Next
‘होय! मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय!’
BOI
Tuesday, November 06, 2018 | 08:00 AM
15 1 0
Share this article:‘लहानपणी शाळेत असताना दिवाळीच्या सुट्टीत अभ्यास असला, तरी त्या दिवाळीची मजा काही औरच होती. किल्ला बनविणं, फटाके वाजविणं, देवदर्शन, फराळ वगैरे वगैरे.. त्या वेळच्या दिवाळीत आपुलकी आणि उत्साह होता. म्हणूनच मला पुन्हा एकदा त्या आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय...’
सातारा जिल्ह्यातले चैतन्य पवार यांनी त्यांच्या आठवणीतल्या दिवाळीबद्दल लिहिलेला हा लेख...  
.............
सायंकाळच्या वेळी झी मराठीवर लागणाऱ्या कौटुंबिक मालिका बघण्यात मग्न असताना, अचानक एक जाहिरात चालू झाली. त्या जाहिरातीचं निमित्त झालं आणि आमच्यातला टिप्पणीकार जागृत झाला. जाहिरात होती मोती साबणाची; पण त्यातल्या अलार्म काकांनी दिवाळीच्या आठवणी मात्र ढवळून काढल्या. हे जरी खरे असले, तरी आमच्या आठवणीत ते काका मात्र नक्कीच नव्हते. कारण गावाकडे सोसायटी नावाचा प्रकार नसतो. आम्ही माणसं गावठी; मात्र गावाकडच्या दिवाळीचा रंग काही औरच होता बरं! त्या जाहिरातीने साबणाची जाहिरात करण्यात यश मिळवले यात प्रश्नच नाही आणि दिवाळीच्या आठवणींत जायलाही नक्कीच भाग पाडले.

माणसाच मन म्हणजे पुष्पक विमानच आहे. स्थळाचं नाव पूर्ण होईपर्यंत मन तिथं हजर! मनाच्या गतीला विश्वात तोड देणारं निश्चितच काहीच नाही. आणि माझं मन तर अतिशय चंचल. त्याने वयाच्या मर्यादाच ओलांडून मला माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये नेऊन आपटलं!!! 

लहानपणी समज कमी असते; पण मन मात्र निरागस असतं. दिवाळीच्या सुट्टीची वाट पाहत पाहत मनामध्ये स्वप्नांचे भले मोठे पूल बांधून तयार. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे दीपावली अभ्यास असणारच. या ‘च’चं महत्त्व खूप आहे बरं! अभ्यासाची भली मोठी पुस्तकं दिली जायची आणि सुट्टी संपण्याअगोदर तो अभ्यास पूर्णत्वास नेणं बंधनकारकच. त्यातूनही दीपावलीची मज्जा काही औरच होती! ‘सुट्टी लागली रे लागली’ अशी बोंब मारत शाळेच्या मैदानावर गोंधळ घालणं हा अलिखित नियमच होता. 

