Next
‘अवनी’स वाचवाया धडपडते एक अवनी!
प्राची गावस्कर
Tuesday, June 05, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या मानवी कृतींचा परिणाम अंटार्क्टिका खंडावर होतो आहे, हे प्रत्यक्ष अनुभवून, आपल्या देशात पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीसाठी विविध देशांच्या युवा प्रतिनिधींची निवड केली जाते. पुण्यातील अवनी अवस्थी ही तरुणी दोन वेळा या उपक्रमासाठी निवडली गेली. वयाच्या चौदाव्या वर्षी ‘रिसायकल आर्मी’ ही छोट्यांची संघटना उभी करून पर्यावरणविषयक उपक्रम राबवणारी अवनी आता व्यापक पातळीवर काम करते आहे. ‘अवनी’ला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या या अवनीबद्दलचा हा लेख.... आजच्या (पाच जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...
..........
समाजासाठी किंवा सार्वजनिक हिताची कोणतीही गोष्ट करायची असली, की किरकोळ अपवाद वगळता प्रत्येकाचा सूर ‘हे आपण कसे करणार? सरकारने केले पाहिजे. आपण किती कुणाला सुधारणार,’ असा असतो; पण त्याच वेळी काही जण मात्र ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ या उक्तीवर विश्वास ठेवून स्वतः त्या कामाचा श्रीगणेशा करत असतात. इतर कोण काय करते, यापेक्षा आपण काय करू शकतो या विचाराने ते पुढे जात असतात. याच तत्त्वावर विश्वास असणारी पुण्यातील तरुणी म्हणजे अवनी अवस्थी. 

सध्या बेंगळुरूत ‘मास कम्युनिकेशन’च्या पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला असलेल्या अवनीचे या क्षेत्रातील काम वयाच्या अवघ्या १४व्या वर्षापासून सुरू झाले. त्या वयात तिने ‘रिसायकल आर्मी’ नावाची बच्चेकंपनीची संघटना स्थापन केली होती. सोसायटीत, आजूबाजूच्या परिसरात सायकलवरून फिरून इतस्ततः टाकलेले टेट्रापॅक जमा करणे, स्वच्छता मोहीम राबवणे, पाणी-विजेची बचत करणे, दिवाळीला फटाके न वाजवणे, होळीला पाण्याचा वापर न करणे असे अनेक मुद्दे मुलांना, मोठ्यांना पटवून देणे, त्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे असे उपक्रम या संघटनेमार्फत ती राबवत असे. त्याचदरम्यान, पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूक असलेल्या ‘टेट्रापॅक’ कंपनीने भारतातील ‘टेरी’ या पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने एक स्पर्धा आयोजित केली होती. ‘पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो,’ या विषयावर दोन मिनिटांचा व्हिडिओ करून पाठवण्याची ही स्पर्धा शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. त्यात अवनीने सहज म्हणून आपण काय करू शकतो याचा व्हिडिओ करून पाठवला. आश्चर्य म्हणजे तिच्या या व्हिडिओला राष्ट्रीय पातळीवर तिसरे बक्षीस मिळाले आणि ‘टेट्रापॅक’ची विद्यार्थी सदिच्छा दूत म्हणून तिची एका वर्षासाठी निवड झाली. त्यामुळे तिचा हुरूप वाढला आणि तिने ‘रिसायकल आर्मी’चे काम अधिक गंभीरपणे करायला सुरुवात केली. 

