीबाई टिळक पुरस्कारही मिळाला. चित्रकलेवर वैचारिक लिखाण करावे असे मला वाटत आले आहे. माझ्या मते (एखाद्या पुस्तकात) चित्राचे महत्त्व असते. कारण शब्द हे संपूर्ण न्याय देऊ शकत नाहीत. चित्र या माध्यमाची तीच ताकद आहे. चित्रे मानवी अनुभवातून व्यक्त होतात. विशेषत: व्यंगचित्राचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे, की माणूस परिपूर्ण नाही. तो जन्माला येताना त्रुटींसह येतो. व्यंगचित्रकाराच्या मनातील रेषा माणसातील विसंगतींचा शोध घेत असतात. माणूस जेव्हा सारासार विचारांपासून दूर जातो, तेव्हाच या विसंगतींचा जन्म होतो. त्यामुळे व्यंगचित्राचा संबंध विद्वत्तेशी नसला, तरी शहाणपणाशी नक्कीच आहे! अर्थात विद्वत्तेतूनही विनोद निर्माण होऊ शकतात, तो भाग वेगळा. 

- या प्रक्रियेत सर्जनशीलतेचा भाग नेमका कसा व कुठे येतो? 
- ते नेमके सांगणे आवघड आहे, कारण तो अबोध मनाचा प्रवास आहे. अर्थात हा प्रवास मोठा आनंददायक असतो; पण याबाबत काही इतर उदाहरणे देता येतील. अमेरिकेतील एका ग्रंथालयात आइन्स्टाइनचे ठसठशीत वाक्य मी वाचले होते. ते असे होते की, इमॅजिनेशन इज मोअर इंपॉर्टंट दॅन नॉलेज. खरे तर या वाक्यात त्याचे बहुतेक उत्तर येते. ही कल्पकता किंवा सर्जनशीलता ही प्रत्येक क्षेत्राचीच गरज असते. सर्जनशीलतेशी असणारे हे नाते या वाक्यातून किती छान उलगडून दाखवले आहे! सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भगवती यांनीही एके ठिकाणी म्हटले आहे, की आम्ही निवाडा करताना कलावंताच्या भूमिकेत जातो. याचा खरा अर्थ असा आहे, की केवळ कायद्याच्या चौकटीत राहून असे निर्णय होत नसतात, त्याला सर्जनशीलतेचीही जोड द्यावी लागते. न्याय देतेवेळी तुम्ही मानवी चेहरा विसरू नका. माणूस चुकलाय व त्यालाही न्यायालयात स्थान आहे, अशी त्यामागची भूमिका असते! .. आणि चित्रकाराला तर सर्जनशीलतेच्या मार्गानेच जावे लागते.

- चित्रकलेच्या किंवा व्यंगचित्रकलेच्या परंपरेशी तुमची पुढची पिढी कशी जोडली गेली आहे?
- माझी कन्या रूपा देवधर ही अभिनव कला विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती माझ्या चित्रांसाठी काम करते. कम्प्युटर ग्राफिक व ऑनलाइन चित्र पाठवायला मला मदत करते. याशिवाय माझ्या चित्रांचे रेकॉर्ड ठेवण्यासारखी बरीच जबाबदारी तिने घेतली आहे. माझा नातू चिन्मय याने माझ्या काही चित्रांचे अॅठनिमेशनही केले आहे. एकूण कलेशी आमची पुढची पिढी जोडली गेलेली आहे. 

- व्यंगचित्रकारांची संघटना, संमेलने याबद्दल आपल्याला काय वाटते? 
- व्यंगचित्रकारांची एक संघटना असावी व त्यांची संमेलनेही भरवली जावीत अशी माझी इच्छा होती. सुदैवाने त्याची सुरुवात प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नातून १९८३मध्ये कोल्हापुरात झाली. तेथील अविनाश जोशी यांनी पाच संस्थांच्या मदतीने मराठी व्यंगचित्रकारांचे एक संमेलनच आयोजित केले होते. कला संचालनालयाचे (डायरेक्टर ऑफ आर्ट) संचालक बाबूराव सडवलेकर त्या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभले. त्यानंतर मात्र पुष्कळ संमेलने झाली. 

- आतापर्यंतची तुमची प्रदीर्घ कारकीर्द थक्क करणारी आहे. तुमच्या आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी आणि पुढच्या कारकिर्दीसाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे हार्दिक शुभेच्छा! 
- धन्यवाद!

(मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत. शि. द. फडणीस यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळावरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. शि. द. फडणीस यांच्या http://www.sdphadnis.com या वेबसाइटवर त्यांची काही चित्रे आणि अधिक माहिती उपलब्ध आहे.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link