Next
व्हॉट्सअॅप मेसेज खोटा वाटतोय? ‘टिपलाइन’ला फॉरवर्ड करून खात्री करा!
अफवा पसरण्याला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवे पाऊल
BOI
Tuesday, April 02, 2019 | 02:21 PM
15 0 1
Share this article:

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप हे अफवा पसरण्याचे मोठे माध्यम ठरले आहे. एरव्ही या माध्यमातून ‘फेक न्यूज’ पसरत असतातच; पण निवडणुकीच्या काळात त्यांना अधिक जोर येतो. म्हणूनच अशा अफवा पसरण्याला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने ‘चेकपॉइंट टिपलाइन’ हा नवा प्रकल्प सुरू केला आहे. आपल्याला व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज संशयास्पद वाटला, तर तो मेसेज +919643000888 या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवायचा आहे. त्या मेसेजमधील माहितीची सत्यासत्यता पडताळून त्या संदर्भातील माहिती संबंधित वापरकर्त्याला पाठवली जाणार आहे. त्यामुळे ‘फेक न्यूज’च्या प्रसाराला प्रतिबंध होणार आहे. 

चेकपॉइंट हा संशोधन प्रकल्प सुरू केल्याची माहिती व्हॉट्सअॅपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्या प्रकल्पाला तांत्रिक साह्य व्हॉट्सअॅपकडूनच केले जाणार असून, भारतातील प्रोटो या मीडिया स्किलिंग स्टार्टअप कंपनीद्वारे तो प्रकल्प चालवला जाणार आहे. 

मेसेज पाठवल्यावर काय होणार?
एखाद्या व्यक्तीने संशयास्पद वाटत असलेला मेसेज +919643000888 या नंबरवर व्हॉट्सअॅपद्वारे टिपलाइनला पाठवला, की ‘प्रोटो’च्या पडताळणी केंद्रावर त्या मेसेजचे विश्लेषण केले जाईल. संबंधित मेसेजमधील माहिती/दावे खरे आहेत का हे तपासले जाईल. खरा, खोटा, दिशाभूल करणारा, वादग्रस्त अशा गटांमध्ये त्या मेसेजचे वर्गीकरण केले जाणार असून, ती माहिती मेसेज पाठवलेल्या व्यक्तीला दिली जाणार आहे. तसेच त्या विषयावर उपलब्ध असलेली अधिकृत माहितीही संबंधिताकडे पाठवली जाणार आहे. 

विविध स्वरूपातील, भाषांतील मेसेजची पडताळणी शक्य
लिखित मजकुरासह फोटो, व्हिडिओ लिंक्स अशा स्वरूपातील मेसेजची पडताळणी या केंद्रावर केली जाणार आहे. तसेच इंग्रजी आणि हिंदी, बंगाली, तेलुगू आणि मल्याळम् अशा चार प्रादेशिक भाषांमधील मेसेजची पडताळणी हे केंद्र करू शकणार आहे.

स्थानिक संस्थांना सहकार्याचे आवाहन
निवडणूक काळात त्या त्या भागांमध्ये व्हायरल होणारे खोटे मेसेज/अफवा यांची माहिती आपल्याकडे सादर करावी, असे आवाहन गावागावांत काम करणाऱ्या संस्था-संघटनांना ‘प्रोटो’तर्फे केले जाणार आहे. त्यामुळे खोट्या माहितीच्या प्रसाराला आळा बसून, कोणत्याही विषयातील खरी माहिती पसरायला मोठा हातभार लागणार आहे.

जागतिक पातळीवरील अनुभव असलेल्या कंपन्यांचा सहभाग
भारतात पडताळणी आणि संशोधनाचे जाळे विकसित करण्यासाठी डिग डीपर मीडिया आणि सॅन-फ्रान्सिस्को येथील मीदान या कंपन्याही ‘प्रोटो’ला सहकार्य करणार आहेत. मीदान या कंपनीने याआधी जगभरात अनेक ठिकाणी अफवा पसरवण्याला प्रतिबंध करण्यासंदर्भातील प्रकल्पांवर काम केले आहे. एखाद्या मेसेजमधील माहिती ही अफवा आहे की नाही, याची पडताळणी करण्याला साह्य करणारे तंत्रज्ञान ‘मीदान’ने विकसित केले आहे. तसेच, ज्या माहितीची पडताळणी झाली आहे, त्यांच्या नोंदी (डेटाबेस) करण्याचे कामही ही संस्था करणार आहे. त्यासाठी त्यांनी मेक्सिको व फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांवेळी तयार केलेला चेक प्लॅटफॉर्म अधिक व्यापक करून व्हॉट्सअॅप बिझनेस ‘एपीआय’शी जोडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आलेल्या मेसेजचे विश्लेषणही शक्य होणार आहे. 

अफवांचे असेही विश्लेषण होणार...
‘अफवांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी आणि अभ्यास करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे. जसजशी अधिक माहिती आमच्याकडे येत जाईल, तसतसे आम्हाला त्या माहितीचे विश्लेषण करता येईल. नेमक्या कोणत्या विषयासंदर्भातील अफवा अधिक पसरवल्या जातात, कोणत्या ठिकाणावरून अफवा पसरण्याचे प्रमाण जास्त आहे, कोणत्या भाषांमध्ये हे प्रमाण अधिक आहे या गोष्टी त्यातून कळत जातील. माहितीच्या पडताळणीनंतर आम्ही संबंधितांना परत पाठवलेल्या अहवालांमुळे अधिकाधिक माहिती आमच्याकडे विश्लेषणासाठी पाठवली जाईल,’ असे ‘प्रोटो’चे संस्थापक ऋत्विज पारीख आणि नासर उल हादी यांनी सांगितले.

या प्रकल्पातून नोंदवली गेलेली निरीक्षणे पत्रकारांसाठीच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडेही पाठवली जाणार आहेत. त्यातून जगभरातील अन्य संस्थांना असे प्रकल्प राबविण्यासाठी मदत होणार आहे.

‘फेक न्यूज’च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सरकारने ‘व्हॉट्सअॅप’ला निर्देश दिले होते. त्यानंतर, फॉरवर्ड केलेल्या मेसेजला ‘फॉरवर्डेड’ असे लेबल देणे, एका वेळी जास्तीत जास्त पाच जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणे असे काही उपाय ‘व्हॉट्सअॅप’ने आतापर्यंत केले आहेत. तसेच, एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला आहे, हे कळण्याची सुविधाही लवकरच दिली जाणार असून, या फीचरचे ‘बेटा टेस्टिंग’ सध्या सुरू आहे. 
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sateesh Rajhans About 112 Days ago
How to know whether this message itself is genuine and not a fake one?
0
0

Select Language
Share Link
 
Search