Next
जिंदगी के सफर में...
BOI
Sunday, January 28, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अनेक हिंदी चित्रपट आपल्या उत्तम, श्रवणीय संगीताने बहारदार करणारे नामवंत संगीतकार म्हणजे आर. डी. बर्मन. चार जानेवारी रोजी त्यांचा स्मृतिदिन होऊन गेला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘जिंदगी के सफर में...’ या त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याचा...
...........
राहुल देव बर्मन अर्थात आर. डी. बर्मन. संगीतकार एस. डी. बर्मन यांचा पुत्र! राहुल देव यांच्या रक्तात संगीत होतं. संगीत हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता. एस. डी. बर्मननी हे ओळखलं होतं! त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्करून ‘एसडीं’नी त्यांना मुंबईला आणलं. मुंबईला आल्यावर ‘आरडीं’च्या जीवनाची दिशाच बदलली. आपल्या आवडत्या संगीत क्षेत्रात त्यांनी स्वतःला बुडवून घेतलं! ‘जेवढी जास्त वाद्यं शिकता येतील, तेवढी शिकून घे,’ असा आग्रह एस. डी. बर्मन यांनी राहुल यांच्याजवळ धरला! उस्ताद अली अकबर खाँ यांच्याकडून ‘आरडीं’नी सतार शिकून घेतली. माउथ ऑर्गनही ‘आरडीं’नी वाजवला होता.

आर. डी. बर्मन ऊर्फ पंचम हे प्रतिभाशाली संगीतकार होते. काळाच्या पुढे असलेला हा संगीतकार होता. अफाट प्रयोग करून ‘आरडीं’नी हिंदी चित्रपट संगीताच्या परंपरागत चौकटी मोडून टाकल्या! हा संगीतप्रेमींना अचंबित करून टाकणारा संगीतकार होता. प्रस्थापित संकेतांना झुगारून देणारा बंडखोर होता. तेव्हाच्या तरुण पिढीला (म्हणजे १९६४पासून पुढील काळ) ‘आरडीं’च्या संगीतानं झपाटून टाकलंच; पण नव्या पिढ्यांवरदेखील पंचम संगीताची मोहिनी पडत राहिली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे १९७२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘समाधी’ चित्रपटाला आर. डी. बर्मन यांचं संगीत होतं. त्यामधलं ‘ बंगले के पीछे, तेरी बेरी के नीचे... काँटा लगा’ हे गीत त्या काळात गाजलेच; पण २००० नंतरच्या नव्या शतकातही या गाण्याने धुमाकूळ घातला होता. तसेच १९९३मध्ये आलेल्या ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातल्या गीतांनीही प्रचंड लोकप्रियता मिळवली. वास्तविक पाहता त्या काळात ‘आरडी संपले’ अशी आवई उठली होती. त्यांचे संगीत एके काळी चांगले होते; पण त्यांचा काळ आता राहिला नाही, असा समज नवीन पिढीच्या चित्रपटप्रेमींनी करून घेतला होता; पण तीच पिढी ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातल्या गीतांवर पागल झाली होती.

वेगवेगळ्या वाद्यांचा वापर, काही नवीन वाद्यांची निर्मिती व त्यामधून तयार केलेलं संगीत यांची कहाणी सांगायची म्हटली, तर एक स्वातंत्र पुस्तक लिहावं लागेल. आर. डी. बर्मन लोकप्रियतेच्या लाटांवर स्वार झाले आणि टीकेचे प्रहारही त्यांनी झेलले. वेग आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘आरडीं’नी हिंदी चित्रपटसंगीतात जोम आणला. हिंदी चित्रपट संगीताला चैतन्य दिलं! वडिलांचा देदीप्यमान वारसा पुढे नेताना ‘आरडीं’नी केवळ बंडखोरीचाच सूर आळवला, हीसुद्धा वस्तुस्थिती नव्हे! परंपरा आणि नवता यांचा समतोल त्यांच्या कारकिर्दीत ठायी ठायी दिसेल. ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ हे एक टोक आणि ‘रैना बीत जाए’ हे दुसरं टोक! 

