Next
‘राज्यातील परिवर्तन हे टीमचे कर्तृत्व’
BOI
Wednesday, April 25, 2018 | 11:29 AM
15 0 0
Share this article:मुंबई :
‘गेल्या तीन-साडेतीन वर्षांत महाराष्ट्रात जे काही परिवर्तन घडवू शकलो, ते माझे एकट्याचे नव्हे, तर माझ्या टीमचे कर्तृत्व आहे. राज्याच्या विकासासाठी हे मिशन हाती घेताना पारदर्शकता आणि सकारात्मकता हे सूत्र ठेवले. लोकांच्या समस्या सोडविताना त्यांना मान्य होतील, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या कालावधीतील परिवर्तनशील योजनांचा धावता आढावा ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकात आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

पुण्यातील पत्रकार आशिष चांदोरकर यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन लिहिलेल्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन २४ एप्रिल २०१८ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी या वेळी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. साकेत प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘हे पुस्तक आत्मचरित्र नाही, गौरवगान नाही, तर गेल्या तीन-साडेतीन वर्षांतील उल्लेखनीय कामांचे, योजना, निर्णयांचे आणि परिणामांचे संकलन आहे. हे मिशन माझ्या एकट्याचे नाही, तर माझ्या टीममुळे महाराष्ट्रात जे परिवर्तन घडवू शकलो, त्या परिवर्तनाची गाथा म्हणजे हे पुस्तक आहे. लोकांच्या समस्या सोडविताना, जे त्यांना मान्य आहेत असे निर्णय घेतले. त्यामध्ये श्रेयवाद कधीही केला नाही. यामुळे वेगवेगळ्या समुदाय, शेतकऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जनहिताकरिता निर्णय घेतला, की त्याच्या परिणामांची चिंता करू नये, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले तत्त्व कसोशीने पाळले. राज्यात रखडलेल्या, गेली कित्येक वर्षे चर्चेत असलेल्या शंभर प्रकल्पांना त्यांच्या प्रेरणेतूनच कार्यान्वित केले.’

‘‘जलयुक्त शिवार’सारखी योजना आता लोकचळवळ बनली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘मिशन मोड’मधील योजना आता ‘ऑटो मोड’वर कार्यान्वित झाल्या आहेत. ‘जलयुक्त शिवार’मुळे महाराष्ट्रातील दुष्काळ इतिहासजमा होईल, असा विश्वास वाटू लागला आहे. आरोग्यासह अनेक क्षेत्रांत सरकारने अनेक महत्त्वपूर्ण आणि लोकांच्या हितांचे निर्णय घेतले आहेत. त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्याचे पाहून अनेकदा मोठे समाधान वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा नेतृत्व म्हणून मुख्यमंत्रिपदाची संधी दिली; पण हे पद महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे, याची जाणीव करून दिली होती. महाराष्ट्रातील जनतेत मोठी ताकद असल्याचे त्यांनी त्या वेळी नमूद केले होते. त्यामुळे यापुढेही सकारात्मकता आणि पारदर्शकता यातूनच महाराष्ट्र हे सक्षम आणि समृद्ध राज्य बनेल असा विश्वास वाटतो,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केल्याचे ‘महान्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत विकासांच्या विविध प्रकल्पांचाही उल्लेख केला. तसेच उद्योजक आनंद महिंद्र यांच्यासह देश आणि विदेशातील संस्था, संघटनांनी महाराष्ट्राला प्रगतशील राज्य म्हणून मानांकने दिल्याचा उल्लेखही केला

‘मिशन मोडमधील महाराष्ट्राला विकासाची दिशा देण्याचे काम गेल्या साडेतीन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहे. हे परिवर्तन घडवितानाच प्रामाणिकपणा, निष्कलंक आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची इतिहास नोंद घेईल,’ असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी व्यक्त केले. 

