डोक्यावर एकही केस नसलेली स्त्री दिसली, तर सहानुभूतीच्या, हेटाळणीच्या किंवा टिंगलटवाळीच्या प्रतिक्रिया सहजपणे आणि बऱ्याचदा महिला वर्गाकडूनच येतात. काळेभोर, लांब केस हा सौंदर्याचा मापदंड मानल्या जाणाऱ्या भारतीय समाजात केसांविना जगण्याचा निर्णय घेणे कठीणच. या पार्श्वभूमीवर, चाईमुळे गेलेले केस औषधोपचारांमुळे परत येत नसल्याने केसांविनाच राहण्याचा कठीण निर्णय पुण्यातील केतकी जानी यांनी घेतला. त्या फॅशन शोमध्ये भाग घेतात आणि समाजातील अशा स्त्रियांना हिमतीने जगण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने जनजागृतीही करतात. एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष करणाऱ्या या ‘निकुंतले’शी प्राची गावस्कर यांनी साधलेला हा संवाद...
.................
प्रश्न : डोक्यावरचा विपुल केशसंभार हा स्त्रियांच्या सौंदर्याचा अविभाज्य घटक मानला जातो. या पार्श्वभूमीवर, केसांविना जगण्याचा निर्णय तुम्हाला का घ्यावा लागला?
केतकी जानी : एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर केस नसतील, तर तिच्याकडे अत्यंत विचित्र नजरेने पाहिले जाते. पूर्वी पती गेल्यानंतर स्त्रियांचे जबरदस्तीने केशवपन करून त्यांना विद्रूप केले जाई. एखाद्या स्त्रीचे केस विकाराने गेले असतील, तरीदेखील तिने काही तरी गुन्हा केल्यासारखे तिच्याकडे पाहिले जाते. तिने काहीतरी पाप केले आहे किंवा केस नसल्यामुळे ती किती बिचारी आहे, अशी संभावना समाजाकडून, विशेषतः स्त्रियांकडूनच केली जाते. अशा समाजात माझ्यासाठीदेखील वयाच्या चाळिशीतच संपूर्ण टक्कल घेऊन जगण्याचा निर्णय घेणे हे खूप कठीण होते. चाई (अॅलोपेशिया) पडल्यामुळे माझ्या डोक्यावरचे केस जाऊ लागले. अवघ्या चार ते पाच महिन्यात डोक्यावरचे सगळे केस गेले. डोक्यावर केस नसताना जगणे अशक्य होते. डोक्यावरचे केस परत यावेत यासाठी विविध उपचार करण्यास सुरुवात केली. घराबाहेर पडायची देखील लाज वाटायची. ऑफीसमध्ये स्कार्फ बांधून जायचे. संध्याकाळी लवकर घरी येऊन खोलीत कोंडून घ्यायचे स्वतःला आणि रडत रहायचे. लोकांचे प्रश्न, त्यांच्या नजरा काळजाला घरे पाडायच्या. मरून जावे असे वाटायचे. केस परत यावेत यासाठी काय केले नाही असे नाही. सर्व प्रकारच्या औषधोपचारांच्या माऱ्याने संपूर्ण शरीराची वाट लागली. नैराश्य आले. औषधांमधील स्टेरॉइड्समुळे वजन प्रचंड वाढले. स्टेरॉइड्स बंद केली, तर केस गळण्याचे थांबणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. विविध उपचार करूनही केस जाणे थांबले नाही आणि इतर अवयवांवर मात्र घातक परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली. त्यानंतर पती आणि मुलांनी निक्षून सांगितले, की ‘तू जशी आहेस तशी आम्हाला हवी आहेस. आम्हाला तू हवी आहेस, तुझे केस नव्हे. त्यामुळे आता यापुढे केस येण्यासाठी कोणतेही उपचार करण्याची गरज नाही.’
मुलीने तर सांगितले, ‘मी पण टक्कल करते, आपण दोघी एकत्र बाहेर जात जाऊ.’ त्या वेळी मात्र मी ठरवले, की बास आता यापुढे केसांविना, जसे आहे तसे जगायचे. २०११ ते २०१५ पर्यंतचा काळ चाई अर्थात अॅलोपेशियाशी लढण्यात गेला होता. स्वतःशी लढण्यात खूप शक्ती खर्ची पडली होती. आता मला जगायचे होते माझ्या मनाप्रमाणे, माझ्या घरातल्यांसाठी आणि समाजातील अशा स्त्रियांसाठी ज्या या रोगाने ग्रस्त आहेत, जगण्याची उमेद हरवून बसल्या आहेत, त्यांच्यासाठी. त्यामुळे हिंमत केली आणि एक दिवस मी बाहेर पडले दुपट्टा न घेता, लोक आ वासून बघत राहिले. त्यानंतर मी मात्र मागे वळून पाहिले नाही.
