Next
मुलांमध्ये नको असुरक्षिततेची भावना
BOI
Saturday, January 06 | 06:45 AM
15 0 0
Share this story


साऱ्यांतून कसंबसं सावरून सीमा नोकरी करायला लागली. तिला नोकरी मिळाली आणि दोन महिन्यातच तिची परगावी बदली झाली. त्यामुळे सुभाषला आता त्याचे आजी-आजोबाच सांभाळतात. सीमा फक्त रविवारी येते आणि संध्याकाळी परत जाते. परंतु ती आली तरी सुभाषला फारसा वेळ देत नाही, कदाचित या साऱ्या धक्क्यातून ती अजून सावरलीच नसावी असं आजीच्या बोलण्यावरून वाटत होतं... ‘मनी मानसी’ सदरात यावेळेस पाहू या मुलांमधील असुरक्षिततेबद्दल...
.........................................................
सुभाषची आजी त्याला भेटायला घेऊन आली. आजी येऊन बसली तेव्हा तिला बराच दम लागला होता. सुभाषचं वय अडीच वर्षं. त्यामुळे आजी त्याला कडेवर घेऊन आली होती. म्हणूनच तिला दम लागला होता. खुर्चीत बसल्यावर तिने सुभाषला खाली उतरवलं. आजीने त्याला खाली उतरवल्याबरोबर सुभाषने मोठ्याने रडायला सुरुवात केली. रडूनही आजी आपल्याला घेत नाहीये, हे लक्षात आल्यावर त्याने थोड्या वेळाने आपलं डोकं जोरात जमिनीवर आपटायला सुरुवात केली आणि लोळण घेतलं. हे पाहून शेवटी आजीने त्याला परत उचलून घेतलं. सुभाषचं रडणं एकदम बंद झालं.  तो रडायचा थांबल्यावर आजीने त्याला शेजारच्या खुर्चीत बसवलं, तेव्हा मात्र तो रडला नाही.

‘पाहिलंत ना कसा करतो हा.. घरीही सारखं हेच सुरू असतं. खात नाही, खेळत नाही.. सारखा रडत राहतो. याला एकतर कडेवर घ्यायचं, नाहीतर खुर्ची किंवा स्टुलवर बसवायचं. तरच हा शांत बसतो. मी आणि याचे आजोबा दिवसभर अगदी दमून जातो. याला सांभाळणं खूप अवघड जातो हो आम्हाला. काय करावं कळत नाही..’ असं आजी सांगत होती. 

हे बोलता-बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आजीचं हे बोलणं ऐकल्यावर त्यांना सुभाषच्या आई-वडिलांबद्दल विचारलं. हा प्रश्न विचारल्यावर तर आजीला आणखी जास्त रडू आलं. आजीला आधी शांत केलं. शांत झाल्यावर त्यांनी आपली कौटुंबिक माहिती द्यायला सुरुवात केली. 

त्यांनी सांगितल्यानुसार चार-पाच वर्षांपूर्वी सुभाषच्या आईचं म्हणजे सीमाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचं वर्ष चांगलं गेलं, पण नंतर सीमाच्या नवऱ्याचं वागणं बदलत गेलं. तो खूप विचित्र वागायला लागला. सीमाशी तो कधी खूप प्रेमाने वागायचा, तर कधी खूप विक्षिप्त. दोन-तीन वेळा तर त्याने तिच्यावर हातदेखिल उगारला. या साऱ्या दरम्यानच्या काळात सीमाला दिवस गेले. आता तरी नवऱ्याचं वागणं सुधारेल या आशेवर सीमा आणि तिच्या घरातले होते. यानुसार नवरा छान वागायला लागलाही, पण हा बदल फार काळ टिकला नाही. सुभाषचा जन्म झाला आणि नवऱ्याने सीमाला घटस्फोट दिला. सगळ्यांनी हे नातं जोडून राहावे यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सीमा आणि तिच्या आई-वडिलांचाही नाईलाज झाला.

या साऱ्यांतून कसंबसं सावरून सीमा नोकरी करायला लागली. तिला नोकरी मिळाली आणि दोन महिन्यातच तिची परगावी बदली झाली. त्यामुळे सुभाषला आता त्याचे आजी-आजोबाच सांभाळतात. सीमा फक्त रविवारी येते आणि संध्याकाळी परत जाते. परंतु ती आली तरी सुभाषला फारसा वेळ देत नाही, कदाचित या साऱ्या धक्क्यातून ती अजून सावरलीच नसावी असं आजीच्या बोलण्यावरून वाटत होतं. 

आजीच्या बोलण्यातून सुभाषची समस्याही लक्षात आली होती. जन्मापासून ते आतापर्यंत सुभाषला आई-वडिलांचं प्रेमच मिळालं नव्हतं. तो आजी-आजोबांबरोबरच होता. ते त्याला आई-वडिलांचं प्रेम देऊ पाहत होते, परंतु अर्थातच त्यावर मर्यादा आल्या. शिवाय वयामुळे त्याला सांभाळण्यात त्यांना खुप कसरतही करावी लागत होती. त्याच्याप्रमाणे धावपळ करणं त्यांना शक्य नसल्याने, सुभाषला खुर्चीवर किंवा स्टुलवर बसण्याची सवय त्यांच्याकडूनच नकळत लागली होती. 

आजीचं बोलणं झाल्यावर त्यांना सुभाषची समस्या लक्षात आणून दिली. आई-वडिलांपासून एवढ्या लहान वयात आलेला दुरावा आणि त्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली भीती, असुरक्षिततेची भावना, त्याच्या या वयात अपेक्षित असणाऱ्या प्रेम, वात्सल्य, मायेच्या स्पर्शाचा अभाव, परिस्थितीमुळे त्याच्या छोट्याश्या जगावर झालेला मोठा आघात या साऱ्या कारणांमुळे त्याच्यामध्ये या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आजीला पुढच्या वेळी सीमाला घेऊन यायला सांगितलं.

सीमा भेटायला आली. तेव्हा ती स्वतःच भावनिकदृष्ट्या खूप असवस्थ होती. अपराधी भाव, राग, हताशपणा या साऱ्या भावनांच्या गुंत्यात ती अडकली होती. त्यामुळे पुढच्या काही सत्रांत आधी सीमाला समुपदेशन करण्यात आलं. साऱ्या परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी तिला मानसिक बळ देण्यात आलं आणि मग सुभाषच्या समस्यांची तिला जाणीव करून देण्यात आली. 

त्यानंतर मात्र सीमाने तिला सुचवलेले सगळे अगदी मनापासून केले. प्रयत्नपूर्वक स्वतःची बदली आपल्याच गावात करून घेतली. साऱ्या बदलांमुळे अर्थातच सुभाषची प्रेमाची गरज भागली आणि त्याच्या साऱ्या समस्या आपोआपच सुटत गेल्या. 

(केस मधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr  या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link