Next
जलक्रांतीसाठी श्रमदान; पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग
कोथरूडमधील वूडलँड सोसायटीच्या सदस्यांचा ‘पाणी फाउंडेशन’च्या कार्याला हातभार
BOI
Monday, May 13, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this article:

अभिनेते गिरीश कुलकर्णींसोबत श्रमदान करताना वूडलँड सोसोयटीचे सदस्य

पुणे : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ आणि ‘पाणी फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून जलक्रांतीसाठी राज्यभर ठिकठिकाणी करण्यात येत असलेल्या श्रमदानात समाजाच्या अनेक स्तरांतील नागरिक सहभाग घेत असल्याचे दिसत आहे. पुण्यातील कोथरूडमधील ‘वूडलँड सोसायटी’च्या सदस्यांनीही या कामाला हातभार लावून या सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घेतला आहे.

अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव या जोडप्याने राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांच्याच माध्यमातून जलक्रांती घडवून आणण्याकरिता ‘पाणी फाउंडेशन’च्या रूपाने पुढाकार घेतला. मागील काही वर्षांपासून त्यांच्या या कार्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दर वर्षी एक मे रोजी, महाराष्ट्र दिनी हे श्रमदानाचे कार्य राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील अनेक गावांमध्ये सुरू करण्यात येते. सामान्य नागरिकांबरोबरच मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यात सहभागी होतात आणि आपले योगदान देण्याबरोबरच लोकांचा उत्साह वाढवतात.  

श्रमदान करताना वूडलँड सोसायटी सदस्य (सर्व फोटो, व्हिडिओ : छायाचित्रकार अजय बेलसरे)

कोथरूड येथील वूडलँड सोसायटीतील सदस्य गेली तीन-चार वर्षे सातत्याने या कार्यात सहभागी होत आहेत. अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या साथीने या सदस्यांनी श्रमदानाचा आनंद घेतला. सासवडजवळील रिसे आणि बेलसर या गावांमध्ये सध्या धडाडीने श्रमदान केले जात आहे. याशिवाय या कार्यात प्रत्यक्षरीत्या सहभागी होऊ न शकणाऱ्या अनेक लोकांनी देणगी स्वरूपातही या कार्याला हातभार लावला आहे. यातूनच गावागावांमध्ये पाण्याचे टँकर, तसेच त्यासाठी लागणाऱ्या डिझेलसारख्या गोष्टी पुरवल्या जात आहेत. 

रिसे गावाची परिस्थिती गंभीर आहे. या गावात पाणी मुरण्यासाठी लागणारी जमीनच नाही. त्यामुळे खडकाळ भागात श्रमदान करणे अत्यंत कठीण होते. या जमिनीत बांध बांधून, चर खोदण्यात आले. त्याद्वारे पाणी अडणार आहे. हे या नागरिकांच्या श्रमदानातून साध्य झाले. या गावात पुरेशी झाडेही नसल्यामुळे गेली अनेक वर्षे रखरखाटच आहे. प्रचंड खडकाळ जमिनीमुळे पावसाचे पाणी मुरतच नाही. परिणामी पाणी पातळीदेखील कमी झाली आहे. तसेच गावातील विहिरींनाही पाणी लागत नाही. या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठीही पाणी फाउंडेशनमार्फत आर्थिक मदत केली जात आहे. याशिवाय अनेक दानशूर व्यक्ती या कामात मदत करत असल्याची माहिती ‘वूडलँड’च्या सदस्यांनी दिली.

पुरंदरजवळच्या बेलसर या गावातही श्रमदान सुरू असून, त्यामध्येही वूडलँड सोसायटीच्या सदस्यांनी सहभाग घेतला आहे. श्रमदानाबरोबरच सोसायटीतील सदस्यांनी आर्थिक सहकार्यही केले आहे. हेमंत आगरकर, वृषाली देहाडराय, अजय बेलसरे यांनी सदस्यांना एकत्र करून श्रमदानासाठी तयार केले. सोसायटीच्या सदस्यांबरोबरच त्यांचे नातेवाईक व मित्रदेखील यात सहभागी झाले आहेत. अलीकडेच या भागात महाश्रमदान उपक्रम राबवला गेला. यात जवळपास तीन हजार जलमित्रांनी श्रमदान केले. प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी, तसेच अन्य कलाकारही या कामात सहभागी झाले होते.

जवळपास साडेचार हजार गावांमध्ये हे श्रमदानाचे कार्य सुरू असून, येत्या काळात त्यात आणखी काही गावांची भर पडण्याची शक्यता आहे. राजाश्रयाबरोबरच या कार्याला लोकाश्रयदेखील मिळत असून, भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे. अशा प्रयत्नांव्यतिरिक्त या गावांमध्ये वड, पिंपळ, बाभळी यांसारखी देशी झाडे लावली जात आहेत. यामुळे भविष्यात जमिनीत पाणी मुरेल आणि गावे हिरवीगार होतील. 

गावांतील इतर समस्यादेखील या माध्यमातून जाणून घेतल्या जात आहेत. त्यानुसार त्यांना आर्थिक सहकार्य केले जात आहे. ग्रामपंचायती, तसेच पाणी फाउंडेशन यांच्या मदतीने व जलमित्रांच्या सहकार्याने ही चळवळ अनेक लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे व जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात आणखी अनेक जण या कामांमध्ये सहभागी होतील आणि ही चळवळ गावागावांमध्ये पोहोचेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

गावे स्वयंपूर्ण झाली, तर शहरेदेखील प्रगतिपथावर येतात. परिणामी देशाची प्रगती होते. हे लक्षात घेऊन राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी प्रत्येकाने या श्रमदानाला हातभार लावावा, असे आवाहन वूडलँड सोसायटीच्या सदस्यांनी केले आहे. आपले राज्य पाणीदार व्हावे, या हेतूने प्रेरित होऊन आमच्याप्रमाणेच जास्तीत जास्त जणांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

(अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search