प्रश्न : तुम्हाला समाजाकडून मिळणारा प्रतिसाद कसा आहे?
केतकी जानी : मी गुजराथी समाजातील आहे. पुण्यात ‘बालभारती’मध्ये मी गुजराती भाषा विभागाची विशेषाधिकारी आहे. मी जरी पारंपरिक रीती-रिवाजांचा पगडा असलेल्या समाजात जन्माला आले असले, तरी घरी पुरोगामी वातावरण आहे. त्यामुळे या संघर्षात मला पहिला आधार मिळाला तो घरातून. घरच्यांनीच मला प्रवाहाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. माझी मुलगी पुण्यजा (ती फिजिओथेरपी शिकत आहे), मुलगा कुंज, माझे पती यांच्यासह अन्य कुटुंबीयांनी मला स्वीकारले. घराबाहेर मात्र सुरुवातीच्या काळात नकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे प्रमाण अधिक होते; मात्र मी आता चाईमुळे किंवा अन्य कारणांनी केस गेलेल्या स्त्रियांसाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर पाठबळ, प्रोत्साहन देणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच मी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांची भेट घेतली. त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने अगदी सहजपणे मला त्यांच्यात सामावून घेतले. माझ्या निर्णयाबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. माधुरीताईंनी मला मैत्रीण असे संबोधले. ही खूप सकारात्मक बाब आहे. यातून मला नवी ऊर्जा मिळाली आहे. याउलट, सुरुवातीच्या काळात मला वाईट अनुभव आले. मला बघितल्यावर बायका सहानुभूती, हळहळ व्यक्त करायच्या. एकदा तर एका बाईने मला म्हटले, की ‘जुन्या काळी पती मेल्यावर बायकांचे केशवपन केले जाई. तुझे केस तुझा नवरा जिवंत असतानाच गेले आहेत. तू किती पापी असशील?’ अनेकदा स्त्रियाच माझ्या टकलाकडे बघून हसतात. त्यावरून विनोद करतात. काहीतरी विचित्र कॉमेंट करतात. सुरुवातीला मला याचा खूप त्रास व्हायचा. मी सगळे उपचार थांबवून जसे आहे तसे जगण्याचा निश्चय केला, त्या वेळी ‘अशा कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही,’ हे मी मनाशी पक्के केले. लोक काय, बोलतच राहतात. आपण एखाद्याच्या व्यंगावर हसतो, तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल, याच्याशी त्यांना काही घेणे-देणे नसते. स्वतःच्या मनोरंजनासाठी ते त्याचा वापर करून घेतात; पण लोकांचे असे बोलणे काही जणांसाठी जीवघेणे ठरते. कर्करोगावरील उपचारांसाठी केमोथेरपी घेतल्यामुळेही केस जातात; पण ते परत येतात. तरीही हळव्या, भावूक महिलांना ती अवस्थादेखील असह्य ठरते. त्यामुळे काही महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. चाईमुळे केस गेल्यामुळे एका तरुण मुलाने आत्महत्या केल्याचेही मी ऐकले. अशी काही उदाहरणे ऐकली, की मला खूप वाईट वाटते. समाजाला जाब विचारावासा वाटतो. ‘अरे, तुमचा खेळ होतो; पण कुणाचा तरी जीव जातो. त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. याला कोण जबाबादार?’ पण हे कुणाकुणाला आणि कितीदा विचारणार? त्यापेक्षा आपणच खंबीरपणे उभे राहिलो, तर कदाचित काही जणांना का होईना, थोडी हिंमत, प्रेरणा मिळेल, या विचाराने मी काम करायला सुरुवात केली. आज जगात १४ कोटीहून अधिक लोक चाईग्रस्त आहेत. भारतातही संख्या मोठी आहे आणि त्यात महिलांची संख्या खूप आहे. जगात सौंदर्यस्पर्धेत भाग घेणाऱ्या, मॉडेलिंग करणाऱ्या अनेक महिलांनी जाणूनबुजून टक्कल केले आहे. त्यांचे कौतुक होते; पण चाईमुळे टक्कल पडले असेल, तर अशा स्त्रियांना हिणवले जाते. हा विरोधाभास बदलला पाहिजे. त्यासाठी मी धडपड करत आहे. आपण खंबीरपणे उभे राहिलो, तर हळूहळू समाजाची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. अर्थात ही खूप प्रदीर्घ आणि सहनशक्तीची परीक्षा बघणारी प्रक्रिया असते. मी या सगळ्यातून गेले आणि अजूनही जात आहे; मात्र आता परिस्थितीला शरण जाऊन रडत बसण्याऐवजी समाजाची पर्वा न करता, परिस्थिती माझ्यासाठी अनुकूल बनवण्याकरिता मला साथ देणाऱ्या कुटुंबीयांच्या आणि पाठबळ देणाऱ्या लोकांच्या आधारावर मी जोमाने वेगळ्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रश्न : केस नसलेल्या स्त्रियांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करत आहात?
