Next
‘गिर्यारोहण हा खेळ माणूस म्हणून समृद्ध करणारा...’
मानसी मगरे
Wednesday, August 29, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:


संगीत, चित्रकला अथवा एखादा खेळ अशी आपली एखादी आवड प्रत्येकानं जपलेली असते. ही आवड जगण्यासाठीची सकारात्मक ऊर्जा देत असते. अशीच जगण्यासाठीची ऊर्जा देणारा एक धाडसी खेळप्रकार म्हणजे गिर्यारोहण. गिर्यारोहणाबद्दलची जागरूकता समाजात रुजवणारी आणि अनेक गिर्यारोहक घडवणारी ‘गिरिप्रेमी’ ही पुण्यातली नामवंत संस्था. जगातलं सर्वोच्च  एव्हरेस्ट शिखर नागरी मोहिमेद्वारे सर करून या संस्थेनं विक्रम प्रस्थापित केला. आज २९ ऑगस्ट अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिन. त्या निमित्ताने ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे यांच्याशी या अनोख्या खेळाबद्दल साधलेला हा संवाद...
........
उमेश झिरपे- गिर्यारोहणाची आवड तुम्हाला कशी लागली? ‘गिरिप्रेमी’तील तुमच्या कामाची सुरुवात कधीपासून आणि कशी झाली?
‘गिर्यारोहण’ हा शब्दही नीट उच्चारता येत नव्हता, तेव्हापासून म्हणजे शाळेत असल्यापासूनच या क्षेत्राशी संबंध होता. पुण्यातील टिळक रस्त्यावरच्या महाराष्ट्र मंडळी संस्थेच्या शाळेत होतो. तेव्हा आमच्या शाळेत मुलांना धाडसी खेळ शिकवण्याच्या दृष्टीनं ट्रेकिंगसारखे उपक्रम घेतले जायचे. त्यात मी नेहमी असायचो. यातूनच पुढे या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. गिर्यारोहण ही आवड बनली. यादरम्यान गिर्यारोहणाची आवड असलेल्या उषःप्रभा पागे, नंदू पागे, आनंद पाळंदे, दिलीप निंबाळकर आणि शशी हिरेमठ या सर्वांनी आपली आवड जोपासण्यासाठी १९८२मध्ये ‘गिरिप्रेमी’ नावानं पुण्यात एका क्लबची स्थापना केली. ‘आनंदासाठी गिर्यारोहण...’ हे या क्लबचं ब्रीदवाक्य होतं, जे आजही आहेच. पुढे १९८६मध्ये माझी आणि उषाताईंची भेट झाली. माझी या क्षेत्रातली आवड आणि मी तेव्हा केलेले काही ट्रेक्स पाहून उषाताईंनी मला ‘गिरिप्रेमी’मध्ये काम करण्यासाठी विचारणा केली आणि तिथून माझा या संस्थेतला प्रवास सुरू झाला. तेव्हापासून आजतागायत मी ‘गिरिप्रेमी’ कुटुंबाचा भाग आहे.  

गिर्यारोहण या धाडसी खेळप्रकाराबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, असं तुम्हाला काम करताना जाणवलं?
- मुळातच गिर्यारोहण याचा नेमका अर्थ फार कमी जणांना माहीत असतो, असा अनुभव आहे. ऐंशीच्या दशकात सुरू झालेली गिरिप्रेमी संस्था पुण्यातील आद्य गिर्यारोहण संस्थांपैकी एक आहे. केवळ आपली आवड जोपासण्यासाठी मोहिमा करत राहणं एवढाच संकुचित हेतू आमच्या संस्थेनं कधीच ठेवला नाही. गिर्यारोहण हा एक साहसी खेळ म्हणून समाजात रुजावा यासाठी कार्य करणं हा मुख्य हेतू ठेवून आम्ही काम करत आलो आहोत. पुढे हाच आमचा ध्यास बनत गेला. समाजातल्या प्रत्येकाला या खेळाचं महत्त्व कळावं, विशेषतः हा खेळ आपल्याला एक माणूस म्हणून किती समृद्ध करतो, याची जाणीव तरुणांमध्ये जागृत व्हावी यासाठी गिरिप्रेमी कार्यरत आहे. गिर्यारोहण हा एक तंत्रशुद्ध खेळ आहे, याची माहितीच अजूनही अनेकांना नाही. ट्रेकिंग करणारी माणसं त्यांच्या आवडीसाठी, मजेचा एक भाग म्हणून कुठेतरी भटकत असतात, इतकीच समाजाच्या लेखी गिर्यारोहकाची ओळख. प्रत्यक्षात केवळ गड-किल्ले चढणं म्हणजे गिर्यारोहण नव्हे. गिर्यारोहण (माउंटेनीअरिंग) ही ट्रेकिंगच्या पुढची पायरी आहे. त्याचं स्वतःचं एक तंत्र आहे, ते शिकण्यासाठीचे शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत, त्याची साधनं आहेत, याबाबत फार कमी जण जागरूक आहेत. 

गिर्यारोहण या खेळाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
- गिर्यारोहण हा असा खेळ आहे, जिथे तुमच्या शारीरिक शक्तीबरोबर मानसिक क्षमताही पणाला लागतात. या दोन्हीही क्षमता तुम्ही ताणायला शिकता. या खेळात तुम्हाला कोणीही प्रतिस्पर्धी नसतो. उलट यात तुम्ही स्वतःचेच प्रतिस्पर्धी असता. आपल्या आयुष्यात कोणत्याही बाबतीत जेव्हा आपण ‘शक्य नाही’ असं म्हणून थांबतो, तिथून पुढं गिर्यारोहणाचा खेळ सुरू होतो. या खेळासाठी निर्णयक्षमता लागते, सकारात्मकता लागते, तसा दृष्टिकोन लागतो. सोबत्यांची काळजी घेत पुढे जाण्याची वृत्ती लागते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींचं शिक्षण जेवढं या मोहिमा आखताना मिळतं, तेवढं कोणत्याही महागड्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये पैसे भरून घेता येत नाही.

