Next
निराधार बालकांना मायेचा आधार देणारी ‘सोफोश’
BOI
Friday, June 29, 2018 | 03:45 PM
15 1 0
Share this article:सार्वजनिक स्थळी सापडलेल्या निराधार बालकांना हक्काचे घर आणि प्रेम देणारे आई-बाबा मिळवून देण्याचे काम पुण्यातील सोफोश (सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ दी ससून) ही संस्था गेल्या ५५ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या ‘सोफोश’बद्दल...
..............
कुटुंबात बाळाचे आगमन होणार, या बातमीनेच सारे घर आनंदून जाते. त्या गोड बातमीपासूनच बाळाच्या जन्माची रात्रंदिवस वाट पाहिली जाते. आई-वडील बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक स्वप्ने बघतात. बाळाचा जन्म होताच आनंदोत्सव साजरा केला जातो; मात्र काही बाळांच्या नशिबात आई- वडिलांचे प्रेम नसते. जन्मत:च त्यांच्यावर अनाथ असल्याचा शिक्का बसतो. अशा मुलांसाठी पुण्यातील एका संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.

श्रीवत्सकुमारी मातांना झालेल्या आणि सार्वजनिक स्थळी सापडलेल्या निराधार बालकांना हक्काचे घर आणि प्रेम व माया देणारे आई-बाबा मिळवून देण्याचे काम सोफोश (सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ दी ससून) ही संस्था गेल्या ५५ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. ही एक शासनमान्य सेवाभावी संस्था आहे. ५५ वर्षांपूर्वी ससून रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी द्रविड आणि हर्शिला मनसुखानी यांनी रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी अधिष्ठाता डॉ. मेंडोंसा यांच्या मार्गदर्शनाखाली १९६४मध्ये ‘सोफोश’ची स्थापना केली. ‘सोफोश’च्या स्थापनेत जयश्री वैद्य, सुमन किर्लोस्कर, लीला मर्चंट, गुल मनसुखानी, भाऊराव साबडे, यशवंत मेहेंदळे यांचाही सहभाग होता. 

गरीब व गरजूंसाठी काम करत असताना रुग्णालयात दाखल होणाऱ्या निराधार बालकांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. या बालकांची काळजी रुग्णालयात इतर बाळांसोबत घेतली जात असे. त्यामुळे बाळ दगावण्याचे प्रमाण वाढू लागले. बालकांसाठी वेगळी सुविधा सुरू करण्याची कल्पना मंदाकिनी द्रविड व हर्शिला मनसुखानी यांना सुचली आणि त्यातून श्रीवत्स या संस्थेचा जन्म झाला. 

येथे बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचे संगोपन केले जाते. शंभर मुलांचा सांभाळ करण्याची या संस्थेची क्षमता असून, सध्या ४८ मुले वास्तव्य करत आहेत. यात एक वर्षापर्यंतच्या २० मुलांचा समावेश आहे. ससूनच्या माध्यमातून काम करत असताना ‘श्रीवत्स’मध्ये अनेकदा शारीरिकदृष्ट्या बहुविकलांग बालकेदेखील येत. या मुलांची वेगळी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून २००८मध्ये ‘सोफोश’ने पिंपळे गुरव येथे तारा सोफोश धडफळे सेंटर सुरू केले. तेथे ४० बहुविकलांग बालकांना मायेची ऊब दिली जाते. आजपर्यंत ‘सोफोश’ने ५२३२ बालकांना मायेचे छत्र व आधार दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मूल दत्तक घेण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्र सरकारने मुले दत्तक देण्यासाठी तयार केलेल्या ‘कारा’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार श्रीवत्स संस्थेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. ४४ वर्षांपूर्वी ‘श्रीवत्स’मधून पहिले बाळ दत्तक देण्यात आले. आतापर्यंत या संस्थेने ३१५२ बालकांना हक्काचे घर आणि आई-बाबा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे. 

५५ वर्षांमध्ये सोफोश संस्थेचे कार्य वटवृक्षासारखे विस्तारले आहे. विशेष म्हणजे संस्थेतून दत्तक गेलेल्या काही मुला-मुलींनी पुन्हा याच संस्थेतून मूल दत्तक घेतले आहे. संस्थेतून दत्तक गेलेली मुले विविध क्षेत्रे पादाक्रांत करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू लिसा स्थळेकर ही सोफोश संस्थेतूनच दत्तक गेली होती. संस्थेत ५५ वर्षांपूर्वी आलेली सुजाता नावाची पहिली महिला आजही ‘ससून’मध्येच काम करत आहे. 

तारा सोफोश धडफळे सेंटरसंस्थेच्या कार्याबद्दल माहिती सांगताना ‘सोफोश’च्या प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद म्हणाल्या, ‘आपल्या समाजात कुमारी माता व त्यांच्या मुलांचा स्वीकार केला जात नाही. अशा वेळी नाईलाजाने बालकांना आमच्याकडे सोडले जाते. ते मूल जगू नये म्हणून त्याच्या तोंडावर अॅसिड फकणे, वार करणे, त्याला रेल्वे ट्रॅकवर ठेवणे, यांसारखे माणुसकीला काळिमा फासणारे प्रकारही अनेकदा केले जातात; मात्र कोणत्या न कोणत्या मार्गाने देव निराधार बालकांना आमच्यापर्यंत पोहोचवतो. या मुलांची काळजी घेण्यासाठी ६५ केअरटेकर आहेत. आमच्या संस्थेतील मुलांना परदेशातील नागरिकदेखील दत्तक घेतात.’ सोफोश, श्रीवत्स व तारा सोफोश या तिन्ही संस्था नागरिकांनी दिलेल्या देणग्यांवर सुरू असून, संस्थेला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन सय्यद यांनी केले आहे. (त्यांच्या मनोगताचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिला आहे.)

मुलांसाठी संस्थेत वेळोवेळी विविध कार्यक्रमही आयोजित केले जात असतात. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी त्या महिन्यात वाढदिवस असलेल्या मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो. विविध सण उत्साहात साजरे केले जातात. तसेच मुलांच्या आनंदासाठी सहलींचे आयोजन करण्यात येत असते. एकंदरीतच, या मुलांना आधार देण्याबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या कार्याला शुभेच्छा!!!

संपर्क : सोफोश संस्था, ससून रुग्णालय, पुणे
फोन : (०२०) २६१२ ८२१९
वेबसाइट : http://www.sofosh.org/

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search