रॉबर्ट स्वान
तिच्या व्हिडिओने आणि कामाने प्रभावित झालेले ‘टेट्रापॅक’चे पर्यावरण सदिच्छादूत रॉबर्ट स्वान यांनी तिला अंटार्क्टिका अभ्यास मोहिमेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला चालत भेट देणारा पहिला माणूस म्हणजे रॉबर्ट स्वान. पृथ्वी वाचवण्यासाठी त्यांनी ‘२०४१ फाउंडेशन’ स्थापन केले आहे. त्यांच्या ‘२०४१ क्लायमेट फोर्स ग्रुप’मध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशील असलेल्या विविध देशांमधील मुला-मुलींची निवड या मोहिमेसाठी केली जाते. त्यांना अंटार्क्टिका खंडावर नेऊन, ग्लोबल वॉर्मिंगचे तिथे होत असलेले दुष्परिणाम, निसर्गावर होत असलेले आणि भविष्यात होणारे परिणाम यांची माहिती दिली जाते. या क्षेत्रातील तज्ज्ञही तेथे मार्गदर्शन करतात. पर्यावरण वाचवण्यासाठी कोणकोणते उपाय राबवता येतील, याबद्दल चर्चा करून ही मुले उपाययोजना सुचवतात. अवनी पहिल्यांदा २०१६मध्ये या मोहिमेत सहभागी झाली. जगभरातील सहा हजार अर्जांमधून निवडल्या गेलेल्या १८७ मुलांमध्ये अवनीही होती. पुण्यातून अशा मोहिमेसाठी निवड होणारी ती पहिली आणि एकमेव मुलगी होती. 

अर्थात, यात सहभागी होण्यासाठी निम्मा खर्च स्वतः करायचा होता आणि त्यासाठी लागणार होते तब्बल सहा ते सात लाख रुपये. ही रक्कम उभारणे खूप कठीण होते. अनेक कंपन्या, संस्था यांच्याकडे तिने मदत मागितली; पण कोणीही पुढे आले नाही. अखेर ‘क्राउड फंडिंग’द्वारे जनतेकडे मदत मागण्याचाही तिने प्रयत्न केला; पण त्याद्वारेही अवघे एक लाख रुपये जमा झाले. अगदी शेवटच्या क्षणी ‘किर्लोस्कर’ कंपनीने अवनीला आर्थिक मदत दिली आणि अखेर तिचे स्वप्न पूर्ण झाले. 

‘अंटार्क्टिका’वरील अनुभवाबद्दल सांगताना अवनी म्हणाली, ‘उणे २० अंश सेल्सिअस तापमानात नि अनेक मैल बर्फ असलेल्या जगाच्या अंतिम टोकावर काही दिवस राहणे हा विलक्षण अनुभव होता. एका भलामोठ्या जहाजावरून तिथे जायचे, काही काळ तिथल्या भूभागावर उतरून तिथले प्राणिजीवन, वनस्पती, हवामान, भूरचनेत झालेले बदल यांचे निरीक्षण करायचे, असा दिनक्रम असायचा. या क्षेत्रातील तज्ज्ञ वेगवेगळ्या विषयांवर माहिती द्यायचे. मग चर्चासत्रे झडायची. वेगवेगळे उपाय आम्ही सांगायचो. त्यावर साधकबाधक चर्चा होऊन एक उपाय निश्चित केला जात असे. अर्थातच प्रत्येक देशात एकाच प्रकारे उपाययोजना राबवणे शक्य नाही आणि आवश्यकही नाही. त्यामुळे प्रत्येक देशातील प्रतिनिधी आपल्या देशातील परिस्थितीनुसार त्यावर विचारविनिमय करून उपाययोजनांची आखणी करतात. या मोहिमेवरून परत गेल्यानंतर या प्रतिनिधींनी त्यांची अंमलबजावणी करायची असते.’