सुट्टी लागली, की पहिली तयारी म्हणजे आपला दिमाखदार किल्ला. इतरांपेक्षा आपला किल्ला कसा वेगळा आणि आकर्षक होईल, याची अटीतटीची स्पर्धा असायची. या तयारीचा पहिला टप्पा म्हणजे लाल माती आवश्यक. आता माती लालच पाहिजे, हे का आणि कोणी शोधलं माहिती नाही; पण लाल मातीने जो चमकदारपणा येतो, तो दुसऱ्या कशातच नाही, या समजुतीने कुस्तीने ठेचून कानाच्या खारका झालेल्या पहिलवानांची नजर चुकवून तालमीतली माती आणणं, म्हणजे एक दिव्यच! त्यातूनही पोतं भरून सायकलवर टाकून आणणं अवघड. मग जोडीदार आला म्हणजे मातीमध्ये त्याचाही वाटा आलाच. किल्ल्याची सामग्री गोळा करून जागेची स्वच्छता करून किल्ल्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जोरदार सुरुवात. इथे माझ्यातला संशोधक जागा झाला. किल्ल्याला जिवंतपणा आणण्यासाठी खूप जुगाड करायचो. पुठ्ठा रंगवून बुरुज, कमानी बनवणं, संक्रांतीचं छोटं मडकं गुहा म्हणून बसवणं, सलाइनची बाटली आणून झऱ्यासारखं पाणी निर्माण करायचं. त्यातच अजून एक शोध लागला, तो म्हणजे पेनाची रीफिल दगडावर घासली, की त्याचा बॉल तुटून जातो. ती रीफिल सलाइनच्या नळीला जोडून तुषार सिंचन तयार. अशी वेगवेगळी जुगाडं करून आमचा दिमाखदार किल्ला कुंभाराकडून आणलेल्या चिनी मातीच्या चित्रांनी खूप शोभून दिसायचा, तेव्हा गर्वाने छाती ५६ इंच फुगायची. पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून चोख बंदोबस्त ठेवणं हे आवडीचं काम.

दिवाळी सुरू होण्यापूर्वी कोजागिरी पौर्णिमेपासूनच गावातल्या मंदिरात भल्या पहाटे रोज काकड आरती, भजन असायचं. वडील कीर्तनकार असल्याने अर्थातच आध्यात्मिक वारसा लाभलेला. त्यामुळे भल्या पहाटे अभ्यंगस्नान करून काकड आरतीला सहकुटुंब जाण्याची गोडी लागली होती. मंदिर थोडंसं लांब होतं. जाण्यासाठी एम-८० गाडी होती; पण कुटुंबातली माणसं सहा! मग जायच कसं? पण इच्छा असेल तर मार्ग मिळतो. मग काय! त्या गाडीच्या पुढच्या अर्धचंद्राकार खळग्यात आम्ही छोटे बहीण-भाऊ दाटीवाटीने बसायचो. वडील गाडी चालवणार, आई मागे बसणार. या दोघांच्या मध्ये मोठी बहीण आणि शेवटचा सदस्य म्हणजे आमची सर्वांत मोठी बहीण गाडीच्या कॅरेजवर. सर्कशीतल्या खेळाप्रमाणे एवढी उलथापालथ करूनही एवढ्या पहाटे थंड गारठ्यात पवार कुटुंबीय मंदिरात हजर असायचं. काकड आरती करून मग सकाळी सहाच्या सुमारास ग्रामदैवतांचं ओळीवार दर्शन. इथे गंमत म्हणजे गावातल्या आया-बाया मात्र नेहमीच लवकर उठून सगळं उरकण्यात व्यग्र. सडा-रांगोळी करणं इत्यादी कामं चालूच; मात्र काही पुरुष मंडळी आपल्या अवाढव्य अशा वाढलेल्या पोटावर एक हात आणि एका हाताने दात घासत, बायकोची ‘आवं पाणी तापलंय, लगोलग अंघूळ करून घेताय नवं!’ अशी आरोळी कानावर पडेपर्यंत नंदीबैलासारखे ढम्म उभे राहायचे. मी मात्र सशासारखं या देवाचं दर्शन घेऊन पुढच्या देवाच्या दर्शनासाठी धावपळ करत प्रसन्न चेहऱ्यानं उड्या मारत जायचो. जाताना अशा खूप गमती पाहायला मिळायच्या. पहाटे साडेचारला उठून देवदर्शन वगैरे या सगळ्याने दिवसभर मन अगदी आनंदात राहायचं.

