Next
इंटरनेटवर आधारित स्मार्ट सिटी अशी असेल!
BOI
Thursday, July 25, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे येत्या काळात शहरे स्मार्ट होणार आहेत. ही स्मार्ट शहरे कशी असतील, हे पाहू या ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ या सदराच्या आजच्या भागात...
........
‘तुमचं शहर म्हणे आता स्मार्ट होत आहे; पण लोकांचं काय?’ त्या दिवशी माझ्या एका मित्राने जाता जाता म्हटलेल्या या वाक्याने एकदम विचार करायला भाग पाडले. स्मार्ट होतेय म्हणजे नक्की काय होतेय? 

त्या दिवशीच ठरवले, की याविषयी अधिक माहिती करून घ्यायला हवी. मग इंटरनेटवर जाऊन वाचायला सुरुवात केली. माणसे माणसांशी बोलतात. माणसे मशीनशी बोलतात हेही ऐकले होते; पण मशीन मशीनशीपण बोलते? हो बोलते - यालाच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (IoT - आयओटी) असे म्हणतात, हे तेव्हा लक्षात आले. अलीकडे रोजच्या वापरातील अनेक ठिकाणी अशा गोष्टी आपण पाहतो; पण त्यामागे हे तंत्रज्ञान आहे. 

तंत्रज्ञान खोलात जाऊन किती कळते आहे, यापेक्षा त्याचा वापर आपण कसा आणि कुठे करतोय हे कळले पाहिजे असे वाटले. मग निरीक्षणे करायला सुरुवात केली.

स्मार्ट बस, स्मार्ट स्ट्रीट लायटिंग हे शब्द याच संबंधात आहे, हे कळले. आपण जेव्हा मोबाइलवरून टॅक्सी किंना रिक्षा बोलावतो, तेव्हा ड्रायव्हरला बरोबर कसे कळते, की आपण नेमके कुठे आहोत? आपण उभ्या असलेल्या ठिकाणाच्या आसपास असलेल्याच ड्रायव्हरलाच संदेश कसा पोचतो, हे सगळे प्रश्न समोर येत होते. ‘जीपीएस’विषयी (Global Positioning System) कळल्यावर लक्षात आले, की याचाच वापर करून एक मोबाइल दुसऱ्या मोबाइलशी बोलतो (हो, एक मशीन दुसऱ्या मशीनशी)

संवेदक अर्थात सेन्सर (Sensor) या घटकाचा एकूणच ‘आयओटी’मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तापमान ओळखण्यासाठी, उंची मोजण्यासाठी, तसेच आत्ता प्रकाश आहे का अंधार, हे कळण्यासाठीही सेन्सरचा वापर केला जातो.

स्मार्ट सिटीविषयी पाहताना, त्यामध्ये अजून काय काय होऊ शकते आणि होणार आहे, हेही पाहू या!

स्मार्ट पार्किंग : पार्किंगसाठी रिकामी जागा कुठे आहे, हे शोधण्यासाठी ड्रायव्हरला मोबाइल अॅप्लिकेशन मदत करणार. 

ऊर्जाबचत : रस्त्यावरचे दिवे रस्त्यावर कुणी नसताना आपोआप मंद होणे, उजेड असताना बंद होणे आणि अंधार झाल्यावर चालू होणे, या गोष्टी शक्य होऊ शकणार. यातून ऊर्जेची बचत होईल.

स्मार्ट बस स्टॉप्स : आपल्याला ज्या बसने जायचे आहे, ती बस आता कुठपर्यंत आली आहे आणि आपल्या स्टॉपला किती वेळात येणार आहे, हे तंतोतंत सांगणारे फलक स्मार्ट बस स्टॉप्सवर असतील. 

स्मार्ट वॉटर मीटरिंग : पाणी स्वच्छ, पिण्यायोग्य आहे की नाही, त्याचा योग्य वापर केला जात आहे ना, हे ओळखण्यासाठी स्मार्ट वॉटर मीटर बसविले जातील.

स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट : रस्त्यावरील गर्दीनुसार ट्रॅफिक सिग्नलची वेळ ठरवणे, आवश्यक तिथे वेगळे मार्ग दाखवणे अशा गोष्टी यामध्ये केल्या जातात. 

- वातावरणातील बदल, हवेतील प्रदूषण ओळखण्यासाठीही यंत्रणा असेल.

- स्मार्ट कचरापेट्यांचाही वापर होईल.

- सार्वजनिक सुरक्षिततेसाठीही ‘आयओटी’चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात, दुष्काळ, पूर, भूस्खलन किंवा वादळ यांसारख्या गोष्टींची कल्पना आधीच येण्यासाठी स्मार्ट सेन्सरचा वापर केला जातो. 

अशा सगळ्या सेवा स्मार्ट सिटी प्रोजेक्टमधून आपल्याला उपलब्ध होणार आहेत. शहर व्यवस्थापनात येणारा कोणताही भाग स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये येऊ शकतो, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल.

स्मार्ट सिटी म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’वर आधारित असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गॅजेट्सचा वापर करून त्यातून माहिती गोळा करणे आणि तिचा उपयोग शहरातील विविध स्रोत, साधनसंपत्ती यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी वापरणे. 

‘स्मार्ट सिटी’ची व्याख्या प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने करतो. ‘स्मार्ट’ यंत्रणेचा वापर करून शहरात राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन आयुष्य सुखाचे करणे हा त्यामागचा उद्देश असतो. यात अनेक आव्हानेही आहेत. स्मार्ट सिटीच्या उपक्रमामध्ये सर्व स्तरांवरील लोकांचा सहभाग आवश्यक आहे. 

शहरातील नेत्यांनी स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या फायद्यांबद्दल जनजागृती केली पाहिजेच. परंतु स्मार्ट तंत्रज्ञानाच्या साह्याने गोळा केल्या जात असलेल्या माहितीच्या आधारे आणखी काय करता येईल, हे पाहायला पाहिजे, त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आपल्या त्यातील सहभागामुळे काय फायदे होतील, हे लोकांना माहीत असेल, तर ते सहभागी होण्याची शक्यता अधिक असते. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील, तसेच शहरातील नागरिकांमधील सहकार्यभावना वाढविणे, या गोष्टी स्मार्ट नागरिक तयार करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 

स्मार्ट सिटी अॅप्सद्वारे नागरिक बिले भरणे, सार्वजनिक वाहतुकीचा चांगला पर्याय शोधणे, अशी कामेही करू शकतात. या सगळ्याचा वापर करताना, डेटा हॅकिंग किंवा त्याचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. 

स्मार्ट सिटी गव्हर्न्मेंट वेबसाइटच्या म्हणण्यानुसार लंडन हे जगातील सगळ्यात जास्त गुणांकन असलेले स्मार्ट शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याचा नंबर जगात छत्तिसावा आहे.

अनुष्का शेंबेकर- अनुष्का शेंबेकर
मोबाइल : ९८२२९ ९९३६६
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

(‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashish Chavan About 84 Days ago
Very very useful information Anushka. Thanks.
2
2

Select Language
Share Link
 
Search