पुन्हा दोन वर्षांनीही अवनीला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. ती म्हणाली, ‘२०१६मध्ये प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्यानंतर फेब्रुवारी २०१८मध्ये मला परत ‘मेंटॉर’ म्हणून अंटार्क्टिका मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या वेळी २० देशांमधून ८७ मुले सहभागी झाली होती. या वेळी मी सोल्युशन टीमची प्रमुख होते. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या प्रतिनिधींना एकत्र आणून ‘अन्न, ऊर्जा, वाहतूक, पाणी आणि कचरा’ या पाच समस्यांवर कशी मात करता येईल याची चर्चा घडवून आणली जायची. त्यातून नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचवल्या जायच्या. त्यातून काही प्रभावी उपाययोजना निश्चित केल्या जायच्या. या दरम्यान येथील ‘डिसेप्शन आयलंड’ला भेट देण्याची संधी मिळाली. पहिल्या वेळीही मी तिथे भेट दिली होती. अवघ्या दोन वर्षांत तिथला सगळा बर्फ वितळून गेला होता. पर्यावरणाची आपण भयानक हानी केली आहे आणि करत आहोत याची जाणीव इथे आल्यानंतर आणखी तीव्रतेने झाली. पर्यावरण जपले नाही, तर किती भयानक परिणामांना तोंड यावे लागेल, हे आता लक्षात आले आहे. त्यामुळे मी माझ्या परीने जितके होईल तितके प्रयत्न करायचा निश्चय केला आहे.’

‘प्रत्येक देशातील परिस्थितीनुसार उपाययोजना वेगवेगळ्या असतील, हे खरेच; पण तरीही जगभर कोणता सार्वत्रिक उपाय राबवण्याची गरज आहे, असे चर्चेतून पुढे आले,’ असा प्रश्न अवनीला विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘सात वर्षांत जगभरातून ३२० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करणे, हे उद्दिष्ट ठेवून जगभरातील देश ही मोहीम राबवत आहेत. त्यासाठी झाडे लावणे हा एकमेव उपाय आहे. आपण ज्या वेगाने झाडांची कत्तल करत आहोत, प्लास्टिकचा बेसुमार वापर करत आहोत, त्यामुळे मानवी जीवनच पणाला लागले आहे, हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे. पर्यावरण जपण्यासाठी प्रत्येकाने मनापासून काम केले पाहिजे. मोठ्यांनी सांगितल्या, पूर्वापार चालत आलेल्या आहेत, म्हणून आपण अनेक गोष्टी करतो; पण आता त्याकडे सजगपणे बघितले पाहिजे. आंधळेपणाने अनुकरण न करता अशा गोष्टी बाजूला सारल्या पाहिजेत. मी हेच समजावण्याचा प्रयत्न करत असते. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता मी शाळा, महाविद्यालये, रोटरी क्लब, लायन्स क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, महिलांचे गट, विविध संघटना यांच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करते. पर्यावरण जपण्यासाठी साधे साधे उपाय आपण कसे राबवू शकतो, त्यांचे महत्त्व काय हे त्यांना सांगते. माझ्या सोसायटीत अगदी माझ्या आजीच्या वयाच्या लोकांनाही मी समजावून दिवाळी फटाक्यांविना साजरी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. होळीला पाण्याचा वापर केला जात नाही. वीज, पाणी जपून वापरले जाते. आमच्या सोसायटीत आणि आजूबाजूला आम्ही मुले स्वच्छता करायचो, ते बघून आपोआप कचरा बाहेर फेकणे, घाण करणे बंद झाले. त्यामुळे लोकांना सांगण्यापेक्षा आधी आपण करणे यावर माझा जास्त विश्वास आहे. पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही माझी आवड आहे. त्यामुळे मी माझ्या परीने जितके होईल तेवढे करत आहे.’ 

सध्या अवनी बेंगळुरूमध्ये मणिपाल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर पदवी घेण्याचा तिचा विचार आहे. या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृतीचे काम आणखी वेगळ्या व्यासपीठावरून, वेगळ्या पद्धतीने करता येईल, असे तिला वाटते. हे काम आपण पुढेही सुरू ठेवणार असल्याचे ती आवर्जून सांगते. ‘अवनी’साठी धडपडणाऱ्या या ‘अवनी’पासून प्रेरणा घेऊन आपणही पर्यावरण संरक्षणासाठी किमान आपापल्या पातळीवर काम करण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचा मुहूर्त नक्कीच चांगला आहे. 

(अवनी अवस्थीच्या कामाची कल्पना येण्यासाठी सोबतचा व्हिडिओही जरूर पाहा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link