Next
राग : भारतीय संगीताचं एक वेगळं वैशिष्ट्य
BOI
Tuesday, October 23, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:


आपल्यापैकी बऱ्याच रसिकांना यमन, भूप, मालकंस, दरबारी कानडा, तोडी, ललित, पूरिया धनाश्री, भैरवी अशी काही रागांची नावं माहिती असतात. अमुक एक गाणं अमुक एका रागावर आधारित आहे असंही ऐकलेलं असतं, पण बहुतेकांना उत्सुकता असते ती राग म्हणजे काय याबद्दल. हे गाणं या रागातलं आहे म्हणजे काय, याची. ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी पाहू या ‘राग’ या संकल्पनेबद्दल...
....................................
कोणतीही भाषा शिकताना जशी त्या भाषेतली मुळाक्षरं (अल्फाबेट्स) आधी माहिती करून घ्यावी लागतात, तसं संगीताच्या भाषेत ‘स्वर’ ही मुळाक्षरं असतात. मराठीत स्वर, व्यंजनं, बाराखडी यांची माहिती करून घ्यावी लागते, तर इंग्रजी शिकताना ए, बी, सी, डी हे अल्फाबेट्स शिकून घ्यावे लागतात. अगदी तसंच, स्वर हे संगीताच्या भाषेतील ए-बी-सी-डी असतात, असं म्हणायला हरकत नाही. अक्षरओळख जशी बोलणं, लिहिणं, वाचणं अशा निरनिराळ्या पातळींवर आपण करून घेतो, तसंच या स्वरांची ओळख प्रथम त्यांच्या आवाजांवरून करून घ्यायची असते. ते आवाज प्रत्यक्ष गाताना वाजवताना मनात पक्के झालेले असावे लागतात. मग हवे ते स्वर लावणं, ऐकलेला स्वर ओळखणं व लिहिणं, लिहिलेल्या स्वरांवरून चाल समजून घेणं अशा विविध प्रकारे या स्वरांची ओळख पक्की करून घेता येते. 

संगीतातली ही मुळाक्षरं म्हणजे आहेत फक्त बारा स्वर. ‘सा - रे - ग – म - प - ध – नी’, हे सात शुद्ध स्वर आणि त्यात कमी-अधिक (वर किंवा खाली आवाज) बदल होऊन, तयार होणारे चार ‘कोमल’ आणि एक ‘तीव्र’ असे बदललेले पाच ‘विकृत स्वर’ असे मिळून बारा स्वर. या स्वरांचं बनतं एक सप्तक. मूळ शुद्ध स्वराच्या आवाजापेक्षा कमी आवाज होणारे चार कोमल स्वर असतात, ‘रे’, ‘ग’, ‘ध’, ‘नी’ आणि मूळ शुद्ध स्वरापेक्षा जास्त होणारा तीव्र स्वर एकच, ‘म’.

‘सा’ आणि ‘प’ हे दोन स्वर नेहमीच शुद्ध राहतात. या सप्तकात आता ‘सा’पासून ‘नी’पर्यंत पायरी पायरीने आवाज चढत जाणारे बारा स्वर असतात, ते असे...

तीव्र स्वर – म 
शुद्ध स्वर - सा रे ग म प ध नी
कोमल स्वर - रे् ग् ध् नी्

हे बारा स्वर तर मिळाले. यातूनच कोणत्याही गाण्याची चाल तयार होते. अगदी जगभरातलं कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही भाषेतलं गाणं या बारा स्वरांतूनच तयार होतं. कारण यांना ‘युनिव्हर्सल टोन्स’ म्हणतात. हे टोन्स वेगवेगळ्या देशांमध्ये अगदी वेगवेगळ्या नावांनी जरी परिचित असले, तरी त्यांचे आवाज तेच असतात. म्हणजे आपण ज्यांना ‘सा रे ग म प ध नी’ म्हणतो, त्यांना पाश्चात्य संगीतात ‘डो री मे फे सो ला टी’ अशी लॅटिन भाषेतली नावं आहेत. याशिवाय सिंथेसायझरसारख्या की-बोर्डच्या भाषेत ‘सी डी इ एफ् जी ए बी’ असं म्हटलं जातं. म्हणजेच मराठीत खुर्ची, इंग्रजीत चेअर, जापनीजमध्ये इसू अशी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं असली, तरी चित्रावरून सर्वांना कळतं की ही बसण्यासाठी वापरण्याची वस्तू आहे. अगदी तसंच, नावं वेगवेगळी असली तरी सर्वांना स्वरांची ओळख त्यांच्या आवाजावरून होते.

