पुणे : ‘नावीन्यपूर्ण संकल्पना, टीमवर्क आणि सातत्य या जोरावर पुण्यभूषण फाउंडेशनने अनेक उपक्रम यशस्वी केले आणि जगभर त्याचे अनुकरण झाले,’ असे प्रतिपादन ‘पुण्यभूषण फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी केले.
सिनर्जी हॉलिडे व्हिलेज आणि सिनर्जी फाउंडेशन यांच्यातर्फे सामाजिक, सांस्कृतिक योगदानाबद्दल डॉ. देसाई यांचा ‘सिनर्जी’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम १५ मे रोजी एरंडवणे येथील ‘सिनर्जी’च्या कार्यालयातील सभागृहात हा झाला.

‘सिनर्जी संवाद’ या उपक्रमातंर्गत झालेले हे दुसरे संवाद पुष्प होते. या वेळी डॉ. देसाई यांनी ‘पुण्यभूषणचे दिवस’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्य सैनिकांची आठवण चिरंतन ठेवण्यासाठी ‘त्रिदल’ संस्थेची स्थापना झाली, तर स्वातंत्र्योत्तर पिढीच्या योगदानाची दखल घेण्यासाठी एस. एम. जोशी यांच्या प्रेरणेने पुण्यभूषण फाउंडेशनची स्थापना झाली. पहिला ‘पुण्यभूषण’ पुरस्कार भीमसेन जोशी यांना देण्यात आला. आता हा पुरस्कार जगद्विख्यात झाला असून, गावोगावी त्याचे अनुकरण सुरू आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी पुण्यभूषण कार्यक्रमाला आल्यावर त्यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सुरू झाला. ‘पुण्यभूषण’ परंपरेला आता ३० वर्षे पूर्ण झाली. उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीदेखील या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येऊन गेले आहेत. ही एकमेवद्वितीय घटना आहे.’
‘आम्ही जे करू, ते उत्तम करू आणि जगभर अनुकरण होईल, असे करू या ध्यासातूनच पुण्यभूषण पुरस्कारानंतर पुढे ‘पुण्यभूषण पहाट दिवाळी’, ‘पुण्यभूषण दिवाळी अंक’ हे उपक्रम सुरू झाले. ‘पहाट दिवाळी’चे जगभर अनुकरण झाले, तर ‘पुण्यभूषण’ हा शहराला वाहिलेला अनोखा संग्राह्य दिवाळी अंक ठरला. हा अंक दरवर्षी पुरस्कार मिळवत असतो. आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून पुण्यभूषण टीममध्ये काम करतो, आमच्याकडे पदाधिकारी नाहीत. रसिकांच्या अंतकरणात आम्ही घर केले आणि अजोड अशी विश्वासार्हता मिळवली,’ असे डॉ. देसाई यांनी नमूद केले.
पु. ल. देशपांडे जन्मशताब्दीनिमित्त आगामी वर्षांत पाच खंडांत ५३ शहरांत होणार्या ‘ग्लोबल पुलोत्सव’ उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र आवटे यांनी आभार मानले.