Next
डॉ. सप्तर्षींच्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
प्रेस रिलीज
Friday, August 10, 2018 | 02:19 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘देशात अघोषित आणीबाणी आहे. संसदीय व्यवस्थांचे, संस्थांचे सरकारकडून अवमूल्यन केले गेले आहे. सर्वांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यात येत आहे. राजकीय विरोधकांना बदनाम करून संपवण्यात येत आहे. या अघोषित आणीबाणीविरुद्ध लढून देश जिवंत आहे, हे दाखवून देण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.

युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा नऊ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि प्रफुल्लता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.  

‘इथून पुढे मोदींवर बोलण्याऐवजी मुद्द्यांवर बोलले पाहिजे. पुण्याने देशाला दिशा द्यावी आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यात पुढाकार घ्यावा. नागरिक म्हणून आता गप्प राहता कामा नये. सव्वाशे कोटी जनतेने मनात आणले तर १९७७ सारखे निकाल येऊ शकतात,’ असे सिन्हा यांनी नमूद केले.

‘आणीबाणी विरोधी आंदोलनात डॉ. सप्तर्षी यांची भूमिका महत्त्वाची होती. आज पुन्हा तशीच परिस्थिती आहे. मागील वेळच्या आणीबाणीला संविधानाचा आधार होता; पण, आता चतुराईने अघोषित आणीबाणी राबवली जात आहे. संसदीय व्यवस्था, तपास व्यवस्था, माध्यमे ताब्यात घेऊन नाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताच्या आणीबाणीत धर्मवाद (सांप्रदायिकता) आहे. व्यवस्था शरण गेल्यासारखी अवस्था आहे,’ असे सिन्हा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘कॅबिनेट मंत्रीमंडळ व्यवस्थेची दुर्दशा झालेली आहे. सरकारमधल्या क्रमांक दोनच्या मंत्र्याला, केंद्रीय गृहमंत्र्याला महबुबा मुक्ती सरकारचा पाठिंबा काढल्याची माहिती नसते. नागाविषयक कराराची माहितीही गृहमंत्र्याला नव्हती. परराष्ट्रमंत्र्यांना परदेश दौऱ्यात, कामकाजात सामावून घेतले जात नाही. त्यांचे अशोभनीय भाषेत ट्रोलिंग केले जाते. अर्थमंत्र्यांना नोटा बंदीच्या निर्णयाची माहिती नव्हती. राफेल निर्णयाची माहिती संरक्षण मंत्र्यांना नसते. कॅबिनेट व्यवस्था ‘ग्रुप ऑफ ऑर्डर्ली’ झाली आहे. एकचजण निर्णय घेत आहे, त्याचे श्रेय-अप श्रेय घेत आहे. माध्यमांवरही अघोषित बंधने आहेत. भाजप कार्यालयातून निर्देश सुटतात. पुण्यप्रसून वाजपेयी एबीपी न्यूजमधून काढण्यात आल्यावर त्यांचे म्हणणे माध्यमांनी मांडले नाही. पत्रकारांना आपल्या मुलाबाळांची काळजी वाटते, म्हणून ते आमचे म्हणणे छापू शकत नाहीत, असे मला दिल्ली पत्रकार परिषदेनंतर सांगण्यात आले.’

या वेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाबाबत आपले विचार व्यक्त केले. या वेळी अप्पा अनारसे, सचिन पांडुळे, जांबुवंत मनोहर, सुदर्शन चखाले, रवींद्र धनक, रवी लाटे, आमदार जयदेव गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, संजय बालगुडे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन आदी उपस्थित होते. प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला यशवंत सिन्हा, डॉ. सप्तर्षी यांनी अभिवादन केले. ही तिसरी आवृत्ती प्रफुल्लता प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहे.

पुस्तकाविषयी माहिती देताना डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘१९७० च्या दशकांत अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून तुरुंगात आलेले अनेक अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबतचे लेखन ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकात आहे.’

‘देशात फॅसिस्ट राजवट असल्यासारखे वातावरण आहे, अशावेळी सत्याग्रहाच्या मार्गाने लढले पाहिजे. हे केंद्रातील सरकार गेले पाहिजे, या भूमिकेपर्यंत आम्ही आलो आहोत. काँग्रेसला भाजपविरोधी लढाई पेलवत नसेल, तर सर्व भाजप विरोधी विचारांनी एकत्र यायला हवे,’ असे डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.

डॉ. कोतापल्ले म्हणाले, ‘येरवडा विद्यापीठातील दिवस हे पुस्तक युक्रांद कार्यकर्त्यांसाठी पाठयपुस्तक आहे. व्यवस्थेच्या प्रतिनिधी असणारे मंत्री, पोलिस, जेलची भीती घालवण्याचे काम या पुस्तकाने केले. मराठी साहित्यातील हे महत्त्वाचे पुस्तक आहे. आताच्या काळात परिवर्तनाच्या प्रक्रियेत हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search