Next
५० कोटी वृक्षलागवडीच्या निमित्ताने...
BOI
Thursday, July 04, 2019 | 10:00 AM
15 0 0
Share this article:


बदलत्या हवामानात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे तो झाडे लावण्याचा. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील तीन कोटी सात लाख हेक्टर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आहे, परंतु याचे प्रमाण वाढवण्याची गरज ध्यानात घेऊन ३३ टक्के क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणण्यासाठी ५० कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आला आहे. या निमित्ताने वृक्षलागवडीसंदर्भातील विवेचन करणारा हा लेख...
..................
सर्वसामान्य नागरिकांना मुळातच निसर्ग जपण्याची आंतरिक ओढ असते. त्यांच्या या आंतरिक भावनेला हात घातला आणि त्यांना सजग केले, तर खरोखरच मोठे काम होऊ शकते. दर वर्षी पाच जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो, परंतु  ही तारीख आपल्या हवामानाला सुसंगत वाटत नाही. हवामानातील बदलांमुळे अलीकडे मृग नक्षत्राचा पाऊस बेभरवशाचा झाला आहे. दोन-तीन पाऊस पडल्यावर रोपे लावली, तर ती तग धरण्याची, जगण्याची शक्यता अधिक असते. म्हणून मृगाचा आणि आर्द्राचा पाऊस पडून गेल्यावर म्हणजेच जुलै महिन्यात झाडे लावली आणि त्यांची निरंतर जोपासना केली तर अधिक फायदेशीर ठरेल. यंदाचे असह्य करून टाकणारे तापमान, पाण्याची तीव्र टंचाई आणि न भूतो न भविष्यति असा भीषण दुष्काळ व त्यामुळे एकंदर जनमानसावर, सृष्टीवर झालेल्या परिणामांमधून उद्भवलेल्या अनेकविध समस्यांचा वेध घेत असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे झाडे लावणे त्यांची जोपासना करणे, त्यांना जगवणे. झाडांची संख्या वाढली, तरच या समस्या सुटणार आहेत. एका पर्यावरण शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे, की झाड म्हणजे आकाशाला जमिनीचे निरोप देणारे टॅावर आहेत. झाडांमार्फत ठरावीक काहीतरी संदेश यंत्रणा कार्यान्वित आहे, जी पाऊस-ऊन-वारा यांना नियंत्रित करते, असे त्याने सप्रमाण सिद्ध केले आहे. झाडे आकाशाला निरोप देतात, असा नुसता विचार केला, तरी सद्य परिस्थितीत निसर्गाला वाचवण्याचे प्रयत्न मनापासून करावेसे वाटतात. 

पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर समाजातील सर्वच घटकांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी ते फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षणाची आठवण केवळ पर्यावरणदिनीच येत असेल, तर ती आपली एक भयंकर चूक आहे असे समजावे. जग बदलत राहणार, नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनात परिवर्तने घडवतच राहणार. मोठी मोठी शहरे उभारली जाणार, आपले जीवन अधिक सुखमय व्हावे, म्हणून प्रयत्न करत राहणार. याचा अर्थ निसर्गाचे चक्र रोखण्याचा परवाना आपल्याला मिळाला असे नाही. ग्लोबल वाॉर्मिंगची चर्चा केवळ जागतिक स्तरावर किंवा राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी नाही, तर त्यावर आपण सर्वांनी मिळून मात करण्यासाठी शाश्वत रक्षणाचा मार्ग अवलंबल्यास हिताचे ठरेल. मागील पिढी शाळेत शिकली त्या वेळी निसर्गच मुख्य शिक्षक होता. पर्यावरण, वन्य प्राणी, झाडे-वनस्पती, जंगले हे आताच्या पुस्तकातले विषय मागच्या पिढीचे सोबती होते. 

