भिवंडी : जागतिकीकरणामुळे इंग्रजीचे महत्त्व वाढले आहे. सध्या मराठी शाळांमध्येही इंग्रजीचे वारे वाहत असून, विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी म्हणून भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शिवनगर केंद्रातील देवरुंग जिल्हा परिषद शाळेत मराठी शाळांच्या इंग्रजी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी भिवंडीचे आमदार रूपेश म्हात्रे, ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी संगीता भागवत, जिल्हा परिषद सदस्या ऋता केणे, पंचायत समिती सदस्य शाम गायखे, कृष्णा वाकडे सदस्या सुप्रिया पाटील, इंग्लंडमधील शिक्षिका टॅरेन ग्रीन, आंतरराष्ट्रीय लेखक व आयएसएफ प्रमुख नितीन ओरायन, गटशिक्षणाधिकारी एम. एन. पाटील, विस्तार अधिकारी प्राजक्ता राऊत, संजय थोरात, वैशाली डोंगरे, अधीक्षिका नीलम पाटील, देवरुंगच्या सरपंच अनिता दळवी, राजेश तरे, विशुभाऊ म्हात्रे (सोनाळे), करिश्मा कशिवले, जानवळ केंद्रातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पालक, केंद्रप्रमुख, खासगी अनुदानित शाळांचे शिक्षक, केंद्रातील इंग्रजी माध्यमातील राज्य, आयसीएसई, सीबीएसईचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
इंगजी जत्रा (English Carnival) या उपक्रमात शिवननगर केंद्रातील एकूण १५ शाळा सहभागी झाल्या होत्या. या वेळी देवरुंग व इतर परिसरातील नागरिकांनी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली. या जत्रेत इंग्रजी विषयाचे आकर्षक असे ३६ स्टॉल मांडण्यात आले होते. तिन्ही सेलसाठी प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका देवरुंग शाळेच्या सुनिता शिंदे यांनी बजावली. जिल्हा परिषद शाळेतील सहभागी प्रत्येक विद्यार्थी अस्खलित इंग्रजीत अचूक माहिती देत असल्याने ते सर्वांचा केंद्रबिंदू ठरले.
आमदार म्हात्रे यांनी आत्मविश्वासपूर्वक विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषाशैली पाहून विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले. केंद्रप्रमुख सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवनगर केंद्र हे ठाण्यातील शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीचे केंद्र असावे, असे प्रतिपादन करतानाच याच केंद्रातील राज्यात नामांकित असलेल्या वैजोळा शाळेचा नामोल्लेख त्यांनी आवर्जून केला.
या प्रसंगी केंद्रातील विद्यार्थ्यांच्या ‘लिटील स्टार’ या विद्यार्थी इंग्रजी हस्तपुस्तिकेचे शिक्षणाधिकारी भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच केंद्रस्तरीय उत्कृष्ट शिक्षक म्हणून जानवळ शाळेच्या विद्या पासलकर, उत्कृष्ट शाळा इताडे, उत्कृष्ट एसएमसी देवरुंग आदी पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी इंग्लडहून आलेल्या शिक्षिका टेरेन ग्रीन यांनी या जत्रेतील सर्व स्टॉल्सना भेट दिली. विद्यार्थ्यांशी इंग्रजीमधून संवाद साधतानाच त्यांचे कौतुक करून मार्गदर्शनही केले. ओशयन यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व व इंग्रजी भाषा प्रत्येकाला येणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद केले. मराठी शाळा इंग्रजी शाळांच्या तुलनेत आता आपला झेंडा रोवत आहेत व प्रगती करताना दिसत आहेत. शिवनगर केंद्रातील आजची ही इंग्रजी जत्रा त्याचेच उत्तम उदाहरण आहे. शिवनगर केंद्राचा हा उत्कृष्ट उपक्रम ठाणे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यास पथदर्शी आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत अशी सुंदर व दर्जेदार इंग्रजी जत्रा पहिल्यांदाच अनुभवल्याचे शिक्षणाधिकारी भागवत यांनी सांगितले. केंद्रप्रमुख पाटील हे या इंग्रजी जत्रेचे आयोजक असून, त्यांच्या उत्तम नियोजनासोबत हा उपक्रम पार पाडण्यासाठी शिवनगर, बापगाव मराठी. ऊर्दू, इताडे, देवरुंग देवरुंगपाडा, मुठवळ, वैजोला, एलकुंदे , वालशिंद, नांदकर, जानवळ ,मूठवळ बाबदेवपाडा, लोनाड या शालांतील शिक्षकांसह मुख्याध्यापक, देवरुंग शाळा व्यवस्थापन समिती, महिला मंडळ, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. देवरुंगपाडा शाळेच्या राजश्री परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.