Next
फणशीबागेतील नदी पुनरुज्जीवित; सुशोभीकरणाचे थ्रीडी मॉडेल लवकरच
शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Tuesday, May 07, 2019 | 01:17 PM
15 0 0
Share this article:

श्रमदानापूर्वीची फणशी नदी

रत्नागिरी : शहरातील फणशीबाग परिसरात असलेल्या नदीचे झरे गेल्या वर्षी श्रमदानाने मोकळे करण्यात आले होते. त्यात चांगला पाणीसाठा झाला होता. या प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून या परिसराचे सुशोभीकरण केले जाणार असून, त्याचे थ्री-डी मॉडेल शासकीय तंत्रनिकेतनमधील पाच विद्यार्थ्यांनी केले आहे. लवकरच ते सादर केले जाईल. नदीतील पाण्याचा उपयोग नेहमीच्या वापरासाठी करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन आणि सुशोभीकरणाचा उपयोग पर्यटनाच्या दृष्टीने करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षक साईल शिवलकर, स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनीअर) ओमकार गिरकर, नितीन कानविंदे, राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे, सिद्धेश धुळप यांच्या पुढाकाराने शहरातील फणशीबाग परिसरातील नदी पुनरुज्जीवन करण्याचे काम गेल्या वर्षी हाती घेण्यात आले. यासाठी राजरत्न प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले. या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करण्यासाठी सहा मे २०१९ रोजी राजरत्न प्रतिष्ठानच्या कार्यालयात बैठक झाली. 


फणशीतील नदीच्या पाण्याची पातळी झरे बुजल्याने कमी झाली होती. त्याचप्रमाणे शहरातील काही रहिवासी भागातील सांडपाणी नदीत मिळाल्याने दूषित झाले होते. त्यामुळे त्याचा वापर करता येत नव्हता. साईल शिवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन ही नदी मोकळी करण्याचा ध्यास घेतला. त्यानुसार २०१८मध्ये त्यांनी श्रमदानासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फणशीबाग परिसरातील सर्व स्थानिक नागरिकांसह तत्कालीन नगराध्यक्ष राहुल पंडित, राजरत्न प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सलग आठ दिवस चाललेल्या या श्रमदानामुळे अनेक नैसर्गिक झरे मोकळे होऊन पुन्हा प्रवाहित झाले. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. गेल्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एका ठिकाणी अडवलेल्या जागेत तीन लाख लिटर इतका पाणीसाठा झाला होता. त्यामुळे परिसरातील स्थानिकांनाही आनंद झाला. 

सलग आठ दिवस चाललेल्या श्रमदानात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

या वर्षीही या नदीत मे महिन्यात मुबलक पाणी असून, हे पाणी वापरात आणण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर नियोजन सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ऋतिक ठीक, शर्विन चव्हाण, नितेश तांबे, विश्वनाथ मांडवकर आणि किरण मसणे या पाच विद्यार्थ्यांनी या परिसराचा पूर्ण अभ्यास करून एक थ्री-डी मॉडेल तयार केले आहे. यात या परिसराचे सुशोभीकरण करून त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल याची सविस्तर मांडणी केली आहे. हे मॉडेल पूर्ण झाले असून, लवकरच त्याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे शिवलकर यांनी सांगितले. 

कामाची माहिती देताना साईल शिवलकर (मध्यभागी)

दरम्यान, नदीतील पाण्याचा उपयोग नेहमीच्या वापरासाठी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचे नियोजन केले जात असून, हे पाणी वापरात आणता आले, तर फणशीबाग, परटवणे, फगरवठार या परिसरातील सुमारे हजार वस्ती असलेल्या रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न मिटवणे शक्य होणार आहे. या भागात फणशी नदीतील पाणी देता आले, तर नगरपालिकेवरील ताण बऱ्याच अंशी कमी होणार असून, संपूर्ण रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ आणि पानवल धरणातील पाणी शहरात कमी दाबाने मिळत असलेल्या प्रभागांमध्ये वळवता येणे शक्य होणार आहे. 

झरे मोकळे केल्यानंतर भरलेली नदी


(राजरत्न प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सिद्धेश धुळप यांच्याकडून उपलब्ध झालेला व्हिडिओ इथे देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search