गडकरी म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत जे काम केले आहे. त्या वस्तुस्थितीचे विश्लेषण लेखक चांदोरकर यांनी या पुस्तकात केले आहे. या सरकारने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात अजोड अशी कामगिरी केली आहे. मराठवाड्यासह, विदर्भाच्या नुकत्याच केलेल्या दौऱ्यात सरकारच्या या कामाची चुणूक लक्षात आली. यापूर्वी लागणाऱ्या टँकर्सच्या संख्येत लक्षणीयरीत्या घट झाली आहे. गेली वीस वर्षे राज्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडले होते. या प्रकल्पांमुळे भांडवली गुंतवणूकही संपल्यातच जमा होती. असे हे सर्व प्रकल्प या सरकारने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेषत्वाने लक्ष घातले. यामुळे रखडलेले हे १०८ प्रकल्प मार्गी लागले आहेत. यातील साठ टक्के प्रकल्प येत्या जूनपर्यंत पूर्ण होतील, अशा टप्प्यांवर पोहोचले आहेत. यामुळे राज्यातील सिंचनाखालील क्षेत्राची टक्केवारी १८ वरून ४० टक्क्यांवर पोहोचेल. याचा लाभ पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना होणार असल्याने, आत्महत्याग्रस्त भागालाही दिलासा मिळणार आहे. राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडण्याचे उल्लेखनीय कामही सरकारने केले आहे.’

‘महाराष्ट्रात मोठे बदल होत आहेत. पायाभूत सुविधा, औद्योगिक क्षेत्र, त्यासाठी येणारी गुंतवणूक, त्यातून निर्माण होणारे रोजगार यामुळे महाराष्ट्राची प्रतिमाही बदलते आहे. आरोग्य, वैद्यकीय सुविधा, आदिवासी-वनवासी यांच्यासाठीचे काम, मुंबई या शहराला कमर्शियल कॅपिटल बनविण्यासाठीचे प्रयत्न, अशा सर्व प्रयत्नांमुळे महाराष्ट्र मिशन मोड पद्धतीने वाटचाल करू लागला आहे. यातून फडणवीस सरकारने स्वच्छ, पारदर्शक प्रशासन आणि निर्णय घेणारे सरकार अशी प्रतिमा निर्माण केली आहे,’ असेही गडकरी यांनी आवर्जून नमूद केले. या वेळी त्यांनी राज्यातील जलयुक्त शिवार प्रकल्पासह, विविध सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांचाही उल्लेख केला.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव येत्या काही वर्षांत साजरा होईल. त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचे आहे. देवराष्ट्र या गावातून आलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी या राज्याची स्थापना केली. त्यामुळे देवराष्ट्र ते देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राचा प्रवास महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने जी कामे केली, ती लोकांपर्यंत पोहोचली की नाहीत, याचा धांडोळा या पुस्तकात आहे. यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचा उल्लेखही अनेकदा आहे. ही प्रतिमा टिकविण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कामातूनही दाखविले आहे. काम करणारे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रालाही अशाच तरुण नेतृत्वाची गरज होती. मुख्यमंत्री फडणवीस ती समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याला योग्य वेळी, योग्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रूपाने मिळाला आहे.’

पुस्तकाचे लेखक आशिष चांदोरकर यांनी प्रास्ताविकात पुस्तकाचा लेखनप्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘राज्यातील पंचवीस जिल्ह्यांत दौरा केला. सामान्य नागरिक आणि योजनांचे लाभार्थी यांच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या. ‘जलयुक्त शिवार’सारख्या योजनांत सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. अनेक प्रयोगशील उपक्रमांची पाहणी केली. सरकारी योजनांचा लाभ कसा झाला, याच्या सुमारे पस्तीस यशकथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. माध्यमांतील, समाजमाध्यमातील चर्चेच्या पलीकडे जाऊन, राज्यात अनेक चांगल्या गोष्टी घडताहेत हे वेगळे चित्र दिसले. विशेषत: नागरिकांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी प्रेम असल्याचे जाणवले. मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षमता आणि धडाडीविषयी लोक भरभरून बोलले. लोकांचे जे मत आहे, तेच या पुस्तकाद्वारे मांडले आहे.’

साकेत प्रकाशन संस्थेचे बाबा भांड यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले. या कार्यक्रमाला राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

(‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search