‘आरडीं’च्या संगीताबद्दल बरंचसं लिहिलं गेलं आहे. तसंच त्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताबद्दलही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलं आहे. उदारणार्थ, ‘तीसरी मंझील’, ‘शोले’ इत्यादी चित्रपटांमधील प्रसंग ‘आरडीं’च्या पार्श्वसंगीतानं उठावदार बनले होते. ‘पंचम’ स्वर हा संगीतातला सर्वांत वरचा! तेच स्थान ‘आरडीं’नी त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनात मिळवलं होतं. स्वतंत्र विचारपद्धती आणि प्रचंड आत्मविश्वास ही ‘आरडीं’ची वैशिष्ट्यं त्यांच्या संगीतामध्ये आपसूक प्रकटली होती.
२९२ हिंदी आणि इतर भाषांतले ३९ चित्रपट आपल्या संगीतानं सजवलेल्या या संगीतकारानं ‘सुखी संसाराची बारा सूत्रे’ या १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटालाही संगीत दिलं होतं. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या बरीच आहे. त्यांपैकी काही चित्रपटांची गीतं विस्मृतीतही गेली आहेत; पण यश-अपयश याचा विचार करण्यापेक्षा ‘आरडी’ यांचे महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी हिंदी चित्रपट संगीताला दिलेली नवीन दिशा! 

असा हा असा कलावंत ४ जानेवारी १९९४ रोजी आपली अमर कला मागे ठेवून निघून गेला. त्यामुळे जानेवारी महिना त्यांच्या स्मृतींशी निगडित आहे. त्यामुळे आजचे ‘सुनहरे गीत’ पाहू या त्यांनीच संगीतबद्ध केलेले! चित्रपट १९७४चा ‘आप की कसम’! गीतकार आनंद बक्षी! पडद्यावर हे गीत कोणी नायक गात नाही. काळ त्या चित्रपटाच्या नायकाला (राजेश खन्ना) आणि आपल्याला सांगतो 

वो फिर नाही आते...

या जीवनप्रवासात जे मुक्काम/क्षण/ प्रसंग घडून जातात, (मग ते सुखाचे असोत अगर दुःखाचे, चुकीचे असोत अगर बरोबर असोत) ते परत येत नाहीत. 

‘आप की कसम’ चित्रपटाच्या कथानकानुसार केवळ संशयावरून जीवनात दु:ख ओढवून घेतलेल्या नायकाच्या मनाची पश्चातापाची भावना काव्यात गुंफताना आनंद बक्षींमधील प्रतिभासंपन्न शायर लिहितो -  

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर 
पतझड में जो फूल मुरझा जाते हैं 
वो बहारों के आनेसे खिलते नहीं 
कुछ लोग एक रोज जो बिछड जाते हैं
वो हजारों के आनेसे मिलते नहीं 
उम्रभर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, 
वो फिर नहीं आते.... 

रोज नवीन फुलं उमलतात.. तसंच आपल्या जीवनातही आपल्याला नवनवी माणसं भेटत असतात. (तथापि) पानगळीच्या ऋतूत जी फुलं कोमेजून जातात, तीच फुलं वसंत ऋतू आला, तरीसुद्धा पुन्हा फुलत नाहीत. (त्याप्रमाणे) आपल्या जीवनात आलेल्या लोकांपैकी काही जण एक दिवस निघून जातात, आपल्यापासून दुरावतात तेसुद्धा आपल्या जीवनात येत नाहीत. अगदी नंतर हजारो लोक आपल्या जीवनात आले, तरी ते दुरावलेले परत येत नाहीत. मग आयुष्यभर तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलावत राहिलात, तरी ते परत येत नाहीत.