ग्रामीण भागात अजूनही पर्यावरणाचे जतन केले जाते, परंतु छोट्या–मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढतच आहे. या दृष्टीने शाळेपासूनच अगदी गांभीर्याने याविषयी शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ‘आयआयटीएम’ या संस्थेच्या अभ्यासात नुकतेच असे आढळले आहे, की आपण आयुष्यातील सरासरी साडेतीन वर्षे प्रदूषित हवेमुळे कमी करत आहोत. एका दृष्टीने ही आत्महत्याच म्हणावी लागेल! वाहनांमुळे उत्सर्जित होणारे प्रदूषित वायू  मनुष्याच्या शरीरात गेल्यामुळे श्वसनाचे विकार होण्याचे प्रमाण राज्यात सात टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे आपण काही छोट्या गोष्टी आताच केल्या, तर त्याचे दीर्घकालीन परिणाम नक्कीच दिसतील.

संतुलित पर्यावरणामुळे निसर्गाचे चित्र बिनबोभाटपणे फिरत राहते. जैवविविधतासुद्धा या चक्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. जंगलांची भूमिका तर अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय वननीती १९८८च्या धोरणानुसार एकूण भैागोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे असताना राज्यात हे प्रमाण साधारण २० टक्के इतके आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रगतिशील आणि आघाडीचे राज्य आहे. राज्यातील तीन कोटी सात लाख हेक्टर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आहे. परंतु याचे प्रमाण वाढवण्याची गरज ध्यानात घेऊन ३३ टक्के क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणण्यासाठी ५० कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदा करण्यात आला आहे. वने ही पर्यावरण संतुलनासाठी आणि माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाची आहेत. शुद्ध हवेपासून ते वनोपजांपर्यंत विविधांगांनी ती माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत. त्या‍मुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


झाडे आपल्याला काय देतात? 
एक झाड ५० वर्षांत वायू प्रदूषणामुळे होणारे ३५ लाख रुपयांचे नुकसान टाळते. एक झाड ४० लाख रुपये किमतीच्या पाण्याचे रिसायकलिंग करते. एक झाड एका वर्षात तीन किलो कार्बन डायऑक्साइडचा नाश करते. एक परिपूर्ण झाड एक हजार माणसांचे जेवण शिजविण्यासाठी उपयोगी पडते. एका झाडापासून आसपासच्या परिसरातील तापमान दोन अंशांनी कमी होते. एक झाड १२ विद्यार्थ्यांची वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते. एका झाडामुळे १०० पक्षी घरटी बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या २५ पिढ्या जन्माला येतात. मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास त्याची संख्या लाखांवर जाते. एक झाड धुपीमुळे होणारे १८ लाख रुपयांचे नुकसान  थांबवते. 

एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्यापासून ते आरामखुर्चीपर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठीपासून स्मशानातील लाकडांपर्यंत साथ देते. एक झाड आपल्या पालापाचोळ्याची भर टाकून जमिनीचा कस वाढवते. एक झाड फळे, फुले, बिया देते. परिसरात जास्त प्रमाणात असलेली झाडे पावसासाठी पोषक वातावरण तयार करतात. झाडे ही पावसाचे पडणारे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठीही मदत करतात. पूर्वी वृक्ष भरपूर होते, म्हणून पाणी मुबलक उपलब्ध होते. मुसळधार पावसात झाडे नसलेल्या भागातील माती सैल झाल्यामुळे पाण्याबरोबर सहज वाहून जाते. परंतु वृक्ष असलेल्या ठिकाणी झाडांची मुळे माती धरून ठेवतात. मातीची झीज होत नाही. एकंदरीतच मृद व जलसंधारणाचे महत्त्वाचे काम झाडे करतात. अशुद्ध हवा शुद्ध करण्यासाठी झाडांची गरज आहे. वड, पिंपळ, तुळस इत्यादी झाडे आपणास शुद्ध हवा देतात. वृक्षाच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. कारण हवा शुद्ध असते. झाडे प्रदूषण नियंत्रणात ठेवतात. तेव्हा निरामय आरोग्यासाठी ओतप्रोत भरलेल्या निसर्गाची कुशी आपल्याला हवी असेल तर झाडे लावायलाच हवी.

