Next
‘त्यांच्या’ जिद्दीने गाव झाले पाणीदार
गणेश पाकदुने यांनी नांदखेडमध्ये आणले पाणी
BOI
Thursday, December 06, 2018 | 03:34 PM
15 0 0
Share this story


नांदखेड : इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर माणूस काहीही करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेश पाकदुने. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील दुष्काळी नांदखेड हे गाव त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे पाणीदार झाले आहे. त्यांनी चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गावाला पाण्याच्या दुर्भिक्ष्यातून बाहेर काढले आहे. आज त्यांच्यामुळे गावातील दोन तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. 

त्याच्या या जिद्दीला लोकसहभागाबरोबरच पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि अनुलोम संस्था यांची समर्थ साथ लाभली. नांदखेड हे साधारण १६०० लोकसंख्येचे गाव. शेती हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. कमी पर्जन्यमानामुळे गावात दोन तलाव असूनही, कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असे. गुराढोरांनाही पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत असे. अशा या वातावरणाला गावकरीही कंटाळून गेले होते. तीन वर्षापूर्वी गणेश पाकदूने यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील पूर्व आणि पश्चिम बाजूला असणाऱ्या तलावातून गाळ काढण्याचा विचार गावकऱ्यांसमोर मांडला. त्यांच्या विचाराला गावकऱ्यांनी साथ दिली आणि लोकसहभागातून पूर्वेकडे असणाऱ्या तलावातून गाळ काढण्यात आला. त्यानंतर पश्चिमेकडील तलावातील गाळ काढण्यात आला. यासाठी अनुलोम, भारतीय जैन संघटना आणि पाणी फाउंडेशनने त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच जेसीबी व साहित्यही उपलब्ध करुन दिले. 


जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने जमीन सुपीक झाली. १०० रुपये ट्रॉली या दराने शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात नेला. साधारण २५०० ट्रिपद्वारे तलावातील गाळ काढण्यात आला. या उपक्रमासाठी अनुलोम, गावातील विठ्ठल नागरी पतसंस्थेने आर्थिक मदत केली. अनुलोम संस्थेने केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे दोन्ही तलाव आज गाळमुक्त झाले आहेत. ४५ बाय ७ मीटर लांबीच्या या तलावात सध्या सहा मीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गावाची पाणीटंचाई दूर झाली आहे. गणेश यांनी दाखवलेल्या धाडसामुळे गाव आता पाणीदार झाले आहे. गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून, जमिनीतील पाणी पातळीतही वाढ झाली आहे. 

गणेश यांच्या या कामात गावचे सरपंच देविदास म्हैसने, विठ्ठल नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नीळकंठ म्हैसने, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद टिकार यांची साथ लाभली. ‘महान्यूज’वर गणेश पाकदुने यांची यशोगाथा प्रसिद्ध झाली आहे. भगीरथाचा वारसा सार्थ ठरवणाऱ्या गणेश पाकदुने यांचा आदर्श इतर गावातील लोकांनीही घेतला, तर पाणीटंचाई कायमची दूर होईल आणि प्रत्येक गाव पाणीदार होईल. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link