संशय घेऊनच नायकानं दु:ख ओढवून घेतलेलं असतं. त्यामुळेच पुढील कडव्यात आनंद बक्षी लिहितात -

आँख धोका है, क्या भरोसा है, सुनो 
दोस्तों शक दोस्तीका दुश्मन है 
अपने दिल में इसे घर बनाने ना दो 
कल तडपना पडे याद में जिनकी 
रोक लो, रुठकर उन को जाने न दो 
बादमें प्यार के चाहे भेजो हजारो सलाम 
वो फिर नहीं आते... 

(कधी कधी दृष्टीभ्रम होतो. त्यामुळेच) डोळेही फसवे असतात, धोकादायक असतात. जे आपण पाहतो ते पूर्ण सत्य नसतं. त्यामुळे त्या डोळ्यांवर काय म्हणून विश्वास ठेवायचा? अरे मित्रांनो, संशय हा मैत्रीमधला वैरी असतो. त्याला (संशयाला) आपल्या मनात स्थान देऊ नका. (अशा संशयामुळे तुमच्या जीवनातून आज जे निघून चाललेत, त्यांना त्वरेनं उठून थांबवा. (नाही तर) भविष्यात त्यांच्या आठवणीतच अश्रू ढाळावे लागतील. जिवाची तगमग होईल (आणि मग) प्रेमानं तुम्ही कितीही संदेश त्यांच्यासाठी पाठवलेत, तरी ते परत येणार नाहीत, परत येत नाहीत. 

जीवनातून केवळ माणसंच नाही, तर चांगल्या संधी आणि पुढे जाणारा काळ, या गोष्टीही पुन्हा येत नाहीत. म्हणून तर शेवटच्या कडव्यात सांगितलं आहे, की 

सुबह आती है रात जाती है, यूँही 
वक्त चलताही रहता है, रुकता नहीं 
एक पलमें ये आगे निकल जाता है,
आदमी ठीक से देख पाता नही 
और परदे पे मंजर बदल जाता है 
इक बार चले जाते है जो दिन रात 
सुबह शाम वो फिर नाही आते...

दिवस उगवतो, रात्र मावळते... असा हा काळ पुढे पुढे जातच असतो, जो थांबत नाही. एका क्षणात काळ पुढे निघून जातो. माणूस नीट बघूही शकत नाही, तोच (काळाच्या) पडद्यावरील दृश्य-देखावा बदलतो. एकदा निघून गेलेले दिवस-रात्र फिरून परत येत नाहीत.

अत्यंत कटू सत्य सांगून जीवन जगताना कशी सावधगिरी बाळगावी, हे सांगणारं हे गीत आनंद बक्षी यांनी जेवढं आशयपूर्ण लिहिलं आहे, तेवढंच ते किशोर कुमार यांनी तन्मयतेनं गायलं आहे. हे गीत पडद्यावर दाखवताना दिग्दर्शकाला ऋतू बदललेले, तसंच दिवस-रात्र हेही दाखवायचं होतं आणि ते सगळं संगीतातूनही दाखवलं गेलं पाहिजे; पण त्यासाठी वेळ काही सेकंदांचा होता,हे जेव्हा आर. डी बर्मन यांना सांगितलं, तेव्हा तीन-चार मिनिटांच्या गाण्यात त्यांनी आपलं कौशल्य वापरून, जो वाद्यमेळ जमवला, त्यामधून हे गीत जास्त प्रभावी ठरलं. दिग्दर्शकाला पाहिजे ते मिळालं. ‘आरडीं’चं या गीतातलं कौशल्य जाणून घेण्यासाठी सुहास किर्लोस्कर यांचा ‘आरडीं’वरचा कार्यक्रम बघायला हवा!

ज्यांच्या संगीताच्या वैशिष्ट्यांवर त्यांच्या पश्चात वीस वर्षांनंतरही कार्यक्रम सादर होतात असे ‘आरडी’ म्हणजे प्रतिभासंपन्न संगीतकार! पण तेसुद्धा ‘फिर नहीं आते, फिर नहीं आते...’

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search