आता प्रश्न येतो, की प्रत्येक गाण्यात हे बाराही स्वर घ्यायचे का? तर नाही. तशी आवश्यकता नाही. जसं रंगपेटीतले सगळेच रंग प्रत्येक चित्रात वापरलेच पाहिजेत, असं नाही. तर या उलट निरनिराळी रंगसंगती वापरल्यामुळे, प्रत्येक चित्रात नावीन्य आणता येतं. तसंच प्रत्येक गाण्यात वापरलेल्या स्वरांत विविधता असेल तर त्यांच्या चाली वेगवेगळ्या वाटू शकतील आणि याच कारणासाठी राग या संकल्पनेचा उपयोग होतो.

‘सप्तकातील बारा स्वरांपैकी निवडक स्वरांच्या समूहाला राग असं म्हणतात.’ म्हणजेच सप्तकातील बारा स्वरांपैकी, काही निवडक स्वरांचा समूह करून तेवढेच स्वर गाण्यात वापरायचे. मग अशा वेगवेगळ्या स्वरसमूहांतून, म्हणजेच रागांतून तयार झालेल्या चाली वेगवेगळ्या बनतात. हे वेगळेपण प्रत्येक स्वरसमूह तयार करताना कसं आणता येतं, ते समजून घेऊ या...

यासाठी मी ‘टेक्स्टाइल डिझायनिंग’चं उदाहरण देईन. टेक्स्टाइल डिझायनिंगमध्ये रंग आणि डिझाइन या दोन गोष्टींमुळे विविधता आणता येते. म्हणजे एकच डिझाइन निरनिराळ्या रंगात वापरता येतं किंवा एकाच रंगात निरनिराळी डिझाइन्स वापरता येतात. अगदी याचप्रमाणे रागनिर्मितीची प्रक्रिया होऊ शकते. ‘सा रे ग म प ध नी’ हे सात स्वर वेगवेगळ्या रंगात वापरता येतात. म्हणजे कधी सातही स्वर शुद्ध, कधी सात स्वरांपैकी ‘ग’ कोमल बाकीचे स्वर शुद्ध. कधी ‘म’ तीव्र, कधी ‘रे’, ‘ध’ कोमल. कधी ‘ग’, ‘नी’ कोमल, कधी ‘रे’ कोमल ‘म’ तीव्र अशा प्रकारे प्रत्येक वेळी वेगवेगळे कोमल, तीव्र स्वर घ्यायचे ठरवले, तर गणितानुसार (परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स करून) या बारा स्वरांमधून चक्क ३२ प्रकारे विविध रंगांत सात स्वर घेता येतात. यालाच ‘मेल’ किंवा ‘थाट’ म्हणतात आणि या थाटांमधून राग तयार होतात.

दुसरा मुद्दा असा.. प्रत्येक वेळेस सातही स्वर घेतले पाहिजेत असंही नाही. एक स्वर सोडला, तर सहा स्वरांचा राग तयार होऊ शकतो. दोन स्वर सोडले, तर पाच स्वरांचाही राग तयार होऊ शकतो. कमीत कमी पाच स्वर मात्र हवेतच. अशा प्रकारे रागात किती स्वर घेतले यावरूनही, पाच स्वरांचा, सहा स्वरांचा किंवा सात स्वरांचा राग तयार केला, तर रागात लागणाऱ्या स्वरसंख्येवरूनही विविधता आणता येते. मग पाच स्वरांचा राग करताना कोणते दोन स्वर सोडायचे, सहा स्वरांचा राग करतांना कोणता एक स्वर सोडायचा यावरूनही विविधता आणता येते.

एकूण काय, तर सप्तकातील बारा स्वरांमधून, एकापेक्षा वेगळा, दुसरा असे अनेक स्वरसमूह म्हणजेच राग तयार होऊ शकतात आणि त्यांत किती विविधता आणता येते, याची कल्पना आली असेल. याही पेक्षा पुढे जाऊन विचार केला, तर अगदी एकच स्वरसमूह घेऊन सुद्धा दोन निरनिराळे वाटणारे राग तयार होतात. एखादी गृहिणी एकच भाजी दोन वेगवेगळ्या प्रकारे करते आणि त्याच्या चवीत वेगळेपणा आणते, तसंच.