आता दिवाळी म्हणजे फटाके आलेच. घरची परिस्थिती बेताची. त्यात भर म्हणजे आम्ही चार भावंडं. आणलेल्या फटाक्यांची योग्य वाटणी कधी शांतपणे झालीच नाही. त्यात शेंडेफळ असण्याचा मान मी कधी सोडला नाही. इतरांपेक्षा थोडासा वाटा मला जास्त देणं हे मोठ्या बहिणीचं कर्तव्य, हा नियम मी लागू केलेला. मिळालेल्या फटाक्यांची आतषबाजी वेळापत्रकानुसार करायची, हे सरकारने आता सांगितलंय असं कळतंय; मात्र मी लहान असतानाही वेळापत्रकच करायचो. कारण फटाके संपले तर पुन्हा मिळणार नाहीत याची असलेली जाणीव; पण जे काही मिळालं त्याचा पुरेपूर फायदा घेणं ही कला जन्मतःच अवगत होती.

दिवाळीसाठीचा फराळ बनवायला आईला मदत करणं म्हणजे उगाचंच तिथे लुडबुड करून आईला त्रास द्यायचा. फराळाची भरपूर रेलचेल असायची, इतकी, की दिवाळी संपल्यानंतर एक महिना झाला तरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचारात दिवाळीचा फराळ मिळणारच. करंज्या, बुंदीचे लाडू, कळीचे लाडू, पोह्यांचा चिवडा, चकली, शंकरपाळे, कापण्या हे पदार्थ ठरलेलेच असायचे. पाहुण्यांनी सगळी घरं कशी गजबजलेली असायची. एकमेकांच्या भेटीगाठी, एकत्र येऊन गप्पा... दिवाळी खूप जोमानं साजरी केली जायची. त्या वेळी दिवाळी हा एक सण म्हणून साजरा केला जायचा. त्यामुळे त्यामध्ये आपुलकी असायची, आनंद, उत्साह, असायचा.

आता हे सगळ काही फक्त आठवतंय. आताचे सण एक कर्तव्य म्हणून साजरे केले जातायत. या कृत्रिमपणामुळे दिवाळी एकत्र येऊन, सर्वांना सोबत घेऊन करायची असते, या संकल्पनेला शेवटच्या टप्प्यावर आणून उभं केलंय. आज जेव्हा मागे वळून पाहताना एक लक्षात आलं, की या धावपळीच्या युगात माझ्यातला तो निरागसपणा आणि तो जुगाडू संशोधक कधीच व्हेंटिलेटरवर निपचित पडला ते समजलंच नाही. तरीही माझ्या मनात चिरंतन जिवंत राहिलेल्या आठवणीतल्या दिवाळीचे ते दिवस पुन्हा एकदा जगायचेत. ‘स्मार्ट’ जमान्यात स्मार्टफोन्स बाजूला ठेवून प्रत्यक्ष भेटून, संवादातून सर्वांना शुभेच्छा द्यायच्यात. धावपळीच्या युगाचे नियम झुगारून पुन्हा एकदा ती रात्रभर चालणारी गप्पांची मैफल रंगवायचीय. पुन्हा एकदा लाल मातीचा किल्ला बनवून किल्लेदार व्हायचंय. पुन्हा एकदा थोड्याशा फटाक्यांसाठी भांडायचंय. होय, मला माझ्या बालपणीच्या, आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय.

संपर्क : चैतन्य महादेव पवार
मु. पो. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा
मोबाइल : ९९७०५ ८१८४२
ई-मेल : cmpawar256@gmail.com

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
।गोपाल टालेपाटील About 250 Days ago
लय भारी #
0
0
Suraj Temghare About 251 Days ago
Kadak bhava ✌🙌
0
0
Ganesh Pandhare About 251 Days ago
Kadak....👌.. bhava
0
0
Sachita kakade About 251 Days ago
Kdk Chaitanya
0
0
Minakshi Pawar About 251 Days ago
Kharach bhawa... Asa anubhaw lihila ahe ki juni chan diwali ani tya Diwalitla ek ek kshan athwla, ani thoda manatlya manat enjoy kela Thank u so much tya athawni punha jagya kelyabaddal.
1
0
Nilesh pawar About 251 Days ago
Kaddak. .....Happy Diwali
0
0

Select Language
Share Link
 
Search