केतकी जानी : आता मी अनेक ‘फॅशन शो’मध्ये भाग घेते. त्याची सुरुवात झाली ती ‘मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड’स्पर्धेपासून. या स्पर्धेत मला झीनत अमान यांच्या हस्ते ‘इन्स्पिरेशन पुरस्कार’ मिळाला. ती म्हणाली, ‘चित्रपटसृष्टीत ५० ते ६० टक्के लोक असे आहेत जे विग लावल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.’ तिने माझे खूप कौतुक केले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला. यामुळे मला आणखी बळ मिळाले. आता मी वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन केस नसलेल्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार सर्वसामान्याप्रमाणे जगण्याचा हक्क आहे, हे मांडते. कोणत्या तरी आजारामुळे केस गेलेल्या स्त्रियाही माणूस आहेत. पुरुषांना टक्कल पडले असेल तर ते चालते. मग स्त्रियांना काही विकारामुळे असे झाले असेल, तर त्यांनी स्वतःला का कमी लेखायचे? सौंदर्याचे पारंपरिक निकष झुगारून माणूस म्हणून जगण्यासाठी अशा स्त्रियांनी पुढे यावे, यासाठी मी लेख, मुलाखती, फेसबुक पेज यांद्वारे प्रयत्न करत आहे. केस येण्याची कोणतीही हमी नसतानाही वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेऊन शरीरावर घातक परिणाम होतात. पैसा, वेळ आणि मानसिक स्वास्थ हरवते. यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आपल्याला हवे असेल तसे राहण्याचा मार्ग निवडणे योग्य आहे. याबाबत मी जनजागृती करते. मी माझ्या तुळतुळीत झालेल्या डोक्यावर ब्रम्हांडाचे दर्शन घडवणारा टॅटू काढून घेतला. माझ्या भुवयांचे केसही गेले आहेत. तिथेही भुवयांच्या आकाराचे टॅटू काढून घेतले आहेत. ती आता माझी ओळख बनली आहे. राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या ‘शूरवीर’ या स्पर्धेत मी भाग घेतला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात धाडसी निर्णय घेऊन समाजापुढे एक उदाहरण ठेवणाऱ्या देशभरातील २५ व्यक्तींचे यासाठी नामांकन झाले आहे. यात माझा क्रमांक २१ वा असून, लोकांनी मला मत दिल्यास मी हा किताब जिंकू शकेन.
प्रश्न : तुम्हाला काय सांगावेसे वाटते?
केतकी जानी : केस नसल्याने लाजिरवाणे वाटणाऱ्या किंवा स्वतःला कमी लेखणाऱ्या स्त्रियांना मला हेच सांगायचे आहे, की आयुष्य एकच असते. केस नाहीत हा तुमचा दोष नाही. ती एक शारीरिक अवस्था आहे. तुमचे मन त्यापेक्षा सुंदर आहे. त्यामुळे स्वतःला ओळखा, स्वतःची नवी ओळख घडवा. तुमच्यावर प्रेम करणारी जी माणसे आहेत, त्यांच्याकडे बघा, टोचून मारणाऱ्या समाजापुढे ठामपणे उभ्या राहा, आयुष्य तुमचे आहे, तुम्हाला हवे तसे जगा.
(केतकी जानी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)