आता या तयार केलेल्या स्वरसमूहांना आणखी काही नियम लागतात. स्वर कशा पद्धतीनं लावायचा, कोणाला किती महत्त्व द्यायचं इत्यादी. पण असा हा नियमबद्ध स्वरसमूह रंजकतेच्या कसोटीवर उतरला, तरच तो राग म्हणून लोकप्रिय होतो. ‘रंजयति इति राग:’ असं म्हटलं जातं. एखाद्या गृहिणीनं नवीन पदार्थ केला, तो डिशमध्ये काढून गार्निश केला, दिसायला तर छान दिसतोय, पण त्याची चव पाहिल्यावरच त्याला पसंतीची दाद मिळते. तसं कोणताही राग ऐकायला कसा वाटतोय, ही त्याची रंजकताच त्याला लोकप्रियता मिळवून देते.

आता आपल्या लक्षात येईल, की असा एखादा नियमबद्ध व रंजक स्वरसमूह, राग घेतला आणि फक्त त्यात लागणारेच स्वर वापरून एखाद्या गाण्याची चाल तयार केली, तर ते गाणं अमुक एका रागात बांधलंय किंवा त्या रागावर आधारित आहे असं म्हटलं जातं. अशी रागांवर आधारित गाणी रसिकांच्या चिरकाल स्मरणात राहतात. पूर्वीच्या हिंदी चित्रपटांतील आणि संगीत नाटकांतील गाणी अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत, याचं कारण हेच आहे. शिवाय अशा गाण्यांच्या चालींमध्ये मुळातच असा दम असतो, की कोणत्याही ऑर्केस्ट्राच्या साथीशिवाय ती नुसती म्हटली, तरी ऐकायला छान वाटतात. 

आणखी एक उदाहरण देते. मोतीचूर लाडू, रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू, तिळाचा लाडू, डिंकाचा लाडू, हळीवाचा लाडू या प्रत्येकालाच आपली अशी खास चव असते. ती चव ते लाडू तयार करतांना त्यांत वापरलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची असते. बेसनाचा तो बेसन लाडू, तिळाचा तो तिळगूळ, रव्याचा तो रवा लाडू हे महत्त्वाचं. तो कशापासून बनवलाय, त्याचं वैशिष्ट्य तो घेऊन येतो. तसंच प्रत्येक रागाचं वैशिष्ट्य घेऊन जेव्हा गाणं बनतं, ते असंच एकमेवद्वितीय असतं. वारंवार रागदारी ऐकल्यानंतर कानांनाही सराव होतो आणि वेगवेगळ्या रागाची खास स्वरसंगती-फार्स ओळखू यायला लागते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘राग’ ही संकल्पना भारताशिवाय इतर कोणत्याही देशाच्या संगीतात नाही. फक्त आणि फक्त भारतीय संगीतातच आहे. या भारतीय संगीताच्या वैशिष्ट्याबद्दल अनेक परदेशी कलाकारांना कुतुहल आहे आणि त्यांनी आपल्या संगीताकडे आकृष्ट होऊन, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे ‘रागसंगीत’ शिकायला सुरुवात केली आहे. आपल्या या रागसंगीतामध्ये मन:शांती देण्याची ताकद आहे, हे त्यांनाही आता उमगू लागलं आहे.

या प्रत्येक रागाला मूर्त स्वरूप देण्यासाठी तयार होते, ती ‘बंदिश.’ रागातील शास्त्रीय रचना, गीत या बंदिशीतून आपल्याला दिसतं, ते त्या रागाचं वैशिष्ट्य, रागाची ओळख. पुढच्या भेटीत आपण जाणून घेऊ या बंदिशींबद्दल. तोपर्यंत ‘मन तरपत हरिदर्शनको आज’ हे मालकंस रागातील लोकप्रिय सिनेगीत दोन-चार वेळा ऐका आणि मग बघा मालकंस कसा तुमच्या मनांत रुंजी घालू लागतो ते...

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध असतील.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search