‘गिरिप्रेमी’च्या माउंटेनीअरिंग इन्स्टिट्यूटबद्दल सांगा. त्या संस्थेला प्रतिसाद कसा आहे?
- गिर्यारोहणाबद्दलची शास्त्रीय माहिती लोकांना मिळावी, समाजात जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने पर्यटन क्षेत्रातील गार्डियन संस्था आणि गिरिप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने २०१५मध्ये ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीअरिंग’ची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून आम्हाला गिर्यारोहणाचं महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्यात यश येत आहे. गिर्यारोहणाच्या या शास्त्रोक्त शिक्षण संस्थेत सर्व सोयी-सुविधांसहित विविध स्तरांवर अभ्यासक्रम चालवले जात आहेत. इतकंच नाही, तर आमचे कार्यकर्ते परिसरातील अनेक शाळांमध्ये जाऊन गिर्यारोहण हा विषय मुलांना शालेय स्तरापासून अभ्यासाला असणं किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करत आहेत. आमच्या या प्रयत्नांना समाजाकडून मिळणारा प्रतिसादही खूप चांगला आहे. शालेय वयापासूनच असंख्य पालक मुलांना गिर्यारोहणाचं शास्त्रोक्त शिक्षण घेता यावं, यासाठी आग्रही आहेत.   

'बचेंद्री पाल' यांच्यासोबत टीम गिरिप्रेमी‘माउंट एव्हरेस्ट’ हे जगातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा अनुभव कसा होता?
- २००७मध्ये ‘गिरिप्रेमी’ला २५ वर्षं पूर्ण झाली. तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं, की संस्थेनं आजवर अनेक छोट्या-मोठ्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. यातून गिर्यारोहणाचा भक्कम पाया घातला गेला आहे. त्यामुळे आता संस्थेनं एखादी मोठी उडी घेतली पाहिजे. परंतु मोठी उडी म्हणजे कोणती, या प्रश्नावर अगदी मनापासून आलेलं उत्तर होतं, जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर. सर्वानुमते मोहीम ठरली आणि तयारीला सुरुवात झाली. आवश्यक प्रशिक्षण, योग्य गिर्यारोहकांची निवड, तांत्रिक बाबींची पूर्तता या सगळ्यांबरोबरच सर्वांत मोठा प्रश्न होता तो मोहिमेसाठी येणाऱ्या खर्चाचा. ही रक्कम अर्थात काही कोटींच्या घरात होती आणि आम्हाला ती समाजातून उभी करायची होती. हे सगळं नक्कीच सोपं नव्हतं; पण समाजातील सर्व स्तरांतून आम्हांला मदत मिळाली. त्यातले काही अनुभव अगदी मन हेलावून टाकणारे आहेत. अखेर २०१२च्या मे महिन्यात जगातल्या सर्वोच्च अशा ‘एव्हरेस्ट’ शिखरावर भारतातली आजवरची सर्वांत मोठी नागरी मोहीम काढण्यात आली. १३ क्लायंबिंग मेंबर्स आणि सपोर्ट टीमचे आठ जण अशा एकूण २१ जणांची टीम होती. या मोहिमेत १३पैकी आठ जणांनी एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्याचा भारतातला नवा विक्रम नोंदवला. या मोहिमेचा अनुभव वेगळाच आणि विशेष होता. अगदी एव्हरेस्ट चढाईचं स्वप्न पाहण्यापासून ते प्रत्यक्ष शिखर सर करेपर्यंतचा प्रत्येक क्षण आमच्यासाठी रोमांचक होता.  

सामाजिक बांधिलकी जपण्याबद्दलही ‘गिरिप्रेमी’चं नाव विशेषत्वानं घेतलं जातं. त्याबद्दल काय सांगाल?
- ‘गिरिप्रेमी’च्या माध्यमातून आजवर अनेक गिर्यारोहक घडले आहेत. केवळ मोहिमा आखणे, त्या पूर्ण करणे किंवा आपली एक आवड म्हणून ती जोपासणे इतक्याच संकुचित मनोवृत्तीने आम्ही हे काम कधीच केलं नाही. उलट गिर्यारोहणाच्या निमित्ताने आम्ही धाडसी खेळांचं जे प्रशिक्षण घेतो, ज्या नवनवीन धाडसांना सामोरं जातो, त्या क्षमतेचा देशासाठी, समाजासाठी काही उपयोग झाला पाहिजे आणि तो होत असेल, तर नक्कीच केला पाहिजे अशा प्रकारची शिकवण इथं दिली जाते. देशभरात उद्भवणारी एखादी दुर्घटना असो, एखादी नैसर्गिक आपत्ती असो, ‘गिरिप्रेमी’चे कार्यकर्ते शक्य असेल तिथं आणि शक्य त्या प्रकारे मदतीसाठी तत्पर असतात. नेपाळ भूकंप असेल, देशात आलेले पूर असतील किंवा एखाद्या अपघातात अडकलेले लोक असतील, आमचे कार्यकर्ते ते एक सामाजिक दायित्व समजून त्यासाठी मदत करत आले आहेत, यानंतरही नेहमीच करत राहतील आणि सामाजिक बांधिलकीची भावना जोपासतील यात शंका नाही. 

वेबसाइट : http://www.giripremi.com/

(उमेश झिरपे यांचे मनोगत आणि ‘गिरिप्रेमी’च्या हिमालय मोहिमेबद्दलचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search