झाडे लावताना स्थानिक झाडांचा विचार जरूर करावा. पर्यावरणपूरक झाडांची लागवड करून आपल्याबरोबर इतर वन्यजीवांचाही जीव वाचवावा. हवामान स्वच्छ ठेवण्यासाठी थुजा, पळस, सावर, कदंब, अमलताश ही झाडे लावावीत. पळस व चारोळी ही झाडे हवेतील प्रदूषण दर्शवतात. वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, कडुनिंब, कदंब ही झाडे १२ तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी आहेत. धुळीचे कण व विषारी वायूपासून संरक्षण करण्यासाठी आंबा, अशोक, बकुळ, सोनचाफा, जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तुळस, मोगरा हे सर्व जीवनदायी वृक्ष लावावीत. 

पिंपळ, करंज, पुत्रजीवी, उंबर, अशोक, शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, रामफळ, अमलताश, पेरू, बोर, कडुनिंब, आवळा, चिंच, कदंब, मोह, बेल ही झाडे औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारणासाठी लावावीत. विविध रोगांवर हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुनिंब, करंज, रिठा, निरगुडी या औषधी वनस्पती मानवजातीला अत्यंत उपयुक्त आहेत. शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उंबर, करंज, साधी बाभूळ, शेवरी ही झाडे उपयुक्त आहेत. आवळा, अंजीर, फणस, चिंच, तुती, करवंद, बोर,करंज ही झाडे वनशेतीसाठी उपयुक्त आहेत. रस्त्याच्या मधील भागात कोरफड, शेर, कोकली, रुई, जट्रोफा, अश्वगंधा, सीताफळ ही झाडे लावावीत. बांबू, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कडुनिंब, कढीपत्ता ही झाडे शेताच्या बांधवार लावण्यास योग्य आहेत. शेताच्या कुंपणाला सागरगोटा, चिल्लर, शिकेकाई, हिंगणी, घायपात, जट्रोफा ही झाडे लावावीत. रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल ही झाडे घराभोवती लावण्यास योग्य आहेत. सरपणासाठी देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावड, बांबू ही झाडे उपयुक्त आहेत. वरीलप्रमाणे वृक्ष लागवड केल्यास आपल्या परिसरातील जैवविविधता  संरक्षित होण्यास मदत होते.

समाजाची मानसिकता बदलण्यासाठी शासनापेक्षाही सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ कायदे करून किंवा फक्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. अनेक लहान लहान गोष्टींमधून आपण सुरुवात करू शकतो. आपल्या राज्यात वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. तिचा वापर काटकसरीने केला, तर वीज  वाचेल. सौर शेगडी, सूर्यचूल वापरली, तर गॅसची बचत होईल. सार्वजनिक वाहनाने प्रवास केल्यास इंधनबचत होईल, कागदाच्या दोन्ही बाजू लिखाणासाठी वापरल्यामुळे कागदाची बचत होईल. शासनातील कागदांचा अनावश्यक वापर कमी करण्याचीसुद्धा गरज आहे. ‘पेपरलेस वर्क’वर भर देण्याची आवशकता आहे. प्लास्टिक कॅरीबॅग वापरण्यापेक्षा कापडी पिशव्यांवर भर द्यावा. पर्यावरणपूरक विकास हा आपल्या सर्वांचा ध्यासच नव्हे, तर श्वासही झाला पाहिजे आणि यासाठी साधी सोपी सूत्रे पाळली पाहिजेत. कमीत कमी वृक्षतोड होईल असा आराखडा तयार करणे, ज्या झाडांची तोड अपरिहार्य आहे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे.

‘फॉरेस्ट’ या शब्दातच फूड, ऑक्सिजन, रेन, एनर्जी, सॉईल आणि टिक असे जीवनाशी संबंधित सर्व घटक समाविष्ट असल्याने पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर वनाचे महत्त्व ओळखण्याची गरज आहे. शासनाने जरी आपली जबाबदारी समजून हा उपक्रम सुरू केला असला, तरी शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि चांगल्या पर्यावरणासाठी वृक्षाचे महत्त्व समजून नागरिकांचा सहभाग वाढणे आणि त्यात सातत्य असणे हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘आता एकच लक्ष्य, ५० कोटी वृक्ष’ असा संकल्प करून या वसुंधरेचे सौंदर्य जपू या 
आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याची मजबूत पायाभरणी करू या! समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू या!

- डॉ. आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search