Next
सहा महिन्यांनी त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या...
८२ वर्षांच्या चंद्रा मनसुखानी यांची जिद्द
BOI
Friday, February 15, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : वय ८२ वर्षे... वजन ११० किलो... मधुमेह, थायरॉइड, रक्तदाबाचा त्रास... दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या वाट्या बदलण्याची गरज... दोन्ही पायातील संवेदनाच कमरेपासून गेलेल्या मुलुंड येथील चंद्रा मनसुखानी या मागील सहा महिन्यांपासून बेडवरच पडून होत्या. अगदी नैसर्गिक विधीसाठीदेखील त्यांना हलता येईना अशा स्थितीत असल्याने त्या आजाराला आणि आयुष्यालाही कंटाळून गेल्या होत्या; मात्र ठाण्यातील डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केल्याने आता त्या स्वत: हिंडू-फिरू लागल्या आहेत.

मनसुखानी यांना या आजारातून बाहेर काढण्यात ठाण्यातील क्युरे हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे. जनरल फिजिशिअन डॉ. मकरंद साळुंखे यांनी मनसुखानी यांचा मधुमेह तपासून तो आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर प्रख्यात स्पाइन सर्जन डॉ. प्रियांक पटेल यानी स्पाइन सर्जरी केली. त्यांची आधी मेंदू व स्पाइनचा एमआरआय काढल्यावर नेमक्या आजाराचे निदान झाले.

या विषयी माहिती देताना डॉ. पटेल म्हणाले, ‘त्यांना एपिड्युरल लिपोमऍटोसीस या आजाराने ग्रासले होते. त्यांच्या मज्जारज्जूभोवती फॅटचे आवरण झाल्याने मज्जारज्जूच्या हालचाली मंदावल्या होत्या, परिणामी कंबरेपासून खाली पायाची ताकत गेली होती. ही अवघड शस्त्रक्रिया होती, मात्र आम्ही मज्जारज्जू फॅट्सच्या आवरणापासून मोकळा केला. सुदैवाने या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पायात संवेदना आल्या व त्या पाय हलवू लागल्या.’

त्यानंतर मनसुखानी यांच्या गुडघ्याच्या दोन्ही वाट्या बदलण्याचे काम ऑर्थो सर्जन डॉ. बकुल अरोरा यांनी केले. एकाच शस्त्रक्रियेत पेनलेस व स्टीचलेस शस्त्रक्रिया करून दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या बदलल्यानंतर आता मनसुखानी स्वत:च्या पायावर व्यवस्थित हिंडू-फिरू लागल्या आहेत.

वैद्यकीय परिभाषेत हा रुग्ण ‘हाय रिस्क पेशंट’ होता. त्याच्या सर्व आजारांवर लक्ष ठेऊन शस्त्रक्रिया केल्याने अक्षरशः बेडवर असलेला रुग्ण आता चालू लागला आहे. त्यांच्या वयाचा व आजारांचा विचार करता कोणतीही शस्त्रक्रिया त्यांना कितपत झेपू शकेल हा प्रश्न होता; मात्र मनसुखानी कुटुंबाने सकारात्मक विचार करून शस्त्रक्रियेला परवानगी दिली. बेडवर पडून असल्याने चंद्रा मनसुखानीदेखील कंटाळल्या होत्या. आता मात्र स्वत हिंडू फिरू लागल्याने वेगळा आत्मविश्वास त्यांच्यात आल्याचे डॉ. साळुंखे व डॉ. अरोरा यानी सांगितले.

‘मी बेडरिडन झाल्याने व पायातील शक्तीच गेल्याने मला हलताच येत नव्हते. माझे पती व कुटुंबिय माझी काळजी घेत होते; मात्र मला बेडवर पडून राहायला व दुसऱ्यावर अवलंबून राहायला आवडत नव्हते. क्युरे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मला या गंभीर आजारातून बाहेर काढले, मी आता माझे दैनंदिन व्यवहार करू शकते. माझ्या पायावर मला पुन्हा उभे केल्याबद्दल मी डॉक्टर व सगळ्या टीमची आभारी आहे,’ अशी प्रतिक्रिया मनसुखानी यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search